येत्या जन्मी पक्षी। करि मला देवा।
वैराग्याने खोपा। सोडे सहजी।।
येत्या जन्मी देवा। कर वृक्ष वल्ली।
स्थिर कर्मयोगी। दुजा नाही।।
वाघरू होईन। आनंदाने देवा।
पोटासाठी हिंसा। धर्मची तो।।
नर जन्मी देवा। दिली मज बुद्धी।
परि मनी भिंगरी। बांधिली गा।।
नर जन्म दिधला। उपकार देवा।
घेईन केशवा। नाम तुझे।।
-रोहन
भोग नशिबाचे कोणा न चुकले
कशास हासशी कशास गहीवर
वळूनी पाही त्या तीरावर
साखर गोडी बालपणाची
लाड करी माय पांघरूनी
अल्लड बालक रूसलो फुगलो
असा वाढलो जसा फुलावर
उमेद मोठी तरूण पणाची
उर्मी मनात होती बहरूनी
पडलो उठलो तरी सावरलो
घाव झेलले या वर्मावर
गोडी न्यारी संसाराची
भार्या साथीला मधूर प्रेमातूनी
अपत्य सुंदर त्यातच रमलो
कष्ट उपसले या पैशावर
वेळ आली गृहस्थाश्रमाची
जो तो गुंतला स्वविश्वातूनी
संसारी या पुरता हरवलो
धनसंपदा या नावावर
अखेर जन्म टांगला अता खुटीत मी
लबाड जीवना नसे तुझ्या मुठीत मी
कसे कपाळ वेंधळेच भेटले मला
किती तुरुंग भोगले तुझ्या मिठीत मी
मिळे म्हणे मुआवजाच नासल्या पिका
असा कसा बसेचना तसा अटीत मी
झरा झरा वहायला अधीर आसवे
रुखा-सुखाच थेंब एक हा दिठीत मी
बसेल वाटले तुला रडून मोकळा
कसा बसेन सांग तू वुरा कुटीत मी?
असे नभात सावळाच सुर्य गोल मी
नसे तुझ्यापरीच चंद्र फटफटीत मी
विचारतो बळी अखेर जाब वामना
किती बसू पिड्यात कर्ज हे फिटीत मी?
एक ..
झुळूक वार्याची ..
एक..
लहर पाण्याची ..
ही ..
लकेर गाण्याची ..
आणि एक ..
आठवणीच्या आड
तुझ्या हसण्याची !
एक ..
कथन गात्रांचे ..
एक ..
रुदन वीणेचे ..
एक ..
नशिब जन्मांचे ..
मीलनात
आणि तुझ्या
एकवार असण्याचे !