प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि दुःख झाले. त्यांच्या दोन आठवणी लिहितो.
एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका परिसंवादात त्यांना बोलावले होते. व्यासपीठावर अन्य काही मान्यवर डॉक्टर बसलेले होते. त्यापैकी एकाने प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करून स्वतःच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. अवचटांनी त्यांच्या भाषणात या गृहस्थांचे नाव न घेता त्यांच्या गैर कृतीचा जाहीरपणे उल्लेख केला. तेव्हा व्यासपीठावरील काहीजण चपापले होते. परंतु या प्रसंगात अवचटांचे धाडस सर्वांना दिसून आले.
..
दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी स्वतः वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या पीडित महिलांची दुःख कशी समजावून घेतली याचा वृत्तांत आम्हाला सांगितला होता. तेव्हा त्या शोषित जगाची आम्हाला अगदी जवळून ओळख झाली.
...
विनम्र आदरांजली!

>>>विनम्र आदरांजली!>>>> +११
त्यांचे मिरची पोती उचलणाऱ्या कामगार तसेच हातमाग मजुरांचेवरचे लेखही हृदयस्पर्शी होते

अवचटांच्या निमित्ताने कुठल्याशा सिनेम्याचा (बहुतेक संहिता) प्रिमियर आठवला. तिथे अवचट, मिलिंद सोमण आणि आणखी काही मोठे लोक होते. मी मोबाईलात मिसो आणि अवचट यांचा फोटो काढायला घेतला. जरा टेन्शन आलं म्हणून अंग आणि मोबाईल दोन्ही वेडेवाकडे करत बरासा अँगल साधू लागलो तेव्हा मिसो कंटाळून म्हणे- अरे केवढा वाकडा होतोयस.. एक फोटो तो काय. कळ आली मला मला पोझ घेऊन!
मग अवचट पांढर्‍या दाढीतून प्रसन्न हसले होते..
===

वरती कुणी आचार्य अत्र्यांचा उल्लेख केलेला काल वाचला तेव्हा जयवंत दळवींनी प्रतिभावंतांच्या घेतलेल्या मुलाखतींच्या पुस्तकातल्या गंमती आठवल्या. (पुस्तकाचं नाव कुणाला आठवल्यास प्लीज लिहा).

'मी (राम गणेश) गडकर्‍यांच्या घरी नेहेमी जात असे, आणि माझ्या लिखाणावर त्यांचा प्रभाव आहे' असं अत्रे सर्वांना सांगत. मात्र ते खरंच गडकर्‍यांच्या बैठकीतले होते का, याबाबत अनेकांना शंका होती, तशी ती दळवींनाही होती. वि.स. खांडेकरांची मुलाखत घेताना दळवींनी मुद्दाम हा विषय काढला. खांदेकरांनी अत्र्यांचं हे ''विशफुल थिंकिंग आहे' असं सरळ सांगून टाकलं. तेव्हा दळवी म्हणाले- ते भेटले नसतील तर तसं आपण छापील मुलाखतीत जाहीर करूया. कारण अत्रे उगाच उठसुट सर्वांना सांगत सुटत आहेत. तेव्हा भाऊसाहेब गडबडून म्हणाले- छ्या छ्या! तसलं काही छापू नका हा. दळवींनी 'का' विचारलं तर खांडेकर म्हणाले- अहो ते अत्रे आहेत. त्यांच्या तोंडी कोण लागणार!

र.वा.दिघे, लोककवी मनोहर आणि आणखी काही लोकांना भेटून दळवींनी हा विषय काढला तेव्हा सर्वांनी एकमुखाने अत्रे गडकर्‍यांना कधीच भेटले असण्याची शक्यता नाही, असं सांगितलं. असं खोटं बोलून अत्र्यांसारख्या मोठ्या माणसाने काय मिळवलं असेल हा एक गहन प्रश्न.

याच पुस्तकात अनेक किस्से आहेत. जबरदस्त बुद्धी आणि कलेची देणगी मिळालेले प्रतिभावंत कधी चक्रमपणा, कधी खुनशीपणा, कधी मुर्खपणा करतातच. तीही माणसंच शेवटी..

याच पुस्तकात फडक्यांचीही मुलाखत आहे. दळवींनी त्यांना जेव्हा 'तुमचे समकालीन- खांडेकर, माडखोलकर (आणि आणखी एक - नाव आठवत नाही)- या तिघांपैकी सर्वात जास्त प्रतिभावान कोण आहे असं तुम्हाला वाटतं?
ना.सी.फडक्यांनी उत्तर दिलं- 'मी'.
===

प्रत्येक शब्द आठवत नाही. पण याच मुलाखतीत दळवींनी विचारलं- 'नवीन लेखकांचं काही वाचता की नाही?'
तेव्हा फडके म्हणाले- 'वाचवत नाही. फार घाणेरडं लिहिता तुम्ही नवे लोक!'
(दळवींनी नुकतीच 'चक्र' लिहिली होती तेव्हा बहुधा.)

साजिरा,
भारी किस्से ! आवडले.
........

अवचटांचे 'लेखन' या विषयावरील मी एक भाषण ऐकले होते.
त्यातील एक वाक्य अगदी भावले. तो काळ आंतरजालपूर्व होता.
त्यामुळे व्यक्त व्हायची माध्यमे म्हणजे लेखन, रेडिओ आणि टीव्ही.
भाषणात ते म्हणाले,
" लेखन तुम्ही निर्वेधपणे करू शकता हा त्याचा मोठा फायदा आहे. रेडिओ किंवा टीव्हीवर काही सादर करायचे असेल तर अनेक अडथळे पार करून जावे लागते".
हे अगदी पटले होते.

सुभाष अवचटांच्या नजरेतून
रफ स्केचेस शांताबाई....
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/lokrang/story-of-shantabai...
लेख वाचून एक प्रकारची रुखरुख वाटली मला... याला त-हेवाईकपणा नाही म्हणता येत पण शांताबाईंचे अतंरंग म्हणावेसे वाटले>>>>

द सा >> अगदी ! मी तो लेख जूनमध्येच वाचला होता.
मी लेखात म्हटल्याप्रमाणे तर्‍हा/ विशेष वागणे/ धाडस / जगावेगळी कृती असे सर्व काही यावे
..........................................................................................................
अन्य एक :
विजय तेंडुलकर मुख्यतः नाटककार म्हणून खूप गाजले. त्यांचा एक शिरस्ता होता. स्वतःच्या नाटकाचा प्रयोग जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर प्रदर्शित व्हायचा तेव्हा ते स्वतः बघायला अजिबात उत्सुक नसत. अगदी अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी तसा प्रयोग पाहिला होता. या वागण्याचे त्यांनी कारणही दिले होते. लेखक जे नाटक लिहितो त्याचे पुढे दिग्दर्शक जे काही करतो त्यात नाटकाचा आत्मा बरेचदा हरवलेला असतो. म्हणून तो प्रयोग बघणे नकोच असे त्यांचे मत होते.
त्यांच्या घाशीराम कोतवाल नाटकात संगीताचा वापर भरपूर आहे. किंबहुना ते नाटक आहे की संगितिका अशीही चर्चा त्या काळी झाली होती. पुढे मात्र तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकात अशा प्रकारे संगीताचा वापर जाणीवपूर्वक करू दिला नाही. त्यातून नाटकाच्या गाभ्याला धोका पोचतो असे त्यांचे मत झाले होते.

बरोबर, तो एक वेगळाच प्रयोग आहे.
गद्य नाटककाराचे संवाद हेच नाटकाचे बलस्थान असावे; संगीताने त्यावर कुरघोडी करू नये असा त्यांचा विचार असावा

(वर सालींजर यांच्या संदर्भात जो मुद्दा आला आहे : पुस्तकातील शब्द महत्त्वाचे; मुखपृष्ठावर चित्र नको, त्या धर्तीवर)

सुभाष अवचटांचा हा लेख वाचला नाही, पण त्यांच्या इतर १-२ लेखांत त्यांच्या नजरेतून सगळेच मोठे लोक तऱ्हेवाईक आणि ते एकटे सुसंस्कृत अश्या पद्धतीचा सूर जाणवला.

दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी स्वतः वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या पीडित महिलांची दुःख कशी समजावून घेतली याचा वृत्तांत आम्हाला सांगितला होता. तेव्हा त्या शोषित जगाची आम्हाला अगदी जवळून ओळख झाली. >> अंधाराचे जग या पुस्तकात त्यांनी या विश्वाबद्दल एक प्रकरण लिहीले आहे.

'रफ स्केचेस' चा उल्लेख कधी येतो याचीच वाट बघत होतो. Proud

शेवटी या सार्‍या चष्म्यातनं बघितलेल्या गोष्टी. रफ स्केचेस असो, की प्रतिभावंतांचे किस्से; घडलेल्या खर्‍या गोष्टी (आणि म्हणून त्या त्या व्यक्ती) आपल्याला तशाच्या तशा कधी कळणार नाही, हेच खरं.

छान चर्चा. वरील सर्वांचे आभार !

आता गंभीरपणाकडून हलक्याफुलक्या किश्शावर नेतो. अर्थात हा ऐकीव आहे.

सचिन तेंडुलकर चहात पूर्ण बुडवून अख्खे बिस्किट एकदम खातो.

आता ही त्याची वैयक्तिक आवड झाली. पण आजूबाजूला जर त्याला कोणी असं खाताना पाहिलं तर ते म्हणणार बघा काय तऱ्हा आहे ! Happy
एकंदरीत तर्‍हेवाईक हा खूप सापेक्ष शब्द आहे.

@हरचंद पालव
>>>सगळेच मोठे लोक तऱ्हेवाईक आणि ते एकटे सुसंस्कृत अश्या पद्धतीचा सूर जाणवला.>>>>

सहमत....
मलाही या लेखात शांताबाई चहा देखील करत नव्हत्या आणि त्यांच्या मुंबईतल्या अस्ताव्यस्त घराचे केलेले वर्णन आवडले नाही....

>>>असं खोटं बोलून अत्र्यांसारख्या मोठ्या माणसाने काय मिळवलं असेल हा एक गहन प्रश्न.>> +११
किस्से छान आहेत.

साहित्य-चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन दिग्गजांसंबंधी हा एक किस्सा.

टागोरांची नष्टनीड नावाची एक कादंबरी आहे. त्यावर सत्यजित राय यांनी चारुलता चित्रपट काढला.
त्याचा विषय : नवरा-बायकोच्या जोडीमध्ये बायको वयाने बरीच लहान आहे. त्यामुळे ती तिच्या समवयस्क दिराच्या प्रेमात पडते. अशा तऱ्हेने हा प्रेमाचा त्रिकोण होतो.

आता त्यांच्या वास्तव आयुष्याशी कसा योगायोग ते पहा :
१. र. टागोरांचे भाऊ जतींद्रनाथ हे त्यांची बायको कादंबरीपेक्षा तेरा वर्षांनी मोठे असतात. इथे दोन भाऊ आणि कादंबरी असा त्रिकोण होतो. पुढे कादंबरी आत्महत्या करतात.

२. राय यांनी जेव्हा अभिनेत्री माधवीला घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण चालू केले तेव्हा ते तिच्या प्रेमात पडतात ! ते तिच्या पेक्षा 21 वर्षांनी मोठे असतात. इथे राय, त्यांची बायको आणि माधवी असा त्रिकोण होतो.

या प्रकाराची कुजबुज खूप वाढल्याने माधवी राय यांच्यापासून दूर होते व त्यांच्या पुढील चित्रपटांत काम करीत नाही.

अशोक शहाणे नावाचा तरुण : नाबाद ८८

* आपल्याच लेखनाची इतकी उपेक्षा करणारा दुसरा कोण लेखक असेल?
* ‘आमची पिढी ही षंढांची’ असे ते निखालस म्हणू शकले. या साऱ्यामागे त्यांचे साहित्याचे आकलन, मूल्यभान, नव्या प्रयोगांची ओढ आणि मराठी संस्कृतीवरचे निस्सीम प्रेम होते.

https://maharashtratimes.com/editorial/manasa/young-man-named-ashok-shah...

>>>>अशोक शहाणे नावाचा तरुण : नाबाद ८८>>> अभिष्टचिंतन !
शहाण्यांनी नेमाडेंना कोसला लिहिण्यासाठी उद्युक्त केले होते.

सर्वांना धन्यवाद !

शहाण्यांनी नेमाडेंना कोसला लिहिण्यासाठी उद्युक्त केले होते.>>>
होय, हा किस्सा भारी असून तो नेमाडे यांनी कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत तपशीलवार लिहिला आहे. तो थोडक्यात लिहितो.

रा. ज देशमुख हे तत्कालीन मराठी साहित्यातील मोठे प्रकाशक. त्यांच्याकडे नेमाडे व शहाणे ही दुक्कल गप्पांसाठी जमत असे. देशमुख त्याकाळी खांडेकर, पु ल देशपांडे आणि रणजीत देसाई यासारख्या मातब्बर लेखकांचे साहित्य प्रकाशित करीत होते. परंतु ही दुक्कल मात्र त्या लेखकांवर वैतागलेली होती. या प्रस्थापित लेखकांचे सगळं कसं कृत्रिम, जुनाट आहे असे मत हे दोघे व्यक्त करीत.

हे वारंवार ऐकल्यावर देशमुख एकदा त्यांना म्हणाले,
“मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. तुम्ही असे एक तरी लिहून दाखवा बरं !” त्यावर नेमाडे म्हणाले,
“खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसात सहज लिहिता येईल”. त्यावर देशमुख म्हणाले, “लिहून दाखवा, बकवास पुरे”

नेमाडे म्हणाले की आम्ही लिहू सुद्धा पण आमचं कोण छापणार ? मग देशमुख यांनी शेवटचे सांगितले,
“लिहून दाखवा, मी छापतो”.
यानंतर मग इरेला पेटून नेमाडेंनी 18 दिवस सलग बसून कोसला लिहिली.

असा तो इतिहास !

मला वाटते कोसला एका ठराविक वयात वाचल्यावर जी मनात ठसते,तो भागही महत्त्वाचा आहे.
कॉलेज जीवनात ही कादंबरी वाचली होती.एकदम आवडली होती.
आता लायब्ररीत कोसला होती.पण जाणीवपूर्वक आणायची टाळली.

कोसला एका ठराविक वयात वाचल्यावर जी मनात ठसते,तो भागही महत्त्वाचा आहे.
>>> +११११११११११११ ..
या विषयावर पूर्वी मी अन्यत्र प्रतिसाद दिलेले असल्याने आता पुन्हा लिहीत नाही.

धन्स.
.. .. .. ..
या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
>>> आज एका पुस्तकाचे (निसर्गकल्लोळ) सुंदर मुखपृष्ठ पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर चित्रकाराचेही हे मत :

चंद्रमोहन कुलकर्णीला सवड काढता येणे हेच कठीण. त्याच्या ‘पुस्तक हे लेखकाइतकेच चित्रकाराचेही असते’, या उक्तीची नेहमीच प्रचिती येत असते.

https://www.aksharnama.com/client/article_detail/6602

https://www.maayboli.com/node/78349 या धाग्यावर लेखकांच्या टोपणनावांवर काही चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा किस्सा :

घटना 2005 मधील आहे. त्यावर्षीच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या दिवाळी अंकात ‘सफाई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर लेखकाचे नाव कार्तिक कौंडिण्य असे लिहिले होते. कादंबरी सफाई कामगार स्त्री या संवेदनलशील विषयावर असून ती सुंदर आहे. त्या कादंबरीच्या लेखकाचे कधी न ऐकलेले हे नाव पाहून अनेकांना संशय आला होता, की हा काय कोणी नवोदित लेखक असणार नाही; हा तर मुरलेला लेखक दिसतोय ! कादंबरीच्या शेवटी त्या लेखकाचा मुंबईतील पत्ताही दिला होता. मग एक वाचक प्रत्यक्ष त्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही कौंडिण्य नावाचे राहत नसल्याचे त्यांना समजले.

दरम्यान मी देखील त्या लेखकांना कादंबरी आवडल्याचे पत्र लिहून ठेवले होते. तेवढ्यात त्या वरील वाचकांनी मासिकाच्या पुढच्या अंकात लिहिले, की कौंडिण्य नावाचे कोणी लेखक तिथे अस्तित्वात नाहीत: ही काहीतरी थापाथापी आहे. हे वाचल्यानंतर मी ते लिहिलेले आंतरदेशीय पत्र फाडून टाकले. या विषयावर मासिकात काथ्याकूट झाल्यावर संपादकांनी खुलासा केला. त्यात म्हटले होते की या कादंबरीचे लेखक त्याच पत्त्यावर राहतात. परंतु काही कारणास्तव त्यांना खरी ओळख जाहीर करायची नाहीये, तरी वाचकांनी त्याचा आदर करावा आणि साहित्यबाह्य संशोधनात रस घेऊ नये.

इथे हा विषय संपला होता. पण माझ्या बाबतीत खरी गंमत पुढे घडणार होती...

2015 मध्ये माझा एक लेख ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो वाचकप्रिय ठरला. त्याबद्दल मला अनेकांचे फोन, पत्रे वगैरे येत होती. एके दिवशी एक असाच अनोळखी फोन आला. तो एका मान्यवर लेखकांचा होता. मग आमच्या गप्पा झाल्या. त्या ओघात ते मला बोलून गेले, की 2005 मधील सफाई कादंबरी त्यांनीच लिहिलेली आहे ! मग मी त्यांना विचारले की फक्त त्या वेळेसच तुम्ही खरे नाव का लपवलेत? तेव्हा ते म्हणाले,

एखाद्या लेखनाचे मूल्यमापन, ते कोणी लिहिले आहे यापेक्षा ते काय लिहिले आहे यावरून व्हावे ही इच्छा होती. मला यानिमित्ताने बघायचे होते, की एका अनोळखी नावाने लिहून पाहिल्यानंतर वाचकांना कादंबरी कशी वाटते ते, आणि तो प्रयोग यशस्वी झाला”.

हे लेखक म्हणजे सुमेध वडावाला (रिसबूड).
कालांतराने ही कादंबरी त्यांच्या खऱ्या नावाने प्रसिद्ध झालेली दिसते आहे :
(https://m.facebook.com/NavataaBookWorld/photos/a.781129091909342/8369464...)

अनिंद्य
तुमच्या प्रतिसादातले इनफिनिटीचे चिन्ह इथे कसे टंकायचे ?

Pages