अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
जिएंनी लष्कराच्या भाकऱ्या
जिएंनी लष्कराच्या भाकऱ्या धागा वाचला असता तर आपला विचार बदलला असता का?
मस्त धागा आहे.
मस्त धागा आहे.
तुम्ही वर मराठी साहित्यिकांत हा मान पु. लं. कडे जातो असा उल्लेख केलाय आणि हल्लीच्या व्हॉट्सॅपीय जगात ते कदाचित खरंही असेल (मध्यंतरी पु. लं. च्या नावावर खपवलेल्या एका व्हॉट्सॅपीय विनोदाच्या पंच लाइनीत अॅमेझॉनवरून ऑनलाइन काहीतरी मागवल्याचा उल्लेख होता). परंतू खपवलेले किस्से कदाचित अत्र्यांच्या नावावर (श्लील-अश्लील विनोदांसह) भरपूर आहेत.
१. जिएंनी लष्कराच्या भाकऱ्या
१. जिएंनी लष्कराच्या भाकऱ्या धागा वाचला असता तर >>
खरंय ! छान मुद्दा. तसं ते अशुद्ध मराठीबद्दल नापसंती व्यक्त करत. ते म्हणायचे, “कर्नाटकातून आपण मोटारीने महाराष्ट्रात यायला लागलो की, जेव्हा अशुद्ध मराठी लिहिलेल्या पाट्या दिसू लागतात तेव्हा महाराष्ट्राची हद्द सुरू झाली आहे असे नक्की समजावे !”
…..
२. खपवलेले किस्से कदाचित अत्र्यांच्या नावावर
सहमत. अत्रे आणि पुलं यांच्यात बहुधा किश्शांच्या बाबतीत स्पर्धा असावी.
दुर्गाबाई देशमुख यांनी
दुर्गाबाईंनी त्याकाळी अश्लील भाषाशैली म्हणून गाजलेले पुस "वासूनाका" डोक्यावर घेतले तेव्हा बहुतेक अत्रे(?) म्हणाले होते या बाईला गटारात हात घालून नाकाला लाऊन वा काय छान वास येतोय म्हणायची सवय आहे.
मस्तच.... जे डी सालिंजर ..
मस्तच.... जे डी सालिंजर ...यांचं मतं पटलं.... परंतु जसा आरसा कुणाला स्वतःचा चेहरा दाखवतो तर कुणाला मागुन येणारी गाडी तर कुणाला स्वतःच्या चेहऱ्यावरील डाग तर कुणाला स्वतःच सौन्दर्य.... आपापल्या पाहण्यावर असत ते. तसंच वाचकांचेही... काही प्रवासांना हजार फाटे फुटतात... काही शब्दांना अनेक अर्थ निघतात... त्यामुळे वाचक आणि लेखक यांच्यात काही वेळेस विसंगती असु शकते.
सॉमरसेट मॉम :“नाही, रोज नवे
सॉमरसेट मॉम :“नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”. >> खुशवंतसिंगांनी पण एका पुस्तकात त्यांच्या लेखनाची हीच पध्दत लिहिली आहे. (पुस्तकाचं नाव आठवत नाही.)
जे डी सालिंजर हे ह्यांच्या ‘कॅचर इन द राय’ या कादंबरीत आणी कोसला ह्या कादंबरीत खूप साम्य वाटलं मला. (हा प्रतिसाद विषयाला धरून नाही. आठवला म्हणून केला हा उल्लेख.
* अत्रे(?) म्हणाले होते या
* अत्रे(?) म्हणाले होते या बाईला गटारात हात घालून नाकाला लाऊन >>>
अत्रे एकदा सुटले की मग त्यांना आवरणं कठीण असायचं.
......
* वाचक आणि लेखक यांच्यात काही वेळेस विसंगती असु शकते.
>>> +११ .
कवितेचा अर्थ समजून घेण्याबाबत तर ही तफावत खूप जाणवते.
‘कॅचर इन द राय’ या कादंबरीत
‘कॅचर इन द राय’ या कादंबरीत आणी कोसला ह्या कादंबरीत खूप साम्य वाटलं मला.
>>>
तुम्हालाच नाही तर अनेकांना हे वाटलेले आहे. त्यावर साहित्यिकांमध्ये एकेकाळी जोरदार चर्चा झालेल्या आहेत. दोन्ही कादंबऱ्यांचा गाभा समान, फक्त वातावरणनिर्मिती वेगळी असे लोकांचे मत आहे.
>>>>कवितेचा अर्थ समजून
>>>>कवितेचा अर्थ समजून घेण्याबाबत तर ही खूप जाणवते>>>
याबाबत काही सर्वश्रुत मते...
कविता अनुभवायची असते...पण समजल्याशिवाय अनुभुती कशी येणार?
माझ्या वैयक्तिक अनुभुतीचे सार्वत्रिकीकरण व्हायला हवे.
काही लिखाण स्वान्त:सुखाय असावे किंवा प्रत्येक वाचनात वेगळे अर्थ निघावेत.
काही प्रतिमा खूप वरच्या लेवलच्या असतात
काही लिखाण स्वान्त:सुखाय
काही लिखाण स्वान्त:सुखाय असावे किंवा प्रत्येक वाचनात वेगळे अर्थ निघावेत.
काही प्रतिमा खूप वरच्या लेवलच्या असतात>>> +११ .सहमत
अत्रे यांचा किस्स यक आहे.
अत्रे यांचा किस्स यक आहे.अशोभनिय, इन
बॅड टेस्ट. संतापजनक.
सामो, कानामात्रा चेक करा ओ
सामो, कानामात्रा चेक करा ओ
अत्र्यांचा यशवंतराव चव्हाणांबद्द्ल वहाण शब्दावरुन पण कायतरी किस्सा होता. आता आठवत नाही. कुणीतरी लिहेलंच.
संयुक्त महाराष्ट्राच्या
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात संयुक्त महाराष्ट्र समिती ऐन भरात होती. मोर्चे, मेलीवे, घोषणा, भाषणे ह्यांची एकच दंगल उसळलेली असे. त्यातली एक लोकप्रिय घोषणा अथवा नारा म्हणजे
' बेळगाव, निपाणी, कारवार सहा संयुक्ता महाराष्ट्र झाला च पाहिजे. त्या वेळी राज्यकर्ता पक्ष काँग्रेस होता आणि त्याचे प्रमुख नेते सौम्य आणि शहाणे यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी एकदा संमस च्या आक्रमक राजनीतीवर टीका करीत म्हटले की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे बरोबरच आहे. आम्हांलाही तो हवा आहे. पण तें झालाच पाहिजे कशाला? त्यातला च कशाला हवा?
लगेच अत्रे म्हणाले, चव्हाण मधला च काढून टाकला तर काय उरेल?
दुसऱ्या दिवशी मराठातल्या अग्रलेखाला अत्र्यांनी शीर्षक दिले,
' चव्हाण नाही, व्हाण!'
अत्र्यांचा यशवंतराव
अत्र्यांचा यशवंतराव चव्हाणांबद्द्ल वहाण शब्दावरुन
>>>
होय, तो गाजला होता.
तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. त्यातली ठरलेली घोषणा म्हणजे “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे !” तर
एकदा चव्हाण विधिमंडळात म्हणाले की झाला पाहिजे हे मलाही मान्यआहे. पण तो सारखा “च” कशासाठी लावताय?”
त्यावर अत्रे म्हणाले,
“चव्हाण साहेब, तुमच्या आडनावातील च काढून टाकला तर खाली काय उरेल ? फक्त वहाण ना ?”
असे ते च चे महत्त्व.
...
हीरा आणि मी एकाच वेळेस टंकन करीत होतो.
त्यामुळे प्रतिसाद लागोपाठ पडले
चालायचंच
वाचक आणि लेखक यांच्यात काही
वाचक आणि लेखक यांच्यात काही वेळेस विसंगती असु शकते.
कवितेचा अर्थ समजून घेण्याबाबत तर ही तफावत खूप जाणवते.>>
मंगेश पाडगावकरांना एम. ए. ला त्यांचीच एक कविता होती. आणी परीक्षेत, त्या कवितेत ‘कवी ला काय वाटले’ हे त्यांनी गाइड मधले लिहिले होते. कारण त्यांना मार्क्स मिळवायचे होते. (यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्रातून)
‘कवी ला काय वाटले’ हे त्यांनी
‘कवी ला काय वाटले’ हे त्यांनी गाइड मधले लिहिले होते
@ कुमार१,
@ कुमार१,
छान संकलन.
बरेचदा पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची चित्रे आशयभंग करणारी असतात. त्यामुळे लेखकाला चित्रकाराची मध्यस्ती नको वाटली तर ते चुकीचे नाही.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
सर्व प्रतिसादकांचे आभार ! सर्व किस्से छान !
१. पाडगावकरांची स्वतःचीच कविता स्वतःला अभ्यासाला असणे भलतेच रोचक वाटले.
२. लेखकाला चित्रकाराची मध्यस्ती नको वाटली तर ते चुकीचे नाही.
>>>
बरोबर.
अलीकडे इ-युगात आपण संदेश पाठवताना शब्द आखूड करत चाललो आहोत आणि त्यात स्मित अथवा अन्य चित्रांचा वापर वाढतो आहे. म्हणजे हळूहळू आपण पुन्हा चित्रभाषेकडे जाणार का, अशी एक चर्चा अन्यत्र झाली होती.
काय वाटते येथील मंडळींना ?
पाडगावकरांची स्वतःचीच कविता
पाडगावकरांची स्वतःचीच कविता स्वतःला अभ्यासाला असणे भलतेच रोचक वाटले.>> हो. त्यांनी शिक्षण सोडल्यावर बऱ्याच वर्षांनी नौकरीत आवश्यक म्हणून परत सुरवात केली होती.
>>>>>>सामो, कानामात्रा चेक
>>>>>>सामो, कानामात्रा चेक करा ओ Happy
अर्र्र सॉरी. किस्सा च्या जागी किस्स झालय.
निघण्यापूर्वी ते बरोबरच्या
निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
>>>हा किस्सा कळला नाही...
म्हणजे, ट्रांजिस्टरच्या
म्हणजे, ट्रांजिस्टरच्या बॅटरीज सारख्या किरकोळ गोष्टीसाठी ते अस्वस्थ व्हायचे.
रोचक धागा. लेख व प्रतिसाद
रोचक धागा. लेख व प्रतिसाद यांमधील किस्से आवडले
धन्यवाद.
धन्यवाद.
रच्याकने
हा एक किस्सा फार पूर्वी वाचला होता. फक्त तो पुलंचा आहे की गंगाधर गाडगीळ यांचा हे आता आठवत नाही. जाणकारांनी सांगावे. (त्यात उल्लेख केलेला पुरस्कार दोघांनाही मिळालेला आहे).
लेखकाने लिहिले आहे,
“मला जेंव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा असे वाटू लागले होते की आपण आता प्रथितयश लेखक झालो. हा माझा गर्व एका कीर्ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने झटक्यात उतरवला”.
तो आपल्या मित्राला विचारत होता की आपल्याला १२ मार्कांसाठी "ज्ञानेश्वर" आहे ना ?
“जर संत ज्ञानेश्वर फक्त १२ गुणांना
मग ‘मी’ तर कोण्या झाडाचा पाला” !
पुलंचा किस्सा आहे हा...
पुलंचा किस्सा आहे हा...
योगी धन्यवाद !
योगी धन्यवाद !
किर्ती कॉलेजवरून बहुतेक तसं वाटत होतं
>>>>. जगातील पहिले
>>>>. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी>>>
तिथे पहिले पाऊल ठेवणारे हिलरी एकटेच होते की ते आणि तेनसिंग या दोघांनी बरोबर पाऊल ठेवले याबद्दल वेगवेगळे किस्से ऐकले आहेत. नक्की सत्य बाहेर आलेच नाही असे म्हणतात
ह्यावरून एक विनोद आठवला.
ह्यावरून एक विनोद आठवला.
एव्हरेस्टवर पहिलं पाऊल ठेवलेल्या हिलरीला एका उडप्यानं तिथंच काॅफी पाजली म्हणे.
हाहाहा
हाहाहा
हाच विनोद नील आर्मस्ट्राँग व
हाच विनोद नील आर्मस्ट्राँग व चंद्राबाबतही सांगितला होता
Pages