प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखक प्रदीप सेबॅस्टीयननी त्यांच्या ‘द ग्रोनिंग शेल्फ’ या पुस्तकात दिलेला हा किस्सा.
त्यांना एमएच्या शिक्षणादरम्यान टी जी वैद्यनाथन हे पुस्तकप्रेमी प्राध्यापक होते. त्यांचा पहिला तास पुस्तके कशी हाताळावीत याविषयीचा असे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,

“आधी हात स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावेत. मग हाताला थोडी टाल्कम पावडर लावावी आणि त्यानंतरच पुस्तकाला हात लावावा. पातळ वेष्टणाचे पुस्तक असेल तर ते पूर्ण न उघडता काटकोनात उघडावं”

असे हे पुस्तक-ममत्व !

हे लहानपणी शिकवलेलं आठवल
तैलात रक्षेत जलात रक्षेत ,
रक्षेत शिथिल बंधनात ।
मूर्ख हस्ते न दातव्यम् ,
एवं वदति पुस्तकम् ।।

असे हे पुस्तक-ममत्व ! >>
नशीब अजून लिहिलं नाही की नंतर नव्याकोऱ्या पुस्तकाच्या कागदाचा श्वास छातीत भरून घ्यावा. Lol

नशीब अजून लिहिलं नाही की नंतर नव्याकोऱ्या पुस्तकाच्या कागदाचा श्वास छातीत भरून घ्यावा. Lol >>>> मी हे अजूनही करतो. Lol पण आताशा कागदी पुस्तके वाचत नाही जास्त.

जर माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर पुढील किस्सा एका युट्युब व्हिडिओत पाहिल्याचे अंधुक स्मरते. एका कार्यक्रमात लोकसत्ता चे गिरीश कुबेर यांना एका श्रोत्याने प्रश्न/तक्रार विचारला होता कि त्यांच्या वर्तमानपत्रात खूप जाहिराती असतात . त्यावर ते म्हणाले कि विनाजाहिराती पेपर चालवायला त्याची किंमत किती ठेवावी लागेल याचे गणित त्यांनी केले असून ती किंमत प्रति पेपर शेहेचाळीस रुपये आणि कितीतरी पैसे अशी येईल. तुम्ही घेणार आहेत का त्या किमतीला पेपर? तो श्रोता निरुत्तर झाला.

*प्रति पेपर शेहेचाळीस रुपये >>>
मुद्दा बरोबर आहे.
खूप वर्षांपूर्वी छापील दैनिक सकाळमध्ये प्रतापराव पवारांनी या विषयाचा चांगला ऊहापोह केला होता आणि त्यात वाचकांच्या या नेहमीच्या तक्रारीला उत्तर दिले होते. तेव्हा त्यांच्या या दैनिकात मजकुराचे प्रमाण हे जाहिरातींच्या प्रमाणापेक्षा बऱ्यापैकी अधिक होते (नक्की टक्केवारी आता आठवत नाही).

असेच काही नाही , त्यांचा निर्मिती खर्च सुद्धा जास्त असू शकतो कि ज्यामुळे त्यांना एवढी किंमत ठेवावी लागते .

श्री ना पेंडसे आणि वायफळ गप्पा !
श्रीना या विषयावर त्यांच्या ‘एक दुर्लभस्नेह’ या पुस्तकात असे म्हणतात,

वायफळ गप्पांना माझ्या लेखी आयुष्यात फार मोठे स्थान आहे. मनाला मिळणारी ती विश्रांती असते. फक्त गप्पा निकोप हव्यात. अशा गप्पा फक्त निकटच्या मित्राशीच होऊ शकतात आणि असे मित्र फार थोड्यांच्या वाट्याला येतात. . .
. . . निकोपगप्पा म्हटलं; कारण नेहमीच्या वायफळ गप्पांत अनुपस्थितीत मित्रांची, व्यक्तींची निंदानालास्ती, खाजगी आयुष्यातील बिनबुडाच्या प्रकरणांची चविष्ट चर्चा यांचे प्राबल्य असते. गप्पांना ‘रंग’ त्यामुळे भरतो ! आमच्या गप्पांत त्यांचा पूर्ण अभाव असतो”
.

84, Charing Cross Road
या नावाचे प्रसिद्ध इंग्लिश पुस्तक असून त्यावर आधारित नाटक व चित्रपटही निघालेले आहेत. या पुस्तकाची जन्मकथा रंजक आहे.
Helene Hanff या अमेरिकी लेखिका काही अभिजात इंग्लिश पुस्तकांच्या शोधात असतात आणि त्यांना ती न्यूयॉर्कमध्ये काही मिळत नाहीत. एकदा एका साप्ताहिकात लंडनमधील एका पुस्तक दुकानाची जाहिरात त्या पाहतात. त्या दुकानाचा पत्ता असतो 84, Charing Cross Road.

मग त्या पुस्तक विक्रेत्यांना पत्र लिहीतात. त्यांच्याकडून उत्साहवर्धक प्रतिसाद आल्यामुळे पुढे त्यांचा नियमित पत्रव्यवहार त्यांच्याशी चालू राहतो. त्या पत्रव्यवहारातूनच छानपैकी पत्रमैत्री जमते आणि ती दरवर्षी क्रिसमस केकच्या देवाण-घेवाणी पर्यंत पोहोचते. कालांतराने त्या पुस्तक विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वरील दीर्घ पत्रव्यवहाराचेच एक पुस्तक न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित झाले. त्या पुस्तकाला दुकानाच्या पत्त्याचेच शीर्षक दिले गेले.

कालांतराने ते दुकान नवीन माणसाने विकत घेतले आणि त्याचे नूतनीकरण केले. त्यानंतर लेखिकेने ते पाहण्यासाठी लंडनला खास भेट दिली तेव्हा त्यांचे त्या दुकान आणि वाचकांतर्फे सहर्ष स्वागत करण्यात आले.

>>>>निकोपगप्पा म्हटलं
करेक्ट गॉसिपसारखा घाणेरडा प्रकार नाही.

परनिंदा विष्ठेसमान माना - गोंदवलेकर महाराज.

म. गांधी जयंती निमित्त :
सन 1962 मध्ये लंडनमधील भारतीय वकिलातीतील अधिकारी मोतीलाल कोठारी यांनी रिचर्ड अ‍ॅटेनबरोना फोन केला आणि एका गोपनीय कामासाठी भेटायचे आहे असे सांगितले. रिचर्ड तेव्हा फक्त 39 वर्षांचे होते आणि रंगभूमीवरचे आघाडीचे नट म्हणून ते ख्यातनाम होते. परंतु त्यांची दिग्दर्शनाची पाटी मात्र अद्याप कोरी होती.

अखेर ठरलेल्या वेळी हे दोघे एक हॉटेलात भेटले. मग कोठारीनी त्यांच्यापुढे गांधी चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला. मुळात रिचर्डना भारताबद्दल फारशी माहिती नव्हती आणि गांधीजींच्या विषयी तर त्याहून कमी. त्यांनी कोठारींना स्पष्टपणे हे सगळं सांगून टाकलं. तरी सुद्धा कोठारींचा आग्रह होता आणि रिचर्डना समजत नव्हते की हे आपल्याच मागे का लागले आहेत ? तिथून निघताना कोठारींनी रिचर्डना लुई फिशरकृत गांधीजींचे चरित्र वाचायला दिले आणि दोन आठवड्यात निर्णय घ्यायचा ठरले.

रिचर्डनी स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीच्या दिवशी ते 505 पानी चरित्र पलंगावर पडून वाचायला घेतलं. ते 48 व्या पानावर आले आणि तिथे लिहिलेला मजकूर वाचून ते एकदम ताडकन उठून बसले. तो मजकूर असा होता,

“ सन १८९०मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधीजी आपल्या एका भारतीय सोबत्याबरोबर फुटपाथ वरुन चालले असता समोरून दोन गोरे त्यांच्या दिशेने येऊ लागले. त्यावर हे दोघे काळे घाईघाईने फुटपाथ शेजारच्या गटारात उतरून गोरे जाईपर्यंत थांबून राहिले. गांधीजी मग आपल्या सोबत्याकडे वळून म्हणाले,
“ दुसऱ्या माणसाची मानखंडना केल्याने आपली प्रतिष्ठा वाढते असं काही माणसांना कसं वाटतं याचा मला नेहमीच कोडं पडतं”.

हे वाचल्यावर रिचर्ड कमालीचे उत्तेजित झाले आणि मग दुसऱ्याच दिवशी पुस्तक पूर्ण वाचून होण्याची वाट न पाहता त्यांनी लंडनला कोठारीना फोन लावून आपला होकार कळवला !

(यशवंत रांजणकर यांच्या ‘गांधी’ या लेखातून साभार)

छान किस्से
<गॉसिपसारखा घाणेरडा प्रकार नाही.> +१

अबब ! किती हे नाटकवेड
सन 1921मध्ये मुंबईतील बालीवाला थिएटर येथे संयुक्त मानापमान नाटकाच्या तिकीट विक्रीसाठी एके दिवशी सहा किलोमीटर लांब लोकांची रांग लागली होती. त्या नाटकाची तिकीटे मिळावीत म्हणून नाट्यप्रेमींनी अगदी कलकत्ता आणि दिल्लीहून सुद्धा तारा पाठवल्या होत्या. इतकेच नाही, तर नाट्यतिकिटांचा काळाबाजार होण्याची परंपरा या नाटकापासून सुरू झाली !

नाटकाच्या या विशेष प्रयोगाच्या वेळी तर नाट्यगृहाच्या बाहेर दहा हजार लोक उभे होते- बाहेर चुकून काही ऐकायला मिळाले तर या आशेने.

( हृषीकेश जोशी यांच्या मुलाखतीतून : https://www.youtube.com/watch?v=rNabN64zXVg)

हे एक गॉसिप होईल, किंवा हिपोकरसी.. एक एसटीच्या दारावर छापलेले कवी आहेत, ज्या कवितेमुळे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली ती कविता स्त्रीच्या मुक्त असण्यावर आणि भृहत्येवर होती. यांची मुलगी कॉलेजात होती, माझी खूप छान मैत्रीण..;मुलींच्या हॉस्टेलवर राहायची. एकदा काहीतरी निमित्ताने तिच्या गावी जाणे झाले. आमचा ग्रुपच होता, पण ती जी घरी गेली ती पुन्हा त्या दिवसात भेटायला आलीच नाही. एका मित्राकडे आमचा पूर्ण ग्रुप (ज्यात 10 मुले आणि 8 मुली होत्या ) थांबलेला, तर तिला बोलावलं भेटायला.. कशी बशी आली तर खरी पण 15 मिनिटात मी जाते जाते करत होती.. आणि अचानक रडायलाच लागली.. नंतर तिला होस्टेलवर गेल्यावर विचारलं तर समजलं, कवी महाशय आपल्या कवितेत वेगळे आणि घरात वेगळेच होते. मुलीने पंजाबी व्यतिरिक्त इतर कोणते कपडे घालू नयेत, मुलांशी मैत्री करू नये, वगैरे वगैरे अनेक बंधने तिच्यावर होती.. असो!

अ पा, बहुतेक सगळे साहित्यिक ह्याच प्रकारचे आढळतील. दाखवायचे आणि खायचे दात वेगळे.

जसे लिहीतो तसेच वागतो असे असणारे साहित्यिक विरळा असावेत.

रद्दीच्या जगातील जिद्दीचा माणूस !
पुस्तक विक्रेता हा पुस्तकसंस्कृतीमधला एक महत्त्वाचा दुवा असतो. विशेषतः जुनी दुर्मिळ पुस्तके अभ्यासू वाचकांपर्यंत पोहोचवण्यात अशा विक्रेत्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अनेक संशोधकांना दुर्मिळातली दुर्मिळ पुस्तके वाट्टेल ते करून मिळवून देण्यात महाराष्ट्रात दोन विक्रेते अग्रेसर मानले जातात :
पां. रा. ढमढेरे आणि
रमेश रघुवंशी

या दोघांनीही आपला व्यवसाय चक्क पदपथावर सुरू करून कालांतराने त्याची भरभराट केली. रघुवंशी तर पुढे प्रकाशक झाले.

संशोधक स गं मालशे यांना ताराबाई शिंदे लिखित ‘स्त्रीपुरुषतुलना’ या पुस्तकाची नितांत आवश्यकता होती. संपूर्ण महाराष्ट्रात चौकशी केल्यानंतर लक्षात आले की ते पुस्तक जवळजवळ नाहीसे झालेले आहे. याच पुस्तकाची चिखलाने माखलेली प्रत ढमढेर्‍यांनी मालशेना मिळवून दिली होती.

अनेक संशोधकांनी त्यांच्या लेखनातून ढमढेरे यांचा आभारपूर्वक उल्लेख केलेला आहे. अशोक कामत यांनी त्यांच्या ‘सहवासचित्रे’ या पुस्तकात ढमढेर्‍यांविषयी ‘रद्दीच्या जगातील जिद्दीचा माणूस’ हा लेख लिहिला आहे.

खूप छान. रद्दी विकत असले तरी ढमढेर्‍यांनापण पुस्तकांबद्दल तितकीच आस्था असणार, जितकी त्या संशोधकांना होती, असे वाटतेय.

बरोबर. ढमढेरे यांनी अजून काही स्वप्ने पाहिली होती.
इंग्लंड अमेरिकेतले ‘ख्रिस्टीज’ सारखे मोठे विक्रेते पुस्तकांच्या पहिल्या आवृत्ती, लेखकाची स्वाक्षरी केलेल्या प्रती, इत्यादींचे मोठाले लिलाव भरवतात. तसेच आपणही करावे अशी त्यांची इच्छा होती.
परंतु एकंदरीत आपल्याकडील उदासीनतेमुळे त्या गोष्टी फलद्रुप झाल्या नसाव्यात.

माझ्या आठवणी दगा देत नसतील तर ...
ह्या श्री ढमढेरे ह्यांच्या घरी मी गेले होतो. त्यावेळी मी अगदी लहान होतो. माझी मोठी बहिण संस्कृत पंडिता होती. तिला संस्कृतची जुनी पुस्तके अभ्यासासाठी लागत असत. तसेच तिला थोडी ज्योतिष शास्त्रात रुची होती. तर ह्या विषयांची पुस्तके मिळण्याचे एकच ठिकाण होते ते म्हणजे ढमढेरे ह्यांचे घर. ढमढेरे घरातच पुस्तकांच्या गराड्यात पडलेले असत. जिकडे पहाल तिकडे पुस्तके. भरत नात्य मंदिराच्या समोर त्यांचे घर होते. भा इ सं मडळही तेथेच पलीकडे होते.
अजून ताण देतो. त्यांचा मुलगा माझ्या बरोबर होता नोकरीला. पण त्याबद्दल नाही लिहिणार कारण त्या आठवणी दुःखद आहेत.
जाणकारांनी काही चुकत असेल तर सांगावे.

अस्मिता आभार.
रद्दी फुटपाथ वगैरे मी पाहिलेले नाही. त्यामुळे मला त्याची कल्पना नाही. बहिणी मुळे मलाही संसृतची थोडी "लागण" झाली होती. टि म वि च्या काही परिक्षाही दिल्या. फार भारी भारी लोकांचा सहवास लाभला. स्वीट होम च्या समोर आमचे दीक्षित नावाचे सर रहात. त्यांच्या इथे मारुलकर नावाचे शास्त्री रहात होते. त्यांच्या कडे मी लघु सिद्धांत कौमुदी शिकायला जात असे. काहीही पुस्तक न बघता ते शिकवत असत. नित्यकर्म शिकवणारे आमचे सप्रे गुरुजी आणि तुळशी बागेत गीता पाठ करून घेणारे ओक सर दोघेही अत्यंत तापट. सप्रे गुरुजी स्वर चुकला तर बसल्या जागेवरून लोड फेकून मारायचे. वर वाग्ताडन! गधड्या वगैरे. तर तुळशीबागेत आमची संथा चालू असताना बायकामुले येऊन तिथे शांतता भंग करायचे. कि त्यांचे पित्त खवळायचे . मग चर्च कशी शांत असतात ह्यावर एक बौद्धिक व्हायचे.
विचित्र प्रतिभावंतांच्या/लोकांच्या आठवणी अनेक. रात्र सरेल पण आठवणी संपणार नाहीत.

कुमार सर
तुम्ही बहुतेक "काही म्हातारे आणि एक म्हातारी " हे वि द घाटे लिखित पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्या वाचा. ह्या लेखासाठी भरपूर माल मसाला आहे त्यात.

हेही छान लिहिले आहे केकू. आठवणी आवडल्या. Happy
एवढे नाही पण काही वर्षे शाळाबाह्य संस्कृत शिकले आहे, त्यामुळे वाचायला आवडले.

केकू आणि अस्मिता
छान पूरक माहितीबद्दल आभार !
. . .

माझ्या लहानपणी बाजीराव रस्त्यावरील पदपथावर पुस्तके मांडून बसणारे एक गोरे, जाडेले आणि मध्यम उंचीचे गृहस्थ होते. तेच ढमढेरे होते की काय, अशी आता शंका वाटते आहे Happy

Pages