प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सव या हिंदी कामुक चित्रपटाने>>>>>

बनवण्यार्‍याचा उद्देश असेल तसा पण शेखर सुमन व रेखा ही विसंगत जोडी अजिबात कामुक वगैरे वाटली नाही. चित्रपट कोसळला याची प्रमुख कारणे २ असावीत - १. शेखर सुमन २. चित्रपटात वापरलेला नैसर्गिक प्रकाश. योग्यच होता पण त्यामुळे सगळे अंधारल्यासारखे झाले..

संगीतकार नौशाद यांना आपली ओळख लपवावी लागली होती.

नौशाद यांनी नव्यानेच संगीत द्यायला सुरूवात केली तेव्हां हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबद्दल चांगले बोलले जात नसे. त्यांना प्रतिष्ठा नसे. नौशाद यांचे वडील त्यांच्यासाठी स्थळ बघत होते. एक स्थळ त्यांना बरे वाटले, पण संगीतकार आहे असे सांगितले कि मुलीकडचे काढता पाय घेत हे माहिती असल्याने त्यांनी मुलगा दर्जी असून मुंबईत काम करतो असे खोटेच सांगितले.

नौशाद यांना सुद्धा मग तसेच सांगावे लागले. तसेच कुरता आणि अचकन माझी स्पेशालिटी आहे असेही ठोकून दिले. लग्न ठरले. लग्नात रतन या चित्रपटातले तेव्हांचे हिट गाणे वाजत होते. ते ऐकून नौशाद यांचे सासरे म्हणाले कि " ज्याने कुणी हे गाणे बनवले आहे तो माझ्या तावडीत सापडला तर जोड्याने मारीन". हे ऐकल्यावर नौशाद यांची लग्नानंतर सुद्धा खरी ओळख सांगायची हिंमतच झाली नाही.
त्यांच्या पत्नीलाही मुंबईला आल्यावरच काही काळाने त्यांचे खरे काम समजले..

काळ झपाट्याने बदलला. हिंदी चित्रपटकलाकारांचे नाव होऊ लागले. मान मिळू लागला. नौशाद यांना पैसा, प्रतिष्ठा मिळाली आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग त्यांना आपला व्यवसाय सांगण्याची पाळी आली नाही आणि कुठलाही अनावस्था प्रसंगही ओढवला नाही.

*हे ऐकल्यावर नौशाद यांची लग्नानंतर सुद्धा खरी ओळख सांगायची हिंमतच झाली नाही.
>>> भारीच ! आवडला किस्सा.
..
*दर्ज़ी >>> छान शब्द

* संगीतकार नौशाद यांना आपली ओळख लपवावी लागली होती.
>>>
यावरून स्नेहल भाटकर आठवले. अर्थात त्यांचे कारण पूर्ण वेगळे आहे.

त्यांचे खरे नाव नाव वासुदेव गंगाराम भाटकर. "एचएमव्ही'तील नोकरीमुळे त्यांना टोपणनाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावे लागले. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. या नावातील "स्नेहल' हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचे "स्नेहल भाटकर' असे बारसे केले.

जगभरात अनेक पुस्तके गाजलेली आणि बहुचर्चित असतात. परंतु प्रत्येक पुस्तकप्रेमीने आपापल्या समूहा/प्रांतात गाजलेले प्रत्येक पुस्तक वाचलेले असतेच असे नाही. एखादे पुस्तक कितीही गाजलेले असले तरी आपण ते वाचलेले नाही, हे प्रामाणिकपणे सांगायला कचरू नये असे डेव्हिड लॉज या लेखकांचे म्हणणे आहे. हा मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी त्यांच्या ‘चेंजिंग प्लेसेस’ या कादंबरीत एक खेळ रचलेला आहे तो रोचक वाटेल.

हा चमत्कारिक खेळ एका इंग्रजीच्या प्राध्यापकाने शोधलेला असून त्याचे नाव ‘ह्युमिलिएशन’ असे आहे. यात उपस्थित मंडळी गोलाकार बसतात आणि मग प्रत्येकाने आपण वाचलेले नसेल अशा एखाद्या गाजलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव सांगायचं. मग क्रमाने समूहातील अन्य सर्व लोक आपण ते पुस्तक वाचले आहे किंवा नाही हे सांगतात.

हजर असलेल्या जेवढ्या लोकांनी ते पुस्तक वाचलेले असेल, त्या प्रत्येकाचा एकेक गुण पुस्तकाचे नाव जाहीर करणाऱ्याला मिळतो. अशाप्रकारे सर्वांची पाळी झाली की मग प्रत्येकाचे गुण मोजतात. ज्याला सर्वाधिक गुण मिळतात तो या खेळात जिंकतो. म्हणजेच, इतक्या लोकांनी वाचलेले पुस्तक आपण वाचलेले नाही ही लाजिरवाणी जाणीव जिंकणाऱ्याच्या मनात निर्माण होते.

गंमत पुढे आहे . . .
खेळात जेव्हा त्या इंग्रजीच्या प्राध्यापकाची सांगायची पाळी येते तेव्हा तो ‘हॅम्लेट’ नाटक सांगतो. ते ऐकल्यावर इतर सर्वजण खो-खो हसतात आणि इंग्रजीच्या प्राध्यापकाने हॅम्लेट वाचलेले नाही हे स्वीकारायला तयारच होत नाहीत !

र आ
तुमच्यासारख्या सर्व चोखंदळ वाचकांच्या सहभागामुळेच धागा रंगतदार होतो
धन्यवाद !

छान धागा
>>> त्याचे नाव ‘ह्युमिलिएशन’ >>> सुंदर किस्सा .

असेही प्रतिभावंत. . .
साहित्य क्षेत्रातील लेखक आणि अन्य काहींना पद्म (अथवा अन्य मानाचे) पुरस्कार बऱ्यापैकी मिळतात. परंतु ग्रंथविक्रेत्याला पद्मश्री मिळणे तसे दुर्मिळच. पण असे कदाचित एकमेव (?) उदाहरण आपल्याकडे आहे.

त्या विक्रेत्यांचे नाव टी एन शानभाग. मुंबईतील पूर्वीच्या strand बुक स्टॉलचे हे मालक. यांना ग्रंथांविषयी अपार ममत्व होते तसेच त्यांचे भाषेवरही प्रभुत्व होते. बहुश्रुत माणूस. ते स्वतः दरवर्षी परदेशात जाऊन सवलतीत ग्रंथ खरेदी करून आणत आणि वाचकांनाही जास्तीत जास्त सवलतीत विकत.

अरुण टिकेकर यांनी त्यांच्या लेखनात शानभाग यांचा गौरवपूर्ण सविस्तर उल्लेख केलेला आहे. टिकेकर यांच्या मते मुंबईतील strand बुक स्टॉल ही एक नामांकित शिक्षणसंस्था होती - कुठलेही प्रवेशमूल्य किंवा फी नसलेली !

शिक्षणतज्ञ 'जे पी नाईक'
युनेस्कोने 1997 मध्ये ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन’ ही जगातील शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात भारतातील तिघांचा समावेश आहे :
महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि जे पी नाईक.

त्यांच्या नाईक या नावाची कथा रोचक आहे. त्यांचे मूळचे नाव विठ्ठल हरी घोटगे. सन १९३० मध्ये त्यांनी असहकार आंदोलनात उडी घेतली. त्यात ते भूमिगत असताना त्यांनी स्वतःचे नाव बदलून जयंत पांडुरंग नाईक असे केले.

भारत सरकारने त्यांना १९७४मध्ये पद्मभूषणने सन्मानित केलेले आहे.

1974मध्ये नारायण धारपांनी ‘निवडक मराठी भयकथा’ हा ग्रंथ संपादित केला होता. त्याच्या प्रस्तावनेतील त्यांचे हे मनोगत अगदी वाचनीय आहे :
https://www.loksatta.com/lokrang/author-narayan-dharap-what-exactly-the-...

त्यातील हा निवडक रोचक भाग :
"भयकथेच्या लेखकाचा भूतसृष्टीवर विश्वास असणे आवश्यक आहे का? माझे असे वैयक्तिक मत आहे की, असा विश्वास असल्याशिवाय लेखकाच्या हातून खरे परिणामकारी लेखन होणे जवळजवळ दुरापास्त आहे. . .
. . . भयकथा परिणामकारी व्हायची असेल तर ती वाचता वाचता असा कोणता तरी एक क्षण यायला हवा की, वाचकाचं सर्व अंग शहारून उठलं पाहिजे, त्याने अस्वस्थपणाने खांद्यावरून मागे वळून पाहायला पाहिजे… ‘अरे! माझ्यावर असा एखादा प्रसंग आला तर?’ असा विचार त्याच्या मनात यायला हवा…
लेखन जर इतकं प्रत्ययकारी व्हायचं असेल तर लेखकाचा अशा गोष्टीवर विश्वास असल्याखेरीज ते शक्य नाही. शब्दांची किमया काही एका मर्यादेपर्यंतच परिणाम करू शकते".

आज हा धागा एका बैठकीत पूर्ण वाचून काढला. कुमार जी तुमच्या बरोबरच इतर सर्व सहभागी मायबोलीकरांचे आभार. Happy

आज हा धागा एका बैठकीत पूर्ण वाचून काढला. कुमार जी तुमच्या बरोबरच इतर सर्व सहभागी मायबोलीकरांचे आभार. Happy

विक्रमसिंहांनी हा धागा एका बैठकीत पूर्ण वाचण्याचा विक्रम केला आहे खरा Happy
प्रतिभेचा हा पण एक पैलूच म्हटला पाहिजे !

स्वागत . . .

कॉलेजमधे असतानाची घटना -
एक प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार (नाव लिहीत नाही) व्यक्तीचा मुलगा आमच्या नाटकाचा दिग्दर्शक आणि मुख्य नायक होता. आम्ही दोघी. मैत्रिणी अकरावीत होतो आणि पुरुषोत्तम साठी सिलेक्षन झाल्यामुळे आकाशात होतो. आमचा दिग्दर्शक आम्हाला सीनियर आणि नाटकातील अनुभवी होता. तो कॉलेज जवळ राहत असल्यामुळे नाटकासंदर्भात त्याच्या घरी जाणे येणे व्हायचे. एके दिवशी आम्ही त्याच्या घरी गेल्यावर समोरच त्याचे वडील बसले होते. मी कॉन्व्हेंट स्कूल मधून आल्यामुळे मला राष्ट्रीय कीर्तनकार माहित असण्याची शक्यता नव्हती. फक्त ते कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे माहित होतं. त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्यांनी काहीतरी संस्कृत मध्ये आशीर्वाद दिला. आणि प्रश्न विचारला " पण हा आशीर्वाद घेण्यासाठी कुमारिका आहात ना ? " आणि चेहऱ्यावर कुत्सित हास्य.
मला तो प्रश्न समजायची शक्यताच नव्हती. पण त्यांचा टोन आणि चेहऱ्यावरचे भाव आवडले नाहीत. बाहेर आल्यावर मैत्रिणीला विचारल्यावर तिने मला तो प्रश्न आणि त्यातील अर्थ सांगितला.

अकरावीतल्या मुलींना एका वृद्ध व्यक्तीने हा प्रश्न विचारावा? Really ?

वर्तमानपत्राचा आत्मा !
1909 साली ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला होता. त्यामध्ये न चिं केळकर यांनी लिहीले होते,

“वर्तमानपत्र हा धंदा आहे. त्या व्यापारातील माल म्हणजे बातम्या असे जर कोणी म्हटले तर मात्र ते चूक होईल. कारण जाहिराती हा त्यांचा माल असतो. मुंबईचे किंवा लंडनचे टाइम्स जरी घेतले आणि त्यांना जाहिरातीचे उत्पन्न मुळीच नाही असे क्षणभर जरी मानले तर. . . निव्वळ वर्गणीच्या उत्पन्नावर त्यांचे एका वर्षात चार वेळा दिवाळे वाजेल. वर्तमानपत्रे बातमी विकत नाहीत तर जाहिरातवाल्यांना लागणारी प्रसिद्धी विकत असतात” !
. . .

वरील मजकूर हे त्रिकालाबाधित सत्य असून (बहुतेक) सर्व प्रसारमाध्यमांना लागू आहे

चांगला पेपर आहे. वाचण्यासारखे बरेच काही असते. advert असतात कि नाही कल्पना नाही कारण मी ब्लॉकर वापरतो. बहुतेक नसाव्यात. google सर्च केला तर अशा अजूनही साईट मिळतील.
मराठी चोथापाणी वर्तमानपत्रांनी खर तर वाचकालाच वाचण्यासाठी पैसे द्यायला पाहिजेत.

*. वाचण्यासारखे बरेच काही असते >>> बरोबर. अशी अजूनही असतील.
परंतु केळकर यांच्या विधानाचा रोख, बातम्या व जाहिरातींचे प्रमाण अशा अनुषंगाने असावा. सध्याच्या बहुतांश माध्यमांमध्ये जाहिराती ठळक, भडक आणि अंगावर येणाऱ्या असतात; प्रमाण प्रत्येकाचे वेगवेगळे असेल. सध्या तर कित्येक छापील वृत्तपत्रांचे पहिले पान म्हणजे संपूर्ण पानभर मोठ्या उद्योगाची जाहिरात आणि असे आठवड्यातून निम्म्या वेळा तरी दिसते.

पूर्वी ह मो मराठे यांनी एका लेखात लिहिले होते, की बहुतेक दिवाळी अंकांनी अंकाच्या उजव्या हाताच्या पानावर जाहिरात आणि डाव्या हाताच्या पानावर साहित्य मजकूर अशी सक्त पद्धत अवलंबली आहे ( कारण आर्थिक फायदा ). ते मात्र मी बऱ्याच अंकांच्या बाबतीत पाहिलेले आहे. हे वाचकावर सरळ सरळ अन्याय करणारे आहे.

न.चिं.केळकरांच्या विधानाचा अर्थ असा असावा की वर्तमानपत्र चालण्यासाठीचा पैसा मिळवण्यासाठी जाहिराती आवश्यक आहेत. पण त्याचबरोबर 'बातम्या' ही विकाऊ वस्तू नाही.

कालच्या लोकसत्ता लोकरंग पुरवणीत इरावती कर्व्यांवर येऊ घातलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची नात प्रियदर्शिनी कर्वे यांचा लेख आहे.
त्यात त्यांनी परिपूर्ती या लेखाचा उल्लेख केला आहे. हा लेख आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता. इरावती कर्वे यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात वक्त्या किंवा प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावले गेले. तिथे त्यांची ओळख अमुक तमुक यांची सून, पत्नी, मुलगी, इ. अशी करून दिली गेली ( हे दिल्या गेली असे लिहिलेलं चालेल का? Wink . ती अपूर्ण आहे, असं त्यांना वाटत राहिलं. मग एकदा रस्त्याने जाताना काही शाळकरी मुलगे त्यांना पाहून - अरे ती बघ आपल्या वर्गातल्या क्ष ची आई, असं आपापसात बोललेले त्यांच्या कानी पडले आणि आपली ओळख पूर्ण झाली असे इरावतींना वाटले. आम्हांला त्या लेखाचे सार मातृत्व हीच स्त्रीजीवनाची परिपूर्ती असे काहीसे शिकवले गेले. तेव्हा ते चूक की बरोबर हे कळण्याचे वय नव्हते. त्या काळात तसा विचारही फार होत नसे. पण पुढे जेव्हा हा लेख आठवे , तेव्हा ते खटकत राही. काल प्रियदर्शिनी यांनी हा लेख औपरोधिक आहे, असं लिहिलं आहे, ते वाचून बरं वाटलं.
इरावती कर्वेंचं कर्तृत्व म्हणावं तितकं अधोरेखित झालं नाही, असं तो लेख वाचताना वाटलं. त्यांना आयुष्यही कमी लाभलं.

*त्या काळात तसा विचारही फार होत नसे. पण पुढे जेव्हा हा लेख आठवे , तेव्हा ते खटकत राही. >>>
अगदी.
काही वर्षांपूर्वी हा मुद्दा बऱ्याच लेखांमधून वाचला होता.

मलाही हा मुद्दा कायम खटकत असे. आणि इरावतीबाई सारख्यांनी असा विचार करावा याचे नवलही वाटे.
प्रियदर्शिनीने तो उपरोधिक होता असे आता सांगितले!
पण त्या लेखावरुन तरी तसा काही अर्थबोध होत नाही, किंबहुना तो अकरावी की कुठल्या तरी इयत्तेला पाठ्यपुस्तकात देखिल होता आणि त्यावर प्रश्न येत असे आठवते आहे.

इरावती कर्वेंचा किस्सा वाचला. नववीत मराठीच्या पुस्तकात तो उतारा होता. पण अनुराधा मराठे आणि इरावती कर्वे यांचे उतारे एकापाठोपाठ असल्याने दोघींपैकी कुणाचा उतारा याबाबतीत गोंधळ आहे.

अनुराधा मराठेंचा मुलगा आमच्याच शाळेत होता. किती इयत्ता पुढे हे लक्षात नाही. पण त्याला सगळे ओळखायचे. त्यामुळे हा उतारा त्याच्या बाबतीत असेल तर चर्चा झाली असती.

विनोद आणि स्वास्थ्य या संदर्भातली एक जुनी घडामोड.
1950साली मुंबईत हिमालय ड्रग कंपनीचे संस्थापक एम मनाल आणि रीडर्स डायजेस्टचे स्थानिक प्रमुख डॉ. रोशन कॅप्टन यांनी एक गट स्थापन केला, ज्याचे नाव होते Humour unlimited. या सर्व सदस्यांनी महिन्यातून एकदा भेटून एकमेकांना विनोद/ चुटके सांगायचे असे त्याचे स्वरूप होते. त्यातूनच Laughter - the best medicine या नावाचे एक विनोदांचे संकलन तयार झाले.

पुढे त्याच नावाचे रीडर्स डायजेस्टमधील सदर अत्यंत लोकप्रिय ठरले. तसेच हिमालय ड्रग कंपनी देखील त्याच नावाचे सदर दरवर्षी प्रसिद्ध करीत असे.

Pages