मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नाव टाळून टाळून इतर धागे वाचावेत म्हटलं तर तिथेही आहेतच महाराज (डोक्यावर हात मारणारा स्माईली)
काही धागे तरी सुटोत तावडीतून ( क्रॉस अवर फिंगर्स)
मुलांच्या गंमतीजमती वाचताना फार मजा येते, ती तरी मुक्तपणे मिळू देत.

अरेंज मॅरेज असणाऱ्या घरात एक बरे असते. जोडप्यांमध्ये अगदीच अहो जाहो नसले तरी पुरेसा आदर राखून बोलणे होते. लव्हमॅरेज वाल्यांकडे मात्र सुरुवातच अरेतुरेने झाली असते. त्यात मैत्रीतून झालेले प्रेम असेल तर एकमेकांना घालून पाडून बोलणे, मस्करीतच का होईना चिडवून तोंडसुख घेणे हा आपला हक्कच समजला जातो. जो पर्यंत मुले होत नाही तोपर्यंत हे चालून जाते. पण नंतर काळजी नाही घेतली तर हे असे होते....

नवीन घरात नुकतेच राहायला आलो तेव्हाची गोष्ट. स्विमिंग पूलही चालू झालेले. सोसायटीतील सगळी पोरं तिथेच पडीक असायची. त्यात एक माझी पोरगीही असायची. तेव्हा तिला पोहता यायचे नाही म्हणून मी सोबत असायचोच. स्विमिंग उरकल्यावर कधी शॉवर घेऊन वर जायचो, तर कधी तसेच घरी आंघोळीला यायचो. त्यामुळे कधी वापरायचा झाल्यास सोबत टॉवेल न्यायचो. तसेच कॅप गॉगल वगैरे बाकीची आभुषणे असायची. त्याची पिशवी सांभाळायची जबाबदारी माझ्यावर असायची. तसे लॉकर होते, पण मी शक्यतो पूलच्या साईडलाच ठेवायचो. त्यामुळे ती आठवणीने परत आणायचे अवघड काम माझे होते. जे विसरणे माझ्यासाठी फार नॉर्मल होते.

असेच एके दिवशी लेकीचे स्विमिंग आटोपल्यावर आम्ही तिच्या मैत्रीणींसह वर जायला निघालो. पूल दुसऱ्या माळ्यावर आहे. लिफ्ट तळमजल्याहून वर येत होती. निम्मी खालून येतानाच भरली होती. उरलेली आम्ही स्विमिंगपूल गॅंगने भरली. तेवढ्यात मला आठवले, अरे पिशवी पूलवरच विसरलो.. मी लेकीला म्हणालो, तू जा वर. मी आलो लगेच घेऊन.. आणि तिच्या उत्तराची वाट न बघता पिशवी आणायला धूम ठोकली.

जाताना पिशवीच्या चिंतेने पळत गेलो असलो तरी येताना पिशवी हातात आल्याने रमतगमत शीळ घालत आलो. पण परत येऊन पाहतो तर लेकीने एवढा वेळ लिफ्ट अडवून ठेवली होती. अरे देवा.. आता सगळी लोकं मला शिव्या घालत असतील म्हणत मी तिला ओरडणार ईतक्यात तीच पटकन म्हणाली.. अरे माकडाss, तू पुन्हा पिशवी विसरलास.. आई ग्ग, सगळी लिफ्टमधली लोकं हसायला लागली Lol आणि मला हसावे की ओरडावे कळत नव्हते Sad लिफ्ट कश्याला अडवून ठेवलीस म्हणून तिला ओरडायचे होते तर ते ही टाळले. तिच्या या फॉर्ममध्ये आणखी शोभा नको होती Proud

पण घरी येऊन बायकोला हा किस्सा सांगताना एक ठरवले. यापुढे माकडा आणि गाढवा सारखे शब्दप्रयोग घरात बंद करायचे. कारण मोठी लोकं एकमेकांना काहीही बोलू शकतात, पण लहानांनी मोठ्यांना काही बोलू नये असे या पिढीला समजावणे तसे अवघडच Happy

खतरनाक किस्से...

काही किस्से जरा too personal वाटतात. शेअर करताना जरा विचार करा की काय शेअर करतोय ते...

ताजा किस्सा
भाचा वय वर्षे 4.5
शाळा ऑफलाइन सुरू झाल्यामुळे आता खुश आहे गडी. रोज नवीन किस्से ऐकवतो.
परवा घरी आला तेव्हा बहिणीने विचारले, आज शाळेत काय केले ? तेव्हा म्हणाला की
" मम्मा आज टीचर ने गोष्ट सांगितली"
"कोणती गोष्ट ? "
"बाळ टिळक आहेत ना त्यांची"
"कोणती गोष्ट ? शेंगांची का ?"
तोवर त्याचा बोलायचा मूड गेला होता आणि घरातल्या गाड्यांचा पसारा काढून खेळत बसला. पण आईचं सुरूच..
"सांग ना पिल्लू, कसली गोष्ट सांगितली ? टिळकांनी शेंगा खाल्ल्या नाहीत ती का ?
" शेंगा नाही काही, त्यांनी वडापाव खाल्ला आणि दूध पिलं."
आई shocks आणि माझा भाचा rocks Wink
( त्यांना शाळेत रोज खाऊ असतो. बहुतेक त्या दिवशी वडापाव होता )
नंतर माझ्याशी फोनवर बोलत होता तेव्हा मी गम्मत म्हणून विचारले की काय रे टिळकांनी काय खाल्ले होते ? टीचर ने गोष्ट सांगितली ना तर मला म्हणाला , त्यांनी मसुराची उसळ आणि पोळी खाल्ली होती .

सुरस किस्से! Lol
मी आणि लेक ती अजून ममी, डॅडी , दादा असं आणि इतकंच तोडकं मोडकं बोलायला लागली होती, तेंव्हा तिला मोठा पुरूष म्हणजे डॅडी असा समज असावा, हे मला माहित नव्हते. अंकल शब्द शिकवला नव्हता.
एक दिवस लिफ्ट मधुन तिला प्रॅम मधुन घेऊन जात असताना लिफ्ट मधे १ माणुस शिरला. तो वर्णाने अगदीच सावळा होता. आम्ही दोघी लक्खं गोर्या वाटू असा. त्याला पाहून लेक म्हटली- डॅडी. Sad
तिला गप करताना माझी तारांबळ उडाली, पण तो मनुष्य अगदीच लाजून गोरा(?) मोरा वगैरे झाला, खुशी लपत नव्हती चेहेर्या वर . Uhoh
नंतर १-२ वेळा लिफ्ट मधे दिसल्या वर लाजून स्माईल वगैरे..आणि माझी नजर तडक फोन वर जसे कोण तो, कोण मी? Lol

४ महिन्यापुर्वी ऑस्ट्रेलियातुन इन्डियात आलेला आमचा भाचा (भावाचा मुलगा) राघव - चार वर्षाचा. तिथे नर्सरी ला टाकले होते त्याला.
तर तिथल्या साउथ इन्डियन कुटुंबाचे आणि भावाच्या फॅमिलीचे स्नेहबन्ध. त्यांची ही छोटी मुलगी साधारण राघवच्या वयाची. दोघांची गट्टी जमलेली. याने इथुन तिला व्हिडीओ कॉल लावला. मग इथल्या सर्वांची ओळख करुन दिली.
धिस इज माय आज्जी, धिस इज अवर तनिष्क दादा.
तिकडुन त्या पोरीने पण सुरुवात केली. सी माय मॉम, ...
लुक, दिज आर माय टॉईज.. इथवर सगळे व्यवस्थित झाले. पोरगी डॅडीला शोधाय्ला गेली. पोरीचा डॅड नेमका त्याच वेळी टॉयलेटमधे गेलेला. पठ्ठिने मोबाईल हातात धरुन, नुसताच लोटलेला दरवाजा उघडला. अन कमोडवर बसलेल्या बापाची ओळख करुन दिली. Biggrin

अन कमोडवर बसलेल्या बापाची ओळख करुन दिली. >>> आई ग्ग Lol

पण खरेच हे पोरांचे विडिओ कॉल प्रकरण फार सांभाळावे लागतात. कारण हल्ली लहानातल्या लहान पोरांनाही विडिओकॉल लावायचे माहीत असतात पण लाजलज्जेचे निकष माहीत नसतात..
माझीही पोरगी विडिओ कॉल लावते तेव्हा मी घरात उघडा वावरत असेल तर माझी पळापळ होते. आणि हे ती ओळखून मुद्दाम हे बघा माझे पप्पा म्हणून माझ्यावर फोकस करते. किंवा मला फसवायला तशी हूल तरी देते. तर कधी ती हूल देतेय असे वाटून मी फसतो Proud

माझ्या चुलत बहिणीकडे घडलेला हा किस्सा आहे. जिजाजींच्या आतेभावाला पाहायला मुलीकडची मंडळी येणार होती. ताईकडे पाहण्याचा program ठरला होता..पण आधी तशी काही कल्पना नसल्याने त्या मुलाने खास कपडे आणले नव्हते.म्हणून ताई,जिजू आणि त्यांचा छोटा 4 वर्षांचा मुलगा दुपारी आतेभावाला घेऊन मार्केट मध्ये गेले..त्यांना बराच वेळ लागला. ईकडे मुलीकडची मंडळी आणि मुलगी ताईकडे पोचलेदेखील ..ताईच्या सासूबाईंनी फोन करून सागितले तसे ते सगळे कपडे घेऊन लगेच घरी आले..पण हॉल मध्ये पाहुणे बसले होते..म्हणुन ताई, जिजू आणि नवरा मुलगा मागच्या दाराने घरात शिरले..पण ताईचा मुलगा आणि या किस्स्याचा हिरो हॉल मधून घरात शिरला..लहान मुलगा दिसल्यावर मुलीच्या वडिलांनी सहज विचारले,"अरे देवांश बाहेरून खेळून आलास वाटतं.." त्यावर माझा भाचा चटकन् उत्तरला, " नाही .मार्केट मध्ये गेलो होतो.त्या चाचूजवळ कपडेच नव्हते.त्याने माझ्या बाबांचे कपडे घालून पण पाहिले पण त्याला झालेच नाही.म्हणून त्याच्यासाठी कपडे आणायला गेलो होतो."2 मिनिटे त्या हॉल मध्ये कोणालाच काय बोलावे सुचले नाही..आणि आतमधे ताई, जिजू आणि नवरा मुलगा यांनी डोक्यावर हात मारून घेतला Lol

काल माझ्या मुलाने मला वेगळ्याच प्रकारे लाजवले. एक गाणे गुणगुणत असताना हा म्हणाला, "मिस्टर इंडिया मधले ना? मस्त आहे सिनेमा. मला खूप आवडतो"

मी शॉक्ड! Lol

"अरे तुला कसं माहित हा चित्रपट? हा तर आमच्या लहानपणीचा चित्रपट. मला पहायचा होता पण जमलेच नाही, अजूनही तो माझ्या `पहायचा आहे` च्या यादीत आहे"

यावर आमचे चिरंजीव: "पप्पा तुम्ही अजून 'मिस्टर इंडिया' नाही बघितला? मी तीन वेळा बघितला"

त्या दुष्ट घड्याळाला जरा थांबवा रे कुणीतरी. अजून मला 'मिस्टर इंडिया' काल परवा रिलीज झाला असेच वाटते आहे. 'बघूया कि कधीतरी' वाटते आहे. तोवर चिरंजीवानी तीन वेळा बघितला.
Biggrin

काल घरात घडलेलं खरं संभाषण:
"आई तू बस मावशींशी बोल.त्या मला आणि शौनक ला बस शाळेत आल्यावर 10 मिनिटं आधी योगा प्रॅक्टिस साठी सोडत नाहीत"(म्हणजे बस आधी 15 मिनिट गेटवर नुसती थांबवून ओळीने सोडतात, त्यात वेळ होतो.)
"पण शौनक काही सांगत नाही का मावशींना?सगळी वकिली तूच करतेस का?"
"तो काहीच बोलत नाही.बसमध्ये मागे मुलं माझ्या आणि त्याच्या बद्दल गॉसिप करतात.एक मुलगी म्हणाली बेटे इस उमर मे ऐसें लडके के साथ नही जाया करते. मग मी तिला म्हणाले दादिमा ऐसी उमर मे ऐसी बातो मे इंटर्फीअर नही करते."
"पण ते का बोलतात?तुला शौनक बद्दल फिलिंग आहेत का?"
"त्याच्यावर क्रश मला पहिलीत असताना होता.आता फिलिंगस गेली."

(बरं हा शौनक पोरगा कोण कसा तेही अजून मला माहित नाही Happy )

आमच्या घरी (२ बीएचके) एक रूम आमची मास्टर अन् दुसरी येऊन जाऊन असणारे आईवडील अन् इतरवेळी पिल्ले अशी अरेंजमेंट होती, पिल्लांना आजी आबा अतिशय प्रिय असल्यामुळे काही महिने अगोदर बंक बेड्स आणून त्या खोलीची dormitory केली आम्ही, वरती पोरे अन् खाली आजी आबा,

असेच आई वडील आले होते तेव्हा एकदा सासूबाईंचा व्हिडिओ कॉल आला, आता पोराला ख्याली खुशाली विचारून झाली मग चिमुरडीला म्हणाल्या

"मी येऊ का ग राहायला घरी?"

पोरगी क्लिअर म्हणते

"बेड रिकामे नाहीत, सोफ्यावर झोपू नये असे मम्मा म्हणते, आजी आबा गेले की तू ये वाटल्यास, पण सध्या आमच्या घरी जागा नाही झोपायला, बाय" (व्हिडिओ कॉल कट)

तो वर्णाने अगदीच सावळा होता. आम्ही दोघी लक्खं गोर्या वाटू असा >>>>>>>>याने काहीच फरक पडला नसता किश्यात

>> +123 exactly हेच लिहिणार होते.

मोक्षु यांनी लिहिलेला किस्सा लग्नाशी रीलेटेड गमतीदार किस्स्यांच्या धाग्यावर वाचला आहे आधी Happy

माझी मुलगी लहान असतानाचा किस्सा.

मुलगी सहा महिन्यांची असल्यापासून तिला झोपवताना मिसेस गाणे ऐकवत झोपवायची. कधी कधी गाणे म्हणायची माझी वेळ असायची. माझ्या दिव्य दर्दभर्‍या आवाजात वाट्टेल ती गाणी म्हणायचो. मुलगी बहुतेक घाबरून झोपायची. अशी ती मोठी झाली. दोन अडीच वर्षाची असताना एकदा कधीतरी माझ्याजवळ झोपायला आली. त्यावेळी मला पण गाणे म्हणायचा उत्साह आला. तिला थोपटत असताना काहीतरी बडबडगीत गायला सुरूवात केली आणि ३०-३५ सेकंद झाले, तर ही बया मध्येच म्हणाली,"बाबा, चुप्प बस, मला झोप येतेयं". त्यानंतर मी कधीही तिला झोपवताना गाण्याची हिंमत केली नाही.

मोक्षु यांनी लिहिलेला किस्सा लग्नाशी रीलेटेड गमतीदार किस्स्यांच्या धाग्यावर वाचला आहे आधी >>> हो , पियु मीच टाकला होता तिकडे पण हा किस्सा..

मी (पाहुण्यांच्या समोर): अरे तुला माहित आहे का, माझा नवीन फोन वॉटरप्रूफ आहे
चिरंजीव: अहो पप्पा आजकाल सगळेच फोन वॉटरप्रूफ असतात

एकाच वाक्यात धुरळा Lol

Lol
मुलाला परिक्षेत इतके इतके मार्क्स मिळाले तर पन्नास रूपये द्यायचे त्याच्या पप्पाने कबूल केले होते.
मुलगा म्हणे," आप फिफ्टी रूपीज afford नहीं कर सकते तो एक अच्छा सा चेस बोर्ड लेके दे सकते है" !.

माझा भाचा 2:5 वर्षाचा होता, मी आणि बहिण त्याला घेऊन मालाड ला खरेदीला गेलो होतो, आम्ही साड्या बघतोय तर हा पट्ठया ढोल, डमरूच्या दुकाना समोर जाऊन उभा. आम्ही समजावतोय तर हलायला तयार नाही. त्या बाईने पण याच्या गळ्यात डमरू टाकून दिला. नाईलाजाने आम्हाला घ्यावाच लागला.
आता खरी मजा होती. वेस्ट वरुन ईस्ट ला यायचं होतं.हा पूर्ण रस्त्यात वाजवत आणि आम्ही दोघी त्याच्या मागे.
पुलावरून चढताना एकेका पायरीवर थांबून वाजवायचा आणि चालायचा. येणारे जाणारे हसून पुढे जात. आजही आठवलं कि खुप हसायला येतं.

माझ्या मुलाला लहानपणी खोड्या करुन इतरांना सतावायला खुप आवडायचे. म्हणाजे आतासुद्धा आवडते पण हल्ली शाळा , अभ्यास वगैरे नको ते झेंगाट गळ्यात पड्ल्याने आवडी निवडी कडे थोडे दुर्लक्ष झालय त्याचे. तर पुर्वी सासुबाई टीव्ही पहात असतील तर तो वीजेच्य चपळाईने जाऊन टीव्ही बंद करायचा. मग प्रत्येक वेळी सासुबाई चिडून म्हणायच्या 'आता बस्सा..' म्हणजे आता वेळ असेल तर हा टीव्हीसुद्दा पाहू देत नाही. आता बसा बोअर होत..... अशा अर्थाने.

तर एकदा त्या टीव्ही पाहण्यात दंग झाल्या असताना हा मांजरासार्खा कुठुनतरी उपटला आणि झटकन टीव्ही बंद केला आणि जोरात 'आता बस्सा..' अशी आरोळी ठोकुन पळाला. त्या प्रत्येक वेळी टीव्ही बंद केला की त्या 'आता बस्सा..' म्हणायच्या त्या मुळे त्याचा समज झाला होता की टीव्ही अचानक बंद झाल्यावर असे बोलायचे असते. म्हणून तो स्वतःच तसे म्हणून पळाला

Pages