मला खुप आवडते त्याचे जगणे...

Submitted by मुग्धमानसी on 23 January, 2013 - 00:49

मला खुप आवडते त्याचे जगणे...

तो जगतो म्हणजे कधीही फक्त जिवंत नसतो... फक्त श्वास घेत नसतो...
तो खरोखर जगतो!
त्याच्याही जगण्याला आकार-उकार, काना-मात्रा, वेलांट्या वगैरे सगळं आहे. तुम्हाला आम्हाला असतं तसं.
त्याच्याही जगण्याला आहेच की दुःखाची किनार, सुखाची झालर... वगैरे वगैरे..

पण तरिही त्याचं जगणं उन्हात चमकणार्‍या भरजरी वस्त्रासारखे सुंदर वाटते...
आणि माझं जगणं त्याच्या जगण्यापुढे एखादा मलमलीचा तुकडा सावलीत वाळत घातल्यासारखं... स्वच्छ, शुभ्र,... पण तरिही त्याला भरजरीची सर नाही!

कुठून आणत असेल तो ही उर्जा?
कुठून शिकला असेल तो हे... जगणे?

मला शिकवशील का रे? कधिपासून प्रयत्न करते आहे... तुझी नक्कल उतरवण्याचा...
कुठल्या कुठल्या मीच मला घालून घेतलेल्या बंधनांत पार अडकून पडलेय मी.

मी बंदिस्त झालेय स्वतःभोवती उभारलेल्या उंचच उंच भिंतींत...
पण त्याही सहज भेदून तू पोचतोस माझ्यापर्यंत... माझ्या आत!
पण उघड्या कवाडांच्या, बिनभिंतींच्या, बिनछपराच्या घरात राहणारा तू... माझ्यापेक्षा जास्त सुरक्षित कसा?
तुझ्या भोवती असतात दिशांच्या स्वच्छंद भिंती... ज्या आजवर मला भेदता आल्या नाहीत.

मला हेवा वाटतो तुझा... तुझ्या जगण्याचा.
मी स्वतःला समजावते... दिवस रात्र... माझी हार मला मान्य करायची नसते!
तुझ्याकडे जे देवदत्त आहे... मी कर्माने, कष्टाने ते मिळवू, जिंकू पाहते!
मी जिवंत आहे... पण जगू पाहते... तुझ्यासारखे!

पण आज... मी मान्य करते. मी हारले.
मी तुझ्यावर... तुझ्या जगण्यावर प्रेम केले... मीरेने केले कृष्णावर तसे!
पण मीरा जिंकली होती. सगळे काही हारून मीरा कृष्ण जिंकली होती. हरण्या-जिंकण्याच्या सगळ्या व्याख्या तिने तिच्या ठरवल्या. इतर कुणालाही तो हक्क दिला नाही... कृष्णालाही नाही!

मी मीरा नाही...

तु असशील कृष्ण कदाचित... पण मी मीरा नाही! मी मीरा होऊ शकले नाही!

कधी कधी वाटते तुझ्याकडून फक्त तुझे जगणे थोडेसे मागून घ्यावे. पण काही गोष्टी खरंच देवदत्त असतात. त्या कर्माने, कष्टाने मिळत नाहीत अन् मागून तर मुळीच मिळत नाहीत!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy

ज्यांना हे झेपले नाही त्यांच्यासाठी....

खरं सांगायचं तर हे लिखाण पोस्ट केल्या क्षणी जाणवलं होतं मला कि हे कुणालाही झेपणं अवघड आहे. हे टाकायला नको होतं. पण एकदा टाकल्यावर मागे कसं घेतात? Happy

असो... स्पष्टिकरण द्यायचा प्रयत्न करते....

मला वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये एक 'मीरे'चा अंश असतो. आणि तिच्या ह्दयात असतो एक श्रीकृष्ण. इथे मीरा म्हणजे एक आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी आतूर, उत्सुक असलेली एक स्त्री. आणि श्रीकृष्ण म्हणजे... ज्याच्यापायी हे सर्व अर्पण करण्याची इच्छा तीला होईल असा एक 'आयडीयल' पुरुष. You can call him a 'perfect man'. असा एक 'perfect man' कळत नकळत सगळ्याच स्त्रीया, मुली मनात जपत असतात. आपल्या आजुबाजूच्या पुरुषांमध्ये त्या तो 'श्रीकृष्ण' शोधत असतात. कधी वडिलांमध्ये... कधी भावामध्ये, मुलामध्ये... आणि जीवनसाथी म्हणून तर आपल्याला तोच तो हवा असतो फक्त!

आपल्याला जसे जगायची इच्छा असते.. पण समाजाच्या भितीने म्हणा, संस्कृतीच्या धाकाने म्हणा... आपल्याला जसे जगता येत नसते तसे स्वच्छंद जगणारा 'श्रीकृष्ण'! अगदी कितीही पुढारलेली, शिकलेली, करियरिस्टिक बाई असली तरिही, विवाहित किंवा अविवाहित असली तरिही, तरूण किंवा व्रुद्ध असली तरीही... तिच्या मनात ही श्रीकृष्णाची प्रतिमा कायम कोरलेली असतेच असते!.

पण प्रत्यक्षात असं परफेक्ट कुणी नसतंच! आपल्याला एखाद्या पुरूषाच्या ठायी 'त्याचा' भास व्हावा आणि नंतर अपेक्षाभंग व्हावा हे तर सतत घडत राहतं. मग नैराश्य, उदासी... वगैरे वगैरे... याचे कारण काय असावे?

मला असं वाटतं मीरेला तीचा 'श्रीकृष्ण' जसा मिळाला तसा प्रत्येक स्त्रीला मिळायला हवा असेल तर खरोखर 'मीरा' होता आलं पाहिजे. पण मीरा जशी जिंकली तसे आपण जिंकत नाही... कारण मुळात आपण मीरा नसतो. मीरेने एक परिपूर्ण पुरुष कल्पून त्याला 'श्रीकृष्ण' नाव दिले नाही. तिच्या मनात आधिच असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेठायी तिने सगळे गुण, परिपूर्णता कल्पिली! तिची परिपुर्णतेची, ''perfect man' ची व्याख्या तिने स्वतः ठरवली. आपल्या 'श्रीक्रुष्णा'ची व्याख्या मात्र फक्त आपणच नव्हे... तर समाज, रिती, धर्म, परंपरा, रुढी, परिस्थिती वगैरे वगैरे असे सर्व घटक मिळून ठरवत असतात.

त्यामुळेच आपण 'मीरा' होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच आपल्या मनात, स्वप्नात असलेला 'श्रीकृष्ण' आपल्याला कधिच मिळत नाही.

अपेक्षा आहे आता मी लिहिलेलं झेपायला थोडं सोपं जाईल.

....

खूपच छान लिहिलय....मस्तच...स्पष्टीकरण पण मस्त दिलंत Happy

Taral & sahajsundar ......
tyala dukkhachi kinar hi aahech !!
Manala bhavun gela !!

मुग्धमानसी ... लिहिलेल मस्त च आहे आणी त्याच स्पष्टिकरण तर खरच मस्त आहे , एकदम भावेश .... मस्त मस्त ..:)

जरा उशिरा नजरेस पडल .....असो

किती सुंदर...

१-तुझ्या भोवती असतात दिशांच्या स्वच्छंद भिंती...

२-माझं जगणं त्याच्या जगण्यापुढे एखादा मलमलीचा तुकडा...

३-मी बंदिस्त झालेय स्वतःभोवती उभारलेल्या उंचच उंच भिंतींत...

अतिशय खोल स्टेटमेंट्स...

मला आधीही समजलं होतं.पण तुमच्या त्या स्पष्टीकरणानंतर उगाचंच का पण मी तिच्या जागी स्वतःला ठेऊन वाचलं म्हणा आणि स्त्रीच्या उत्कट प्रेमातल्या,भक्तीतल्या अर्थाला थोडा स्पर्शून गेलो...हे अर्थ जाणवणंच महत्वाचं होतं....ती कसे प्रेम करीत असेल ते अनुभवलं....पण तोही किती छान अनुभव दिलात..ध.

शुभेच्छा!