बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची
मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही. जाणते-अजाणतेपणी अनेक सूक्ष्म भावभावना अन्नाशी जुळलेल्या असतात. प्रेम, वात्सल्य, अभिमान, स्वच्छता, सुरक्षा, संस्कृती, समाज, धार्मिक समजुती, परंपरा, भूगोल, इतिहास ... सगळ्यांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. प्रत्येक घराच्या, समाजाच्या काही खास खाद्यपरंपरा असतात. ह्या खाद्यपरंपरा म्हणजे आपल्या समाजसंस्कृतीचा आरसा. ह्या लेखात वाचूया कोलकात्याच्या एकमेवाद्वितीय खाद्यपरंपरेविषयी.
“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.