लेखमालेचे यापूर्वीचे चार भाग इथे वाचता येतील : -
https://www.maayboli.com/node/72801
https://www.maayboli.com/node/72846
https://www.maayboli.com/node/72950
https://www.maayboli.com/node/72977
आमार कोलकाता - भाग ५ - नवजागरणाचा नवोन्मेष
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी. जन्माने रशियन असलेल्या पण कोलकात्यात स्थायिक होऊ पाहणाऱ्या गार्सीम लेबेदेफ या नाट्यवेड्या अवलियाने रिचर्ड जॉर्डेलच्या ‘The Disguise’ या नाटकाचे बंगाली भाषांतर केले आणि स्थानिक हौशी मंडळींचे टोळके जमवून पहिल्यावहिल्या बंगाली नाटकाचा प्रयोग कोलकात्यात घडवून आणला. दिवस होता २७ नोव्हेंबर १७९५!
हा आधुनिक बंगाली नाट्यक्रांतीचा पहिला आविष्कार मानला जातो. गमतीशीर भाग असा की हे नाटक मूळ इंग्रज लेखकाचे, निर्माता-अनुवादक रशियन, नाटक बंगाली भाषेत, कलाकार आणि प्रेक्षक समस्त कोलकात्याची देशी-विदेशी मंडळी! या प्रयोगात युरोपीय पद्धतीप्रमाणे रंगमंचावरचे कलाकार आणि प्रेक्षक एकमेकांच्या अगदी समोरासमोर असण्याची पद्धत बंगालात पहिल्यांदाच वापरण्यात आली. त्याआधी बंगालमध्ये होणाऱ्या ‘जात्रा’ सारख्या कार्यक्रमात पौराणिक कथा-काव्यवाचन, कीर्तन-भजन इत्यादी सादरीकरण करणारे कलाकार प्रेक्षकांच्या वर्तुळाकार सभेच्या मधोमध रंगमंचावर उभे राहून प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करत. सोळाव्या शतकात अनेक भक्तिपंथातील संतांनी बंगालात वैष्णव भक्तीचा पाया घातला होता, त्यात आचार्य चैतन्य देव आणि त्यांचा गौडिय वैष्णव संप्रदाय आघाडीवर होता. राधा-कृष्णाच्या प्रेमावर आधारित अनेक छोटी मोठी बंगाली नाट्ये ‘लीला कीर्तन’ म्हणून सादर होत होती, त्यात नृत्य-संगीत आणि लयबद्ध सादरीकरण होते. तेही एकप्रकारे नाट्याविष्कार ठरते. म्हणूनच लेबेदेफच्या नाटकाचे वेगळेपण ठसत असले तरी त्याला एकट्याला बंगाली नाट्याचा जनक म्हणणे ही थोडी अतिशयोक्ती ठरेल. नाटकांची आवड आणि त्यातील नवीन प्रयोग हा मात्र शहरवासीयांचा खास गुण, तो अनेक दशकं कायम राहिला.
सुरवातीच्या काळात बंगाली नाटक म्हणजे लोककलेकडे झुकणारे आणि संस्कृतमधील प्रसिद्ध नाटकांचे बंगाली रूपांतरण असे स्वरूप होते. त्यात रामायण महाभारतातील कथा, वाईटावर चांगल्या शक्तींचा विजय, चांगुलपणाचा संदेश देणारी रूपकं असा साधारण मसाला असे. असल्या पौराणिक नाटकांना स्थानिक प्रेक्षकांनी प्रतिसादही भरपूर दिला. यथावकाश त्यांची क्रेझ कमी झाली आणि इंग्रजी आणि अन्य युरोपीय भाषांमधील साहित्यावर बेतलेली नाटके बंगाली भाषेत येऊ लागली. सुजाण भद्रजनांचा त्याला भरघोस पाठिंबा आणि जनाश्रय मिळू लागला. या भाषांतरित प्रयोगांमध्ये मायकल मधुसूदन दत्ता, रामनारायण तर्करत्न, दीनबंधू मित्रा असे बंगाली साहित्यकार-नाटककार आघाडीवर होते. त्याचा परिणाम म्हणजे बंगाली नाट्यसृष्टीला प्रख्यात इंग्रज आणि अन्य युरोपीय नाटककारांची नाटके बंगाली भाषेत भाषांतरित किंवा रूपांतरित करून मिळाली. पण काही फार्स आणि गंभीर वैचारिक नाटके वगळता या नाट्यचळवळीचे रूप मुख्यतः ब्रिटिश जीवनशैली आणि उच्चभ्रू समाजजीवनाचे चित्रण असे होते.
बंगाली नवजागरणाने साहित्याच्या सर्वांगाला झपाटले. गंभीर विषयांच्या ग्रंथांबरोबर कथा-कादंबऱ्या, लेख, कविता आणि नाटके अशा सर्व साहित्यविधांमधे बंगाली भाषेत उत्तमोत्तम रचना निर्माण झाल्या. मायकल मधुसूदन दत्तांचे (१८२४-१८७३) ‘मेघनादबधकाब्य’, रवींद्रनाथ टागोरांचे (१८६१-१९४१) ‘गीतांजली’ सारख्या बंगाली रचना जागतिक दर्जाचे साहित्य ‘मास्टरपीस’ म्हणून सहज मान्य होतील. गीतांजलीला सुयोग्य जागतिक कीर्ती मिळालीही, इंग्रजी भाषांतर झाल्यानंतर गीतांजलीबद्दल रवींद्रनाथांना साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
नवीन बंगाली साहित्यनिर्मितीत नाटकांचा क्रम वरचा. ययाती-देवयानीच्या महाभारतातील प्रसिद्ध कथेवर आधारित ‘शर्मिष्ठा’ हे नव्या धाटणीचे पहिले पूर्ण बंगाली नाटक लिहिणारे मायकल मधुसूदन दत्ता बंगाली भाषेतले पहिले नाटककार ठरतात. नाटकांप्रमाणे त्यांच्या ‘मायाकानन’ सारख्या कवितासंग्रहानी रसिकांना आनंद दिला. फक्त छंदात्मक पद्य वापरणाऱ्या बंगाली कवितेला त्यांनी मुक्तछंदाचे आकाश दाखवले. त्यांचा ‘चतुर्दशपदी कवितावली’चा प्रयोगही प्रचंड लोकप्रिय झाला. १६ ऑगस्ट १८६० रोजी दत्तांच्या ‘शर्मिष्ठा’चा पहिला प्रयोग बंगाल थिएटरच्या बेडन स्ट्रीटवरच्या (आताचे नाव दानी घोष सारिणी) नव्या इमारतीत झाला आणि बंगाली भाषेतल्या नाटकांचे एक नवे युग कोलकात्यात अवतरले. पद्मावती, तिलोत्तमासम्भव, व्रजगान, कृष्णकुमारी, वीरावगान अशी उत्तमोत्तम नाटके प्रसवणारे मधुसूदन बंगाली नाट्यचळवळीचे प्रमुख शिलेदार ठरले. त्यांच्या बेलगाछिया थिएटरने अनेक नाटकांचे प्रयोग कोलकात्यात केले. १८७० सालापासून बंगाली आणि इंग्रजी भाषेत व्यावसायिक नाटके सादर करण्याची परंपरा नॅशनल थिएटरने कायम केली. गिरीशचंद्र घोष आणि दीनबंधू मित्र यांच्यासारख्या प्रसिद्ध नाटककार मंडळींनी ही चळवळ पुढे नेली. नाटकाची आवड नसलेला बंगाली माणूस दुर्मिळ असण्याचा काळ होता तो.
कोलकात्याची मंडळी विलायतेतून शिकून जेव्हा कोलकात्यात परत आली तेव्हा ब्रिटिश शासनाकडून होणारे स्थानिकांचे शोषण आणि जनतेवर होणारे अत्याचार त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांच्या लेखणीने बंगाली नाट्यसृष्टीत नवनवीन प्रयोग घडवून आणले. समाजाच्या खऱ्याखुऱ्या समस्या आणि आक्रोशाचे प्रतिबिंब तत्कालीन बंगाली नाट्यसृष्टीत पडलेले स्पष्ट दिसते. उदा. बंगालातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शोषणाला वाचा फोडणारे दीनबंधू मित्र यांचे ‘नीलदर्पण’ हे नाटक ब्रिटिश मालकांविरुद्ध स्थानिकांच्या लढ्यावर आधारित होते. मायकल मधुसूदन दत्तांनी त्याचे इंग्रजीत नाट्यरूपांतर करून नाटकाच्या प्रसिद्धीस हातभार लावला. त्यामुळेच नीळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली.
कोलकात्यातील सर्वाधिक जुनी नाट्यगृहे.
ग्रेट नॅशनल थिएटर (आताचे मिनर्व्हा), बीना थिएटर (पूर्वीचे व्हिक्टोरिया ऑपेरा हाऊस), स्टार थिएटर, कॉर्नवोलीस स्ट्रीटवरचे न्यू स्टार थिएटर, कर्झन थिएटर अशी अनेक नाट्यगृहे कोलकात्यात उभी राहिली. त्यापैकी काही कालौघात नामशेष झालीत, काही आजही आहेत.
कोलकात्यातील सर्वाधिक जुनी नाट्यगृहे.
बंगाली नाट्यचळवळीचा दुसरा खंड म्हणता येईल असा काळ म्हणजे भारत भूमीतील स्वदेशी चळवळ रुजण्याचा काळ. शतक कूस बदलत असतांना हळू हळू बंगाली रंगभूमीतही परिवर्तनाचे वारे वाहू लागले. वर्ष १९०० ते १९५० हा ५० वर्षांचा कालखंड म्हणजे देशात हळूहळू पुन्हा तयार होत असलेले ब्रिटिशविरोधी वातावरण, बंगाली नवजागरणाचा काळ आणि स्वदेशी विचारसरणीचे सूप्त बीज रुजून त्याला फळे-फुले येण्याचा काळ. वर्ष १९०५ उजाडले आणि तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा तो दुर्दैवी निर्णय घेतला. त्याने बंगाली जनमानस ढवळून निघाले. निर्णयाला कसून विरोध झाला आणि अनेक ब्रिटिशधार्जिणे म्हणून ओळखले जाणारे विचारवंत-धनिक-प्रतिष्ठित लोक ब्रिटिशविरोधी गटात आले. या घडामोडींचे प्रतिबिंब कोलकात्याच्या बंगाली नाट्यपंढरीत उमटले नसते तरच नवल. अमरेंद्र दत्ता, राजकृष्ण रे, गिरीशचंद्र घोष, अमृतलाल बोस असे अनेक नाट्यवेडे या काळात कोलकात्याच्या रंगभूमीवर सक्रीय होते. गिरीशचंद्र घोष हे आधी ऐतिहासिक-पौराणिक नाटकांचे बादशहा म्हणवले जात. पुढे त्यांची सिराजउदौला, मीर कासीम, छत्रपती अशी नाटके आली. ही नाटके उघडउघड ब्रिटिश सत्तेविरुद्ध भाष्य करणारी होती. बहुतेक नाटककार स्वतः उत्तम अभिनेते असल्यामुळे हा काळ विशेष गाजला. बंगाली अस्मितेला मिळालेली झळाळी, उत्तमोत्तम बंगाली नाटकांची निर्मिती आणि त्यांना मिळणारे व्यावसायिक यश असा त्रिवेणी सुवर्णयोग कोलकात्याच्या बंगाली नाट्यपंढरीत जुळून आला.
आजच्या कोलकात्यात नंदीकर थिएटर फेस्ट, सभाघर, बंगाल नाट्यअकादमीचा वार्षिक महोत्सव असे काही नावाजलेले नाट्यमहोत्सव शहराची नाटक-भूक भागवतात. थोडीफार व्यावसायिक नाटके बंगाली आणि इंग्रजीत होत असतात. त्यांना बऱ्यापैकी प्रतिसाद असतो. सिनेमा-दूरचित्रवाणी मालिका-जालीय मालिकांच्या माऱ्यातही बंगाली नाटक टिकून आहे.
* * *
नाटक वगळता अन्य कलाप्रांतातही कोलकात्याने अनेक नवोन्मेष बघितले. ज्ञानान्वेषण, लिटररी ग्लीमर, कोमेट, लिटररी ब्लॉसम….. काव्य-साहित्याला वाहिलेली अशी अनेक मासिके कोलकात्यातून प्रकाशित होत (१८४०-१९१०). त्यात लिहिणाऱ्यांची संख्याही भरपूर होती.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळा केलेले भारतीय शिल्पकलेचे आणि चित्रकलेचे ऐतिहासिक महत्त्वाचे नमुने, स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचे शेकडो नमुने, स्थानिक कलाकारांच्या कलाकृती अशा ऐवजाचे कायमस्वरूपी प्रदर्शन शहरात असावे असा विचार पुढे आला. त्यासाठी काही धनिकांनी पुढाकार घेऊन कोलकात्याला एक अप्रतिम भेट दिली. एशियाटिक सोसायटीच्या पुढाकाराने चौरंगी-पार्क स्ट्रीटच्या भागात भव्य इमारतीत ‘इम्पिरियल म्युझिअम’ (आताचे इंडियन म्युझिअम) उभे राहिले.(१८७५). आधुनिक भारतातले पहिले. ऐतिहासिक-सांस्कृतिक ठेव्याबरोबरच वनस्पतीशास्त्र, मानववंशशात्र, भूगर्भशास्त्र अन्य अशा अनेक विषयांना वाहिलेली दालनं उभारली गेली. निओक्लासिकल वास्तुशैलीतील या पांढऱ्याशुभ्र इमारतीची संकल्पना वॉल्टर ग्रॅनविले या वास्तुरचनाकाराची. ही देखणी इमारत आणि त्यातील अमूल्य कलाकृती कोलकात्याचे वैभव आहे.
कोलकात्यातील इंडियन म्युझियमची इमारत.
शहरातले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट (स्थापना १८५४) कलेचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावाजले गेले. लवकरच टागोर कुटुंबीय आणि इ. बी. हावेल, पर्सी ब्राऊन यांच्या पुढाकाराने चित्रांच्या ‘बंगाल शैली’ला प्रतिष्ठा मिळवून दिली. बंगाल शैलीची चित्रे अभिजात म्हणून मान्यता पावली. त्यापैकी काही इंडियन म्युझिअममध्ये प्रदर्शित केली आहेत.
बंगाल शैलीतील रंगचित्रे, बंगाल मास्टर्स कलेक्शन, सौजन्य - इंडियन म्युझिअम, कोलकाता. - १
बंगाल शैलीतील रंगचित्रे, बंगाल मास्टर्स कलेक्शन, सौजन्य - इंडियन म्युझिअम, कोलकाता. - २
कलेच्या विविध प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या कोलकात्याच्या सुपुत्रांबद्दल आपण वाचले. पण एकाचवेळी अनेक कलाप्रांतांमध्ये असामान्य प्राविण्य मिळवणारी आणि शहराला वैश्विक कीर्ती मिळवून देणारी असामी म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ! शहरावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा न पुसता येणारा. त्यांच्याबद्दल पुढे.
(क्रमश:)
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
आवडला लेख!
आवडला लेख!
मस्त चालू आहे मालिका
मस्त चालू आहे मालिका
Mahitupurn lekh ahe...
Mahitupurn lekh ahe... Vachtey..
छान सुरु आहे मालिका! पु. भा.
छान सुरु आहे मालिका! पु. भा. प्र.
मागचे तीन भाग एका बैठकीत
मागचे तीन भाग एका बैठकीत वाचले आज. प्र चिंमुळे अनेक जुन्या इमारतींच्या मूळ सौंदर्याचा अंदाज येतोय. बंगाल शैलीविषयीची माहिती नवीन आहे माझ्यासाठी. ही शैली फक्त पौराणिक प्रसंग किंवा मानवी आकृती रेखाटण्यासाठी वापरली जाते का?
वाचतेय. छान चालु आहे मालिका.
वाचतेय.
छान चालु आहे मालिका.
वाचतोय. पु भा प्र
वाचतोय. पु भा प्र
@ चंद्रा,
@ चंद्रा,
थोडक्यात सांगतो :- बंगाल शैलीचे जवळपास सर्व प्रसिद्ध चित्रकार हे शिल्पकलेतही प्रवीण होते, कदाचित त्यामुळे मानवी आकृती रेखाटण्याचे प्रमाण जास्त आहे. अमूर्त कमीच.
बंगाली क्लासिक चित्रशैलीत चित्रविषयाची हाताळणी थोडी वेगळी आहे. उदा. द्विहस्त शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांमध्ये प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.
प्रतिसादाबद्दल आभार.
शंकानिरसनासाठी आभार, अनिंद्य
शंकानिरसनासाठी आभार, अनिंद्य . पुभाप्र!
@ कुमार१
@ कुमार१
@ Aadesh203
@ लंपन
@ वेडोबा
@ अश्विनी..
@ चंद्रा
@ सस्मित
@ हर्पेन
लेखाबद्दलच्या प्रतिसादासाठी आभार.
ज्यांनी इथवर वाचले आहे
ज्यांनी इथवर वाचले आहे त्यांच्यासाठी पुढील भाग इथे आहे :-
https://www.maayboli.com/node/73034
आज विश्व रंगमंच दिवस.
आज विश्व रंगमंच दिवस.
त्यानिमित्ताने कोलकाताच्या नाट्यवेडाबद्दलचा हा धागा वर काढत आहे.
लेखात उल्लेख असलेल्या “स्टार
लेखात उल्लेख असलेल्या “स्टार थिएटर” चे नाव बदलून “बिनोदिनी” करण्याचा निर्णय आज झालाय.
वारांगना म्हणून हिणवल्या गेलेल्या बंगाली रंगभूमीच्या अग्रणी स्त्री नाट्यकलाकाराला साधारण दीड शतक उलटून गेल्यावर सन्मानित करण्याचे दुर्मिळ उदाहरण.
बातमी:
https://www.thestatesman.com/bengal/star-theatre-to-be-renamed-binodini-...