आमार कोलकाता - भाग १ - प्रास्ताविक आणि मनोगत

Submitted by अनिंद्य on 24 December, 2019 - 01:52

प्रास्ताविक आणि मनोगत :

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दलच्या आणि काही दिवसांपूर्वी 'बंगभोज' ह्या कोलकात्याच्या खाद्ययात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला भरभरून कौतुक मिळाले. त्यामुळे 'आमार कोलकाता' ही लेखमाला आजपासून क्रमश: प्रकाशित करीत आहे. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या कोलकाता शहराची जडणघडण, तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

तुम्हां गुणिजनांचे अभिप्राय, सूचना, सल्ले आणि प्रतिसाद प्रार्थनीय आहेत.

* * *

आमार कोलकाता - भाग १

IMG_3434.jpg

कोलकाता शहर म्हटले की तुम्हाला पटकन काय सुचतं?

माणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय - ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना? ह्या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला 'सिटी ऑफ जॉय' म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.

आपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक ह्यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.

माझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची सुदीर्घ परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्य शास्त्र विनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.

इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोनमैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेंव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. ह्याची अनेक आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.

आज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब - कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत असल्यासारखे वाटते. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे चौदा दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या ह्या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली. ‘कलकत्ता’ शहर २००१ पासून 'कोलकाता' झालं, त्यालाही आता बराच काळ लोटला. 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत. बहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द - भद्रलोक.) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्त परिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.

बंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं ? स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्य परिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अश्या इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.

पुण्यसलीला गंगा इथे ‘हुगळी’ आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध 'हावडा ब्रिज' हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.

IMG_2944.jpg

कोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. ह्यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुगळीकाठी जोरात होता.

वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अश्या अनेक देशात नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे - दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, सामाजिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.

* * *

आजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरुवात झाली १६९० साली ! ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी ह्या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.

दलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणारे सामान - सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही ह्या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.

शतक पालटले. ह्याचसुमारास अर्मेनिया ह्या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. ते हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेते झाले. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे 'होली चर्च ऑफ नाझरेथ' प्रार्थनास्थळ बांधले आणि त्याजवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्वबाजूनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन ‘चर्च’ म्हणतात पण दुरून ही इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)

१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) यानी फर्मान काढून कोलकात्याला 'मेयर्स कोर्ट' नियुक्त केले आणि अधिकृतरित्या 'कोलकाता शहर' आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.

अफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अश्या अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यांना वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे - जमिनी विकत घेण्यात आल्या. पुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हटल्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.

ब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १७०० सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).

बंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.

(क्रमश:)

(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली सुरुवात. वाचायची उत्सुकता आहे.

भद्रलोक म्हणजे gentleman नाही. भद्रलोक या शब्दाला विशिष्ट वर्ण, वर्ग यांचं कोंदण आहे. इंग्रजांमुळे आलेली श्रामंती आणि पाश्चात्य शिक्षण यांमुळे भद्रलोकाचा उदय झाला. बंगालातला प्रबोधनकाळ, विविध समाजांचा, संस्थांचा उदय यांत भद्रलोकाचा सहभाग होता. भद्रलोक ही व्यक्ती नसून एक सामाजिक वर्ग होता.

Gentleman या अर्थी वापरला जाणारा शब्द म्हणजे बाबू. बंगाली समाजातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जाई. समाजात वजन राखणार्‍या पुरुषांसाठीचा हा शब्द नंतर कारकुनांसाठी वापरला जाऊ लागला.

....भद्रलोक या शब्दाला विशिष्ट वर्ण, वर्ग यांचं कोंदण आहे.....

You are right. Some words mean much more than ‘sum of the parts’

More about ‘bhadralok’, ‘babu’ and ‘gentlemen’ in coming episodes. Happy

इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. >> सहमत! कोणतेही ठिकाण असे जाणून घेण्यासाठी संवेदनशील मन हवे Happy
मला कोलकात्याला जाण्याचा योग आला नाही अजून आणि परिचयातल्या ज्यांनी कोणी भेटी दिल्या त्यांचे या शहराबद्दलचे मत अधिकतर नकारात्मकच होते.
लेखामध्ये तुमची या शहराविषयी, वंगसंस्कृतीविषयी आत्मीयता जाणवते. तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाने ज्ञानात भर पडेल आणि पूर्वग्रह दूर व्हायला मदत होईल. धन्यवाद आणि पुभाप्र!

मस्तच. महाराष्ट्रा आणि बंगाल मध्ये बरीच साम्य स्थळे आहेत अस मला नेहमी वाटायच. तुम्ही ते अगदी मस्त एक्सप्लेन केले आहे.

आऊटडोअर्स
सस्मित
हर्पेन
rockstar1981
निलाक्षी
चिनूक्स
लंपन
अनया
सायो
फारएण्ड
कुमार१
मऊमाऊ
साधना
BLACKCAT

प्रतिसादांबद्दल आभारी आहे, लवकरच पुढील भाग प्रकाशित करतो.

@ चंद्रा,

लेखातील मला स्वतःला सर्वाधिक आवडलेले वाक्यच तुम्ही कोट केले आहे Happy

भेट देणाऱ्यांचा नकारात्मक प्रतिसाद म्हणाल तर देशातील अनेक शहरे वेगाने बकाल होत आहेत, कोलकाता अपवाद नाही. त्याबद्दलही लिहीन.

@ सीमा,

.... महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये साम्य ...... मला तरी तसेच वाटते. Happy

@ अश्विनी..
@ वेडोबा

प्रतिसादाबद्दल आभार.
आता लेखमालेचे ८ + १ भाग प्रकाशित केले आहेत इथे. तेही वाचावेत असा आग्रह.

याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे.

त्यानिमित्ताने धाग्यावर शुभेच्छा !

अतिशय सुरेख सुरुवात झाली आहे. भद्रलोक शब्द फारच आवडला. तुमची शैलीही आवडते. लिहीत रहा.
पहिले प्रचि सुंदर आहे. महाराष्ट्र व बंगाल यातील साम्यस्थळे कळली. हळूहळू सगळे भाग वाचणार आहे. सुचवल्याबद्दल आभार.

@ अस्मिता.,

प्रोत्साहनाबद्दल आभार.

Pages