अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
Ohhh डॉक्टर. टोटल मिस झाले
Ohhh डॉक्टर. टोटल मिस झाले होते. लगेच रिप्लाय करते.
एडिट: डॉक्टर, आपण आपली संपर्क सुविधा बंद ठेवली आहे का? आपल्याला रिप्लाय करणे किंवा मेल करणे दोन्हीही शक्य होत नाहीये त्यामुळे.
पियू
पियू
संपादित .
(तुम्हीही असे केलेत तरी चालेल. तिकडे पाहतोय).
पियू
पियू
माझी संपर्क सुविधा व्यवस्थित चालू आहे.
>> मला तुम्हाला संपर्क करायचा टॅब च दिसत नाहीये चक्क.
काही शंका आली म्हणून इतर सदस्यांचे प्रोफाईल चेक केले तर अस्मिता यांच्या प्रोफाईल मध्ये मला संपर्क हा टॅब दिसतोय.. पण चिकू यांच्या नाही.. तुमच्याही नाही.. साधना यांच्याही नाही.
इथे अवांतर होतेय जरा. मी हा विषय मायबोली धाग्यावर हलवते.
फडके- खांडेकर चर्चा आता
फडके- खांडेकर चर्चा आता मनसोक्त झाली असावी असे समजतो आणि येत्या काही तासांत असेच एक वादग्रस्त ‘रत्न’ वाचकांच्या चर्चेसाठी घेतो . . .
चि त्र्यं खानोलकरांच्या
चि त्र्यं खानोलकरांच्या उत्तुंग प्रतिभा आणि अतिउद्धटपणाचे बरेच किस्से ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’ या ‘राजहंसी’ पुस्तकात दिले आहेत. त्यातला एकच नमुना मी या धाग्याच्या मूळ लेखात घेतलेला आहे :
“निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
असे स्वतःच म्हणणे.
जिज्ञासूंनी पुस्तकातले सातवे पूर्ण प्रकरण जरूर वाचावे. ते वाचल्यानंतर असं वाटून गेलं, की
उच्च प्रतिभा आणि उद्धटपणा या बऱ्याच वेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात का ?
सांगता येत नाही. . . . सरसकटीकरण तर नाहीच नाही, पण तरीही त्यांच्या बाबतीत हे नाईलाजाने म्हणावे लागेल.
त्या संपूर्ण लेखाचा सारांश पिंगे यांच्या खालील वाक्यात आलाय :
“हे अमाप यश खानोलकराला शांतपणे पचविता आलं नाही, हीच खरी शोकांतिका आहे. यश थेट त्याच्या डोक्यात गेलं” .
>>>>>>>उच्च प्रतिभा आणि
>>>>>>>उच्च प्रतिभा आणि उद्धटपणा या बऱ्याच वेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात का ?
कधीकधी आपल्या श्रेष्ठत्वाची सारासार, योग्य जाणिव असू शकते त्यात जर स्पष्ट व निर्भिड स्वभाव असेल तर तसे बोलले जात असावे.
आपला लेख वाचल्यावर आपल्याला त्याची गुणवत्ता (बलस्थाने व मर्यादा) स्पष्ट कळलेली असते. त्याकरता प्रतिसादांची जरुरी नसते. इथे इतके कवि-लेखक आहेत, सर्वांना हे माहीत असावे.
खोट्टा खोट्टा विनय असण्यापेक्षा, निर्भिड आणि स्पष्ट सेल्फ अवेअरनेस खूप चांगला.
>>> संपूर्ण लेखाचा सारांश
>>> संपूर्ण लेखाचा सारांश पिंगे यांच्या खालील वाक्यात आलाय :
पिंगे कोण?
=====
>>> उच्च प्रतिभा आणि उद्धटपणा या बऱ्याच वेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात का ?
दोन्ही बाजूंना एकच वैशिष्ट्य असणारेही गौरवले गेल्याची काही उदाहरणे आहेत
>>>>>.दोन्ही बाजूंना एकच
>>>>>.दोन्ही बाजूंना एकच वैशिष्ट्य
हाहाहा उद्धटपणा हे ते वैशिष्ट्य?
विविध मते वाचतो आहे
विविध मते वाचतो आहे
रवींद्र पिंगे हे त्या पुस्तकाचे लेखक.
उच्च प्रतिभा आणि उद्धटपणा या
उच्च प्रतिभा आणि उद्धटपणा या बऱ्याच वेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात का ?>>>> यावर निष्कर्ष काढणे कठीण, कारण ह्या दोन्ही गोष्टी Subjective आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे, खासकरुन असा कोणताही निष्कर्ष ज्यावेळी काढायचा असतो तेव्हा.
<निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच
<निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"> मला यात काही वावगं वाटत नाही , उद्धटपणाही वाटत नाही. तोवर मराठीत ज्ञानपीठ फक्त वि स खांडेकरांना ययातीसाठी मिळालं होतं.
या एका उदाहरणावरून आणि पिंग्यांना तसं वाटतं म्हणून ते उद्धट होते असं ठरवणं कठीण आहे. आणि असले उद्धट तरी वाचक म्हणून मला काय त्याचं?
पिंगे यांनी उद्धटपणाचा
पिंगे यांनी उद्धटपणाचा निष्कर्ष अनेक उदाहरणे बघून काढलेला आहे. त्यातली मोजकी थोडक्यात लिहितो.
१. मधु मंगेश कर्णिक आणि इतर काही लेखकांनी प्रेमापोटी या महोदयांच्या कविता वाचनाच्या मैफिली जमवून आणल्या पण फालतू भांडण उकरून या कवीने त्या प्रेमाचा सुद्धा चुथडा केला.
२. दीपावलीच्या चित्रकार दलालांना ते म्हणाले, की माझं साहित्य तुम्हाला काय कळणार ?
३. त्यांची ‘रात्र काळी.. ही कादंबरी दोषपूर्ण आहे असे परीक्षण छापून आल्याचे त्यांना पाहुण्या मित्राने सांगितले. त्यावरती ते त्या मित्रावर रस्त्यातच उखडले आणि त्याला घरातून चालतं केलं.
४. त्यांच्या लेखनाबद्दल प्रतिकूल अभिप्राय व्यक्त केलेला त्यांना अजिबात खपत नसे आणि दुसऱ्याचा उदोउदोही झालेला पसंत नसे, असे पिंगे म्हणतात.
असो. आता याहून अधिक लिहीत नाही. हा धाग्याच्या विषयाला अनुसरून असलेला चर्चाविषय आहे. आपणा सर्वांच्या मताबद्दल आदर आहेच.
आणि असले उद्धट तरी वाचक
आणि असले उद्धट तरी वाचक म्हणून मला काय त्याचं?
>> या हिशोबाने या धाग्यावरील सगळीच चर्चा वायफळ ठरते. कारण या धाग्यावर पान एक पासून ज्या ज्या प्रतिभावंत लोकांचा तऱ्हेवाईकपणा आपण वाचतो आहोत ते सारे त्यांच्या त्यांच्या कलेत सरसच होते. त्यामुळे एक रसिक म्हणून " असले तऱ्हेवाईक तरी एक गुणग्राहक/ रसिक / वाचक / श्रोता म्हणून मला काय त्याचं? " या एका वाक्यात हा संपूर्ण २० पानांचा धागा मोडीत काढता येऊ शकेल.
काहींना उपरोध कळत नाही आणि
काहींना उपरोध कळत नाही आणि काहींना उपरोध सोडून बाकी काही कळत नाही
Pages