अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
ते अमर बिश्वास आणि उत्पल
ते अमर बिश्वास आणि उत्पल बिस्वास.
यांचे पार्श्वसंगीत आहे. पण स्वतंत्र उल्लेख आहे या सिनेमासाठी.
ओह ते दोन्ही अमर वेगळे का? मी
ओह ते दोन्ही अमर वेगळे का? मी अमर-उत्पल मधले अमर ते हेच असे समजत होतो.
* दोन्ही अमर वेगळे >> +१
* दोन्ही अमर वेगळे >> +१
गंमत म्हणजे या दोघांचेही वडील देखील संगीतकारच होते :
परशुराम हळदीपूर आणि अनिल बिश्वास.
अमर हळदीपूर यांची २ मुले म्हणजे सिद्धार्थ आणि संगीत .
हळदीपूर यांनी वरील मुलाखतीत
हळदीपूर यांनी वरील मुलाखतीत अजून एक उल्लेखनीय गोष्ट सांगितली.
त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व गाजलेल्या संगीतकारांकडे वादनाचे काम पूर्वी केलेले आहे. त्या सर्वांमध्ये फक्त लक्ष्मीकांत प्यारेलाल हीच जोडी हाताखालील वादकांना ‘माणूस’ म्हणून वागणूक देत असे ; बाकी इतर सर्वांकडे नोकर अशी वागणूक असायची.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शंभरहून अधिक वादकांची कुटुंबे पोसली असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला आहे.
किस्से भारी आहेत !
किस्से भारी आहेत !
>>>“तुम्ही माझ्या पुस्तकाचा प्रत्येकी सव्वा रुपये मला दिलात. त्यातले चार आणे मला मिळणार आहेत. या वड्याच्या रूपाने मी ते तुम्हाला परत करतोय” !!>>> एकदम भारी
दत्तप्रसाद दाभोळकर यांचा हा
दत्तप्रसाद दाभोळकर यांचा हा किस्सा त्यांच्याच एका लेखामधून साभार :
त्यांची ‘बिजली’ ही कथा प्रथम मासिकात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर त्यांच्या एका पुस्तकात छापली गेली. एक सुखवस्तू सवर्ण मध्यमवर्गीय पुरुष एका अनाम क्षणी एका दलित मोलकरीणीशी शरीरसंबंध करतो हा तिचा विषय आहे.
पुढे त्या पुस्तकाचे प्रकाशन नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. भाषणात ते म्हणाले,
“ही कथा मराठीतील एक उत्कृष्ट कथा आहे पण हा अनुभव वाटतो !”
त्यावर सभागृहात प्रचंड हशा झाला.
ही कथा मी अंतर्नादमध्ये वाचली
ही कथा मी अंतर्नादमध्ये वाचली आहे. चांगली कथा आहे. सवर्ण आणि दलित यावर कितपत भर होता हे आता आठवत नाही, पण मालक आणि मोलकरीण हे आठवतंय.
अवांतर- 'अंतर्नाद'मध्ये सातत्याने लिहिणाऱ्यांपैकी दत्तप्रसाद दाभोळकर आणि सर्वोत्तम ठाकूर (सुनीता देशपांड्यांचे बंधू) या दोघांचे लेख मला सर्वात जास्त आवडायचे.
‘बिजली’
‘बिजली’
>>
दाभोळकरांची ती कथा 'अंतर्नाद'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी त्याच मासिकाच्या दिवाळी अंकात ‘कोमेजणारी एक कळी उमलताना’ हे अनुभवकथन लिहिले होते. त्यात सुरुवातीला त्यांनी बिजलीचा संदर्भ दिला होता. त्यातला गमतीचा भाग सांगतो.
‘बिजली’ ही पूर्णपणे काल्पनिक कथा होती परंतु अनेक वाचकांना ती सत्यकथा वाटली ! ती कथा वाचून एका स्त्रीने त्यांना असे पत्र लिहिले होते,
“तुमच्यासारख्या माणसाकडून असा प्रकार घडला म्हणजे तो अनेक पुरुषांच्या बाबत घडत असणार. फक्त एवढ्या कारणासाठी माझ्या मुलीला मी घटस्फोट घ्यायला लावला. ती मला आता चूक वाटते”.
या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘कोमेजणारी एक कळी’ मध्ये त्यांच्या आयुष्यात अवचित आलेल्या एका मानसकन्येची सत्यकहाणी लिहिली होती.
वरती अमर हळदीपूर यांच्या
वरती अमर हळदीपूर यांच्या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा उल्लेख आहे. आता त्याचा दुसरा भाग आलेला आहे :
https://www.youtube.com/watch?v=fk6j8jkSnM8
त्यांच्या मुलाखतीतून बरेच किस्से ऐकायला मिळतात. त्यातले हे दोन :
1. राज कपूर जेव्हा त्यांच्या सिनेमातील वाद्यवृंदाला भेट द्यायचे तेव्हा ते व्हायोलिन या वाद्याचा उल्लेख ‘व्हिलन असा करायचे ! त्याचे कारण म्हणजे तिथे जवळपास 40 व्हायोलिन वादक असायचे आणि त्यामुळे त्यांच्या बिदागीचा निर्मात्याचा खर्च बराच व्हायचा. (उलट बासरी वादक एकच असे).
2. गीतकार आणि संगीतकारांच्या आर्थिक मोबदल्यामध्ये प्रचंड तफावत फार पूर्वीपासूनच आहे. त्यांनी 1965 मधील हे आकडे सांगितले - तेव्हा शंकर जयकिशनना साडेचार लाख रुपये मिळायचे आणि संबंधित गीतकाराला फक्त 5,000 रुपये.
मुलाखत अजून बघितली नाही, पण
मुलाखत अजून बघितली नाही, पण १९६५ साली साडेचार लाख रुपये ही अतिशयोक्ती वाटते.
<लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी
<लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शंभरहून अधिक वादकांची कुटुंबे पोसली असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख>
हे वाचून आदर वाटला. एल पी माझे आवडते संगीतकार.
त्यांची ‘बिजली’ ही कथा प्रथम
त्यांची ‘बिजली’ ही कथा प्रथम मासिकात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर त्यांच्या एका पुस्तकात छापली गेली. एक सुखवस्तू सवर्ण मध्यमवर्गीय पुरुष एका अनाम क्षणी एका दलित मोलकरीणीशी शरीरसंबंध करतो हा तिचा विषय आहे.>>>>>> रंग याचा वेगळा या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात ते दिल्लीच्या वास्तव्यात असताना स्वत:विषयी असेच लिहिले आहे त्यातून जन्मलेल्या कन्येची जबाबदारी पण घेतली आहे. मी ते वाचले आहे. उल्लेख सविस्तर मात्र नाहीत. अन्य कुणी ते वाचले असल्यास खात्री करावी. मला जरा साशंक वाटते आहे.
बिजली मी वाचलेली नाही परंतु
बिजली मी वाचलेली नाही परंतु ‘कोमेजणारी एक कळी’ हे कथन अंतर्नाद दिवाळी अंकात वाचले आहे.
त्यामध्ये काली नावाची एक अनाथ नेपाळी मुलगी असा उल्लेख आहे. त्या मुलीचे पुनर्वसन केल्यानंतर त्यांनी तिचे लग्न रोहित कालरा या इंजिनियर मुलाशी लावून दिलेले आहे.
जेफ्री आर्चर हे गाजलेले
जेफ्री आर्चर
हे गाजलेले इंग्लिश लेखक आणि एकेकाळचे राजकारणी देखील. काही वर्षांपूर्वी त्यांचे पुण्यात भाषण झाले होते. त्यातून त्यांच्याविषयी समजलेल्या काही रंजक गोष्टी :
* एकेकाळी त्यांची शेअर बाजारात प्रचंड आर्थिक फसवणूक झाली आणि ते कफल्लक झाले. मग त्यांनी त्याच अनुभवावर आधारित त्यांनी पहिलीवहिली कादंबरी, ‘नॉट ए पेनी मोअर, नॉट ए पेनी लेस’ लिहिली. 17 प्रकाशकांनी तिला नाकारल्यावर 18 व्याने ती स्वीकारली आणि तिचा पुढे विक्रमी खप झाला.
* त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचे कच्चे लेखन हे हस्तलेखन असते. मूळ लेखनापेक्षा जवळजवळ दुप्पट वेळ ते पुनर्लेखानासाठी देतात. यामध्ये लेखनाचे अनेक खर्डे होतात.
* सन 2001 मध्ये त्यांना खोटी शपथ घेणे आणि न्यायप्रक्रियेत ढवळाढवळ केल्याच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगवास घडला होता. त्या दोन वर्षांच्या अनुभवावर आधारित त्यांनी ‘ए प्रिझनर ऑफ बर्थ’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरी-शीर्षकाचा अन्वयार्थ, आपण सगळेच जन्माचे कैदी असतो, असा आहे.
*भारतीय वाचकांबद्दलचे त्यांचे मत त्यांच्याच शब्दात ऐकण्यासारखे आहे,
“ तुम्ही भारतीय खूप बारकाईने वाचून दुसऱ्याच्या चुका काढण्यात तत्पर असता. माझ्या ब्लॉगवरील लेखनातील सर्वाधिक चुका भारतीय लोकच काढतात आणि त्याचे लांबलचक विश्लेषण करतात. माझ्या पुस्तकांच्या चौर्य-आवृत्ती मोठ्या प्रमाणात मुंबईत रस्त्यावर विकताना मी पाहिल्यात. माझ्या भारतातल्या वाचकांचे सरासरी वय 25 ते 30 असावं”.
(व्यक्तिगत नोंदीमधून)
नॉट अ पेनी मोअर .... चा मराठी
नॉट अ पेनी मोअर .... चा मराठी अनुवाद अनेकदा वाचला आहे. फार छान जमलंय ते पुस्तक आणि अनुवाद.
अ फॉल्स इम्प्रेशनची संक्षिप्त आवृत्ती वाचली आहे. व्हाइट कॉलर क्राइमचं फार डोकेबाज चित्रण करतात.
भारतीय वाचकांबद्दलचं त्यांचं मत आपल्या सगळ्यांवरून (मायबोलीकर ) सहज पटण्यासारखं आहे. मला तर अधिकच लागू आहे.
खूप बारकाईने वाचून
जेफ्री आर्चर यांची अनेक पुस्तके मी तरुणपणी वाचली आहेत आणि ती आवडली आहेत.
खूप बारकाईने वाचून दुसऱ्याच्या चुका काढण्यात तत्पर असता >> व्यक्तिशः मी स्वतः असे करतो, त्यामुळे सहमत आहे. पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की एखाद्याने चांगली ग्राहकसेवा दिली किंवा out of the way जाऊन मदत केली तर मी तितक्याच तत्परतेने कौतुकाची ईमेल/पत्र (पोस्टाचे पैसे खर्च करून) वगैरे तितक्याच तत्परतेने पाठवलेली आहेत आणि अजूनही पाठवतो.
पुस्तकांच्या चौर्य-आवृत्ती मोठ्या प्रमाणात मुंबईत रस्त्यावर विकताना मी पाहिल्यात. >> खरं तर हा स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकेल. एशियन एडिशन/भाषांतरित पुस्तके जर स्वस्तात उपलब्ध केली तर रस्त्यावर नकली प्रती विकणे कमी होईल, असे वाटते. पण जर पर्याय उपलब्धच नसेल तर हे होणारच. (Beg, borrow, steal)
DRM चा सढळ वापर सुरू करून आणि पेवॉल टाकून प्रकाशकांनी त्याला अधिक खत पाणी घातले आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. ई-साहित्याबद्दल आणि एकंदरीत माझे मत आहे की If buying isn't owning, then piracy isn't stealing.
मुलाखत अजून बघितली नाही, पण
<< मुलाखत अजून बघितली नाही, पण १९६५ साली साडेचार लाख रुपये ही अतिशयोक्ती वाटते. >>
I stand corrected. आत्ता मुलाखत बघितली, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की १९६५ सालचे साडेचार लाख रुपये म्हणजे आजचे जवळपास ५० कोटी रुपये झाले.
एकंदर मुलाखत खूप आवडली. मुख्यत: नेहमी इतरांकडून छोटया छोटया गोष्टींतून शिकण्याचा प्रयत्न करणे आणि इतरांच्या प्रती कृतज्ञता (Gratitude), ज्याचा बऱ्याच भारतीयांमध्ये अभाव आढळतो, हे गुण फार आवडले.
बरोबर.
बरोबर.
*त्यांचं मत आपल्या सगळ्यांवरून (मायबोलीकर) सहज पटण्यासारखं >> छान !
*एशियन एडिशन/भाषांतरित पुस्तके जर स्वस्तात उपलब्ध केली तर रस्त्यावर नकली प्रती >> +1
*इतरांच्या प्रती कृतज्ञता >>> +11
जेफ्री आर्चर यांचं पुण्यात
जेफ्री आर्चर यांचं पुण्यात भाषण झालं होतं!!!!! (अचंबित बाहुली)
माझ्या पुस्तकांच्या चौर्य-आवृत्ती मोठ्या प्रमाणात मुंबईत रस्त्यावर विकताना मी पाहिल्यात >> आणि मी एकेकाळी वाचल्यात .... .. पेक्षा
!!!!! (अचंबित बाहुली)
!!!!! (अचंबित बाहुली)
>>>
या बाहुलीमध्ये भर पाडणारी पुढील माहिती
भाषण पुण्यातील कॅम्पातील लँडमार्क या पुस्तकांच्या दालनात आयोजित केले होते. त्याला तरुणांची खूप गर्दी होती. दालन खचाखच भरलेले होते आणि कित्येकांनी संपूर्ण दोन तास उभे राहून भाषण एकचित्ताने ऐकले होते.
जबरी
जबरी
किस्से छान.
किस्से छान.
>>>. मूळ लेखनापेक्षा जवळजवळ दुप्पट वेळ ते पुनर्लेखानासाठी देतात.>>
हे आवडले.
ना सी फडके आणि पु भा भावे
ना सी फडके आणि पु भा भावे यांच्यात झालेला एक संवाद : इरसाल, फटकळ आणि तऱ्हेवाईकपणाचा नमुना !
( व्यंकटेश माडगूळकर यांच्या चित्रे आणि चरित्रेमधून साभार)
एका टळटळीत दुपारी भावे व्यंमांकडे आले आणि म्हणाले,
“अप्पा फडके इथेच राहतात म्हणे”
“हो, पलीकडेच”
“जाऊ या का त्यांच्याकडे सहज?”
तेव्हा व्यंमा आणि फडक्यांची तशी ओळख नव्हती म्हणून व्यंमा म्हणाले की आपण त्यांना आधी कळवले नाहीये. शिवाय भर दुपार आहे तर नको जायला.
तरी पण भाव्यांनी आग्रह धरला म्हणून दोघे गेले.
घराच्या दारातून भावे ओरडले,
“आहेत का फडके?”
“कोण आहे?”
“मी भावे, येऊ का ?”
“या”
फडक्यांचे लिहिणं चालू होतं. भावेंनी विचारलं, काय चाललंय?
“लिहितोय”
“दररोज किती तास लिहिता?
“चालू असतं सारखं”
भावे : फार लिहिलं की कस राहत नाही. सुमार लेखन होत असं वाटत नाही का ?
फडके : तुम्ही थोडं लिहिता आणि ग्लोरीफाय करता
भावे : तुमच्या पहिल्या कादंबऱ्या उत्तम आहेत, हल्लीच्या नाहीत
फडके: माझं उलट मत आहे. आत्ताच माझं लेखन जास्ती मॅच्युअर आहे. पूर्वीचं चांगलंच होतं. आताचही आहे
मग थोड्या वेळ ताणलेली शांतता.
भावे : तुम्ही फार मेथॉडिकल आणि स्ट्रिक्ट आहात असं म्हणतात ते खरं का ?
फडके टेबलावरच्या कागदांकडे नजर टाकून म्हणाले,
“मेथड आता दिसली, स्ट्रिक्टनेस थोड्या वेळाने दिसेल”
पुन्हा शांतता.
भावेंनी विचारलं, आता जायचं का ?
फडके (शांतपणे) : बरं आहे, या.
जागतिक पातळीवरील काही
जागतिक पातळीवरील काही नामांकित डॉक्टरांचे किस्से
(ब्रिटिश मेडिकल जर्नलमधून साभार) :
१. प्रमोद करण सेठी : हे जयपूरचे. त्यांनी तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिला अस्थिभंग विभाग सुरू केला. अपघातात पाय गमावलेल्या लोकांसाठी कृत्रिम पाय तयार करण्याच्या संशोधनात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यासाठी परदेशी तंत्र न वापरता भारतीय उठण्याबसण्या आणि चालण्याच्या पद्धतींचा विचार करून त्यांनी एक विशेष कृत्रिम पाय बनवला. त्याला नाव देताना अनेकांची, “तुमचे स्वतःचे नाव द्या” ही सूचना डावलून यांनी आपल्या कर्मभूमी जयपूरचे नाव दिले. त्या उत्पादनाचा स्वामित्व हक्कही त्यांनी जाणीवपूर्वक घेतला नाही.
..
२. Willam Ganong : हे कॅनडाचे. यांनी मानवी शरीरक्रिया शास्त्राचे ‘Review ऑफ मेडिकल फिजिओलॉजी’ हे अतिशय महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे आणि त्याचे कित्येक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्या पुस्तकाची एखादी आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगून ठेवले होते, की जो कोणी यातील चूक दाखवून देईल त्याला प्रत्येक चुकीमागे 25 सेंट्स बक्षीस मिळतील. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांना या ‘उद्योगात’ बरीच रक्कम खर्च करावी लागली !
..
३. Fyodor G Uglov : यांची कर्मभूमी रशिया. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना, ‘तुमच्या हातात कौशल्य नाही’ असे झाडले होते. ते मनाला लागल्याने त्यांनी शस्त्रक्रियेची उपकरणे घरी आणून अगदी कसून सराव केला. त्यांनी 400 पातळ रबरी मोज्यांवर बारीक टाके घालण्याचा दीर्घ सराव केला आणि त्यानंतर रक्तवाहिनी जोडण्याची अभिनव शास्त्रक्रिया करून दाखवली. ते व्यसनमुक्तीचा जोरदार प्रचार करीत. माणसाने मर्यादित आहार घेतला, धूम्रपान-मद्यपानापासून पूर्णपणे अलिप्त राहिले आणि उपयुक्त कष्ट करीत राहिले तर तो आरामात 160 वर्षे जगेल असा त्यांचा दावा होता.
ते स्वतः १०३ वर्षे जगले, त्यांनी ४ विवाह केले आणि १०२व्या वर्षापर्यंत ते वैद्यकात कार्यरत होते. वयाची शंभरी पार केल्यानंतरच्या मुलाखतीत त्यांनी, आपण आठवड्यातून दोनदा संभोग करतो असे कौतुकाने सांगितले होते !
संगीतातील 2 भन्नाट किस्से
संगीतातील 2 भन्नाट किस्से दीपक राजाध्यक्ष यांनी इथल्या मुलाखतीत सांगितलेत
https://www.youtube.com/watch?v=jaBaaPs1RNs
1.
कुमार गंधर्वांचा एक गायन कार्यक्रम शिवाजी मंदिरला होता. तेव्हा प्रेक्षागृहात फक्त 7 श्रोते उपस्थित होते आणि त्यापैकी एक होते मंगेश पाडगावकर.
कार्यक्रम छान चालू होता. नंतर मध्यांतर झाले. त्या वेळात पाडगावकरांना अगदी अस्वस्थ वाटत होते आणि कुमारांना भेटू की नको अशी त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती. तरी पण हिय्या करून ते त्यांना भेटायला गेले. कुमारांनी त्यांना विचारले, की कसे वाटले माझे गाणे ?
पाडगावकर म्हणाले की अप्रतिम ! परंतु पाडगावकर खूप अस्वस्थ आहेत हे कुमारांना जाणवले. मग त्यांनी त्याचे कारण विचारले. त्यावर पाडगावकर म्हणाले, “तुमचे लक्ष होते का सभागृहात ? तिथे आम्ही फक्त सात जण आहोत. त्यावर कुमार उत्तरले, “नाही, माझं लक्ष माझ्या ‘आत’ होतं !”
अशी ही दुर्मिळ एकतानता
**********************
2.
एका राज्य नाट्यस्पर्धेत एका नाटकासाठी अनंत अमेंबल यांना पार्श्वसंगीत देण्यासाठी बोलवण्यात आले. त्यांनी नाटकाची तालीम बघून लगेच सांगितले की ह्या नाटकाला पार्श्वसंगीताची कणभर सुद्धा आवश्यकता नाही; अगदी काळोख कराल तेव्हा सुद्धा नाही. यावर दिग्दर्शकांना आश्चर्य वाटले परंतु अमेंबल त्यांच्या निर्णयाशी ठाम राहिले.
मग स्पर्धेमध्ये ते नाटक सादर झाले व त्याच्या श्रेयनामावलीत पार्श्वसंगीत ‘अनंत अमेंबल’ असे नाव मात्र लिहिलेले होते ! आश्चर्याचा भाग पुढे आहे. . .
स्पर्धेचा निकाल जाहीर झाला तेव्हा त्या नाटकाला पार्श्वसंगीताचे पहिले बक्षीस मिळाले !!!
छान माहिती. दोन्ही किस्से
छान माहिती. दोन्ही किस्से आवडले.
नाही, माझं लक्ष माझ्या ‘आत’ होतं !”
अशी ही दुर्मिळ एकतानता
>>>> अशी एकतानता थोड्याफार प्रमाणात अनुभवली आहे. त्यामुळे पोचलंच.
>>>>.तेव्हा त्या नाटकाला
>>>>.तेव्हा त्या नाटकाला पार्श्वसंगीताचे पहिले बक्षीस मिळाले !!!
क्या बात है! लेस इज मोअर.
खरंय !
खरंय !
अमेंबल यांच्या वरील प्रसंगावरून मला वैद्यकातले खालील वाक्य आठवले :
The best surgeons know when not to operate !
>>>>>>The best surgeons know
>>>>>>The best surgeons know when not to operate !
ओहोहो!!
अशी ही दुर्मिळ एकतानता >>>
अशी ही दुर्मिळ एकतानता >>> किस्सा भारी आहेच पण "एकतानता" शब्दाचे इथे प्रयोजनही. हा शब्द फक्त कुमार गंधर्वांच्याच "उठी उठी गोपाला" मधे ऐकल्याचे लक्षात आहे. "एकतानता कुठे लाविते एकतारीची धून"
Pages