रॉकी और राणी की कायकी प्रेमकहाणी

Submitted by अस्मिता. on 30 September, 2023 - 10:27

रॉकी और राणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. Proud लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. Wink गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका. Wink

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. Happy )

©अस्मिता

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण बघितला काल सिनेमा..पंधरा वीस वर्षापूर्वीच्या दोन तीन साऊथ सिनेमांचं मिश्रण आहे या सिनेमाची कथा....
मग परत लेख वाचला..बरोब्बर निरिक्षणे Lol
आवडला सिनेमा टाईमपास म्हणून...शबाना आझमी चं काम चांगलं आहे..
क्षिती जोग दामिनी मधे दिव्या इन्स्पेक्टर होती ना? आठवलं..

Btw, या आधीही पूर्ण सिनेमाभर साड्या आलीयानेच नेसल्या होत्या, गंगूबाई काठीयावाडी मधे (फ्लॅशबॅकची घागरा चोली , कोठ्यावर आल्यावर सुरवातीचे परकर पोलकं वगळता)
मोस्ट्ली पांढर्‍या रंगाच्या निरनिराळ्या शेड्स.. रोमँटिक सिन्स मधे पिंक /पेस्टल छटा असलेली पांढरी, उत्सव वगैरे असताना मेटॅलिक वर्क असलेली पांढरी, नेता बनल्यावर लाल बॉर्डर असलेली पांढरी !

डीजे च्या पोस्ट मुळे डोळ्यातल्या झणझणीत अंजनाचा प्रभाव कमी.
हळूहळू डोळ्यात बदाम।परत येण्याची संवेदना जागृत
Lol

> रानीला पाठीवर घाम-बिम येत नाही का?
अरसिकेषु शिफॉन प्रदर्शनं, मा लिख मा लिख.

हे लोक 'राम तेरी गंगा मैली' बघतानाही 'हिला न्यूमोनिआ झाला तर?' असा विचार करत असणार !

Bagh ki viku.

विकु Lol

हे लोक 'राम तेरी गंगा मैली' बघतानाही 'हिला न्यूमोनिआ झाला तर?' असा विचार करत असणार ! >>> चांगलं आठवतंय. सर्व लहानथोर बाप्ये रडत असायचे तिचे असे हाल पाहून..

डिजे Happy
पण देसी गर्ल ती देसी गर्लच 'या सम हीच', बेस्ट बॉडी इन बॉलिवूड. आलियाच्या ह्या साड्या अनेक रंगांच्या व दंडाच्या (मधून शिवलेल्या) आहेत. नवरात्रात गरीबांना परवडतील अशा, ब्लाऊज मात्र लॉटरी लागल्याशिवाय काही घेता येणार नाही.

धन्यवाद हर्पा, रमड, संजना. Happy

हर्पा, आपण संस्कृत शिबिरात 'बिछडलेले' भाऊ-बहीण आहोत. त्यात माझी 'याददाश्त' कमजोर झाली आहे. Happy

रमड, नको असं करू. बघ नं प्लीज. हॅरी मेट सॅली कुठं पळून जाणारे, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. Lol

विकु, मराठी माणूस रोमॅन्स मध्ये मागे का ? Lol

मागे मराठी माणूस उद्योगात मागे (ममाउमाका) का हा धागा आला होता, आता 'ममारोमाका'लाही वाव आहे असं दिसतंय.

आलियाच्या ह्या साड्या अनेक रंगांच्या व दंडाच्या (मधून शिवलेल्या) आहेत >>> Lol

मराठी माणूस रोमॅन्स मध्ये मागे का >>> कारण मराठी माणूस रोमान्स लिहीताना शॉर्ट A वापरतो कधी कधी Wink

र्म्द ची पोस्ट कोठे आहे? मागची २-३ पाने दिसत नाही.

'राम तेरी गंगा मैली' बघतानाही 'हिला न्यूमोनिआ झाला तर?' > >> हे महान होते विकु Lol

पण देसी गर्ल ती देसी गर्लच 'या सम हीच', बेस्ट बॉडी इन बॉलिवूड. आलियाच्या ह्या साड्या अनेक रंगांच्या व दंडाच्या (मधून शिवलेल्या) आहेत. नवरात्रात गरीबांना परवडतील अशा, ब्लाऊज मात्र लॉटरी लागल्याशिवाय काही घेता येणार नाही. >> ह्या वाक्यातली विरामचिन्हे रानोमाळ हरवली आहेत अशी पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली Lol

असामी, शंकेने चाटलेल्या मनाला पोस्टीतल्या 'पंचाने' पुसून घ्या. Wink
ता क - पंचावर द्विभाषिक कोटी केली आहे.

रमड, 'जे का रंजले गांजले, त्यासी जर पिसले' Wink

फा Happy

@आंबट गोड आणि हर्पा Happy

या राका शशि-शोभना गतघना सा यामिनी यामिनी।
या सौन्दर्य-गुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी।।
या गोविन्द-रस-प्रमोद मधुरा सा माधुरी माधुरी।
या लोकद्वय साधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी।।

आकाशावर कसलेही‌ नभावरण नसलेली पूर्ण चंद्राची रात्र हीच खरी 'यामिनी' आहे (कोजागिरी पौर्णिमा ?). जी स्त्री रूपगुणसंपन्न असून पती सेवेत रममाण आहे, तीच खरी 'कामिनी' आहे. कृष्णभक्तीत जो गोडवा आहे, तीच जीवनातील खरी 'माधुरी' आहे. जीवांनी या लोकांत नैतिक कर्तव्य करून जगणे, हे दोन्ही लोकातील (स्वर्ग आणि पृथ्वी ?) खरे 'चातुर्य' आहे.

संदर्भ -
http://panini-sanskrit.blogspot.com/2019/02/blog-post_27.html?m=1

अस्मिता, हा पिक्चर पाहून कारंजले गंजले व्हायची शक्यता जास्त वाटते Wink

फा, बहुधा मागच्याच पानावर सापडेल तुला. ती काय माहेरची माणसं आहेत खूप पानं मागे जायला? Proud

अस्मिता, छान अर्थ !
अर्थात कामिनी ची व्याख्या मला पटलेली नाही.... !!!

आलियाच्या ह्या साड्या अनेक रंगांच्या व दंडाच्या >>>> गरीब ( कन्टेन्टदृष्ट्या म्हणतेय हो मी) चित्रपटातली नायिकाही गरीब नको का Wink

धन्यवाद सामी, बघितला का मग? Happy Lol

माझेमन Happy

होय आंबटगोड. अर्थ कालबाह्य होत असतो, आपण फक्त भाषासौंदर्याचा आनंद घ्यायचा. Happy

चुकून सुद्धा कुणीही बाप्या रणबीरचे शर्ट्स ( त्याने घातले असतील तर) कित्ती छान होते असे म्हणत नाही. काय प्यांटी, काय ते दिपीकाचे स्कर्ट !
आहे का अशी कमेंट ?

हातासरशी त्या साड्या व ब्लाउजचे फोटो पण आले असते तर बरं झालं असतं कारण तेवढ्याकरता सिनेमा पहायची तसदी घ्यायला नको. Proud
(आणि असे कपडे शिल्पा शेट्टी, दिपिका, पुर्वीची ऐश्वर्या राय, सुश्मिता यांना फारच भारी दिसतात).

अर्धा पाहिला आहे. आलिया आणि रणवीर एकमेकांच्या घरी जायला निघतात तोपर्यंत.

जया भादुरीचे कॅरेक्टर इतके बिटर का झाले ते तिला एक दहा मिनिटाचे स्वगत द्यायला हवे होते >>> मलाही वाटले पण काही लोक जेन्युइनली खत्रूट असतात तशीच असेल Happy प्रत्यक्षातही तशीच वाटते Happy

जुन्या गाण्यांचे संदर्भ आवडले. पण धरम व शबानाच्या त्या गाण्यांच्या सीन मधे सगळी धरमचीच गाणी घेतली असती तर मजा आली असती. फक्त "आज मौसम बडा बेईमान है बडा" होते ते लक्षात आहे.

क्षिती जोग पंजाबी वाटत नाही कारण एकतर ती मराठी आहे हे आपल्याला माहीत आहे व केजोच्या पंजाबी स्टीरीओ टाइप्स सारखी ती दिसत नाही. पण नॉर्थच्या/पंजाबी सिरीज मधे सुद्धा अशा पर्सनॅलिटीचे लोक दिसतात.

आलिया मस्त आहे यात. ते साड्या, ब्लाउज चे डीटेल्स काही समजले नाहीत. रणवीर जनरली धमाल असतो. पण इथे जरा कमी आहे. आर्टिफिशियल वाटतो. रणवीर असला की एक अतरंगी डान्स असायला हवा खरेतर. पण व्हॉट झुमका वगैरे सारखी चपखल सिच्युएशन असताना त्याचा यातला डान्स अगदीच रूटीन पंजाबी आहे. त्याच क्लिशे स्टेप्स. त्याला रामलीला, खिलजी किंवा बाजीराव मधे केले तसे काहीतरी अफलातून करू द्यायला हवे होते.

मला ती व्हॉट झुमका मधले लिरीक्स एकदम धमाल वाटले - आलिया चे जबाब विशेषत:

"बस ढूँढ रहा है मौका, खुल के मारेगा चौका, बाय चान्स किसी लडकीका, जहाँ झुमका गिरा रे" Happy

शकल से जितना नेक है तू, कसम से उतना फेक है तू - वगैरे याच गीतलेखकाने लिहीलेल्या "शकल का प्यारा है, अकल का मारा है रे तू" वगैरेची आठ्वण करून देतात.

दुसरे एक नंतरचे गाणे फॉरवर्ड केले.

बाकी धरम-शबाना जोडी त्यांच्या लीड रोल्सच्या काळात कधी एकत्र होती का? आठवत नाही.

धरम-शबाना जोडी त्यांच्या लीड रोल्सच्या काळात कधी एकत्र होती का? आठवत नाही.>>> बर्नींग ट्रेन?? अजून ही असावे.

फारेंड तुम्हाला आठवत नाही म्हणजे हद्दच झाली आता Lol
मला झुमका गाणे नाही आवडले.. अगदीच फरगेटेबल लीरिक्स..तेही आधीच असलेल्या जुन्या गाण्या वर! ओ कमलिया हे ओरीजनल गाणे छान आहे.

Pages