लेखमालेचे यापूर्वीचे सहा भाग इथे वाचता येतील : -
https://www.maayboli.com/node/72801
https://www.maayboli.com/node/72846
https://www.maayboli.com/node/72950
https://www.maayboli.com/node/72977
https://www.maayboli.com/node/73013
https://www.maayboli.com/node/73034
आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू
भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये सुमारे ३५०० किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. शेकडो वर्षांपासून दोन्ही देशात बहुस्तरीय सांस्कृतिक संपर्क असला तरी नागरिकांनी एकमेकांच्या देशात स्थायिक होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, अगदीच ‘सागर में बूंद’ किंवा समुद्रात खसखस! भारतात शरणार्थी म्हणून आलेले लाखभर तिबेटी बांधव सोडले तर चीनच्या मुख्य भूमीतून येऊन भारतात वसलेल्या चिनी व्यक्तींची संख्या जेमतेम काही हजार असेल. चिनी लोक भारतात सर्वप्रथम स्थायिक झाले ते कोलकात्यात, आजपासून साधारण २३० वर्षांपूर्वी. आज सुमारे दोन हजार चिनी कोलकात्यात राहतात. बहुतेकांचे पूर्वज अनेक पिढ्या कोलकात्यातच आहेत. चिनी वस्ती असलेल्या भागांना ‘चायना टाऊन’ म्हणण्याचा प्रघात आहे. चायना टाऊन म्हणता येतील अशा दोन वस्त्या आजच्या कोलकात्यात आहेत. जुने चायना टाऊन आणि नवीन. पैकी जुने चायना टाऊन रवींद्र सारिणी जवळ तिरेता बझार (Tiretta Bazar) भागात आहे. पूर्व कोलकात्याच्या तांगरा भागात दुसरे ‘न्यू चायना टाऊन’ आहे.
कोलकाता म्हणजे बजबजपुरी असे स्थानिक लोकही म्हणतात. पण कोलकात्यात खरोखरीच एक ‘बजबज’ नामक वस्ती आहे – नावाला आणि अर्थाला जागणारी! याच बजबज भागात काही चिनी व्यापाऱ्यांनी स्वतःची पहिली पेठ वसवली होती. तोंग अच्यू (Tong Achew) नामक एका यशस्वी चिनी व्यापाऱ्याने येथे सर्वप्रथम जागा विकत घेऊन साखरेचा कारखाना टाकायचे ठरवले. त्यासाठी त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी मिळवली. साखर कारखान्यासाठी ६५० बिघा जमीन दीर्घमुदतीच्या करारावर देणाऱ्या परवानगीपत्रावर खुद्द गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सची सही आहे (वर्ष १७७८). पुढे कारखान्याच्या कामासाठी चीनमधून काही जाणकार आणि मजूर लोक आले. २-३ वर्षात साखरेचे उत्पादन सुरू झाले पण तितक्यातच तोंग मरण पावला, साखर कारखाना बंद पडला. त्याच्यासोबत आलेले चिनी परत गेले नाहीत, कोलकात्यातच राहिले. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती, भाषा आणि धार्मिक परंपरांच्या रूपाने कोलकात्यात त्यांच्या देशाला जिवंत ठेवले. आज हा भाग तोंग अच्यूच्या नावाने अचीपूर म्हणून ओळखला जातो. अच्यूच्या नावे एक स्मृतिस्थळ तेथे आजवर आहे.
पुढच्या काही दशकांमध्ये कोलकात्याला येऊन वसणारे चिनी लोक सुतारकाम आणि चामडे कमावण्याच्या, पादत्राणे घडवण्याच्या कामात तरबेज होते. पहिल्या महायुद्धानंतर कोलकात्यात चिनी चर्मकारांचे अनेक कारखाने आणि दुकाने मोठ्या प्रमाणावर उघडली. बेंटिक स्ट्रीट – धरमतल्ला भागात ही दुकाने होती, पैकी काही आजही आहेत. ब्रिटिश सैन्याला आणि अधिकाऱ्यांना उत्तम कमावलेल्या कातड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचा पुरवठा चिनी कामगार करत. ब्रिटिश रेसिडेन्सी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या चामडी पखालीतून पाणी वाहून नेणारे ‘भिश्ती’ शहरात नेमलेले असत. त्यांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या चामडी पखाली चिनी कामगार पुरवत, त्यामुळे त्यांच्या कौशल्याला विशेष मागणी होती. (अगदी अलीकडे साठच्या दशकापर्यंत पखालीतून पाणी वाहून नेणारे भिश्ती जुन्या शहरात कार्यरत होते.) एकेकाळी सुमारे ३० हजार संख्येने असलेल्या चिनी लोकांना त्यांच्या पद्धतीचे अन्न पुरवणाऱ्या बेकरी आणि छोटी उपाहारगृहे चालवणारे चिनी बरेच होते.
कोलकात्यातील चायना टाऊन सिंगापूर, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेतल्या चायना टाऊन सारखी चकचकीत अजिबातच नाहीत. दोन्ही चायना टाऊनमध्ये मूळचे चिनी लोक दाटीवाटीने राहतात. पैकी जुने चायना टाऊन तेथील ‘चायनीज चर्च’ साठी ओळखल्या जाते. सहा-सात चायनीज चर्च अजूनही कोलकात्यात आहेत. प्रचंड गर्दीच्या दाटीवाटीने वसलेल्या गल्लीबोळात चिनी दैवतांची प्राचीन देवळे आहेत, स्थानिक चिनी लोक त्यांना देऊळ-टेम्पल न म्हणता चायनीज 'चर्च' का म्हणतात हे कोडेच आहे.
कोलकात्याच्या ब्लॅकबर्न रोडवरचे चिनी चर्च (स्थापना १९०८)
हा भाग घनदाट लोकवस्तीचा आणि गलिच्छ असल्यामुळे सर्व चायनीज चर्चेसना भेट देणे शक्य नाही. काही जागी मात्र जाता येते. पैकी ट्रक टर्मिनस जवळचे क्वान यिन ह्या चिनी देवीला समर्पित रेड चर्च/सी ईप हे त्यातल्या त्यात शोधायला सोपे.
आतील मुख्य मूर्तीची दुर्गा झाली आहे, म्हणजे पूर्ण बंगालीकरण. अंगभर रेशमी शेला, भाळी कुंकुम, गळ्यात पुष्पहार. आजूबाजूची सजावट मात्र चिनी आणि प्रसाद म्हणून हक्का नूडल्स. सगळीकडे अंधार, फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाश. बाहेरच्या प्रचंड कोलाहलाचा आणि कुरुपतेचा आत गेल्यावर विसर पडतो ही त्या जागेची जादू असावी.
तांगरा भागात असलेल्या न्यू चायना टाऊन भागातही घनदाट लोकवस्ती आहे. इथे भल्या पहाटे रस्त्यावर दुकाने थाटून काही चिनी मंडळी चिनी खाद्यपदार्थ विकतात. अन्यत्र सहसा न मिळणारे, आत वेगवेगळे सारण असलेले चिनी पद्धतीचे पाव, मोमो, स्प्रिंग रोल, खास कॅण्टोनीज चवीचे पोर्क सूप अशी न्याहारी करायला काही स्थानीय लोक आणि थोडेफार विदेशी पर्यटक येतात. स्वच्छतेचा आग्रह मात्र ह्या भागात धरता येत नाही.
न्यू चायना टाऊन मध्ये काही चिनी रेस्तराँ आहेत. नाव वगळता तिथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये फार काही चिनी नाही, देशभर इतरत्र मिळणारे ‘इंडो-चायनीज’ इथेही आहे, फक्त मालक मंडळी चीनवंशी आहेत. इथेच काही पडक्या घरांमध्ये ‘सॉस-मेकिंग मॉम्स’ राहतात – शहरातल्या हॉटेलांना आणि हातगाड्यांना लागणारे शेकडो लिटर चिली सॉस घरी तयार करून विकणाऱ्या कुटिरोद्योजक चिनी महिला!
‘मून केक फेस्टिवल’, चिनी नववर्ष, चिनी वर्षाच्या सातव्या महिन्यातला हिंदू पितृपक्षासारखा पूर्वजांना भोजन अर्पण करण्याचा ‘हंग्री घोस्ट फेस्टिवल’ असे काही महत्त्वाचे प्रसंग सोडल्यास फारसे काही इथे घडत नाही. या संपूर्ण भागाला अस्वच्छतेचा शाप आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे कोणाला तिथे जावेसे वाटत नाही. चीनवंशी जनताही आता फारशी तिथे राहात नाही, एकेकाळी संख्येने २० हजार असलेले चिनी आता हजार-दोन हजारच्या संख्येत असावेत.
* * *
समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात असे म्हटले जाते. कोलकात्याच्या चिनी रहिवासीयांनी स्वतःची भाषा जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे दाखले मिळतात. महत्त्वाचे म्हणजे ही चिनी मंडळी श्रीमंत नव्हती. पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात आलेल्या विपन्न लोकांना भाषा आणि संस्कृती टिकवणे अधिकच कठीण होते. चिनीपारा भागातली पहिली चिनी भाषा शिकवणारी शाळा सुरु झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. Chien Kuo Chinese school असे शाळेचे नाव. स्थानिक चिनी लोकांचा स्वभाषेशी संपर्क क्षीण झाला होता, त्यामुळे स्थानिक शिक्षक मिळवणे अवघड होते. समाजाच्या पुढाऱ्यांनी जुन्या ओळखीतून कॅण्टोनीज शिक्षक मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न फळला नाही. सरकारी मदत म्हणावी तर तत्कालीन चिनी सरकार ह्या उपद्व्यापाला अनुकूल नव्हते. त्यामुळे काही शिक्षक तैवानमधून आयात करण्यात आले. १४ शिक्षक आणि सुमारे ७०० विद्यार्थी अशी ही शाळा मुलांना कॅण्टोनीज भाषा, मँडरिन लिपीचे लेखन-वाचन, चिनी लोकसंगीत, गणित आणि समाजशास्त्रात पारंगत करत होती. पुढे १९५० सालाच्या दरम्यान शाळा बंद पडली ती परत कधीही सुरु न होण्यासाठी. शहरातील चिनी लोकांनी चालवलेल्या अन्य काही छोट्या शाळा प्राथमिक शिक्षण देत. अपुरा पैसा आणि पुरेशा पटसंख्येअभावी त्याही हळू हळू बंद पडल्या. १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चिनी कुटुंबांना कोलकात्याच्या बाहेर नेण्यात आले. हेरगिरीच्या संशयामुळे अनेकांना कायमचे तडीपार करण्यात आले. त्यावेळी ३० हजाराच्या आसपास असलेली चिनी लोकसंख्या कोलकाता-भारत सोडून झपाट्याने अन्य देशात विखुरली. याचा परिणाम म्हणून कोलकात्यात असलेल्या जवळपास सर्वच चिनी भाषक शाळा बंद पडल्या, पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत. एक दोन शाळांची जबाबदारी कॅथलिक चर्चने स्वीकारली आणि सुमारे पाऊणशे मुले पटावर असलेली एक शाळा आणखी काही वर्षे चालवली. दरम्यान अनेक चिनी कुटुंबीयांनी धर्मपरिवर्तन करून ख्रिस्ताच्या धर्माला जवळ केले आणि इंग्रजी त्यांची प्रमुख भाषा झाली. कमी पटसंख्या, आर्थिक मदतीचा अभाव आणि चिनी भाषा शिकण्यासाठी अनुत्सुक नवीन पिढी अशा कचाट्यात सापडून चिनी भाषेतले शिक्षण हळूहळू कोलकात्यातून हद्दपार झाले. शांघाय शहरातून आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी स्थापन केलेले ग्रेस लिंग लियांग चायनीज चर्च स्कूल (स्थापना १९४९) आणि त्याची एक शाखा आज कोलकात्यात आहे. म्हणायला चिनी शाळा असली तरी तेथे फक्त इंग्रजी भाषेतले शिक्षण दिले जाते.
काही वृद्ध मंडळी सोडली तर खुद्द चिनी स्वतःची भाषा बोलू-लिहू शकत नाहीत. कुठलीही भाषा मरणे म्हणजे एक संस्कृती नष्ट होणे. तदनुसार ‘कोलकात्यातील चीन’ म्हणजे आता फक्त चिनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या, चार-दोन चिनी रेस्तराँ आणि काही पडकी चिनी देवळं वागवणारा गलिच्छ भाग एवढेच.
शक्ती सामंतांच्या ‘हावडा ब्रिज’ ह्या हिंदी चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं आहे – मेरा नाम चिन चिन चू. गीता दत्तच्या आवाजातले ‘बाबूजी मैं चीन से आई चीनी जैसा दिल लाई’ कोलकात्यातील चिनीजनांचे वर्णनच जणू ……. साखरेला बंगालीत ‘चीनी’ आणि चीनमधून आयात होणाऱ्या पोर्सेलीनला “चिनीमाटी’ म्हणतात. दोनही समूहात शेकडो वर्षांच्या संपर्काचा हा प्रभाव असावा.
गाण्याचा आस्वाद घ्या - मेरा नाम चिन चिन चू (जालावरून साभार)
चिनी समाजाप्रमाणेच कोलकात्याला आपले म्हणणाऱ्या आणि आता कोलकात्यातून अस्तंगत होत असलेल्या देशी-विदेशी भाषा-धर्म-वंशसमूहाबद्दल पुढे..
(क्रमशः)
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)
अरे किती छान लेख आहे. मी पै
अरे किती छान लेख आहे. मी पै ली.
कुठलीही भाषा मरणे म्हणजे एक
कुठलीही भाषा मरणे म्हणजे एक संस्कृती नष्ट होणे. >> सगळ्याच शहरांमधून ही परिस्थिती आहे. मुंबईत कित्येक जण आहेत जे नावाला तमिळ तेलगू वगैरे आहेत पण त्यांना ती ती भाषा घरात बोलण्यापुरती येते पण लिपी लिहिता वाचता मात्र येत नाही.
'गलिच्छ' शब्द असलेली वाक्ये वगळता लिखाण आवडले.
छान लेख.
छान लेख.
हा ही भाग छान.
हा ही भाग छान.
Mast लेख!
Mast लेख!
हा ही भाग छान>+११
हा ही भाग छान>+११
@ अमा
@ अमा
@ सस्मित
@ कुमार१
@ देवकी
@ rockstar1981
आभार !
@ हर्पेन
@ हर्पेन
..... नावाला तमिळ तेलगू वगैरे आहेत पण त्यांना ती ती भाषा घरात बोलण्यापुरती येते पण लिपी लिहिता वाचता येत नाही.....
हे वाईट आहे, पण टाळता येणे शक्य आहे.
..... 'गलिच्छ' शब्द असलेली वाक्ये ....
नाईलाज आहे हो, नाहीतर फार सौंदर्यप्रिय माणूस आहे मी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गलिच्छ' शब्द असलेली वाक्ये ..
गलिच्छ' शब्द असलेली वाक्ये ....
नाईलाज आहे हो, नाहीतर फार सौंदर्यप्रिय माणूस आहे मी Happy>>>
: हाहा :
हर्पेन, मला वाटतं अनिंद्यनी वर्णनासाठी वापरलेला शब्द स्थाननिहाय (location specific) आहे. कोणत्याही शहरात अशा काही कमीजास्त बकाल जागा असतात. सगळेच सुंदर आणि परिपूर्ण कसे असेल?
@ चन्द्रा,
@ चन्द्रा,
न कंटाळता इथवर वाचणाऱ्यांसाठी पुढचा आणि शेवटचा भाग :-
https://www.maayboli.com/node/73146