टॉम आणि जेरी निघाले चंद्रावर....
(पेशल पेशल थँक्स - रुणुझुणुच्या लेकाला..... ज्याच्यामुळे टॉम आणि जेरी यानात दिसले )
टॉम आणि जेरी एकदा बसले छान यानात
दोघे मिळून निघाले की चंद्रावर थाटात
एक दाबतो हिरवे बटण, दुसरा दाबतो लाल
यानाखाली दिसली त्यांना आग पिवळी लाल
घाबरुन बसले दोघे आपल्या खुर्चीत चिडीचूप्प
यान निघाले होते आता अग्दी अग्दी जोरात खूप
खिडकीतून बघताना आली मज्जा फार
आख्खी पृथ्वीच चालली होते मागेमागे पार
भूक लागता दोघांना खुडबुड खुडबुड किती
खाऊ शोधता एकच आला क्रिमरोल हाती
ओढाताण करताना दोघे पडले धाडकन
बटण कुठले दाबले गेले यान फिरले गरर्कन...
जा, मी तुझ्याशी बोलणार नाही
यंदा पावसात खेळणार नाही...
सारे म्हण्तात आला आला
छत्र्या रेनकोट काढा काढा
तुझा तर अजून पत्ताच नाही
जा, मी तुझ्याशी बोलणार नाही...
गाणे कित्ती म्हणून झाले
आकाशात कितीदा बघून झाले
तुला जर त्याचे काहीच नाही
मी ही तुझ्याशी बोलणार नाही....
येतोस जेव्हा धाव्वत धाव्वत
आम्हीही सगळे असतो नाचत
तुझा जर मूड गेलाय तर
मलाही मग इंटरेस्ट नाही
जा, मी तुझ्याशी बोलणार नाही....
"आज सूर्य कुठे उगवला ?
छत्री- रेनकोट दोन्ही कशाला ??"
"तुला तर आई कळतंच नाही
अजून बट्टी झाली नाही
मी काही पावसात खेळणार नाही......"
महिनाभर जर हा पडेल मस्त
काय झालंय कळत नाही !!
ये रे ये रे पावसा
गाणं म्हणतो सारखा
तरी तू येत नाहीस
काय झालंय कळत नाही
नेहेमीच येतो जून मधे
सारे कौतुक करतात तुझे
जून तर आला संपत
तरी तू येत नाहीस
काय झालंय कळत नाही
कट्टी फू केलीस का
एवढं कोणी रुसतं का
असशील जर दोस्त खरा
धावून येशील भराभरा
सगळीकडे पाणीच पाणी
सगळे गातील तुझीच गाणी
सुट्टी किती घेशील रे
ये रे लवकर ये रे ये ....
आला आला पाऊस आता
मस्त मज्जा करु
पागोळ्यांच्या खाली अपुली
ओंजळ अश्शी धरु
पाण्यामध्धे सोडायाला
केली बघ्घा होडी
होडीत बसुन पहा निघाली
राजा राणीची जोडी
थेंब झेलत खेळायाला
आवडते मज भारी
बेडकांच्याही मागे धावतो
आम्ही मुले सारी
भिजून गेले आई, बघ मी
ह्या पावसात जाता
होईल ना ग सर्दी आणि
तापही येईल आता
नक्को दूध, आलं घालून
देशील का ग चहा?
सर्दी खोकला ताप
कस्सा पळुन जाईल पहा
एक होता कोल्हा
पंढरपूरला गेला
तिथे होती गर्दी
त्याला झाला सर्दी
दवाखान्यात गेला
खिशात नव्हता ढेला
म्हटला, "विठ्ठल विठ्ठल !
उगिच सोडले जंगल"
- ग्लोरी
.
नवे कपडे नवे बूट
पुन्हा तीच शाळा -
आजपासून पुन्हा
दप्तर करा गोळा !
छान होती सुट्टी
कित्ती कित्ती आराम
रोज भोवताली गोळा
राजा राणी गुलाम !
मित्र मैत्रिणी घालत
अवतीभवती पिंगा,
आईस्क्रीमच्या पार्टीचा
रोजचा धांगडधिंगा
रात्री होई जागरण
दुपारी खूप दंगा -
अभ्यासाचा मुळीच
पाठीशी नव्हता भुंगा
अस्सू दे ना ग आई
शाळेला कायम सुट्टी
अजून आहे लहान मी...
अस्सू दे थोडा हट्टी !
वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी
माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले
टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान
पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या
खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा
- ग्लोरी
पावसा रे पावसा
पावसा रे पावसा
ये की रे जोरासा
थेंबातून नाच रे
अंगणातून धाव रे
हात तुझा हातात घेईन
मी पण नाच करीन
दोघे आपण भाऊ भाऊ
लवकर लवकर ये पाहू
आपली तुपली दोस्ती
मिळून करु मस्ती........
वाढदिवस हत्तीचा
केक बनवला केळीचा
सोंडेने मेणबत्त्या फुंकू
हत्ती लागला केक कापू
जंगलातले
प्राणी सगळे
गीत लागले गाऊ
हप्पी बर्थ डे टू यू
वाढदिवस मिठ्ठूचा
केक बनवला पेरूचा
शिट्टीने मेणबत्त्या फुंकू
मिठ्ठू लागला केक कापू
जंगलातले
प्राणी सगळे
गीत लागले गाऊ
हप्पी बर्थ डे टू यू
वाढदिवस झाडाचा
केक बनवला बर्फाचा
मेणबत्त्या लागल्या पेटू
केक लागला सारा वितळू
जंगलातले
प्राणी सगळे
गीत लागले गाऊ
हप्पी बर्थ डे टू यू
- ग्लोरी
झाडं असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरू असतात
झाडांचीही परिक्षा असते झाडंसुद्धा पेपर देतात
ऊन पाऊस वादळवारा अवघड अवघड विषय असतात
झाडांनाही ताण येतो झाडंसुद्धा कंटाळतात
अशावेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात
जगत राहणं यालाच झाडं खरं मेरीट म्हणत असतात
वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाही
उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत .....
- ग्लोरी