अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
केकू,
केकू,
वाचली हो आणि तिकडे श्रेय देऊन आलो देखील !
"बालकवि" ह्या प्रतिभावंत
"बालकवि" ह्या प्रतिभावंत कवीचे खाजगी जीवन अत्यंत दुःखद होते. विचित्र गोष्ट अशी कि त्यांना आपल्या मृत्यूची पूर्व सुचना मिळाली होती असे वाचल्याचे स्मरते. त्या दिवशी त्यांच्या मानलेल्या आईने -लक्ष्मीबाई टिळक-त्यांना दिवसभर आपल्या शेजारी बसवून ठेवले होते. अर्थात त्या दिवशी काही झाले नाही. पण त्यानंतर बरोबर एका वर्षाने त्याच दिवशी त्यांचा रेल्वेखाली सापडून अपघाती मृत्य झाला.
लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्या "स्मृतिचित्रे" ह्या आत्मचरित्रात हा किस्सा आहे म्हणे.
कुणाला काही माहिती आहे का?
एका वर्षाने नाही, पाच
एका वर्षाने नाही, पाच वर्षांनी. त्याच तारखेला का हे लक्ष्मीबाईंनी लिहिलं नसावं. स्मृतिचित्रे पुन्हा वाचून खात्री करून घ्यावी लागेल.
https://www.maayboli.com/node/65502
इथे त्या प्रसंगाबद्दल आणि त्यांच्या तदनुषंगिक कवितांबद्दल मी लिहिले आहे.
भरत , अनेक धन्यवाद!
भरत ,
अनेक धन्यवाद!
हल्लीच सो मि वर वाचले की
हल्लीच सो मि वर वाचले की बालकवी आपल्या पत्नीला मारहाण करायचे. खुप जणांनी त्यांना बरेच वाईट साईट बोलुन घेतले. त्या काळात पत्नीला वागवायची जी नेहमीची पद्धत होती कदाचित तसेच त्यांचे वागणे असेल, अदाचित हा अपवादात्मक प्रसण्ग असेल जो कोणीतरी नमुद केला आणि आता वर आला. त्यांच्या कविता खुप तरल होत्या, निसर्गाशी जवळ होत्या. अशा प्रतिभावंताच्या आयुष्यातील जोडीदार त्याशी सुसंगत नसेल तर किती घुसमट होत असेल अशा माणसाची. आताच्या काळात दुसरा जोडीदार शोधणे सोपे असेल, तेव्हा कदाचित असेल्/नसेल. मागे एका मराठी चित्रपट दिग्दर्शकाने असा दुसरा संसार मांडल्याची चर्चा माबोवर झाली होती ते आठवले.
बालकवींचे मोठे बंधू आणि
बालकवींचे मोठे बंधू आणि त्यांच्या पत्नीने बालकवींचे मन त्यांच्या पत्नी विषयी कागाळ्या करून कलुषित केले. त्याचा परिणाम असेल.
Mad Genius: Schizophrenia and
Mad Genius: Schizophrenia and Creativity
What, if anything, is the link between psychosis and creativity?
https://www.psychologytoday.com/us/blog/hide-and-seek/201509/mad-genius-...
आणि
https://www.psychologytoday.com/us/articles/201707/the-mad-genius-mystery
कुमार१ सर तुम्ही ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढा प्लीज.
*psychosis and creativity>>
*psychosis and creativity>>
धन्यवाद
दुवे बघतो. पण विषय गहन आहे. कोणाचा अभ्यास असेल तर लिहा त्याच्यावर.
** कॅमेरा त्यांच्या कलीगकडे
एव्हरेस्टवीर अद्यतन :
** कॅमेरा त्यांच्या कलीगकडे होता व त्याचा मृतदेह नाही सापडलाय अजून. मध्यंतरी जॉर्ज मेलरी यांचा मृतदेह सापडला. आणि त्यावरून ते पहिले एव्हरेस्टवीर नव्हते असं कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न झाला.
Submitted by माझेमन on 19 July, 2024 - 09:49 **
>>>
या संदर्भात National Geographic च्या चमूच्या संशोधनाची बातमी :
https://indianexpress.com/article/world/partial-remains-mount-everest-cl...
"“I lifted up the sock, and there’s a red label that has ‘A. C. IRVINE’. . .
आता डीएनए चाचणी होईल .
मीही असेच काही तरी लिहिणार
मीही असेच काही तरी लिहिणार होते केकू.
The Queen's Gambit नावाची एक मिनीसिरीज बघितली. त्यात बुद्धिबळ पटूची ( prodigy) गोष्ट आहे. जी लहानपणी आईला डोळ्यासमोर गेलेले बघते, नंतर अनाथाश्रमात जाते. त्या काळात अनाथाश्रमात मुलांनी त्रास देऊ नये म्हणून ड्रग्स औषधांसारखे दिले जायचे. त्याचीही तिला सवय लागते. केवळ बुद्धिबळाच्या ध्यासामुळे ती तगते.
अतिशय प्रेमहीन आणि थंड बालपणात एका सफाई कामगाराकडून बुद्धिबळ शिकत जाते व ग्रॅंडमास्टर होते अशी गोष्ट आहे. त्यात तिला अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावान असल्याने सुद्धा प्रचंड एकटेपणा येतो व ती व्यसनांच्या आहारी जाते. तेव्हा एक वाक्य तेथे म्हटले होते - Intelligence and creativity can cause psychosis. अर्थात दोन्ही प्रचंड आणि एकत्र असले तर मेंदूत बिघाड होतो. कुणीही समजून घेऊ शकत नाही कारण इतरांकडे ते समजून घेण्यासाठी लागणारा दृष्टीकोन आणि बुद्धी दोन्ही नसते. ते मला पटलेलेच होते.
कारण Vincent van Gogh चे जगप्रसिद्ध Starry Nights त्याने मनोरूग्णालयातून दिसणाऱ्या खिडकीतून काढले होते असे म्हणतात. निकोला टेस्लानेही आयुष्याचे शेवटचे अनेक दिवस हॉटेल रूममधे स्वतःला कोंडवून ठेवले होते. प्रत्येकाचे 'नॉर्मल' वेगळे असते, त्यामुळे वेडा/ वेडी लेबल लावणे पटत नाही.
बालकवींविषयी ते वाचून माझा आदर कमी झाला होता. विक्षिप्त, लहरी, तिरसट, एकलकोंडे समजू शकते पण हिंसक नाही समजून घेता येत. हा गुन्हाच वाटतो. 'तो रविकर का गोजिरवाणा' वगैरे ऐकून आधी तेच आठवते.
Oliver Shanti नावाचा प्रसिद्ध जर्मन संगीतकार आहे, त्याचे संगीत (calm music) मला फार आवडायचे. नंतर कळले तो लहान मुलांचे शोषण करायचा तेव्हापासून आदर नष्ट झाला आणि पुन्हा कधीही ऐकावेसे वाटले नाही. अशा गोष्टी विसरता येत नाहीत.
( सध्या येथे P. Diddy नावाच्या Rapper चे प्रकरण गाजतेय त्यावरून) अशातच लेकीने प्रश्न विचारला होता. आई, Can you separate the art from the artist? मला विचार करावा लागला, बहुतेक एका मर्यादेपर्यंतच मला ते येते. जेथे सामाजिक गुन्हेगारी प्रवृत्ती असेल तेथे ती मर्यादा संपते.
*कुणीही समजून घेऊ शकत नाही
*कुणीही समजून घेऊ शकत नाही कारण इतरांकडे ते समजून घेण्यासाठी लागणारा दृष्टीकोन आणि बुद्धी दोन्ही नसते. >>> +१११ अ-ग-दी !
“कलावंत हा विकारवश असतो’ असे एक वाक्य मधु मंगेश कर्णिक यांच्या 'संधिकाल’ या कादंबरीत आहे.
अस्मिता
अस्मिता
Can you separate the art from the artist?>>> हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे!
Intelligence and creativity can cause psychosis>> Or is it other way round?
हो, खरे आहे. हे दोन्ही प्रश्न
हो, खरे आहे. हे दोन्ही प्रश्न विचारात पाडतात.
बालकवींविषयी हे माहीत नव्हते.
बालकवींविषयी हे माहीत नव्हते. खरे असेल तर नक्कीच आदर कमी/नाहीसा होईल. एक मर्यादा आहे याच्याशी सहमत.
अफाट कलाकृती निर्माण करणार्यांच्या त्यामागे ज्या प्रेरणा असतात त्याचेच हे साइड इफेक्ट असतात असेही वाचले आहे. पण दुसर्यांना जर त्याचा त्रास होणार असेल तर तेथे ती मर्यादा क्रॉस होते.
Blade Runner, Total Recall,
Blade Runner, Total Recall, Minority Report and A Scanner Darkly हे सिनेमे आपण पाहिले असतील. फिलीप के डिक ह्या नावाजलेल्या विज्ञान कथा लेखकाच्या कथावर आधारित. हा गुणी लेखक कायम पैशाच्या विवंचनेत असे. मग रात्रंदिवस कथा लिहिता याव्यात म्हणून त्याने ड्रग्स घेण्यास सुरवात केली. त्या ड्रग्सच्या धुंदीत तो लिहित असे. त्याला अजूनही काही मानसिक आजार होते. दुर्दैवी जीव!
Hergé म्हणजे तिनतिन चा जनक
Hergé म्हणजे तिनतिन चा जनक किंवा एनिड ब्लायटन ते वंशवादी रेसिस्ट होते का?
अश्या आरोपांची छाननी करताना थोडे तारतम्य बाळगायला पाहिजे.
“ बालकवींविषयी हे माहीत
“ बालकवींविषयी हे माहीत नव्हते. खरे असेल तर नक्कीच आदर कमी/नाहीसा होईल.” - इतर कुठल्याही व्यक्तीप्रमाणेच बालकवी सुद्धा ‘प्रॉडक्ट ऑफ हिज टाईम‘ होते. त्यांच्या बायकोची - पार्वतीबाईंची - कथा त्या काळातल्या भारतीय स्त्री कथांइतकीच करुण आहे. नवरा-बायकोत आठ वर्षाचं अंतर होतं. पार्वतीबाईंची माहेरची सांपत्तिक स्थिती ठोंबर्यांपेक्षा चांगली होती. पण आई कडक स्वभावाची होती. मुलीला १६ वर्षाची होईपर्यंत मारहाण करायची. सासरी बालकवींची आई (सासू), आणि काहीही कामधाम न करता, धाकट्या भावाच्या कमाईवर जगणारा बालकवींचा थोरला भाऊ आणि त्याची बायको, ह्या लोकांमुळे पार्वतीबाईच्या आयुष्याची वाताहत झाली.
लग्नानंतर पाच वर्षं पार्वतीबाईंना सासरी नेलंच नव्हतं. पण अधूनमधून त्यांचा दीर त्यांच्या वडिलांकडून पैसे घेऊन जायचा. सासरी गेल्यावर सासूनं त्यांचे दागिने काढून घेतले. मोठ्या भावाने, जावेने आणि आईने ह्या नवरा-बायकोला फारसं जवळ न येऊ देणं, बालकवींचे कान भरणं वगैरे गोष्टी इमानेइतबारे केल्या. त्यातून पार्वतीबाई नवर्यामुळे इंटिमिडेट व्हायच्या/ घाबरून फ्रीझ व्हायच्या. ह्या सगळ्या प्रकारातून बालकवींनी बायकोला एकदा काटेरी काठीनं मारहाण केली. (फॉलोड बाय पश्चात्ताप). बालकवींची एक बहिण पार्वतीबाईंशी सहानुभूतीनं वागायच्या. पण एकंदरीत पार्वतीबाईंचं आयुष्य एक शोकांतिका होती.
नवरा, सासू वगैरे मंडळी गेल्यावर, २० वर्षाच्या पार्वतीबाईंनी नर्सिंगचं शिक्षण घेतलं आणि पुढची पन्नास वर्षं एकट्या जगल्या.
बापरे.. बालकवींच्या
बापरे.. बालकवींच्या पत्नीबद्दल हे काही माहिती नव्हतं
बालकवी काय आणि अजून कोणी काय, ‘प्रॉडक्ट ऑफ हिज/हर टाईम‘ हे तर खरंच. पण तरीही.. इतक्या सुंदर कविता लिहिणाऱ्या व्यक्तीकडून असं इतकं क्रूर कृत्य घडलं यातला विरोधाभास केवढा आहे!
प्रतिभा आणि स्वभाव हे सुसंगत
प्रतिभा आणि स्वभाव हे सुसंगत असावेत ही लोकांची अपेक्षा असते.
लेखक, कवी यांचे वैयक्तिक आयुष्य काय आहे यावरून त्याच्या लिखाणाला जज्ज करावे का ?
अशाने पडद्यावर अँगी यंग मॅन साकारणार्या अमिताभने व्यवस्था बदलली असती. पतिव्रतेचा रोल करणारी अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात तशीच असायला हवी. मध्यंतरी सोनारिका भदोरिया च्या बाबतीतल्या बातम्या / अफवांवर विश्वास ठेवावा तर तिने कुठले रोल करावेत ?
स्टार्स हे लोकांच्या अपेक्षांच्या पलिकडे गेलेले असावेत. लेखक / कवी हे त्यातही मराठीतले हे तावडीत सापडतात.
बालकवी काय आणि अजून कोणी काय,
बालकवी काय आणि अजून कोणी काय, ‘प्रॉडक्ट ऑफ हिज/हर टाईम‘ हे तर खरंच>>> >>>
पण ज्या संवेदना काव्यात जाणवतात त्या प्रत्यक्ष्यात जाणवत नसतील का? का मग आपल्याला सोयीस्कर वागण्यासाठी दाबून टाकल्या जातात.
बालकवींच्या पत्नीचं कौतुक की त्यांनी लहान वयात हे सर्व भोगूनसुद्धा पतीपश्चात् शिक्षण घेतलं व पुढे आपलं आयुष्य जगलं.
बालकवींच्या पत्नीचं कौतुक की
बालकवींच्या पत्नीचं कौतुक की त्यांनी लहान वयात हे सर्व भोगूनसुद्धा पतीपश्चात् शिक्षण घेतलं व पुढे आपलं आयुष्य जगलं.
>>>> अगदी.
“ ज्या संवेदना काव्यात
“ ज्या संवेदना काव्यात जाणवतात त्या प्रत्यक्ष्यात जाणवत नसतील का? का मग आपल्याला सोयीस्कर वागण्यासाठी दाबून टाकल्या जातात” - बालकवी भाऊ, भावजय आणि आई ह्यांच्या विरोधात जाऊन बायकोची बाजू घेऊ शकले नाहीत ह्याबद्दल कुठलंच स्पष्टीकरण नाही. पार्वतीबाईंचं नवर्याशी बोलूही न शकणं आणि दुसरीकडून आई, भाऊ, भावजयीकडून अडथळे आणणं, कुटुंबाच्या अर्थार्जनाची जबाबदारी ह्या सगळ्यात ते नातं कधी फुललंच नाही.
बालकवींच्या पत्नीचं कौतुक की
बालकवींच्या पत्नीचं कौतुक की त्यांनी लहान वयात हे सर्व भोगूनसुद्धा पतीपश्चात् शिक्षण घेतलं व पुढे आपलं आयुष्य जगलं. >>> नक्कीच.
बालकवी सुद्धा ‘प्रॉडक्ट ऑफ हिज टाईम‘ होते. >>> हे जनरली मला पटतेच. आणि जवळजवळ सर्वच थोर लोकांना लागू होते. आत्ताच्या नॉर्म मधे न बसणार्या सर्वांना सरसकट कॅन्सल करणे मलाही पटत नाही. पण याची मर्यादा कोठे असावी हे माझ्या डोक्यात क्लिअर नाही. त्या दृष्टीने "बायकोला एकदा मारले व नंतर पश्चात्ताप झाला" आणि "बायकोला मारत असत" यातही खूप फरक आहे.
“ त्या दृष्टीने "बायकोला एकदा
“ त्या दृष्टीने "बायकोला एकदा मारले व नंतर पश्चात्ताप झाला" आणि "बायकोला मारत असत" यातही खूप फरक आहे.” नक्कीच आहे. मुळात एकत्र कुटुंबात रहात असताना ‘सासू-भावजयीला न विचारता नवर्याशी बोलली‘ ह्या ‘गुन्ह्याची’ शिक्षा भोगावी लागायच्या परिस्थितीत ते नवरा-बायको इतके एकत्रच नव्हते. अगदी थोड्या काळासाठी ते स्वतंत्र राहिले, पण भावाने त्यांना परत एकत्र कुटुंबात आणलं. लग्नानंतर पाच वर्षं पार्वतीबाई माहेरी होत्या. त्यानंतर सात वर्षांत बालकवी वारले.
मी बालकवीं विषयीच्या चर्चेत
मी बालकवीं विषयीच्या चर्चेत भाग घेऊ इच्छिते.
मी बालकवींच्या कुटुंबात जन्मले आहे. ते माझे पणजोबा लागतात ( माझ्या आजीचे वडिलांची आई हिचे सख्खे काका). मी त्यांच्या बायकोचे चरित्र वाचलेले नाहीये.
पण मी लहान असताना ह्या विषयावर चर्चा नेहमी आजी आणि तिच्या बहिणीसोबत केलेली आहे. एकदा आमच्याकडे काही पत्रकार आजीची मुलाखत घ्यायला आलेले त्यांनी पण हे आजीला विचारले होते. तेव्हा आजीने जे उत्तर दिले ते असे.
आजी म्हणे की तिची काकू अतिशय लाडाकोडात वाढलेली होती. त्याकाळातील प्रथेप्रमाणे लग्न झाले की लगेच मुलगी नांदायला सासरी पाठवत नसत ती मोठी झाली की पाठवत. त्याच्यामुळे कदाचित काकू सासर आणि माहेरच्या आर्थिक परिस्थितीची तुलना करीत असावी. ह्याशिवाय सासरी तिला हवे तसे कोडकौतुक लाभले नसावे. ह्या चरित्रात अगदी जुना काल नवीन आधुनिक काळाशी जुळवून लिहिले आहे. माझ्या आजीने तिचे काका मारहाण करीत ह्या विधानाचा कडाडून विरोध केला होता. ते अतिशय साधे पण तरल भावना असलेले व्यक्ती होते. ते भावनेच्या भरात वाहून जात असत. त्यांना बऱ्याचदा कविता आणि भावना ह्यांत भवती घडत असलेल्या गोष्टींचं भानही राहत नसे.
त्यांच्या आत्महत्ये विषयी पण प्रश्न विचारला होता. तेव्हा आजीने सांगितले की त्यांनी आत्महत्या केली नव्हती आणि अमृतराव (त्यांचे मोठे भाऊ) ह्यांनी त्यांना रुळावर ढकलले हे सुध्दा अफवा आहे. गडबडीत रेल्वे रुळावरून जात असताना त्यांचा ट्रेन खाली सापडून मृत्यू झाला.
आजीने पुढे अजून एक सांगितले होते. तिच्या काकूने एक मुलगी दत्तक घेतली होती. तिने आपल्या आईला फसवले म्हणून ती उद्विग्न झाली होती. तिने हे सगळे मनानेच भावनेच्या भरात लिहून काढले होते.
आता कोण खरे आणि कोण खोटे हे सांगायला कोणीही जिवंत नाही.
सगळे एकामागोमाग एक वारले.
जे मला आठवते ते असे वरीलप्रमाणे.
मी त्यांच्या विषयी जे ऐकले किंवा वाचले त्यावरून मला तरी असे वाटते की ते कायम आर्थिक विवंचनेत असायचे. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर बाबुराव ( आजीचे बाबा) मुळे त्यांच्या कुटुंबाला जरा बरे दिवस आले.
पण बाबुराव पण अल्पायुषी ठरले. आजीची तिच्या भावंडांची फार फरफट झाली.
पण तिने कधीही कोणाविषयी वाईट सांगितल्याचे मला आठवत नाही
ही एक चांगली पोस्ट आहे.
ही एक चांगली पोस्ट आहे. सगळ्यात जास्त विश्वसनीय आहे. धन्यवाद.
वरील विश्वसनीय माहिती आणि
वरील विश्वसनीय माहिती आणि मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर झालेली चर्चा अर्थपूर्ण होती.
धन्यवाद !
चर्चेत भाग घेऊन माहिती
चर्चेत भाग घेऊन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉ रोहिणी.
माहितीबद्दल धन्यवाद डॉ रोहिणी
माहितीबद्दल धन्यवाद डॉ रोहिणी!
माहितीबद्दल धन्यवाद डॉ रोहिणी
माहितीबद्दल धन्यवाद डॉ रोहिणी>>>१००+++
Pages