अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
युवाल हरारींचे यंदाचे
युवाल हरारींचे यंदाचे नवीन पुस्तक म्हणजे Nexus. अश्मयुगापासून ते आजच्या ‘एआय’ युगातल्या माहितीचे आदानप्रदान हा या पुस्तकाचा विषय.
त्या अनुषंगाने नुकत्याच त्यांच्या मुंबईत झालेल्या मुलाखतीत त्यांनी काही व्यक्तिगत गोष्टी सांगितल्या. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी स्मार्टफोन विकत घेतलेला नव्हता. परंतु आता अनेक आर्थिक /अन्य व्यवहारांसाठी तो लागत असल्याने अखेर त्यांनी तो घेतला आहे. परंतु ते त्याचा वापर अत्यंत चिक्कूपणे करतात !
धो धो माहितीचे धबधबे आपल्यावर पडत राहणे हे घातक आहे असे सांगून ते म्हणतात,
“म्हणूनच मी किती माहिती ग्रहण करायची याचा निग्रह केलेला आहे - Information diet ही ती संकल्पना.
चांगली कल्पना आहे.
चांगली कल्पना आहे.
पुस्तक महोत्सवी वातावरणाच्या
पुस्तक महोत्सवी वातावरणाच्या निमित्ताने . . .
इटालिय लेखक-तत्वज्ञ Umberto Eco आणि फ्रेंच पटकथाकार-अभिनेते Jean-Claude Carrière या दोघांचा संवाद असलेले
“This is not the end of the book; “ हे एक प्रसिद्ध पुस्तक.
(https://www.goodreads.com/book/show/8664814-this-is-not-the-end-of-the-book)
त्यात पुस्तक या संकल्पनेविषयीचे मूलभूत चिंतन आहे. इकोंच्या म्हणण्यानुसार पुस्तकाचा शोध हा चाकाच्या (किंवा चमच्याच्या) शोधासारखा इतिहासातील मूलभूत शोध आहे. अशा शोधांमध्ये कालानुरूप काही फेरफार झाले तरी मूळ संकल्पना चिरंतन असते. कालानुरूप कागदी पुस्तकाच्या जागी ई पुस्तक येईल परंतु वाचन करणे ही गोष्ट कायम राहील.
* ‘डिजिटल युगात कागदी पुस्तकांचे भवितव्य काय?’
यावरही या दोघांचे मनन पुस्तकात व्यक्त झालेले आहे.
Carrière म्हणतात की छापील पुस्तकांना पारंपरिक म्हणून नश्वर ठरवत आधुनिक तंत्रज्ञान हेच अधिक टिकाऊ/ शाश्वत आहे असं मानन्याची एकंदरीत मानसिकता आहे, पण प्रत्यक्षातला अनुभव तसा नाही. तसेच कागदी पुस्तके साध्या सूर्यप्रकाशात किंवा रात्री मेणबत्तीच्या प्रकाशातही वाचता येतात हे कायमस्वरूपी सत्य आहे. त्यामुळे ती कालौघात समूळ नाहीशी होतील असे वाटत नाही.
म्हणूनच मी किती माहिती ग्रहण
म्हणूनच मी किती माहिती ग्रहण करायची याचा निग्रह केलेला आहे - Information diet ही ती संकल्पना.>>>
छान लिहीतायेत सगळे.
छान लिहीतायेत सगळे.
रमण रणदिवे या (https://www
रमण रणदिवे या (https://www.youtube.com/watch?v=2Zo-aKdF378&t=1188s) अप्रतिम कार्यक्रमात गझल आणि गीतांमधील फरक सांगताना म्हणालेत,
“ गझल म्हणजे कवितांची कविता असते ! एखाद्या गझलेतील काही ओळी बाजूला काढल्या तर ती स्वतंत्र सार्वभौम कविताच असते. गझल निव्वळ सुखदुःखांची मिरवणूक नसते तर त्यामधून जीवनच वाहत असते. म्हणून कवितेपेक्षा गझलेला दाद लवकर मिळते. . . . .
जो चांगला माणूस असतो तो चांगली गझल लिहितो. . . “
“सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी या दोन सुरेशद्वयांनी माझी भरकटलेली गझल जागेवर आणली” असेही त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले आहे.
सगळे किस्से छान आहेत.
सगळे किस्से छान आहेत.
<इकोंच्या म्हणण्यानुसार पुस्तकाचा शोध हा चाकाच्या (किंवा चमच्याच्या) शोधासारखा इतिहासातील मूलभूत शोध आहे. > +123 मस्त !
इरावती कर्वे : प्रणाम आणि
इरावती कर्वे : प्रणाम आणि प्रणाम !!
मुळात त्या मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्या काळी त्या विषयातील पीएचडी करण्यासाठी त्या जर्मनीतील प्रसिद्ध KWI या संस्थेमध्ये गेल्या होत्या. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शक होते Eugen Fischer, जे पुढे नाझी समुदायात शिरले आणि त्यांच्या प्रभावातूनच हिटलरच्या डोक्यात वंशशुद्धीची कल्पना बळावली.
इरावतीबाईंना संशोधनासाठी जो विषय दिला होता त्यात विविध वंशीय मृत लोकांच्या कवट्यांचा अभ्यास करून त्यावरून प्रत्येक वंशाच्या बुद्धीसंबंधित निष्कर्ष काढायचा होता. त्या संशोधनाचा (?)निष्कर्ष त्या मार्गदर्शकाच्या डोक्यात आधीच तयार होता तो म्हणजे, गोऱ्या युरोपीय वंशाच्या लोकांच्या कवट्यांची विशिष्ट मोजमापे आणि त्यांची उच्च बुद्धिमत्ता आणि शहाणपण ( logic, reasoning, etc) इत्यादी गोष्टींचा थेट संबंध आहे !
बाईंच्या कामाचा एक भाग अर्थातच स्मशान आणि अन्यत्र जाऊन विविधवंशी लोकांच्या कवट्या गोळा करणे हा होता. त्यामध्ये अनेक ज्यू लोकांच्या कवट्या देखील होत्या. प्रत्येक कवटीला हात लावून त्या मनोमन म्हणत,
“हे मृता, मला क्षमा कर” आणि मगच ती कवटी त्या पिशवीत घालून नेत.
संशोधन पूर्ण झाले आणि इरावतीबाईंनी त्यांचा निष्कर्ष प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे मांडला. निष्कर्ष अर्थातच असा होता, की विविध वंशांच्या कवट्यांची मोजमापे (anatomy/ asymmetry) आणि बुद्धिमत्ता यांचा काहीही संबंध सिद्ध झालेला नाही.
या निष्कर्षावर अपेक्षेप्रमाणेच मार्गदर्शक खूप नाराज झाले आणि त्यांनी बाईंच्या प्रबंधाला सर्वात कमी पातळीची श्रेणी दिली.
( Iru: The remarkable life of Iravati Karve या पुस्तकातून साभार !)
जस्टीन सन यांना प्रतिभावंत
जस्टीन सन यांना प्रतिभावंत म्हणायचं का ?
त्यांचा कारनामा पाहिला तर हा प्रश्न या धाग्यावर अस्थानीच वाटेल. त्यांनी एक कलाकृती विकत घेतली आहे.
ती कलाकृती म्हणजे एक खरं खुरं केळं आहे. त्याला सेलोटेप सारख्या टेपने एका पृष्ठभागावर चिकटवले आहे.
ही कलाकृती जस्टीन सन यांनी तब्बल सहा पूर्णांक दोन मिलीयन डॉलर्सना विकत घेतली. म्हणजे जवळपास पन्नास कोटी रूपये.
केळं ज्या पद्धतीने चिकटवलं आहे त्यावरून तर त्या कलाकृतीला जास्तीत जास्त पाचशे रूपये म्हणजे डोक्यावरून पाणीच. शिवाय ते केळं काळं पडणार आहे.
मग एव्हढे पैसे घालवण्यामागचं कारण काय ?
ते समजलं तर मग त्यांना प्रतिभावंत म्हणायचं का याचा फैसला होईल.
* मग एव्हढे पैसे
* मग एव्हढे पैसे घालवण्यामागचं कारण काय ? >>>
याचे उत्तर एखाद्या प्रतिभावंतानेच द्यावे !
आपलं तर डोकं नाही चालत बुवा
कुमार सर
कुमार सर
एक मित्र उद्योगपती आहे. त्याला विचारले होते.
त्याने सांगितले कि हा अटेन्शन मार्केटिंगचा प्रकार आहे. त्याने 6.2 दशलक्ष डॉलर्स खर्च केले पण त्या मुळे जगभरात त्याच्या नावाने सर्च दिला गेला. जे त्याचे नाव ऐकून होते त्यांनी चर्चा केली.
चार दिवस प्रिंट मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियात त्याची चर्चा झाली. त्यामुळे त्याची कंपनी चर्चेत आली. पन्नास कोटीला केळं विकत घेणारी कंपनी म्हणून त्याच्या शेअर्स मागणी वाढली. किंमत वाढली. त्यात बहुतेक सव्वाशे बिलियन डॉलर्स ची वाढ झाली.
या कंपनीची एक क्रिप्टो करन्सी आहे. सध्या या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. पण चार दिवसात या करन्सी मधे लोकांनी पैसे गुंतवले.
कोटीत घातले अब्जावधी कमावले.
याला प्रतिभावान म्हणता येईल का?
*याला प्रतिभावान म्हणता येईल
*याला प्रतिभावान म्हणता येईल का?
>>>
प्रतिभा = उच्च प्रकारचें ज्ञान; अलौकिक बुद्धि; स्फूर्ति
चातुर्य = बुद्धिमत्ता; हुशारी; बुद्धिसामर्थ्य; कर्तृत्व,
(दाते शब्दकोश)
..
यावरून वरील प्रश्नाचे आपापले उत्तर ठरवावे !
(No subject)
या कंपनीची एक क्रिप्टो करन्सी
या कंपनीची एक क्रिप्टो करन्सी आहे.
>>>> त्या coin ची किंमत 1 USD पर्यंत जाईल अस prediction आहे
घ्यावे का आबा?
घ्यावे का आबा?
७ रू किंमत असल्यापासून मी
७ रू किंमत असल्यापासून मी घेतोय, तुमच्या रिस्कवर घ्या
"चित्राची गोष्ट" हे बाबू
"चित्राची गोष्ट" हे बाबू मोशाय यांचं सिनेम्याच्या इतिहासासंदर्भातलं पुस्तक वाचतो आहे.
सिनेमा प्रसार आणि प्रभाव वाढू लागला तसा लब्धप्रतिष्ठितांचा आणि संस्कृतीरक्षकांचा रोषही. 'मासिक मनोरंजन' मध्ये ना. सी. फडक्यांनी 'चित्रपटांची चांडाळचैन' असा एक जळजळीत लेख लिहिला. त्यातली काही वाक्ये -
"...कलेच्य दृष्टीने, आर्थिक दृष्टीने, नैतिक दृष्टीने, वैद्यकीय दृष्टीने- सर्व दृष्टीने सिनेमाची करमणुक सर्वथैव त्याज्ज्य ठरते. तात्त्विक दृष्ट्या तर सिनेम्याची करमणुक किती अधम प्रतीची आहे! निसरगतः सौंदर्यलुब्ध असणारा माणुस जर आपल्या स्वाभाविक मनोवृत्तीचा विपर्यास करून खोट्या सौंदर्यात आनंद मनू लागला, तर त्याची कृती निंद्यच समजली जाईल. स्वभावतः संगीतस्वरावर लुब्ध असणारा नाग गर्दभस्वराव्र मोहित होऊ लागला तर त्याने आपला धर्म सोडला असे होईल. त्याचप्रमाणे मनुष्याच्या सौंदर्यप्रिय मनोवृत्ती सौंदर्याच्या आभासाने रंजित होऊ लगल्या तर मनुष्य पशुवृत्तीचा होत चालला आहे, असे म्हणावे लागेल..."
"...परमेश्वरी शक्तीचा निराकार सौंदर्यावर प्रेम करणारा मनुष्य सर्वश्रेष्ठ सौंदर्यभोक्ता होय. त्याच्या खालच्या पायरीवर जो मनुष्य सुंदर स्त्री-पुरूष् व सुंदर वनश्री यामध्ये रममाण होतो त्याची गणना होईल. नाट्यगृहातील शोभेवर लुब्ध होणारा मनुष्य त्याहूनही खालच्या प्रतीचा ठरेल. आणि चित्रपटांतील छायांवर अनुरक्त होणार्या माणसाचे सौंदर्यप्रेम अत्यंत अधम मानावे लागेल. इतकी या चित्रपटांची योग्यता! "
"...अर्थिकदृष्ट्या विचार केला, तर हे चित्रपट म्हणजे आमच्या हिंदुस्थानच्या संपत्तीवरील एक भयंकर संकट होय! आधीच आमचे दारिद्र्य सुदाम्याच्या तोडीचे! अशा परिस्थितीत आम्ही मनोरंजनासाठी द्र्व्याचा व्यय करणे म्हणजे सर्व जगात बेशरमपणाबद्दल श्रेष्ठ ठरण्यासारखे आहे..."
"...आमच्या देशात दारुचे कारखाने मोठ्या उत्कृष्ट रीतीने चलू लागले तर ती धन्यतेची गोष्ट होईल काय? वेश्यागमनाचा धंदा मोठा सुव्यवस्थित व शास्त्रीय रीतीने चालविण्यात आला तर ती आमच्या हिताची गोष्ट होईल काय? देशात चोरीचा धंदा यशस्वी रीतीने चालू लागला तर ती आमच्या कल्याणाची गोष्ट होईल काय? या सार्या ङोष्टींइतकाच सिनेम्याचा धंदा नैतिक व आरोग्यदृष्ट्या निंद्य आहे. सिनेम्यांत चोर दरवडेखोर, जुगारबाज, व्यसनी व चांडाळ लोकांची कृष्णकृत्ये प्रामुख्याने चित्रित केलेली असतात. सिनेम पाहावयास येणारे पुष्कळ लोक अशिक्षित, व्यसनी व दुर्वर्तनप्रिय असतात अशा लोकांने हे असे नाना प्रकार दाखवणे म्हणजे त्यांना एक प्रकारे अनीतीचेच शिक्षण देणे नव्हे काय? ..."
"... चित्रपटांतील देखाव्यांत आमच्या नीतिकल्पनांस दुखावणारे कितीतरी प्रसंग असतात. नग्नप्राय स्त्रियांचे नाच. तरुण स्त्री-पुरुषांचे चुंबनसमारंभ, कामोत्तेजित युवक-युवतींची आलिंगने - असली चित्रे पाहून प्रेक्षकांच्या पापी वृती प्रक्षुब्ध होणे अगदी साहजिक आहे. पुण्या-मुंबईत जी सिनेमा थिएटरे आहेत ती बहुधा कोंदट, आकुंचित अशी असून नाना प्रकारच्या गलिच्छ भागांतून आलेल्या लोकांनी गच्च भरलेल्या, शेकडो लोकांच्या श्वासोच्छवासांनी उष्ण झालेल्या या थिएटरांची सर्व दारे बंद करण्यात येतात. या गोष्टींचा शरीरप्रकृतीवर function at() { [native code] }यंत अनिष्ट परिणाम झालाच पाहिजे.."
"... परंतु डोळे फोडणार्या, मेंदू चिरडणार्या आणि पेकाट मोडणार्या या करमणुकीचे आम्हांस कोण भयंकर वेड लागले आहे! या भलत्या मोहाला बळी पडून आमचा समाज कुजत जाणार. कामकरी, कुणबे, मुसलमान वर्गाला आम्ही दरिद्री म्हणतो. परंतु या लोकांचा कितीतरी पैसा सिनेमात जात आहे! प्रत्येक नवा चित्रपट पाहण्याची शपथ घेतलेले अशिक्षित गरीब लोक पुण्यात हजारांनी मोजावे लागतील. व मुंबईत त्यांची मोजदाद दहा हजारांनी करावी लागेल.
...अशाप्रकारे कलेच्या दृष्टीने हीन दर्जाची, आर्थिक दृष्ट्या हानीकारक आणि आमच्या नीतीची व प्प्रकृतीची होळी करणारी ही चांडाळ करमणुक आम्ही कोणत्या समजुतीने घरात नांदू द्यायची??"
***
फडके सरांनी म्हणे नंतर नाटक सिनेमा निर्मिती (की लेखन-दिग्दर्शन? जाणकारांनी माहिती द्या) मध्ये गुंतवणुक केली म्हणे. पण सरांना काडीचेही यश मिळालं नाही.
फडक्यांच्या सनातनी आणि
फडक्यांच्या सनातनी आणि बुरसटलेल्या दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे पुण्याच्या अलका थिएटरचे चालक आणि चित्रपट इतिहासकार भा. वि. धारप यांची भुमिका लक्षणीय आहे. १९३५ सालच्या 'ध्रुव' मासिकाच्या लेखात ते म्हणतात-
"कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता तिच्या उपयुक्ततेवर न ठरविता तिच्या अंगभूत असलेल्या क्षुल्लक दोषांवर ठरविण्यात आली तर मोठीच आपत्ती होईल. मोटारी व विमाने यांसारख्या या युगांतील क्रांतीकारक गोष्टींमुळे अपघात होतात म्हणून त्यांवर बंदी घालून सर्वांनी बैलगाड्या व टांग्यांतूनच प्रवास करावा असे कुणी म्हणू लागले तर ते विधान कमालीचे हास्यास्पद ठरल्यावाचून राहणार नाही.
...मनोरंजनाच्या, मतप्रचाराच्या व शिक्षणाच्या दृष्टीने चित्रपटांची उपयुक्ततता आणी अव्यक्त सामर्थ्य्याची ओळख जगाला इतकी पटली आहे की त्यामुळे या नवीन साधनाला व्यक्ती, समाज व राष्ट्र यादृष्टीने function at() { [native code] }इशय महत्त्व आले असून भविष्यकाळात सिनेमा कलेची प्रगती व धंद्याचा प्रसार वाढत्या प्रमाणावर चालू राहणार हे निश्चित आहे..
* १. फडक्यांनी 'चित्रपटांची
* १. फडक्यांनी 'चित्रपटांची चांडाळचैन' >>> खो .. खो ! एकदम 'नासी'पणा !
ना सी फडके आणि पु भा भावे यांच्यात झालेला एक संवाद : इरसाल, फटकळ आणि तऱ्हेवाईकपणाचा नमुना ! (Submitted by कुमार१ on 5 July, 2024 - 07:14) पान ५ वर झालाच होता. त्यात ही 'मौल्यवान' भर !!
* * *
*२ इतिहासकार भा. वि. धारप यांची भुमिका >>>
कालसुसंगत आणि समंजस भूमिका !
. . .
" तऱ्हा" छानच !
साजिरा छानच माहिती.
साजिरा
छानच माहिती.
छान माहिती, साजिरा.
छान माहिती, साजिरा.
वरील फडक्यांच्या किश्यावरून
वरील फडक्यांच्या किश्यावरून ‘लीळा पुस्तकांच्या’ (https://www.maayboli.com/node/77708) मधील प्रस्तावनेतील हा किस्सा लिहायचा मोह झालाय :
. . . कुठल्याही समाजात अशा करमणूकहेतूप्रेरित लेखन वाचनाला प्रतिष्ठा नसते त्याप्रमाणे ती मराठीतही नव्हती आणि नाही. सन 1908 मध्ये ना गो चापेकरांनी ‘43 आख्यायिका’ नावाने काल्पनिक गोष्टी लिहिल्या आणि त्या आपले गुरु वि कों ओक यांच्याकडे अवलोकनासाठी पाठवल्या. त्यावर ओकांचं उत्तर आलं,
“या आख्यायिका वाचल्यापासून कोणतें उपयुक्त ज्ञान आपल्या लोकांस मिळावयाचे आहे? कोणतेही नाही. मनोरंजन तरी व्हायचे आहे काय ? तेंही नाही. तर मग हे लिहिण्याचे श्रम तुम्ही घेतले कशाला ?” . . .
"कोणत्याही गोष्टीची
.
शुल्लक >>> प्लीज हे 'क्षुल्लक
.
फडक्यांचे विचार असे असतील ,
फडक्यांचे विचार असे असतील , असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कादंबर्यांनाही हेच निकष लावावेत का?
विकि पानातून - फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत
* शरीरनिष्ठ प्रणयाला
* शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात >>> +१. वाचलय तसं
तारुण्यात वाचलेल्या त्यांच्या काही कादंबऱ्यांमधली तशी काही वाक्ये अगदी तोंडपाठ होऊन गेली आहेत
उथळ लेखन वाटायचे फडक्यांचे,
उथळ लेखन वाटायचे फडक्यांचे, आमच्याघरी शक्यतो आणू द्यायचे नाहीत पुस्तकं. शिरवळकर आणि फडके , दोघांनाही माझ्यापासून दूर ठेवले होते. नंतर मोठेपणी वाचले तेव्हाही आवडलेच नाही, कुठंकुठं सवंग वर्णनात पानंच्यापानं घालवलेली आहेत. आशय नाहीच, दोन ओळीत मावेल इतकी कादंबरी. मला मनोरंजक वगैरेही वाटले नाही. प्रतिष्ठित पॉर्न असावे त्याकाळचे. सगळ्या कादंबऱ्या सारख्याच वाटायच्या, नायक- नायिका तेवढे बदलायचे.
विकीचे वर्णन चपखल आहे.
शाळेत मराठीमध्ये (बहुतेक
शाळेत मराठीमध्ये (बहुतेक दहाविलाच) फडक्यांचा “प्रतिभेचे घोडे“ नावाचा धडा होता. त्यातली भाषा इतकी कृत्रिम होती परत कधी फडके वाचायचा धीर झाला नाही.
साजिराची पोस्ट वाचून त्या भयंकर आठवणी जाग्या झाल्या.
फडक्यांचे विचार असे असतील ,
फडक्यांचे विचार असे असतील , असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कादंबर्यांनाही हेच निकष लावावेत का?
>>
अर्थातच. त्यांच्या कादंबर्या हिट झाल्या तो काळाचा महिमा आणि मराठी वाचकांचा भाबडेपणा होता- असंच म्हणायला पाहिजे. माझ्या एका जुन्या इथल्याच पोस्टमध्ये लिहिलेलं आठवलं- "फडके साने गुरुजींना रडुबाई हळुबाई म्हणत असत. पण त्यांची एकही कादंबरी लक्षात न ठेवता ते सो-कॉल्ड मात्रूप्रेमाचं महामंगल स्त्रोत्र लक्षात ठेवलं आणि जपलं - ही महाराष्ट्राने त्यांना केलेली शिक्षा आहे".
मी नेहेमीच म्हणत असतो- फडके आणि खांडेकर- दोघांनी मराठी साहित्य (त्यावेळीच नव्हे तर आजही. आजही दाखले दिले जातात) साचेबद्ध केलं, सडवलं. (कला आणि जीवन असला काहीतरी मूर्ख वाद होता दोघांत). पण खांडेकर फारच परवडले.
त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या भंपकपणाबद्दल तर बरंच काही आहे, पण ते इथं नको.
त्यातली भाषा इतकी कृत्रिम
त्यातली भाषा इतकी कृत्रिम होती परत कधी फडके वाचायचा धीर झाला नाही
>>>
यापुढे तर वाचूच शकत नाही. 'सॉफ्ट पॉर्न' हा शब्द सुद्धा 'अपमान करता काय' म्हणून माघार घेईल. बाकी भाषा आणि साहित्यिक मुल्यं हे कधीच एक्स्पायर झालं.
अशा लेखकांना आपण ग्लॅमर मिळवून दिलं हे आपलंच दुर्दैव म्हणायला पाहिजे. आपल्या आईबापांना हा प्रश्न विचारला पाहिजे खरं तर. आमची आई तर 'एम ए सिलॅबस मध्ये होतं, काय करु?' असं उत्तर देईल बहुतेक.
Pages