खार बाई खार, लाडाची खार
झाडाच्या अंगावर खेळते फार
मोर बाई मोर
रंगांचा चोर
चोरलेत बाई त्याने रंग हजार
भालू बाई भालू
चाले डुलूडुलू
नाचून दाखवतो गमतीदार
मनी बाई मनी
किती किती गुणी
गरम गरम दुध पिते करून गार
हत्ती बाई हत्ती
जाडजूड किती
त्याचीच भिती त्याला वाटते फार
ससा बाई ससा
धरू तरी कसा
चाहूल लागताच होतो पसार...
- ग्लोरी
दसरा आणि दिवाळीतलं भांडण कसं मिटलं !
सांग ना रे भाय
मोठं काय
दिवाळीचे दिवे हजार
की
दस-याचा सोनेरी चमत्कार
सोन्याची पानं, पानांना सोनं
की भाउबीजेचं भावाला ओवाळणं?
दसरा दिवाळीत झाला असा वाद
सर्वांच्याच तोंडाचा पळून गेला स्वाद
दिवाळी म्हणते मी मोठी
माझ्या दिव्यांचा बघ कसा लखलखाट
दसरा म्हणतो मी मोठा
माझ्या सोन्याचा चमचम चमचमाट
दिवाळी म्हणे मी भावा-बहिणीना भेटवते
दसरा सांगे, सोनं देताना सगळ्यांचीच भेट होते
माझ्याकडॆ वस्त्रे
माझ्यामागे शस्त्रे
माझ्याकडे शेव-चकली-लड्डू
माझ्याकडे श्रीखंडू
वाद तुटेना
झगडा मिटेना
तोवर तेथे आला एक मुसाफ़िर
मांजराने चाटली दूधाची वाटी
आईने पाठीवर मारली काठी
मांजर गेल खिडकीतून पळून
आईची भाजीपण गेली जळून
आई आता अशी बडबड करते
रोजरोज मांजर दूधापाशी मरते
एकदा दूध तापून उघडच ठेवले
गरम दूधाला मांजराने चाटले
मांजराची जीभ खूपच भाजली
चोरुन दूध प्यायची खोडच मोडली
किकु
आला ऋतु नवा बाई आला ऋतु नवा
पावसात ऊन आणि उन्हात गारवा
झुळुझुळु वाहे झरे
झुले गवताचे तुरे
डोळ्यांमधे भरे बाई फुलांचा ताटवा
हिरवी हिरवी झाली वाट
हिरवा हिरवा नदीकाठ
हिरव्यागार झाडावर पोपटाचा थवा
कोकिळेचा चढे सूर
साद देतात मयूर
रानभर पसरला गोडवा गोडवा
आला ऋतु नवा बाई आला ऋतु नवा
- ग्लोरी
एक होता छबू
त्याला दिसला भुभू
भुभू होता झोपेत
घोरत होता मजेत
छबूने धरली शेपूट
भुभूला म्हटला ऊठ ऊठ
भुभूला आली जाग
चढला भलता राग
भुभू भुंकत उठला
छबू धावत सुटला
एक होता ठोंबा
त्याला दिसली हंबा
हंबा होती चरत
हिरवे हिरवे गवत
ठोंबा गेला मधे
आणि म्हटला, "दुध दे"
हंबाने उचलली मान
जोरात हलवले कान
चिडली होती भारी
ठोंबा म्हटला सॉरी
- ग्लोरी
मांजराने केला
उंदराला फोन
उंदीर म्हणाला
"हॅल्लो कोण ?"
मांजर म्हणाले
म्याँव म्याँव म्याँव
उंदराने घेतली
बिळामधे धाव...
लावुन घेतले
बिळाचे दार
तुटली रेंज अन
कटला कॉल
कटला कॉल पण
फुटला घाम
आत होता नागोबा
करीत आराम
- ग्लोरी
मेंढीताई मेंढीताई
अंगभर लोकर, मज्जा बाई -
थंडी जोरात वाजली तरी
तुला ऐकू येतच नाही ?
बेडूकराव बेडूकराव
का ओरडता डराव डराव ?
येत नाही झोप तुम्हाला -
बाळावर का चिडता राव !
मनीमाऊ मनीमाऊ
म्याऊ म्याऊ बंद करा,
उंदीर दिसत नाही तोवर-
तुम्ही जरा मौन धरा !
भूभूदादा भूभूदादा
येता जाता तुम्ही भुंकता -
चोर चोरी करतानाच
तुम्ही नेमके कसे पेंगता ?
आई, आता बस्स तुझा खिमटेवाला भात
तोंडामधे माझ्या आले आहेत सोळा दात
भाज्यांचंही करतेस गुर्गुट वरण भातामध्धे
ओळखता पण येत नाही काय काय आहे त्यात.
कधी म्हणतेस चिकन तर कधी मासाबाऊ
सगळंच लागतंय सारखं मग सांग कसं खाऊ?
माहिताय न तुला सगळं चावता येतंय मला
वेगळंवगळं दे नं भाजी, चपाती नि भात.
आणि हो, ते बस्स तुझं बाऊलमध्धे देणं
चमच्या चमच्याने माझ्या तोंडात भरवणं
आता जेवू दे नं डायनिंग टेबलखुर्चीवर
आजोबांनी दिलेल्या त्या पाच खणी ताटात.
एक होती कोंबडी, तिला मिळाली एक घोंगडी
आणि मग कोंबडीची पळाली थंडी,
तिने घातली दोन छान छान अंडी,
अंडी ठेवली घोंगडीच्या आत
त्यातून निघाली दोन पिल्ले छान,
पिल्ले होती गोरी गोरी पान
पण त्यांना नव्हतेच मुळी कान
कोंबडीने आणला पिल्लांना खाऊ
त्यात होता भात मऊ मऊ
पिल्लांनी सगळा खाऊन टाकला खाऊ
आणि घोंगडीत झोपली जाऊन.