बालकविता

बंटीबाबांच्या अटी

Submitted by एम.कर्णिक on 22 December, 2011 - 05:01

आई, बाबा, शाळेत तुम्ही घालणार केव्हा मला
आत्ताच सांगा नाय्तर मी करीन हल्लागुल्ला
कुठली शाळा तिचे आधी नाव मी विचारिन
दाखवा नेउन शाळा पैले, आवडते का पाहिन

टीचर दिस्ल्या चांग्ल्या आणि बिल्डिंग अस्ली चांग्ली
ग्राउंड अस्ला खेळाय्ला नि वर्गात चित्रं टांग्ली
स्विंग आणि स्लाईडसकट चांग्ले अस्तिल गेम
तरच त्या शाळेत माझे घालायचे नेम

बसनी नाई जाणार मी सांगुन ठेव्तो पैले
शाळेत सोडाय्ला नि न्यायला आबा पायजेत आले
बाबा तुम्ही येऊ नका, आबा असतील ड्राय्व्हर
आरामात मी गाडीत त्यांच्या बसेन मागच्या सीटवर

आई, टिफिनमध्दे पाय्जेत मफ़िन आणि चॉक्लेट
शाळेत अलाउड नस्णार नं सुर्मई, बोंबिल, पाप्लेट?

गुलमोहर: 

उंदरीण आणि उंदीरशेठ...

Submitted by ग्लोरी on 22 December, 2011 - 01:44

उंदरीण आणि
उंदीरशेठ
पिंजर्‍यात झाली
दोघांची भेट

उंदीरशेठ
बाताडे भारी
उंदरीणिला म्हणाले
"हे सुंदरी"

सांग सांग करशील का
माझ्याशी लगीन
तुझ्यासाठी नभीचे
तारे मी कतरीन

उंदरीण म्हणाली
दावीत नखरा
आधी या पिंजर्‍याचा
एक तार कतरा...

- ग्लोरी

गुलमोहर: 

नक्की कोणता मी प्राणी ...!

Submitted by विदेश on 17 December, 2011 - 13:21

मान हलवता सर मजला
'नंदीबैल' पहा म्हणती -
हुषार नाही म्हणून मजला
मित्र किती 'गाढव' म्हणती !

डबे शोधतो हळू नेहमी
'बोका' म्हणते आई मला ,
नुसता चरतो इकडे तिकडे
'घोडा' म्हणती वडील मला !

दादा म्हणतो 'लबाड कोल्हा'
पुढेपुढे मी करताना -
'माकड' समजे ताई मला
गडबड माझी बघताना !

'गरीब गाय' म्हणते मला
आजी माझी आवडती ,
जवळ घेउन आजोबा तर
माझा 'वाघोबा' म्हणती !

गुलमोहर: 

चिऊताई चिऊताई..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2011 - 04:21

चिऊताई चिऊताई..

चिऊताई, चिऊताई,
उगा का रुसतेस बाई

खाऊ देईन मूठभर
भरभर चिव् चिव् कर

नाचत रहा अंगणभर
बाळ बागडेल तेथवर

मम्म्म् होईल भरभर
जाऊ नको दम धर

थोडी तरी चिवचिव कर
हसू फुटेल बोळकंभर...

गुलमोहर: 

बंटीबाबा आणि इडली

Submitted by एम.कर्णिक on 17 December, 2011 - 03:28

एकदा एक इडली सांबार्‍यात बुडली
चटणीनं बघितलं नि चिड चिड चिडली

चटणी म्हटली इडलीला, “मैत्री का ग तोडली?”
इडली म्हटली, “सांबार्‍याची संगत आवडली”

तशी चटणी झाली चुप्प, इडली फुगली हुप्प
बंटीबाबानी मग खाल्ली इडली गुप्पागुप्प

गुलमोहर: 

ससोबा आले उंदराच्या घरी...

Submitted by ग्लोरी on 17 December, 2011 - 00:31

ससोबा आले
उंदराच्या घरी
उंदराने केली
अंडाकरी

ससोबा म्हणाले
"काय उंदीरराव
शाकाहारी मी
नाही का ठाव ?"

उंदीर म्हणाला
"तसे नाही ससोबा
अंडाकरी खायला
येणार आहेत वाघोबा"

"तुमच्यासाठी आहे
हिरवेगार झुडूप"
असे म्हणेस्तोवर
ससोबा गुडूप

- ग्लोरी

गुलमोहर: 

कावळा म्हणाला...

Submitted by ग्लोरी on 17 December, 2011 - 00:06

कावळा म्हणाला
मी नाही काळा
मी तर आहे
जरासा सावळा

बगळा म्हणाला
मी नाही पांढरा
मी तर आहे
गोराच गोरा

पाहा पाहा इकडे
म्हणाला कोंबडा
आहे का कुणाला
तुरा असा तांबडा

पोपट म्हणाला
वळवून मान
अंगावर माझ्या
पाचूचे रान

तितक्यात तिथे
मोर नाचत आला
सगळ्यांनी त्याला
नमस्कार केला

- ग्लोरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बंटीबाबांची खंडणी

Submitted by एम.कर्णिक on 14 December, 2011 - 13:33

बाबा माझ्या बर्थडेला गिफ्ट काय देणार?
बघा हं, चिल्लरपिल्लर नाय चालणार

आई म्हटली होती जिलबी आर्डर करणाराय
तुमच्याकडुन सांगा नक्की काय मिळणाराय?

केक हवा मोठ्ठा त्यावर मिकी माऊस हवा
अंगा पण छान छान हवा नवा नवा

नवे कोरे बूट हवेत दिवे लागणारे
चालताना पिक पॉक आवाज देणारे

आणखी पण काही तरी तुमच्याकडून हवय
आत्ताच नाही सांगत, माझं अजून ठरायचय

आबा काय देणारायत ठाऊक आहे मला
मीच तर लावलंय त्याना कबुल करायला

सिक्रेट आहे आमचं मी तुम्हाला का सांगू?
लगेच लागाल तुम्ही ते माझ्याकडे मागू

बरं बरं सांगतो, एक चॉक्लेटचा डबा
शंभर चॉक्लेट्वाला मला देणार आहेत आबा

गुलमोहर: 

इवल्या इवल्या बाळाचे

Submitted by विदेश on 12 December, 2011 - 09:22

इवल्या इवल्या बाळाचे
इवले इवले ताट
चिऊ काऊ हम्माचे
अवती भवती पाट

पहिला घास चिऊचा
चिव चिव अंगणीचा
मेणाच्या घरातल्या
चिव चिव चिमणीचा

दुसरा घास काऊचा
काव काव फांदीवरचा
शेणाच्या घरातल्या
काव काव कावळ्याचा

तिसरा घास हम्माचा
हम्मा हम्मा कपिलाचा
गवताच्या गोठ्यातल्या
हम्मा हम्मा गाईचा

बाळाची अंगतपंगत
पक्षीप्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत

गोड घास आईचा
मम्म मम्म करण्याचा
चांदोबाला बोलावत
गात निन्नी करण्याचा !

गुलमोहर: 

आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी...

Submitted by ग्लोरी on 8 December, 2011 - 02:00

आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

उसळती लाटा निळ्या
निळ्या अंधाराच्या
आदळूनी होडीवर
होतात रुप्याच्या

नजरेला येत जाते दुधाळशी गोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

लुकुलुकु पोहतात
मासे चांदण्यांचे
कुठे कुठे लागतात
बेटही ढगांचे

आरामात पाहा सारे करू नका खोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

एरवी या सागराचे
पाणी काळेभोर
चांदोबाची होडी म्हणजे
उजेडाचा मोर

होडीला या जगामधे नाही कुठे जोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

- ग्लोरी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता