भाकरीच्या टोपल्यावर
लक्ष जाते पहुडल्यावर...
वेदना परतून गेली
आसवे वैतागल्यावर...
ती म्हणाली थांबतो का
पाय मागे घेतल्यावर...
दुःख खरपूस होत जाते
वास्तवाने भाजल्यावर...
थबकले आयुष्य माझे
मीच मांडी ठोकल्यावर..
चेहरा निश्चिंत दिसतो
देह शेवट झाकल्यावर..
ताकही फुंकून गिळले
मी दुधाने पोळल्यावर..
प्रेम म्हणजे जहर... कळले
नेत्र झाकुन प्यायल्यावर...
बदलते इतिहाससुद्धा
एक स्त्री संतापल्यावर..
काय देशिल जीवना तू
मी तुला सांभाळल्यावर....
"सर्व काही ठीक आहे" वावड्या उठतात हल्ली
माणसेही मेंढरागत आंधळी दिसतात हल्ली...
जीव आहे तोवरी तू मंजुरी कर्जास द्यावी
सबसिड्या तर आमच्या मयतासही मिळतात हल्ली..
तू भुकेपोटी जवळ येता मुकी मी रोज होते
त्यामुळे संवाद रात्री आपले नसतात हल्ली..
ही मराठी अस्मिता का एवढी नाजूक झाली
बदलता सत्ता तिलाही हादरे बसतात हल्ली...
फ़क्त स्त्रीने बाळगावी लाज असला नियम जरका
पुरुष सारे संस्कृतीच्या आड का लपतात हल्ली...
सौख्य तर भरपूर आहे झोपही भरपूर येते
मात्र अंगाला बिछाने रेशमी रुततात हल्ली...
द्रौपदीची लाज सावरण्या हजर असतोस तू जर
सांग दुःशासन तुझ्या राज्यात का चळतात हल्ली...
एकदा घागर तुझी या पायरीवर हिंदळू दे
पायरी पाहून ओली उंबरा जळतो जळू दे....
फ़क्त देठानेच काटे का गुलाबा बाळगावे
काळजातील दुःख वरच्या पाकळ्यांनाही कळू दे....
एकतर गंधात तुझिया देह माझा दरवळू दे
दे दुरावा अन्यथा.. मग श्वास सारे तळमळू दे..
का ढिला करतेस अंबाडा इरादा काय आहे
एवढी घाई नको... तो सूर्य आधी मावळू दे...
गे नको मज स्पर्श देहाचे प्रिये भेटीत सारे
श्वास ओठांवर तुझा एकेक अलगद ओघळू दे...
मी लिहिन प्रेमात गजला ग्रंथ कविता लेखसुद्धा
पण तुझ्या डोळ्यात तसले प्रेमतर मज आढळू दे...
कंप अजुनी दाटला देहात नाही
नेमकेपण का तुझ्या स्पर्शात नाही...
पाकळ्यांचा भार तू सावर गुलाबा
फार ताकद राहिली देठात नाही....
एकटा रोखू किती मी वादळाला
जोर पहिल्यासारखा पायात नाही...
रात्रभर चुरगाळतो घायाळ होतो
मोगर्याचा त्याग वाया जात नाही..
पेटला वणवा नको विझवूस आता
रोखणे त्याला तुझ्या हातात नाही..
मी पितो डोळ्यातुनी रम.. झिंगतोही
पण नशा ओठातली डोळ्यात नाही...
शोधले चंद्रा तुला अंधार करुनी
जा नभी जागा तुझी वस्त्रात नाही...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
कारणे शोधून अश्रू मी कधी ना ढाळले
वेदना पाहून माझ्या दुःखही ओशाळले..
जन्मभर मी भाकरी संपुर्ण नाही पाहिली
मज भुकेने त्यामुळे आयुष्यभर हेटाळले..
प्रेम करणे हा गुन्हा मी एकदा केला जरी
आठवांनी रोज का सरणापरी मज जाळले..
कोरडा होता खडक छातीत जेव्हा ठेवला
लेकरू पायात तेव्हा नेमके घोटाळले..
टोचले डोळ्यास माघारी तिचे जाणे असे
पण वचन ना वाहण्याचे आसवांनी पाळले..
स्वप्न सरल्यावर तुझे मज झोप नाही लागली
आजवर मी त्यामुळे तर स्वप्न बघणे टाळले..
बांध केसांना नको अडवूस सुर्याला प्रिये
बिंब क्षितिजावर तुझ्या केसांमुळे रेंगाळले..
अंगठी पत्रे तुझी काहीच नाही फ़ेकले
कुशीत घ्यायला तिला.. तिने रुसायला हवे
म्हणून रोज एकदा तिला छळायला हवे....
समर्पणात सौख्य केवढे असेल जाणण्या
पतंग होउनी दिव्यावरी जळायला हवे..
भविष्य पाहण्यात वेळ घालवायला नको
घडेल त्यास फक्त चांगले म्हणायला हवे...
जखम जुनी मनातली जपून ठेव वेदने
कशी परत करायची मला शिकायला हवे..
नको पळूस युद्ध सोडुनी उगाच जीवना
जगायचे असेल तर पुन्हा लढायला हवे...
तुझ्या अढळपदास मी जपेन नेहमीच पण
नभा तुला समोर माझिया झुकायला हवे..
पुसून आरसा कसा दिसेल स्वच्छ चेहरा
तुला स्वतःवरील डागही पुसायला हवे..
तुझी खट्याळ ओढणी नकोच सावरूस ना
ऋतूबदल जगातले प्रिये घडायला हवे..
मानले डबक्यास सृष्टी हीच ज्यांची चूक होती
भेटली हरपावली ती माणसे बेडूक होती....
व्यर्थ सांभाळू कशाला अंगठी पत्रे तिची मी
ती पुन्हा परतायची जर शक्यता अंधूक होती...
यायची डोळ्यात माझे दुःख जाणायास वेडी
वेदना माझ्या मनाची केवढी भावूक होती...
लेकरे फ़ुटपाथवर का गोठली थंडीत देवा
आज त्यांनी पांघराया घेतली जर भूक होती....
ती उडाली उंच आभाळात... कारण पंख होते?
की गुलामीची पुरातन साखळी नाजूक होती...
प्रेम होते पण तिला मी दाखवू शकलोच नाही
वादळे डोळ्यातली सारीच तेव्हा मूक होती...
मी विकाया बैसलो ताजी सुखे स्वस्तात जेव्हा
का बरे दुःखास येथे मागणी घावूक होती....
हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!
इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!
हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!
काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!
हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!
दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!
-गणेश शिंदे..!!
पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!
म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!
सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!
नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७
गाव ब्रम्हांड माझे
सांगताना अवेळीच सांगू कसे?
पोळलेल्या मनाचे असे हे हसे!
काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे
हात घेताच हातात का वाटले?
तप्त अग्नीत जळलेय मोती जसे
शिक्षणाने मिळालाय विश्वास की;
चंद्र तारे अता दूर ना फ़ारसे
पिंजरा तोडुनी मी सिमा लांघल्या
गाव ब्रम्हांड माझे "अभय" छानसे
- गंगाधर मुटे
----------------------------------------