नेमकं तेव्हाच.....

Submitted by मुग्धमानसी on 3 January, 2013 - 00:29

नेमका तेव्हाच संचारतो काळोख दिवसाच्या अंगात!
नेमका तेव्हाच एकमताने ठराव पास होतो ढगात... कि आता बरसायचं आहे...
अगदी तेव्हाच लख्ख कोरडं रहायचा निश्चय केलेल्या मला... चिंब चिंब भिजवायचं आहे!

हळवेपणाची कात टाकून खंबीर व्हायचं ठरवते... नेमकी तेव्हाच कातरवेळ होते
मग आकाशात रंग... गार गार वारे...
पानांची सळसळ... अंगावर शहारे...
बुडणारा सूर्य... गळणारं पान...
परतणारे पक्षी... सुटलेलं भान...
तशातच नेमकी कुठलीशी आठवण...
आणि मघाच्या निश्चयाची सपशेल बोळवण!!

भास हे भासच असतात.
झोपल्यानंतर होऊ लागले तर त्याला स्वप्न म्हणतात...
आणि जागेपणी होऊ लागले तर त्याला तंद्री म्हणतात...
... असे वेडे विचार मनी थैमान घालू लागले कि त्याला काय म्हणतात?

ठाम ठरवते स्वतःशी की आता शहाण्यासारखं वागायचं...
स्वप्न फक्त झोपल्यानंतरच पहायचं!
नेमकं तेव्हाच कुणीतरी खुडबुडत रेडिओ लावतं...
त्यातुन नेमकं कुणीतरी आर्त वगैरे गातं...
माझ्यासाठी..........??? हॅट्!!
पण पुन्हा माझ्या तंद्रीसाठी तेवढं कारण पुरतं!!

मग घशाचं दुखणं वगैरे... आवंढा बिवंढा गिळणं वगैरे...
पोटात खड्डा-बिड्डा पडणं.., डोळ्यात पाणी-बिणी येणं...
बापरे हे फारच होतंय...
भावना-बिवना, मन-बिन, उत्कट-बित्कट...
विसरावं सगळं तर हे अजुनच वाढत जातंय...!!

मग म्हटलं असू देत...
आपलंच आहे मन... करतं हट्ट तर पुरवुयात एकदा...
आलीच आहे आठवण, तर मनभरुन आठवून घेऊयात एकदा...
मात्र फक्त एकदाच हं... अगदी शेवटचं!!
डोळे घेते मिटून... अन् वाट पहाते त्या आठवातल्या चेहर्‍याची!
काका, मामा, दादा, चुलता,
मंदिरातला भटजी, सिग्नलवरचा भिकारी, गल्लीतला वेडा, गल्ल्यावरचा वाणी...
लागोपाठ रांगेत असंख्य चेहरे दिसतात.... पण...
पण नेमका तो चेहरा काही दिसत नाही!!
कोणत्याही क्षणी... कुठल्याही काळी... न बोलावता डोळ्यांसमोर चमकत राहणारा तो चेहरा...
नेमका त्याक्षणी आकार घेण्याचं नाकारत राहतो.

मी प्रकाशात शोधते त्याला...
तर मनाच्या प्रदेशात दिवस ढळून रात्र सुरू होते.
मग मी अंधारातच तो चेहरा विसरायचा प्रयत्न करते...
अन् नेमका तेव्हाच... तो उजळवून टकतो मला आंतरबाह्य!!
लखलखीत आठवणींचं झुंबर बनून!!!

माझं हे असंच चालायचं...
कुठून तरी सुरू व्हायचं अन् कुठेतरी संपायचं...
सुधरायचंच नाही म्हटल्यावर मी तरी मनाला किती समजवायचं???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी प्रकाशात शोधते त्याला...
तर मनाच्या प्रदेशात दिवस ढळून रात्र सुरू होते.
मग मी अंधारातच तो चेहरा विसरायचा प्रयत्न करते...
अन् नेमका तेव्हाच... तो उजळवून टकतो मला आंतरबाह्य!!
लखलखीत आठवणींचं झुंबर बनून!!!
>>>

माझ्याच ह्या कवितेची आठवण झाली.

धन्यवाद सर्वांना!

माझ्याच ह्या कवितेची आठवण झाली.>>> निंबुडा, वाचली तुझी कविता. मस्तच आहे!

रिया<<< कसलंच रिलेट होतय अग>>> Wink

ठाम ठरवते स्वतःशी की आता शहाण्यासारखं वागायचं...
स्वप्न फक्त झोपल्यानंतरच पहायचं!

वा वा..! अनेकांच्या मनातलं...

मुग्धमानसीजी,

<कोणत्याही क्षणी... कुठल्याही काळी... न बोलावता डोळ्यांसमोर चमकत राहणारा तो चेहरा...
नेमका त्याक्षणी आकार घेण्याचं नाकारत राहतो.>

अप्रतिम.:) Happy Happy

सौ. वंदना बर्वे.

काय सुंदर लिहिलंय खर हे ..
..
..
.
एक एकदम चपखल बसणारा शब्द आहे , तो इथे लिहायचाय मला..
विचार केला पण आठवेच ना.. प्च!

आपल्याच मनातल धुसर झालेल जग प्रदर्शनातल्या एखादया चित्रात एकवटलेल दिसत तसच काहीस वाचून झाल्यावर वाटलं .