प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या बाबतीतला हा एक किस्सा
( डॉ. सुभाष भेंडे यांच्या लेखातून साभार) :

पिंगे आकाशवाणीमधून निवृत्तीच्या मार्गावर होते. नेमके तेव्हाच नाशिकला एका व्याख्यानानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले,
“आचार्य अत्रे हे टिनपॉट लेखक आहेत. त्यांचं बरंचसं लेखन अर्वाच्य आहे”.

ही उथळ शेरेबाजी पत्रकारांना अजिबात आवडली नाही. पिंग्यांच्या या उद्गारांना भरपूर प्रसिद्ध मिळाली. मग काय, एका दैनिकाने त्यांच्याविरुद्ध मोहिमच उघडली. अत्रेभक्तांनी तर मोर्चा आयोजित केला आणि आकाशवाणीच्या संचालकांकडे निषेधपत्रही दिले.

शेवटी रवींद्र पिंग्यांनी सर्वांची मनःपूर्वक क्षमा मागितली आणि या प्रकारावर पडदा पडला.

रविंद्र पिंगे प्रसिद्ध व्यक्ती होते. पण एखादा साहीत्यिक आवडत नाही हे सांगण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
भावना दुखावण्यावरून आपण अनेकांची टिंगल करतो. इथे अत्रेभक्तांनी वेगळे काही केले असे वाटत नाही.

* साहीत्यिक आवडत नाही हे सांगण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.>>> +१

पण ' टिनपॉट' शब्द टोकाचा व आक्षेपार्ह वाटतो.
( मी कोणाचाच भक्त नाही Happy

पण ' टिनपॉट' शब्द टोकाचा व आक्षेपार्ह वाटतो. >>> तुमचे म्हणणे बरोबर आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोण आपापल्या ठायी बरोबर असतो इतकेच म्हणणे होते.

एखाद्याची भाषा अर्वाच्य आहे असा एखाद्याचा समज झाला तर त्याने काय उपमा द्यावी हा त्याचा प्रश्न आहे. त्यावर चाहत्यांनी नाराज होणे हे सुद्धा त्यांचे अभियक्ती स्वातंत्र्य आहेच की. पण असेच निषेध झुंडीने केले गेले कि हल्ली भावना दुखावणे हा रोग आहे अशी मल्लिनाथी करत खिल्ली उडवण्यात येते. हे सुद्धा स्वातंत्र्य आहेच..

काय आवडत नाही हे सांगायचे स्वातंत्र्य तर हवेच पण ते सांगताना कसे सांगायचे, कोणते शब्द वापरायचे याचेही तारतम्य हवे. नाहीतर न आवडण्याचं कारण मत्सर आहे असे समजायचे स्वातंत्र्य वाचकास आहे. Happy

साधनाजी, वादविवाद खेळणे हे इथे अभिप्रेत नाही.
कुणी शिवीगाळ केली, त्याच्या त्या वर्तनाचा उल्लेख एखाद्याने सभ्य भाषेतल्या टोकाच्या शब्दाने केला तर त्याला मत्सर द्वेष म्हणणे हे स्वातंत्र्य असले तरी ते झेपणारे नाही. तर्क आणि कुतर्क यात फरक आहे हे मान्य व्हावे.

बाय द वे वेव्ह्ज ऑफ डान्यूब ऐका आणि काही आठवतंय का पहा. >>> कोणत्या गाणे आपल्याकडचे आहे या सुरावटीवर? मला या ओरिजिनल सुरावटी ऐकल्या की "कोठेतरी ऐकले आहे" असे वाटते पण देशी गाण्याची लिंक डोक्यात पटकन लागतेच असे नाही Happy

खुद्द अत्रे लोकांना काय काय बोलले आहेत त्या तुलनेत टिनपॉट काहीच नाही Happy

असल्या उपमा/शेरे मारण्याचे स्वातंत्र्य कोणालाही हवे, कोणाबद्दलही हवे. मग त्या व्यक्तीचे स्थान काहीही असो. अशा व्यक्तीच्या उद्गारांना विरोध करण्याचेही स्वातंत्र्य पब्लिकला आहेच. पण त्या विरोधातून मूळ व्यक्तीचे तिला जे काही म्हणायचे आहे ते स्वातंत्र्य धोक्यात आले तर तो विरोध लाइन क्रॉस करतो हे नक्की.

टिनपॉट हा शब्द वापरण्यामागचा ऐकीव इतिहास असा आहे..

पत्र्याचे डबे नुकतेच सुरू झाले होते तेव्हां (अर्थातच भारतात) त्यांचा वापर आतला पदार्थ संपला कि धुवून पुसून निरनिराळ्या कारणांसाठी व्हायचा. या काळात शास्त्रीय संगीताचे जाहीर कार्यक्रम होत असत. हा त्यांचा शेवटाला जात असल्याचा काळ होता.
काही काही गायक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत गायनाचे कार्यक्रम ठेवत त्यांना उद्देशून टिनपाट असा शब्द वापरला जात असे. कारण पत्र्याच्या डब्यात खडे टाकून ते जोरजोरात हलवले कि जो आवाज होतो तसे या गायकाचे गायन आहे असे सांगायचे असे.

शाळेतल्या एका शिक्षकांनी हे रंगवून सांगितले होते. हे सांगून झाल्यावर किशोरकुमारचं गाणं हे तसं आहे हे सांगायला विसरले नाहीत.

कोणत्या गाणे आपल्याकडचे आहे या सुरावटीवर? मला या ओरिजिनल सुरावटी ऐकल्या की "कोठेतरी ऐकले आहे" असे वाटते पण देशी गाण्याची लिंक डोक्यात पटकन लागतेच असे नाही
>>>>>>>
https://youtu.be/sqrp8grcTY0?si=gtf0MDCy6puwGBm0
Waves of the Danube
Life Theme Music of Raj Kapoor
घ्या. Happy

घ्या. >>> धन्यवाद Happy

बाय द वे या क्लिप मधे ३:०४ ला ते तिघे फ्रेम मधे असताना कॅमेरा अँगल जमिनीवरून वर असा घेतला आहे. तो राज कपूरचे दु:ख वगैरे दाखवायला - असे राजकपूरचा गाढा अभ्यासक असलेल्या कोणाकडून तरी ऐकले आहे. ते खरे असावे. (मात्र तो पिक्चर आता पाहताना राजकपूरचे कॅरेक्टरच ऑल्मोस्ट हॅरॅस करणारे वाटते ते वेगळे. आणि ते तेव्हाच्या अनेक पिक्चर्स मधे असेल)

कारण पत्र्याच्या डब्यात खडे टाकून ते जोरजोरात हलवले कि जो आवाज होतो तसे या गायकाचे गायन आहे असे सांगायचे असे. >>> यावरून हे एक जुने गाणे आठवले. कॉलेजच्या काळात जुनी गाणी आवडू लागली तेव्हा त्याबद्दल मिळेल तेथे भरभरून वाचायचो. आत्तापर्यंत फक्त या गाण्याचे शब्दच वाचले होते - गाणे कधी ऐकले नव्हते. पण आता यूट्यूबवर सगळे असल्याने सहज सापडले
https://www.youtube.com/watch?v=-YPWM91FEH4

उत्तम चर्चा आणि विचार मंथन. सर्वांना धन्यवाद !
आतापर्यंत या धाग्यावर प्रामुख्याने साहित्य, संगीत, नाट्य-चित्रपट आणि विज्ञान या क्षेत्रातील व्यक्तींबद्दल लिहिले गेले आहे. त्यात साहित्य क्षेत्राला झुकते माप मिळालेले आहे आणि क्रीडा क्षेत्राकडे तसे दुर्लक्ष झालेले आहे याची जाणीव आहे.

क्रीडा जाणकारांना विनंती की त्यांनी सवडीनुसार त्या क्षेत्रातील व्यक्तींबद्दलही काही लिहावे.
अन्य काही क्षेत्रांबद्दलही लिहीण्यास काहीच हरकत नाही.

फारेण्ड, धन्यवाद या गाण्याबद्दल..
कधी ऐकले नव्हते. अशी थोडी अटपटी गाणी त्या त्या काळात गाजतात, नंतर विरून जातात.
ऐकताना कुणाला इशारा दिलाय का असे वाटले Lol
एकंदरीत टीनच्या डब्ब्यावर नाराजी असावी. (आधी मातीची वापरत होते कि तांब्याची ?)

वा अस्मिता! तू तर खजिन्याची चावीच दिलीस. मला फक्त ‘संगम’ आणि ‘जीना यहां’साठी धून वापरल्याचं माहिती होतं. बरसात पाहिला नाही. तो सीन माहिती होता पण त्याआधी ही धून वाजवली जातेय हे नव्हतं माहित. आणि राज कपूरने हे हक्क विकत घेतल्याचं माहिती नव्हतं. आत्ताही हा वॉल्ट्झ वाजतो परदेशात. मग हे लायसन्ससारखं असावं का?

टीनपॉटबद्दल मी ऐकलंय ते असं की अभिजन वर्गाकडे बोन चायना, स्टर्लिंग सिल्व्हर वगैरे वापरले जात असताना टीनची भांडी स्वस्त मिळायची. सैन्यात इश्यु केली जायची. म्हणजे टीन वापरणारे उच्चभ्रु नाहीत/नोकरपेशा आहेत. कलोनियल प्रभावामुळे भारतातही हेच झाले. इथे तर तांब्या पितळेची जडशीळ भांडी मग टीनला तुच्छ लेखले गेले यात नवल काय?

Shanker Jaikishen, then ruling the roost, were so stung by OPN that they composed a special song “tin kanastar peet peet kar “ to deride and denigrate OPN style of music. They did the same to RD Burman too with a special song “ Kauva chala hans ki chaal”

https://m.mouthshut.com/product-reviews/Golden-Collection-O-P-Nayyar-rev...

हे मराठीत आधी वाचले होते. काही संदर्भ मिळतो का म्हणून शोधले तर हे मिळालं.

क्रीडा जाणकारांना विनंती की त्यांनी सवडीनुसार त्या क्षेत्रातील व्यक्तींबद्दलही काही लिहावे. >> वर फारेण्ड ने दिलेले गाणे आहे त्याच सिनेमात क्रिकेट वर देखील एक गाणे आहे. हा फक्त योगायोग.

त्या गाण्याबद्दल थोडे अवांतर (इथे लिहावे कि नको म्हणून राहिले होते).
ते गाणे देवानंद वर (देव आनंद पेक्षा हेच ओळखीचे वाटते) चित्रित केलेले असले तरी रफीअण्णाने देव साठी जो राखीव आवाज ठेवलेला आहे तो लावलेला नाही. हा कुणासाठी आहे ते ध्यानात येत नाही. काही ओळी थोड्या वरच्या पट्टीत असल्या तरी खोया खोया चांद ला सुद्धा देव आनंदच गातोय असे वाटते.

त्या काळी रफी एका स्टुडीओतून दुसर्‍या स्टुडीओत असे नेहमी होत असल्याने तीन वेळा भलत्याच हिरोचे गाणे आहे असे समजून त्याचा आवाज लावलेला होता.
एका गाण्याच्या वेळी रफीचे रोजे चालू होते, त्यामुळे संगीतकाराला शक्यतो कमीत कमी टेक मधे गाणे करायची विनंती केली, लताला पण केली. गाणे पूर्ण झाले. रफी पुढच्या गाण्यासाठी निघाले, नंतर घरी जाऊन उपास सोडायचे होते. कार मधे बसणार इतक्यात गीतकार गुलशन बावरा आले आणि रफीचे आभार मानले. रफीने चमकून विचारले कि "किस बात के लिये " यावर गुलशन बावरा नम्रतेने उत्तरले "इस नाचीज के लिये आपकी आवाज पर्दे पर सुनाई देगी"
हे ऐकताच रफी धावत धावत पुन्हा स्टुडीओत गेले. सर्वांना पुन्हा टेक घ्यायला सांगितले. या प्रकाराने लता मंगेशकर वैतागल्या. स्वतःच विनंती करून स्वतःच पुन्हा गायला लावतात अशी काहीशी तक्रार होती.
संगीतकार पण म्हणाले कि गाणे व्यवस्थित आहे. पण रफीने पुन्हा रेकॉर्ड करायला लावले.
गाणे संपल्यावर सर्वांनी विचारले कि तुमचे उपास चालू आहेत म्हणून आम्ही टाळत होतो, मग असे काय झाले..
यावर रफीने खुलासा केला कि मी फक्त सिनेमाचा लीड कोण आहे हे विचारले होते, त्यावर अमिताभ बच्चन असे उत्तर मिळाले.
पण गाणे गुलशन बावरावर आहे हे माझ्या लक्षातच आले नाही. मी अमिताभला जसा आवाज देतो तसा आवाज दिला....
यावर वैतागलेल्या लता करवादल्या
"तो पहले पूछ लेना चाहिए ना ?"

इंटरेस्टिंग! अमिताभ असलेल्या पिक्चरमधे हे कोणते गाणे? चित्रपटात ठेवले होते का वगैरे काही माहिती होती का त्यात?

खुद्द अत्रे लोकांना काय काय बोलले आहेत त्या तुलनेत टिनपॉट काहीच नाही>>>> १००+
कधीकधी तर तथ्याऐवजी फक्त अहंकाराचे पुष्टीकरण वाटायचे.

Happy छान किस्सा आचार्य, जेवढं वाचलं आहे त्यावरून रफींच्या आवाजातली मार्दव आणि संवेदनशीलता त्यांच्या वागण्यातही होती असे जाणवलेले आहे.

छान भर घालता आहात आचार्य, 'लिहू की नको' असा विचार करू नका. Happy

राजकपूरचे कॅरेक्टरच ऑल्मोस्ट हॅरॅस करणारे वाटते ते वेगळे. +१
राज कपूरने कबीर सिंगचा पाया रचला आहे असं वाटलं आहे कधीकधी. इतक्या अदा, रोमान्स आणि अवीट गोडी असलेली मधाळ गाणी पेरली की डोळ्यांवर झापडे बसवली गेली. त्याचे पात्र अभिनेत्रीशी जवळीक करताना नेहमी थोडे आक्रमक वाटले आहे.

माझेमन, मी फक्त योग्य keywords वापरून शोधले. मला काहीही माहिती नव्हती. Happy पण थॅंक्स.

अमिताभ असलेल्या पिक्चरमधे हे कोणते गाणे? >>> जंजीर, दीवाने है दीवानों से

अस्मिता >> प्रत्यक्षात जे त्यांच्याशी बोलले आहेत ( माझे मामा आहेत त्यात) त्यांचा अनुभव असा आहे कि कानात प्राण आणून ऐकावे लागत असे इतके हळुवार बोलत असत. खूप रिस्पेक्ट देत.

'लिहू की नको' असा विचार करू नका. >> खरंच कि ! प्रतिभावंतांच्या यादीत कलावंतच आहेतच ..

हो का? बरं. Happy शक्य आहे.
------------

मला 'जज' करता येत नाही कुणाला, त्या त्या क्षणी एखादी व्यक्ती जशी वागते, ते त्यांच्या दृष्टीने योग्यच असते. त्यात प्रतिभावंत किंवा कलाकार (मन/बुद्धी) वेगळे असतात, आपण आपल्या साच्यात बसवू नये शक्यतो त्यांना. कारण मग आपणच त्यांना मर्यादित करू आणि कुठल्या तरी नवीन विचारांपासून अनभिज्ञ राहू..! त्यामुळेच ते सामान्य लोकांना तऱ्हेवाईक वाटतात.

**ही पोस्ट राजकपूरसाठी नाही. Happy

जंजीर, दीवाने है दीवानों से >>> ओह! हे डोक्यातच आले नाही Happy मी डोक्यात कस्मे वादे वगैरे शोधत होतो Happy

त्याचे पात्र अभिनेत्रीशी जवळीक करताना नेहमी थोडे आक्रमक वाटले आहे. >> मी त्याचे खूप चित्रपट पाहिलेले नाहीत (श्री ४२० पाहिला आहे पण खूप वर्षे झाली) पण संगम मधे तरी मला टोटली तसेच वाटले. दोस्त दोस्त ना रहा उलटे राजेंद्र कुमारनेच म्हणायला हवे Happy "अवीट गोडी असलेली मधाळ गाणी" हे मात्र १००%. "भूली बिसरी यादे मेरे हसते गाते बचपन की" वगैरे म्हणताना लताचा आवाज!

कॅमेरा अँगल जमिनीवरून वर असा घेतला आहे>> यातली फारशी माहिती नाही. पण जेव्हां कॅमेरा खालून वर घेतात तेव्हां ते पात्र लार्जर दॅन लाईफ वाटते, किंवा त्या क्षणीचे त्याचे भाव उठावदार होतात. ( खालून वर पाहण्याने ).

आता राजकपूर हा विषय चालला आहे तर पूर्वी कुठल्यातरी दैनिकाच्या रविवार पुरवणीत वाचलेला एक किस्सा थोडाफार आठवून लिहीतो.

कुठल्यातरी एका (कोणता?) चित्रपटात राजकपूरची अगदी गरीब फाटक्या माणसाची भूमिका आहे. तर झाले असे, की त्या चित्रपटाच्या उद्घाटनाचा विशेष समारंभ सुरू होणार होता. तेव्हा पाहुण्यांना चहापाणी देणाऱ्या कामगारांमध्ये एक पोरसवदा मुलगा आलेला होता आणि त्याचे राजकपूरच्या भूमिकांवर मनस्वी प्रेम होते. त्याची तीव्र इच्छा होती की आपण राजकपूरना ओझरते भेटावे आणि त्यांनी आपल्याशी दोन शब्द बोलावेत.
शिताफीने तो त्यांच्यापर्यंत पोचला परंतु राजकपूरनी त्याला अक्षरशः झिडकारले आणि बऱ्यापैकी झापले. त्यानंतर तो बिचारा रडवेला झाला होता. तेव्हा आजूबाजूच्या पत्रकारांनाही ते खटकले ( निदान त्या मुलाचे लहान वय बघून तरी . . . वगैरे)

हा सगळा प्रसंग लिहीणाऱ्या पत्रकारांनी लेखात मल्लीनाथी केली होती, की पडद्यावरील भूमिकेतला माणूस आणि वास्तवातला माणूस यात कधी कधी जमीन-अस्मानाचे सुद्धा अंतर असते.

Pages