चूक होती
Submitted by संतोष वाटपाडे on 16 January, 2015 - 03:02
मानले डबक्यास सृष्टी हीच ज्यांची चूक होती
भेटली हरपावली ती माणसे बेडूक होती....
व्यर्थ सांभाळू कशाला अंगठी पत्रे तिची मी
ती पुन्हा परतायची जर शक्यता अंधूक होती...
यायची डोळ्यात माझे दुःख जाणायास वेडी
वेदना माझ्या मनाची केवढी भावूक होती...
लेकरे फ़ुटपाथवर का गोठली थंडीत देवा
आज त्यांनी पांघराया घेतली जर भूक होती....
ती उडाली उंच आभाळात... कारण पंख होते?
की गुलामीची पुरातन साखळी नाजूक होती...
प्रेम होते पण तिला मी दाखवू शकलोच नाही
वादळे डोळ्यातली सारीच तेव्हा मूक होती...
मी विकाया बैसलो ताजी सुखे स्वस्तात जेव्हा
का बरे दुःखास येथे मागणी घावूक होती....
विषय:
शब्दखुणा: