प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आचार्य अत्रे यांचा एक किस्सा अभिनेत्री फैयाज यांनी या मुलाखतीत सांगितलाय :
https://www.youtube.com/watch?v=vSCdT8fgBiY

फैयाज यांनी अभिनित केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चा पहिला प्रयोग तब्बल साडेसहा तास चालला होता ! त्यनंतर दुसऱ्या दिवशी अत्र्यांनी मराठामध्ये त्याचे परीक्षण, “कट्यार घड्याळात घुसली” अशा शीर्षकाने लिहिले.

तर पणशीकर या नाटकाबद्दल म्हणाले,
“ हे नाटक जन्माला येतानाच पाठीवर थाप घेऊन आलेले आहे !”

थोर कन्नड साहित्यिकांच्या पुस्तकांचे मराठीत उत्तम अनुवाद डॉ. उमा कुलकर्णी यांनी केलेले आहेत. त्यांच्याबद्दलचा हा रोचक किस्सा द. दि. पुंडे यांच्या पुस्तकातून साभार :

उमा कुलकर्णी यांना कन्नड अजिबात वाचता येत नाही ! परंतु त्यांना ती भाषा बोलता येते आणि ऐकलेली समजते. त्यांचे यजमान विरुपाक्ष यांची मातृभाषा कन्नड असल्यामुळे त्यांना ती पूर्णपणे यायची. एखाद्या कन्नड पुस्तकाचा उमाताईंनी अनुवाद करायचा ठरवल्यावर विरूपाक्ष सर्वप्रथम ते संपूर्ण पुस्तक मोठ्याने वाचून ध्वनिमुद्रित करत असत. त्यानंतर उमाताई ती ध्वनिफीत बारकाईने ऐकून त्याचे मराठी भाषांतर लिहून काढीत.

नवरा बायकोंच्या या सहकारी प्रयोगावर पुंडे यांनी छान टिप्पणी केली आहे. ते असे म्हणतात की, एरवी एखादे पुस्तक वाचून भाषांतर करणारा लेखक शब्दशः भाषांतर करत बसतो आणि त्यामुळे तो अनुवाद काहीसा बोजड होऊ शकतो. या उलट उमाताईंच्या बाबतीत एक भाषा ऐकून ती अनुवादित केल्यामुळे त्यांचे अनुवाद सरस आणि सुरस झालेले आहेत.

एखादी भाषा शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, ती वारंवार ऐकून थेट बोलायला लागणे, हा मुद्दा पुंडे यांनी या निमित्ताने अधोरेखित केलेला आहे.

दुर्दैवाने विरुपाक्ष यांचं कोविडमध्ये निधन झालं. त्यामुळे आता त्यानंतर उमा कुलकर्णी अनुवाद करू शकत असतील की नाही हे माहिती नाही. Sad
वैयक्तिकरीत्या विशेषतः भैरप्पांसारख्या साहित्यिकाच्या कादंबऱ्या मला मराठीतून वाचायला मिळाल्या याबद्दल मला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते.

कृतज्ञता वाटते. >> +१
***************************************************************************************************************************
आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असल्यामुळे त्यांचा एक छोटा किस्सा.

त्यांच्या काळात अनेक साहित्यिक मराठीत नवे पर्यायी शब्द सुचवत होते. परंतु त्यामध्ये संस्कृतप्रचुर शब्दांचा भरणा होऊ लागला तेव्हा या वृत्तीची चेष्टा करण्यासाठी अत्र्यांनी त्यांच्या कवितेला खालील मजेशीर शीर्षक दिले होते :
कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत

!!!

संस्कृतप्रचुर >>
पुलंचा 'एक शून्य मी' मधला 'क्व भवान् क्व च सूकरः क्व च पुलः ' हा लेख याच विषयावर आहे.

'क्व भवान् क्व च सूकरः
>>>
अगदी अगदी ! धमाल लेख आहे तो.
“डुक्कर, वराह आणि डिग्री” या शीर्षकाचा मथळा नवभारतच्या संपादकीयात आला होता. त्यावर तो आहे.

उमा कुलकर्णी यांना कन्नड अजिबात वाचता येत नाही ! ))))

एस एल भैरप्पा मराठीत येण्यामागे या दाम्पत्याचे भगीरथ प्रयत्न आहेत. वाचता येत नाही अशा भाषेतील तीनचारशे पानांचे ध्वनिमुद्रण निव्वळ ऐकून अनुवादित करायचे म्हणजे किती कठीण काम आहे. (कोहळ्याची हुळी, नाचणीची उकड,काकडीचे रसायन, इत्यादी संदर्भ ही पुस्तके वाचल्यानंतर गुगलल्याचे आठवते.)

वंशवृक्ष , जा ओलांडुनी या सारख्या सांस्कृतिक आणि सामाजिक गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. त्यामुळे त्यांना कन्नड वाचता येत नव्हते हे समजल्यावर अजूनच कौतुक वाटले.

वैयक्तिकरीत्या विशेषतः भैरप्पांसारख्या साहित्यिकाच्या कादंबऱ्या मला मराठीतून वाचायला मिळाल्या याबद्दल मला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते.)))+111

वंशवृक्ष >>> +१
विधवा पुनर्विवाह या विषयावरील ही कादंबरी मी 1993 मध्ये वाचल्याची नोंद मला माझ्या वहीत मिळाली.
मूळ कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
..
रोचक : विरुपाक्ष मूळ कन्नड होते तरी ते मराठी लिहायला व वाचायला शिकले होते !

होय डॉक.

वंशवृक्ष एक गाजलेली कलाकृती आहे. त्यावर आधारित चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. गिरीश कारनाड प्रमुख भूमिकेत आहेत.
https://youtu.be/LoKh2Rjzx6Usi=sQsPW9oC2AxlY7MK

विधवाविवाहा सोबत अनेक गुंतागुंतीची समांतर कथानके असणारी ही कादंबरी शेवटी 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' ह्या ध्रुवपदावर येऊन वाचकाला स्वतःच्या अस्तित्वावर विचार करायला भाग पाडते.

रोचक : विरुपाक्ष मूळ कन्नड होते तरी ते मराठी लिहायला व वाचायला शिकले होते !))) खरंच खूप कौतुक दोघांचेही..!

चित्रपटालाही
>>> स्वासु धन्यवाद.
चित्रपट सवडीने नक्की बघेन. म्हणजे कथानकाची आता उजळणी होईल. पुस्तकातले आता बाकी काही मला आठवत नाही.
मूळ कन्नड कादंबरी 1967 मधली आहे.

कन्नड चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला होता. पण गिरीश कार्नाडांनी राजची ( कात्यायनीचा दुसरा नवरा) भूमिका केली आहे आणि ती केंद्रस्थानी घेतली आहे. कादंबरीत तसं बघायला गेलं तर श्रीनिवास श्रोत्री केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे ते आवडलं नाही.

वैयक्तिकरीत्या विशेषतः भैरप्पांसारख्या साहित्यिकाच्या कादंबऱ्या मला मराठीतून वाचायला मिळाल्या याबद्दल मला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते.>>>>११११

विशेषतः भैरप्पांसारख्या साहित्यिकाच्या कादंबऱ्या मला मराठीतून वाचायला मिळाल्या याबद्दल मला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते >>> १०००+++

वंशवृक्ष चित्रपट
युट्युबवर पाहिला. आवडला.

कादंबरी मी 31 वर्षांपूर्वी वाचलेली असल्यामुळे एखादा प्रसंग वगळता फारसे काही आठवत नव्हते. त्यामुळे कुठलीही तुलना मनात न ठेवता पाहता आला. चित्रफित खूप जुनी असल्याने धूसर आहे. कित्येक ठिकाणी तळातली इंग्लिश वाक्ये नीट वाचता येत नव्हती. अर्थात दृश्यांवरून कथा व्यवस्थित समजण्यासारखी आहे. तत्कालीन सामाजिक- वैचारिक स्थिती चांगली चित्रित केलेली आहे.
कलाकार उत्तम.

मात्र एनएफडीसीने त्यात घातलेल्या इंग्लिश तळ-वाक्यांमध्ये काही हास्यास्पद व मूलभूत चुका झाल्या आहेत.

धन्यवाद कुमारसर. मीही सेव्ह करून ठेवला आहे. कन्नड कितपत झेपेल कळत नव्हतं पण तुमची पोस्ट वाचून कळेल असं वाटतं आहे.

विंदा करंदीकर यांचे कंजूष/ हिशेबीपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सुभाष भेंडे यांच्या एका जुन्या लेखात वाचलेला हा किस्सा. हा किस्सा प्रा. यास्मिन शेख यांनी भेंडे यांना सांगितलेला होता.

विंदांचे ‘सशाचे कान’ हे पुस्तक तेव्हा प्रसिद्ध झालं होतं. प्रा. शेख व त्यांचे एक सहकारी यांनी त्याच्या दोन प्रती विंदांकडून विकत घेतल्या. एका प्रतीची किंमत सव्वा रुपये होती. दुसऱ्या दिवशी विंदांनी त्या दोघांना, “चला कॅन्टीनमध्ये जाऊ”, असे निमंत्रण दिले. मोठ्या आश्चर्याने ते दोघेही विंदांबरोबर कॅन्टीनमध्ये गेले.
कॅन्टीनमध्ये गेल्यावर विंदांनी वेटरला स्पष्टपणे विचारले की, चार आण्याला इथे काय मिळतं ?
वेटरने सांगितले की बटाटेवड्याची प्लेट.

मग विंदांनी तीन प्लेटसची ऑर्डर दिली आणि त्या दोघांना म्हणाले,
“तुम्ही माझ्या पुस्तकाचा प्रत्येकी सव्वा रुपये मला दिलात. त्यातले चार आणे मला मिळणार आहेत. या वड्याच्या रूपाने मी ते तुम्हाला परत करतोय” !!

('सशाचे कान'चे प्रथम प्रकाशन 1963 मधील आहे)

प्रत्येक व्यक्ती ही एक नमुना असते असं म्हणतात. हा पहा एक पाश्चात्य नमुना :

सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक आणि नोबेल विजेते विल्यम फॉकनर यांचा एक किस्सा. ते जेव्हा पासष्ट वर्षांचे होते तेव्हा ही घटना घडली. 1962 साली अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी व्हाइट हाऊसमध्ये लेखक व कलावंतांसाठी एक जंगी मेजवानी ठेवली होती. फॉकनरना पण या मेजवानीचे निमंत्रण होते. परंतु ते काही तिथे गेले नाहीत.
त्याचे कारण विचारले असता ते म्हणाले,
“या वयात अनोळखी माणसांबरोबर जेवणं, गप्पा मारणं माझ्यासारख्याला अवघड जातं” !

(अंतर्नाद मासिकातून साभार)

संगीतकार ( व संयोजक) अमर हळदीपूर यांनी त्यांच्या बालपणीचा एक हृद्य संगीत-किस्सा मुलाखतीत (https://www.youtube.com/watch?v=vLYmfB4tdf4) सांगितला.

तेव्हा ते सात वर्षांचे होते. एके दिवशी प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद त्यांच्या घरी आले. त्यांना पैशांची गरज होती म्हणून ते अमर यांच्या वडिलांना म्हणजे संगीतकार परशुराम यांना म्हणाले,
“मला जरा तीस रुपये द्या कारण मला किराणा सामान आणायचे आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडचे हे व्हायोलिन तुमच्याकडे ठेवून घ्या आणि तुमच्या मुलाला यावर शिकवा”

त्यावर अमर यांचे वडील म्हणाले की, अहो पैसे जरूर देतो तुम्हाला पण त्या बदल्यात तुम्ही मला व्हायोलिन द्यायची काही गरज नाही. तरी देखील प्यारेलाल यांच्या वडिलांनी आग्रहाने ते व्हायोलिन त्यांना घ्यायला लावले. त्या व्हायोलिनवर लहानपणी प्यारेलाल स्वतः शिकलेले होते.

मग अमर यांचे शिक्षण त्या व्हायोलिनवर सुरू झाले. या छोट्याशा व्हायोलिनवर ते कायम बेहद्द खुश आहेत. पुढील आयुष्यात अमर हळदीपूर हे व्हायोलिनचे शहेनशहा म्हणून ओळखले गेले. गमतीचा भाग म्हणजे त्यांनी ‘शहेनशाह’ या चित्रपटाला देखील संगीत दिलेले आहे !

गिरीश कार्नाड यांची विक्षिप्तपणाबद्दल ख्याती होती. त्यांचे हे दोन किस्से उमा कुलकर्णी यांच्या लेखातून साभार :
१.
कार्नाड यांचे ‘खेळता खेळता आयुष्य’ हे आत्मकथनाचे पुस्तक आहे. त्याची अर्पणपत्रिका भारी आहे :

डॉ मधुमालती गुणे यांना :
त्या ठरलेल्या वेळी न आल्यामुळे माझा जीव बचावला आणि म्हणून मी अस्तित्वात आलो” !

मात्र या प्रकारामुळे डॉक्टरांचे काही आप्तस्वतीय दुखावले गेले होते. मुळात त्या एक चांगल्या प्रसूती-डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होत्या.
. .

२.

“आपल्या मृत्यूनंतर आपला मृतदेह कोणाच्या नजरेला पडू नये,” अशी इच्छा त्यांनी जिवंतपणे व्यक्त केलेली होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अर्थातच कोणतेही विधी केले गेले नाहीत.

अंत्यविधी शासकीय इतमामानुसार होणार होता. परंतु त्यालाही कुटुंबीयांनी अर्थातच नकार दिला.
विद्युतदाहिनीची जागा गावापासून बरीच दूर होती. जवळच्या लोकांना तिथं ठराविक वेळेला यायला सांगितलं गेलं. पण माणसं तिथं पोचायच्या आत सगळं संपलं होतं.

गमतीचा भाग म्हणजे त्यांनी ‘शहेनशाह’ या चित्रपटाला देखील संगीत दिलेले आहे ! >>> हो ते "अमर-उत्पल" या जोडीच्या नावाने.

Pages