प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेध वडावाला (रिसबूड) यांचा किस्सा आवडला.
जयंत नारळीकरांचाही असाच किस्सा आहे. त्यांनी पहिली विज्ञानकथा लिहिली आणि मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी पाठवली. पण आपलं नाव बघून परीक्षकांनी आपल्याला झुकतं माप देऊ नये म्हणून त्यांनी नारायण विनायक जगताप (ना.वि. ज. ही आद्याक्षरं जयंत विष्णू नारळीकर या नावाच्या आद्याक्षरांच्या उलट क्रमाने आहेत म्हणून हे नाव Happy ) या नावाने ती कथा मंगला नारळीकरांच्या हस्ताक्षरात लिहून घेतली आणि पत्ताही मला वाटतं वेगळा दिला. त्या कथेला प्रथम क्रमांक जाहीर झाला तेव्हा त्यांनी 'मीच तो' हे उघड केलं. म.वि.प. ला अर्थातच आश्चर्य आणि आनंद वाटला!

>>>नारायण विनायक जगताप>>> मस्तच !
............................
एक किस्सा तर माझ्या एका नातेवाईकांच्या बाबतीत घडलेला आहे. सुमारे 60 वर्षांपूर्वी.

त्यांचे वैद्यकीय शिक्षण चालू होते. त्या दरम्यान त्यांनी कथा लिहिल्या होत्या पण कुठले मासिक त्या स्वीकारत नव्हते. मग त्यांनी एका मासिकाने नाकारलेली कथा स्वतःच्या नावापुढे बी ए (ऑनर्स) ही पदवी लिहून पाठवली आणि काय आश्चर्य !
ती स्वीकारली आणि छापली गेली होती.

प्राचीन धन्यवाद !

वरील चर्चेत आलेल्या सफाई या कादंबरीचा तुमच्या पुस्तकदर्पण साठी विचार करता येईल- अर्थात तुमच्या वैयक्तिक पसंतीनुसार.
मी ती कादंबरी अठरा वर्षांपूर्वी मूळ दिवाळी अंकात वाचली होती. आता बारकावे आठवत नाहीत पण तेव्हा अक्षरशः भारावून गेलो होतो.

एरव्ही मी कादंबरीच्या वाटेला जाणारा माणूस नाही Happy

टोपण नावाचे पटकन आठवणारे एक उदाहरण मालती बेडेकर. त्यांनी 'कळ्यांचे निश्वास' टोपण नावाने लिहिली. नंतर झालेला गदारोळ पहाता तो निर्णय योग्यच होता. पण इथे मूळ नाव व टोपण नाव दोन्हीही स्त्रीलिंगी.

आणखी एक म्हणजे रहस्यकथांचा रतीब घालणारे एस एम काशीकर. ते माया सामंत या स्त्री आयडीनेही कादंबर्‍या लिहित. अभिरुचीसंपन्न वाचकांनी ही नावे ऐकली नसावीत बहुदा.

'कळ्यांचे निश्वास'
>> होय, हे वाचलेले नाही.
पण ते बरेच गाजले होते आणि त्यासंबंधी काही लेख वाचले होते.

कळ्यांचे नि:श्वास लिहिलं तेव्हा त्यांचं नाव बाळूताई खरे असं होतं .

जॉर्ज ऑर्वेलनेही आपल्या आधीच्या लेखनाला वाचकपसंती न लाभल्याने नंतरचे लिखाण या टोपण नावाने केले. मूळ नाव एरिक ब्लेअर.

आचार्य अत्र्यांचा एक छान किस्सा वाचला. एकदा त्यांच्या व्याख्यानाला एका प्रसिद्ध राजकीय पुढार्‍याचा मुलगा अध्यक्ष म्हणून आला होता. सुरुवातीला तो अत्र्यांचे स्वागत करताना म्हणाला, “अत्रे हे श्रेष्ठ विनोदी लेखक आणि वक्ते आहेत. अतिशयोक्ती हा विनोदाचा आधार आहे. लोकांनी त्यांच्या व्याख्यानातल्या अतिशयोक्तीकडे न पाहता त्यांच्या बोलण्याचा आशय लक्षात घ्यावा”.
नंतर अत्रे बोलायला उठले आणि म्हणाले, ‘लोकहो आज माझे भाग्य आहे. आजच्या आपल्या व्याख्यानाचे अध्यक्ष हे सुप्रसिद्ध पुढारी अमुक अमुक यांचे चिरंजीव आहेत”.
हे बोलून अत्रे त्या तरुण अध्यक्षकडे हळूच वळून म्हणाले, “काहो, माझ्या या विधानात काही अतिशयोक्ती नाही ना?”

साद, ते विठ्ठलराव गाडगीळ होते. मी अत्र्यांचं ते भाषण ऐकलं आहे एका कॅसेटवर. ते म्हणाले - आज आपले थोर नेते श्री काकासाहेब गाडगीळ, यांचे ज्येष्ठ चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ .... (एवढ्या लांबलचक वर्णनानंतर एक मोठा pause) .. काय हो, ह्यात काही अतिशयोक्ती नाही ना?

साद ने लिहिलेला किस्सा वाचल्यावर हसु नाही आलं. तो विनोद demeaning वाटला. विनाकारण rude statement.
हपा नी लिहिलेलं जर शब्दश: जसाच्या तस भाषणातील वाक्य असेल तर ते सौम्य आणि वेगळ्या अर्थाचं वाटतं.

पर्ल बक या सुप्रसिद्ध अमेरिकी लेखिका. त्यांची गुड अर्थ ही कादंबरी जगभर गाजली. त्यांचा मुक्काम अनेकदा मुंबईत असे. देव आनंद यांच्या गाईड चित्रपटाच्या इंग्लिश आवृत्तीची पटकथा या लेखिकेने लिहिलेली आहे.

त्यांच्याशी संबंधित एक अभूतपूर्व असा प्रसंग एकेकाळी मुंबईत घडलाय...
पर्ल यांच्या जीवनावर आधारित 'टू गुड अर्थ् स ' हा चित्रपट अमेरिकी दूतावासाने मुंबईत निवडक रसिकांना मोफत दाखवण्याचे ठरवले होते. त्यासाठी विविधभाषक ३५० लेखकांना आग्रहाची निमंत्रणे पाठवली गेली. चित्रपट दाखवण्याचा दिवस ठरला.

प्रत्यक्ष चित्रपट सुरू होण्याच्या वेळेस संपूर्ण प्रेक्षागृहात फक्त एक(मेव) निमंत्रित हजर होते ! हे गृहस्थ म्हणजे मराठी साहित्यिक रवींद्र पिंगे.
त्यांनी एकट्याने तो चित्रपट पाहिला. या प्रसंगाने त्यांना खूप ओशाळे वाटल्याचे त्यांनी लिहिलेले आहे. अर्थात तो उत्कृष्ट चित्रपट पाहून डोळ्यांचे पारणे फिटले असेही ते म्हणतात.

आज आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी
(१३ जून). त्या निमित्त हे २ किस्से
१.
अत्रेंच्या काळातच नवकवी कवितांचा रतीब घालत होते. त्यांना उद्देशून अत्रे म्हणाले होते, की मद्य पिऊन लिहिलेले गद्य म्हणजे पद्य.
अत्रेंच्या वाचनात आलेली एक नवकविता त्यांना काही जाम सुधरली नाही. मग त्यांनी एक स्पर्धा जाहीर केली.

त्या नवकवितेचा अर्थ जो स्पष्ट करून सांगेल त्याचा अत्रे जाहीर सत्कार करणार होते. गमतीचा भाग म्हणजे त्या स्पर्धेत त्यांनी मूळ कवीलाही भाग घेण्यास परवानगी दिली होती !
..
२.
अत्र्यांवर विजय तेंडुलकरांनी ‘प्रचंड’ नावाचा लेख लिहिलाय. त्यातला एक प्रसंग अत्र्यांचे विकलांग रुप दाखवतो. १९६२च्या लोकसभा निवडणूकीत अत्रे नानासो गोरे यांच्याकडून हरले. त्या दिवशीचे अत्र्यांचे हतबल झालेले रुप त्या लेखात विस्ताराने आलेले आहे.
“आता सगळे खलास, काही राहिले नाही, आपण आपले वृत्तपत्र बंद करून टाकू” असा त्रागा अत्रे करीत होते. येणारा प्रत्येक फोन त्यांनी घेतला आणि त्यावर,

सर्वांना ओरडून सांगा, आम्ही हरलोय ..” असे बोलत होते आणिमग ते ‘प्यायला’ बसले.

तो मूळ लेख तेंच्या भाषेत वाचण्यासारखा आहे.

वरील दोन्ही पोस्टी छान आहेत.

विकलांग म्हणजे? मनाने दुर्बल या अर्थाने का ? शब्द तितका पटत नाहीये. Happy असो. 'स्खलनशील' जास्त चपखल वाटेल.

तेंडुलकर स्थिरबुद्धी वाटायचे , त्यामानाने अत्रे आली लहर केला कहर/ आत्मकेंद्री वाटायचे. अर्थात माझं मत ऐकीव माहितीवर आधारित आहे.

विकलांग म्हणजे? मनाने दुर्बल या अर्थाने >>> होय.
तो लेख संपूर्ण वाचल्यावर हा मुद्दा लक्षात येईल.
निवडणुकीतला पराभव म्हणजे आता आयुष्यातलं सगळं संपलं अशा पद्धतीने ते अगदी हतबल झाल्यासारखे वागले आहेत.

'स्खलनशील' >>> नाही पटला कारण :
स्खलन = नीतिबाह्य वर्तन करणें; पाप करणे

(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%B2%...)

वरच्या अत्रेंच्या निवडणुकीतील प्रसंगावरून सहज मनात एक विचार आला. लोकसभा किंवा विधानसभेवर निवडून गेलेले किती मराठी साहित्यिक असावेत ?
(? अत्यंत मोजके ).

मला दोनच आठवतात :
विद्याधर गोखले - लोकसभा (1989- 91)
आचार्य अत्रे - विधानसभा (1962- 67).

कोणाला अजून साहित्यिकांची नावे आठवत असतील तर लिहा; पण राज्यसभा किंवा विधानपरिषद इथली नकोत.

अरे, खरंच की ! Happy
माझ्या या प्रतिसादात
Submitted by कुमार१ on 13 June, 2023
सुधारणा : १९५७ ची निवडणूक.

ना. धो. महानोर
विधान परिषदेत होते.

Pages