मेघ मेघ बरसू दे
पान पान बहरू दे
मृद्गंध हा आसमंती
श्वास श्वास भरून घे
धुंद धुंद दाही दिशा
भान हरपला वारा
कुंद कुंद हा नजारा
नसानसात भरून घे
ढगाआड लपंडाव
सूर्य पहा खेळतसे
सकाळ की ही सांज
प्रश्न मना हा पडे
धुवाधार येशी कधी
कधी शांत शांत सरी
अनंत ही तुझी रूपे
सारीच मोहवून घे
बीज बीज रुजून ये
कोंब कोंब उमलू दे
पेरीले ते उगवीते
सृजनाचा विश्वास दे
हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
तुझं चालू आहे की सगळं
सुरळीत नियमित अव्याहत
वर्षामागून वर्ष जात आहेत
ऋतुमागून ऋतू बदलत आहेत
फाल्गुन संपला की चैत्राची चाहूल
नाविन्याकडे पुढलं पाऊल
शिशिरात सारं जीर्ण सोडून द्यायचं
आपली आपणच करायची डागडुजी
वसंतात पुन्हा बाळसं धरायचं
मोहोर, धुमारे, सुकुमार चैत्रपालवी
तू लाख शिकवशील हे सगळं, लाखवेळा
पण इथे वेड पांघरायच्या नाना कळा
तेव्हा तुझा आपलं चालू दे असंच
सुरळीत नियमित अव्याहत
कधीतरी येईल शहाणपण आम्हालाही
तुझ्याकडून काय, किती आणि कसं घ्यायचं?
कुठे वहात जायचं आणि कधी थांबायचं?
उन्हाळा तुम्हाला जरा वाटून देऊ का
पाऊसाचा प्रत्येक थेंब मी घेऊन जाऊ का...???
भरून येणाऱ्या आभाळाला मात्र
माझ्या कडे मी घेऊन जाऊ का...???
उन्हाळा तुम्हला जरा वाटून देऊ का...???
आमच्याकडे पाऊसच पडत नाहीये
कोरड्या जमिनीची ढेकळ तुम्हला देऊ का...???
आमच्या कोरडवाहू जमीसाठी मात्र
मी हा पाऊस घेऊन जाऊ का...???
उन्हाळा तुम्हाला जरा वाटून देऊ का...???