प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“सखी मंद झाल्या तारका” हे सुधीर मोघे यांनी लिहिलेलं प्रसिद्ध आणि गाजलेलं गीत सर्वांना माहिती असेलच.

त्या गाण्याकडे वरवर पाहता असे वाटेल की हे प्रियकर प्रेयसीचे प्रेमगीत आहे. परंतु मुळात ही कविता मोघ्यांनी त्या उद्देशाने लिहीलेली नव्हती. या कवितेतून त्यांनी खुद्द कवितेला - म्हणजे कवीच्या सखीला - साद घातलेली आहे. कवी महोदय कविता लिहायला बसले पण ती काही सुचतच नव्हती आणि म्हणून ते कवितेलाच साद घालतात,
“आता तरी येशील का . . . “

तसेच,
“आला आला वारा. . .” मधील “पाठवणी करा सया निघाल्या सासुरा” हे शेतकऱ्याने कापणीच्या वेळी पिकाला उद्देशून म्हटलेले आहे !

( वाचू आनंदे कार्यक्रमातील सुधीर मोघेंवरील भागातून : https://www.youtube.com/watch?v=IM3HmyvLtzI)

आला आला वारा गाण्यात पडद्यावर नायिका आणि तिच्या सख्या शेतात कामं करायचा अभिनय करत लाजत बिजत भिजत नाचत असतात.
सगळ्या कधी करिशी लग्न माझे या मोडमध्ये दिसतात. शेतकाम हे निमित्त. नायिका तर श्रीमंत घरातली असते. शेतात नाचायलाच येते.

सखी मंद झाल्या तारकाबद्दलचा किस्सा त्यांच्या लोकसत्तेतल्या लेखमालेत वाचला होता. त्याबद्दलचा एक किस्सा म्हणजे पुणे आकाशवाणीसाठी हे गाणं पं. भीमसेन जोशी यांनी गायलं, पण रेकॉर्ड सुधीर फ डकेंच्या आवाजात निघाली. दोन्हीची चालही बहुधा वेगळी होती.

सुधीर मोघे हे संगीतकारही होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश भटांची प्रसिद्ध कविता - रंग माझा वेगळा

* पं. भीमसेन जोशी यांनी गायलं, पण रेकॉर्ड सुधीर फडकेंच्या >> +१
https://www.aathavanitli-gani.com/Song/Sakhi_Mand_Jhalya_Taraka इथे दोन्ही गायकांचा उल्लेख आहे.

* रंग माझा वेगळा >>> सुंदर आहे !

सखी मंद झाल्या तारकाचा हा किस्सा माहिती नव्हता!
मी लहानपणापासून अर्थात सुधीर फडक्यांचंच गाणं ऐकलं होतं आणि ते आवडत होतंच, पण काही वर्षांपूर्वी यूट्यूबवर भीमसेन जोशींचं ऐकलं आणि ते इतकं आवडलं की आता मी नेहमी तेच ऐकते Happy चाल सारखीच आहे, पण भीमसेनांचं जरा स्लो आहे.
https://youtu.be/F2gldTrqThk?si=mrP0K6ZPTlLIG5hP

दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात साक्षात सुरेश भटांसमोर देवकी पंडितनी ही गझल (? ) गायली आहे. आज कितव्यांदातरी ऐकताना अंगावर काटा आला. सुधीर मोघ्यांचं अर्थवाही संगीत आणि त्या वयातही देवकी पंडितची समज , गायकी आणि अदायगी. त्याही एक प्रतिभावंतच.

मी शेतकरी नाही त्यामुळे चूभूद्याघ्या, पण 'आला आला वारा संगे पावसाच्या धारा' या ओळी कापणीच्या वेळेशी जुळत नाहीत

* देवकी पंडित >>
ऐकली. अप्रतिम !
ऐन तारुण्यातील देवकी सुरुवातीला ओळखू आल्या नाहीत Happy

त्या बहुतेक भाताची लावणी करत असतील . मीही शेतकरी नाही, पण जेवढं ऐकलं वाचलं त्यावरून भाताची रोपं आधी अन्यत्र तयार करून मग शेतात चिखल करून त्यात रोवतात. म्हणून पाठवणी. Wink तो अर्थ कवीने काढलेला नसावा, काढणार्‍याचं क्वालिफिकेशन कवीचा पुतण्या हे आहे.

* “पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
>>> https://www.aathavanitli-gani.com/Song/Aala_Aala_Vara
इथल्या ब्लॉगमध्ये व्यवस्थित माहिती आहे.
(वाचू आनंदेमध्ये सांगितल्यानुसार) ती कापणी नसून भाताच्या रोपांच्या पुनररोपणाची स्थिती आहे.

हं. कवीनेच ते सांगितलंय तर. सामान्यतः उलट होतं. निसर्गातल्या गोष्टी मानवी भावभावना, व्यवहारांचं रूपक म्हणून येतात. इथे उलट झालंय.

गजेंद्र अहिरेंचा किस्सा वाचून मला शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या बाळाजी आवजी चित्रे (चिटणीस पद) यांची गोष्ट आठवली. तेही असेच तल्लख होते.
एकदा महाराजांनी त्यांना काही पत्रांचा मजकूर सांगून ठेवला आणि खलिते तयार ठेवायची आज्ञा केली. सगळा दिवस कामाच्या अफाट गडबडीत गेला आणि नेमकं एक पत्र लिहायचं राहिलं. रात्री खलबतखान्यात आल्यावर महाराजांनी विचारलं तेव्हा त्यांना 'नाही' म्हटलं तर तो अवमान होणार म्हणून चिटणीसांनी चाचरत हो म्हटलं. पटकन महाराजांनी 'वाचा' म्हटलं तर कोरा कागद वाचूनही दाखवला. मजकूर मातब्बर जमला होता म्हणून महाराजांनी खूष होऊन ते बघायलाच मागितलं तेव्हा चिटणीसांनी मान खाली घालून मनापासून क्षमा मागितली आणि खरा प्रकार काय तो सांगितला. हे आधी घडलं नव्हतं आणि पुन्हा कधीच ते काही विसरले नाहीत. पण या प्रसंगात सुद्धा अकारण न रागवता महाराजांनी त्यांचं मनमोकळेपणाने कौतुक केलं होतं.

>>>>>दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात साक्षात सुरेश भटांसमोर देवकी पंडितनी ही गझल (? ) गायली आहे. आज कितव्यांदातरी ऐकताना अंगावर काटा आला.
लिंकबद्दल आभार. सुंदर कार्यक्रम आहे.

* बाळाजी आवजी चित्रे (चिटणीस पद) >> किस्सा छान !
* * *
वाचू आनंदेमधील सुधीर मोघेंवरील पहिला भागही आवर्जून पाहण्यासारखा आहे. (https://www.youtube.com/watch?v=bgS3fXGTF20&t=8s)

त्यांनी पूरिया, मारवा व यमन या तीन ‘रागांवर’ केलेली प्रत्येकी एक अशा तिन्ही कविता अप्रतिम आहेत !
शास्त्रीय संगीतातले काही कळत नसलेला वाचक देखील त्या कविता ऐकल्यावर स्तिमित होतो.

कवीने आपल्या कवितेलाच काव्यविषय बनवण्याचे अजून एक उदाहरण आठवले ते म्हणजे संदीप खरे यांची,
“कितीक हळवे, कितीक सुंदर” ही कविता.

सहा कडव्यांच्या या कवितेतील पहिल्या पाच कडव्यांमधील वर्णनावरून कवी ‘ती’ म्हणजे स्त्रीबद्दल बोलतो आहे असे वाटणे स्वाभाविक असते. परंतु शेवटच्या ओळीत कवीचे मन लखलखीतपणे समोर येते -

“झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर” !

वाह कुमार सर, हे गाणे ऐकले नव्हते. किती गोड.

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर
मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
- संदीप खरे

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त झालेला कार्यक्रमाची चित्रफित येथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=7JM7CCLeyLs

त्यातील ठणठणपाळच्या निवडक भागाचे अभिवाचन कलावंतांनी केलेले आहे. तत्कालीन बहुतेक सगळ्या साहित्यिकांची दळवींनी घेतलेली एकूणच ‘हजेरी’ लाजवाब आहे ! सर्वांच्या विविध ‘प्रतिभा’ त्यांनी चव्हाट्यावर आणल्या आहेत.

त्यांच्या नाटकांवरील चर्चेमध्ये स्वाती चिटणीस यांनी सांगितलेली अतुल परचुरेची आठवण हृद्य आहे. ‘नातीगोती’मध्ये अतुलनी मतिमंद मुलाची भूमिका अप्रतिम वठवली होती. नाट्यगृहातील तो प्रयोग संपल्यानंतर अनेक प्रेक्षक कलाकारांच्या खोलीबाहेर गर्दी करायचे आणि सर्वांचे म्हणणे एकच होते,

“आम्हाला फक्त एकदा तो नाटकातला मतिमंद मुलगा खरोखरच नॉर्मल आहे ना ते डोळ्यांनी बघू द्या !”
. . .
बॅरिस्टरबद्दल बोलताना प्रदीप वेलणकर म्हणाले,
“पण या नाटकाच्या उत्तम यशानंतरही दळवींनी बॅरिस्टर(२) काढले नाही!”

या वाक्यावर श्रोत्यांचा जोरदार हशा झाला.

वाचू आनंदेचा सुधीर मोघे (भाग तीन) : एक रंजक किस्सा

एकदा त्यांचा एका संस्थेतर्फे सत्कार होता आणि ते व्यासपीठावर बसलेले होते. संयोजकांनी त्यांना शाल व श्रीफळ दिले. शाल पांघरून झाली आणि हातात नारळ येता क्षणी मोघेंनी नकळत तो आपल्या कानाशी नेऊन वाजवून पाहिला ! पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले,
‘अरे आपण इथे व्यासपीठावर बसलो आहोत’ आणि ते चपापले.

https://www.youtube.com/watch?v=0vmMUHMSTRE

सुधीर मोघेंना भेटलोय त्यांच्या घरी.
मुक्तछंद नाव दिलंय घराला.
श्रीकांत मोघे त्यांचे वडील बंधू होते हे माहीत नव्हते.
ते एकदा लोणावळा रेल्वे स्टेशन वर भेटले होते.

* मुक्तछंद नाव दिलंय घराला.>>>
सुंदर !

१. घराच्या नावासंदर्भात मला दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या सातारा येथील बंगल्याचे “या” हे नाव खूप म्हणजे खूपच आवडले.

२. पंढरपूरस्थित एका लेखकांनी अंतर्नाद मासिकावरील प्रेमापोटी स्वतःच्या बंगल्याला 'अंतर्नाद' हेच नाव दिलेले आहे.

सुधीर मोघे स्वतः छंदबद्ध लिहीण्याबद्दल प्रसिद्धच आहेत. त्यांनी मुक्तछंद नाव द्यावे हे मला नवलाईचे वाटत होते. मला विचारायचं होतं पण सोबत्याने हाताने दाबून गप्प केले.

बाहेर पडल्यावर तो म्हणाला "त्यांचा मूड चांगला असेल तर चांगले उत्तर दिले असते नाहीतर खवचट उत्तर मिळाले असते. त्यांच्या दृष्टीने मुक्तछंद पण छंदातच असतो. थोडासा सैल असतो.

छंदापासून मुक्त या प्रकाराला ते छंदमुक्त म्हणतात..
अर्थात घराच्या नावाचा आणि कवितेतल्या मुक्तछंदात संबंध आहे का हा प्रश्न राहिलाच विचारायचा.

अंतर्नाद
आवडले हे नाव. रानातल्या घराला शोभेलसे.

किशोरकुमारच्या तर्‍हेवाईकपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
ज्या निर्मात्याकडे काम करायचे नाही त्याला ताटकळत ठेवून लपून बसणे, कवटीतून चहा पाजणे इ.
यातला कवटीचा किस्सा किती खरा असेल ही शंका होती. पण अलीकडेच पत्रकार रजत शर्मा यांनी एक किस्सा सांगितला आहे. आप कि अदालतची जुळवाजुळव सुरू होती. पहिले काही एपिसोडस सुप्रसिद्ध, वादग्रस्त, खळबळजनक व्यक्ती गेस्ट्स म्हणून आल्या तर कार्यक्रम सुपरहीट होईल म्हणून रजत शर्मा अनेकांच्या मागावर होते.

खूप प्रयत्न झाल्यावर किशोरकुमार यांना त्यांनी घरी गाठले. ते म्हणतात कि वातावरण बघून दडपण आलं. बंदूक होती, बऱ्याच चित्र विचित्र वस्तू होत्या आणि भिंतीवर कवट्या ( खोपड्या) होत्या.

रजत शर्मा यांना घाम फुटला होता. किकुंचे किस्से आठवत होते. एवढ्यात किकु आले.

गप्पा संपल्या. रजत शर्माने चाचरत विचारले, "ये खोपडियां क्यूं सजाई है दीवारों पर?"

त्यावर किकुंनी दीर्घ श्वास घेतला " बेचारे तुम्हारे जैसे पत्रकार थे. अब उस खाली दीवार पर तुम्हारी खोपडी टंगने वाली है"

त्यांचा सांगायचा अंदाज असा होता कि रजत शर्मा सगळी भीती विसरून हसायला लागले.

विकीपिडीया नुसार

किशोर कुमार ह्यांचा मृत्यु १३ ऑक्टोबर १९८७
आप की अदालत ह्या शोचे प्रसारण वर्ष १९९३

किशोर कुमार ह्यांच्या मृत्यूपुर्वी 'आप की अदालत' सोडा इतर कुठल्याही खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव शक्य नाही कारण खाजगी वाहिन्या भारतात १९९० साली आल्या.

रजनी पंडित
या खाजगी गुप्तहेर व्यवसाय करतात. आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी 85,000 प्रकरणी हाताळली आहे हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले ! या उद्योगाला भारतात सरकार दरबारी मान्यता नाही.

त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रथम उद्योगश्री पुरस्कार दिला गेला. परंतु देण्याआधी त्याला बराच विरोध झाला होता कारण,
“लोकांच्या मागे लागणारे ही बाई आहे, तिला पुरस्कार कशाला ?”
असा वादाचा मुद्दा होता. परंतु प्रेमा पुरव यांनी मध्यस्थी करून तो पुरस्कार देणे उचित असल्याचे सांगून द्यायला लावला.

रजनीताईंनी इंदिरा गांधींना आणीबाणीच्या विरोधात पत्र लिहिले होते आणि त्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांकडे बोलावणे आले होते आणि पोलिसांनी त्यांना सांगितले की तुम्हाला इंदिरा गांधींची प्रतिक्रिया आली असून तुम्ही पत्र छान लिहीलेले आहे.

“कोणालाही आपली जात ही शिवी वाटता कामा नये’

हा त्यांनी मुलाखतीत मांडलेला विचार महत्त्वाचा वाटला.

भारतात खाजगी गुप्तहेर हा अधिकृत व्यवसाय व्हावा या मागणीसाठी त्या लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=ofXNvSoBXlg&t=1014s

Pages