प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नर्गिस किंवा नंतर त्याच्यात गुंतलेल्या पद्मिनी व वैजयंतीमालासोबत काम करताना तो आक्रमक असायचा. पण साधना किंवा नुतनसोबत असं जाणवलं नाही. कदाचित वैयक्तिक केमिस्ट्री असेल.

संगीताचा चांगला कान होता, स्वतः वेगवेगळ्या वाद्यांवर कमांड होती आणि लता, शैलेंद्र, हसरत जयपुरी, एसजेसारखी प्रतिभावान टीम होती. त्यामुळे अप्रतिम गाणी तयार झाली नाहीत तर नवल.

हिरॉईन्सना पांढऱ्या साडीत दाखवण्याची सुरूवात राज कपूरने केली. गम्मत म्हणजे यामागची प्रेरणा त्याची बायको होती. कृष्णा कपूर नेहमी तलम पोताच्या पांढऱ्या साड्यांत (आणि रेड नेल्स, लिप्समध्ये) वावरली. आणि हा लूक ती फार मस्त कॅरी करायची.

छान चर्चा सुरू केली आहेत कुमारसर. Happy
आपणच अपेक्षा ठेवू नयेत ... झाले. रोचक किस्सा.

पण निळ्या डोळ्यांचा, कश्मिरी गोऱ्या वर्णाचा, नितळ कांतीचा, उंचापुरा व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तरीही फाटका- रस्त्यावर रहाणारा व 'पै पै' मोजणारा माणूस भारतात असू शकतो, ह्यावर विश्वास बसला नाहीये. Lol

माझे मन, भांड्या भांड्यातल्या वर्णभेदाची पोस्ट पटली. Lol

पण जेव्हां कॅमेरा खालून वर घेतात तेव्हां ते पात्र लार्जर दॅन लाईफ वाटते, किंवा त्या क्षणीचे त्याचे भाव उठावदार होतात. >>> हो हे खरे आहे. त्या स्पेसिफिक सीन मधे त्या दोघांना एकत्र बघून याच्या चेहर्‍यावर जे दु:खाचे भाव होते ते सरळ लेव्हलच्या कॅमेर्‍याने कॅप्चर होत नव्हते, म्हणून त्या वेळेस तो तसा अँगल घेतला - असे त्या गप्पांमधे ऐकले होते.

राज कपूरच्या तो किस्सा शिरीष कणेकरांनी लिहिला. पडद्यावर साम्यवादी ( के एक अब्बास यांच्यामुळे) प्रत्यक्षात उलट.

“राज कपूरच्या तो किस्सा शिरीष कणेकरांनी लिहिला” - संगमच्या प्रिमियरच्या वेळचा आहे. माझ्या वाचनाप्रमाणे इतका एलॅबोरेट प्रसंग झाला नव्हता. रेड कार्पेटवर सगळ्या पाहुण्यांची यायची वेळ झाली असताना, तिथल्या एका सफाई कामगाराचा लहान (४-५ वर्षाचा) मुलगा तिथे आला असताना, राज कपूरने त्याला तिथून ‘चल हट‘ असं म्हणून हाकललं होतं. बाकी कणेकरचं इंटरप्रिटेशन होतं.

कपूर फॅमिलीविषयी असं वाचण्यात आलंय की ते कलाकारांबाबत खूप रिस्पेक्टफुल होते/आहेत. पब्लिकली तरी राज कपूर खूप विनम्र होता (रणधीर सुद्धा) त्यामानानं ऋषी कपूर अ‍ॅरोगंट वाटायचा. (चालायचंच.. सेकंड जनरेशन).

नर्गिससोबतच्या अगदी सुरुवातीच्या एका चित्रपटात तो नर्गिसला धावत जाऊन तिचे केस मुठीत धरून पकडतो आणि वळवतो, असं दृश्य आहे.

नर्गिस , वैजयंतीमाला, पद्मिनी यांच्याबरोबरचे चित्रपट आर के बॅनर्सचे. तिथे दिग्दर्शकही तोच. नूतन इ.सोबतचे चित्रपट बाहेरचे. दिग्दर्शक दुसरे.

त्याने नुसता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या मुलग्यांना घेऊन काढलेल्या चित्रपटांतही नायिकांना सोसावं लागलंय.

<पण निळ्या डोळ्यांचा, कश्मिरी गोऱ्या वर्णाचा, नितळ कांतीचा, उंचापुरा व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तरीही फाटका- रस्त्यावर रहाणारा व 'पै पै' मोजणारा>
रंगीला रतनमध्ये ऋषी कपूर असाच रस्त्यावर राहणारा असतो. त्याला श्रीमंत माणसाचा अचानक मिळालेला वारसदार दाखवायचे म्हणून पळवून आणतात आणि परवीन बाबी त्याला ब्रशने घासून अंघोळ करवते , असा प्रसंग आहे. समोर परवीन बाबी आहे म्हणून थोडा तरी खपला तो सीन.

नर्गिस , वैजयंतीमाला, पद्मिनी यांच्याबरोबरचे चित्रपट आर के बॅनर्सचे. तिथे दिग्दर्शकही तोच. नूतन इ.सोबतचे चित्रपट बाहेरचे. दिग्दर्शक दुसरे
>>>>>
पॉईंट आहे.
ऋषीच्या गोजिरवाण्या रुपामुळे त्याची अभिनयप्रतिभा झाकोळली गेली. शेवटच्या इनिंगमधे मात्र त्याला चॅलेंजिंग भुमिका मिळाल्या.

>>>राजकपूरला सहसा असा आनंदी, रोमँटिक फार कमी पाहिलाय. त्याच्या रोमान्स मधे नेहमी एक समोरच्या नायिकेला तडपवण्याची झाक असते. त्याची नायिका सतत त्याच्यासाठी आसूसलेली वगैरे असते. अन प्रेमात नेहमी त्याचा वरचष्मा जाणवत रहातो. त्या काळातही काहीसा डॉमिनन्ट नायक त्याने साकारला. हे गाणं मात्र याला अपवाद आहे.
उलट सुरैय्या सगळा भाव खाऊन जाते या गाण्यात. अर्थात हे स्वाभाविक आहे, या वेळी सुरैय्या तिच्या करियरच्या सगळ्यात वरच्या पायदानावर हेती. तर राजकपूर तसा नवा होता. अशी जरा उलटी भूमिका बघताना मला तर थोडा आसूरी आनंद मिळाला Wink
एरवी राजकपूर कितीही आवडत असला तरी बायकांप्रती त्याचा अॅप्रोच मला खटकत आलाय. म्हणजे हृदयात एक कळ येते वगैरे ठिके हो, पण सतत का आपला त्याचा माज, हुर्रऽऽऽ <<< : https://www.maayboli.com/node/83641?page=3 इथे तारारी आरारी बद्दल लिहिताना लिहिलेल Happy

राज कपूरचे मी फारसे चित्रपट बघितलेले नाहीत. अनाडी लहानपणी बघितलाय. संगम अर्धवट बघितलाय. राज कपूरची गरीब भूमिकांमधली देहबोली ही चार्ली चॅप्लिनसारखी आहे हे मला स्वतःहून (कुठेही न वाचता) लक्षात आलं होतं. (गाणी बघितली आहेत.) चार्ली चॅप्लिन मला आवडतो, पण राज कपूर नाही आवडत.

अवल, सुरैयासोबतच्या गाण्यात ती कथानकाची आणि भूमिकेची गरज असावी. त्यांच्या प्रत्यक्षातल्या स्टेटसचा काही संबंध नसावा. हे दोघे बालकलाकार म्हणून आकाशवाणीवर कार्यक्रम करायला जात, तेव्हा राज कपूर सुरैयाच्या वेण्या ओढून तिला त्रास देत असे अशी आठवण तिने अमीन सायानींना सांगितली आहे. म्हणजे राजचं लहानपणापासून असंच होतं.

नर्गिसला धावत जाऊन तिचे केस मुठीत धरून पकडतो आणि वळवतो, असं दृश्य आहे.
>>> बघितले आहे बहुतेक. मर्दबिर्द का काय..... विषाक्त पौरुषत्व..!

समोर परवीन बाबी आहे म्हणून थोडा तरी खपला तो सीन.>>> Happy इतके चिकने- गरीब कुणी असूच शकत नाही.

कपूर तेही डबल ओ असलेले (Kapoor) आणि कपूर- नावात यू असलेले (Kapur उदाहरण शाहीद, पंकज कपूर) हे सुद्धा वेगवेगळे आहेत म्हणे. नावात 'डबल ओ' वाले भणंग दिसणे अशक्य आहे. जशी आपली 'चला हवा येऊ द्या'ची टीम खानदानी श्रीमंत दिसणं अशक्य आहे. Happy तेही गुणी कलावंत आहेतच पण देखण्या लोकांना बहुतेकवेळा pretty privilege मिळतेच. शिवाय सुंदर चेहऱ्यांवर बघणाऱ्यांचा विश्वास चटकन बसतो म्हणे.

काल प्रतिभावंतांच्या शहरातल्या सर्वांनी नेहमीप्रमाणे आरशासमोर उभे राहून शुभेच्छा दिल्या.

ऑलिंपिक्सच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील काही हट के क्रीडा किस्से
१. प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो आणि पायथागोरस यांचे खेळांमध्ये पण योगदान आहे. प्लेटो स्वतः कुस्तीगीर होते आणि त्या काळातील Isthmian या ऑलिंपिकच्या धर्तीवर भरणाऱ्या खेळांमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. तर पायथागोरस यांनी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देऊन काही ऑलिंपिक विजेते घडवलेले आहेत ( तर सॉक्रेटिस आणि ऍरिस्टॉटल यांच्या खेळातील अशा योगदानाबाबत दुमत आहे).

२. 1936 च्या ऑलिंपिक्स बर्लिनला भरल्या होत्या. तेव्हा हिटलरने, “आफ्रिकी खेळाडू हे हलक्या वंशातले असल्याने जर्मन खेळाडूंना हरवूच शकणार नाहीत”, असा अपप्रचार केला होता. मात्र जेस्सी ओवेन्स या अमेरिकी कृष्णवर्णीय खेळाडूने तो सपशेल खोटा ठरवला. त्या स्पर्धेत त्याने धावण्याच्या आणि लांब उडीच्या स्पर्धेत एकूण ४ सुवर्णपदके मिळवली. त्याच्याशी हस्तांदोलन करायला लागू नये म्हणून हिटलरने बक्षीस समारंभांना यायचेच टाळले.

३. 2000 च्या दशकात एकदा दिल्लीत जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या होत्या. त्या बघायला कोणी फिरकले सुद्धा नव्हते. परंतु समारोपाच्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन आल्यामुळे तुफान गर्दी झाली होती. त्या स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या जपान संघाच्या प्रशिक्षकाला अमिताभ हे सिनेनट आहेत असे कळल्यावर धक्का बसला. त्याने त्यावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया अशी होती,

“तुम्हा भारतीयांना पदके का मिळत नाहीत हे आता कळलं ! तुम्हाला जिंकण्याचा अभिनय पुरतो. नाटक करून पदके कशी मिळणार ? आमच्याकडे खेळाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी सिनेनटांना बोलवायची गरज भासत नाही”.

( आंतरजाल माहिती आणि भीष्मराज बाम यांच्या लेखातून साभार)

खेळांसाठी मायबोलीवर वेगळे ग्रूप आहेत. पण तुम्ही म्हणताय तर
https://www.facebook.com/tennischannel/videos/453973070837096/?mibextid=...

लिएंडर पेस चं कौतुक मार्टिना नवरातिलोवाकडून

स्वतःची परखड चिकित्सा करणारे कलावंत तसे कमी असतात. त्याचा हा एक नमुना :

सॉमरसेट मॉम (1874 - 1965) हे इंग्लिश लेखक कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या ८० व्या वाढदिवसापर्यंत त्यांच्या खपलेल्या पुस्तक प्रतींची एकूण संख्या चार कोटी होती ! अशा तऱ्हेने त्यांना लेखनावर अमाप संपत्ती मिळाली. त्यातील 17,000 पौंड वेगळे काढून त्यांनी एक प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्या रकमेच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी एका होतकरू इंग्रजी ललित साहित्यिकाला 400 पौंडाची पर्यटन शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली.

अशा या लोकप्रिय लेखकाने स्वतःचे मूल्यमापन वाचकांसमोर जाहीर केलेले आहे. ते म्हणतात,
“I know just where I stand : in the very front row of the second raters”.

आपण अभिजात लेखनाच्या फक्त जवळपासच जाऊ शकलो याचे पूर्ण भान त्यांना होते. त्यांनी काही इंग्लिश लेखकांचे आदर्श समोर ठेवले होते. समृद्ध भाषा म्हणजे काय ते एडमंड बर्क यांच्या लेखनातून समजतं, असं ते म्हणायचे. तर कोणत्याही लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी ते स्वतः Voltaire यांचे ‘कॅन्डीड’ हे पुस्तक चाळायचे. Voltaire ना त्यांनी “परीस” म्हटलेले आहे.

डॉ. महेश केळुस्कर
विविध प्रकारच्या दर्जेदार कवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी बरीच राजकीय उपरोधक काव्ये देखील रचली आहेत. असे काही लिहिले की समाजातून तिखट प्रतिक्रियांचा धोका असतोच. परंतु त्यांनी मनाशी एक पक्के ठरवले होते, की कुठल्याही आमिषाला बळी पडायचे नाही आणि धमकीला घाबरायचे नाही.
1990 साली त्यांना पहिली प्राणघातक धमकी आलेली होती परंतु ते डगमगले नाहीत. स्पष्टवक्तेपणा हा गुण ते त्यांच्या आईकडून शिकलेले आहेत.
इथे छान मुलाखत आहे : https://www.youtube.com/watch?v=R-QgEyU7HjU

विडंबन या अवघड काव्यप्रकारासाठी लागणारी प्रतिभा, दत्ता डावजेकरांसारखे गीतातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणारे संगीतकार, इत्यादी मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे.

कवितेचे दोनच प्रकार असल्याचे ते मानतात : कविता आणि ‘अ-कविता’!

नारायण सुर्वे यांची पुण्ण्याई !

कै. नारायण सुर्वे यांच्या घरी एका चोराने चोरी केली. मात्र त्या चोराला जेव्हा समजलं की हे त्यांचं घर आहे तेव्हा मात्र त्याने चोरलेली वस्तू परत केली. तसंच एक चिठ्ठीही लिहिली आणि त्यात त्यांनी सुर्वे आणि त्यांचे कुटुंबीय यांची माफीही मागितली. हा प्रसंग पाहण्यासाठी आज नारायण सुर्वे हयात नाहीत, मात्र या घटनेची चर्चा होते आहे.
https://www.loksatta.com/maharashtra/thief-returns-stolen-tv-after-reali...
..

चोरोंके भी कुछ उसूल होते है . . . Happy

द पां खांबेटे
हे मराठीतील एक नामवंत लेखक. ते जेव्हा अनेक मासिकांमधून लिहीत होते तेव्हा त्यांनी एकूण 21 टोपणनावांनी लेखन केलं आहे. हा कदाचित भारतीय विक्रम असावा !

त्या नावांपैकी काही गाजलेली नावे म्हणजे :
चंद्रहास, अवधूत आंजर्लेकर, दत्ता मराठे, वि म ब्रम्हे, मुरारी वेंगुर्लेकर,

निसर्गप्रेमी, रमाकांत वालावलकर, सोमाजी गोमाजी कापशे,

के. दत्त, संतदास आणि गोष्टीवेल्हाळ.

>>> द पां खांबेटे
हे मराठीतील एक नामवंत लेखक. ते जेव्हा अनेक मासिकांमधून लिहीत होते तेव्हा त्यांनी एकूण 21 टोपणनावांनी लेखन केलं आहे. हा कदाचित भारतीय विक्रम असावा !

मायबोलीवर त्यांचा अनुल्लेख झाला असता. इतकी किरकोळ संख्या येथे कोणीही achieve करते.

Pages