
तो माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी आईचं बोट पकडून चालायचे तेव्हापासून आहे.
ऊन्ह कलायला लागली की आम्ही, आजूबाजूची मुलं, आया मंडळी, सगळं गावचं तिकडे लोटायचं म्हणा ना!
जाताना भातुकलीची खेळणी घेऊन जायचं, त्या काळी सँड किट नव्हते ना! ओल्या वाळूत खड्डे खणायचे, विहिरी खोदायच्या, डोंगर बनवायचे, कपात थोड पाणी आणून विहीर भरण्याचा निष्फळ प्रयत्न करायचा, काडीने त्या ओल्या वाळूवर नावे लिहायची, चित्र काढायची, ओल्या वाळूचे मस्त लाडू वळायचे, कधी ते एकमेकांच्या अंगावर फोडले जायचे, तर कधी ते एकमेकांवर रचून त्यांचं कासव बनवायचं..
मैलोन मैल भटकत शंख शिंपले गोळा करायचे.. अगदी पिशवी भरभरून…
मऊ मऊ रेतीत कधी मी
खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या
वाऱ्याच्या संगती
भरती असेल तर धमालच.. उसळत येणाऱ्या लाटांवर उड्या मारत नखशिखांत भिजायचं. त्या खाऱ्या समुद्राच्या पाण्यात भिजायचं, रेतीत पाय रोवून उभे राहिल्यावर जाताना लाट पायाखालची वाळू घेऊन जाते, इंच इंच करून पावलं त्या रेतीत रुतत जातात.. पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय ते अगदी शब्दशः अनुभवायला मिळतं, पाणी हळूहळू पुढे सरकायला लागलं की अचानक लक्षात यायचं अरे आपण चपला काढून ठेवल्यात त्या जातील पाण्यात वहात .. मग पळत जाऊन चपला अजून मागे ढकलायच्या.
फेस फुलांचे सफेद शिंपीत
वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती
गात किनाऱ्याकडे
पण जेव्हा संध्याकाळच्या वेळेला पूर्ण भरती असेल त्यावेळेला पाणी अगदीच पुढपर्यंत असायचं म्हणजे सगळी ओली वाळू पूर्ण पाण्यासाठी.. अशावेळी लाटाही खूपच मोठ्या मोठ्या येत मग आम्हाला अशा वेळी पाण्यामध्ये जायला मज्जाव करण्यात येई..
तुफान केव्हा भांडत येते
सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने
दूर जरा राहतो
मग तेव्हा सुक्या वाळूच्या वाळवंटात खेळत असू. ते खेळ निराळे.. ती वाळू कितीही खड्डा खोदला तरी सुळकन् सरकायची. त्या गार गार मऊ मऊ वाळूत कुठे हा हातच लपव, पाय लपव, कुणाची चप्पलच लपव असे बरेच उद्योग चालत..
इथे खेळताना मात्र थोडं काळजीपूर्वक खेळावं लागे कारण डोळ्यात कधी वाळू जाईल त्याचा भरोसा नसे त्यामुळे वाऱ्याची दिशा बघायला लागे.. वारा पाहून पाठ फिरवावी म्हणजे काय ते शिकायला मिळालं (?)… नाहीतर मोठ्यांकडून ओरडा आलाच म्हणून समजा..
तो लालभडक सूर्याचा गोळा बुडाला की मंडळी हळूहळू घराकडे परतू लागत.
दूर टेकडी वरती पेटती
निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता
घरी जायला हवे
मग त्या दिवशी गोळा केले असतील तर शंख शिपल्यांची पिशवी, दुसऱ्या हातात ती रेतीने माखलेली खेळणी, अंगा-खांद्यावर, केसांमध्ये, कपड्यांवर अशी सगळी मिळून एखाद् किलोची वाळू वागवतच घरी जायचं.
मागच्या अंगणात चुलीवर आधीच पाणी तापायला ठेवलेलं असे. त्या अंधारात रहाटाने विहिरीतून पाणी काढायचं तापवलेल्या पाण्यात मिक्स करायचं आणि पटापटा परत एकदा अंघोळी उरकायच्या, ती सगळी रेती काढून टाकायची. कोणीतरी शंख शिंपले आजीने दिलेल्या टोपलीमध्ये पाण्यात टाकून ठेवायचे..
त्यानंतर शुभम करोति परवचा…
हळूहळू जसे मोठे होत गेलो तसं तसं समुद्रात च्या पाण्यात खेळणं कमी कमी होत गेलं, तेच पाणी मग खारट, अस्वच्छ वाटू लागलं. पण तरी समुद्रावर जायचं कधी थांबलं नाही. समुद्राच्या पाण्यात पाय बुडवायचे ( शास्त्र असत ते) , आणि एका हातात चपला घेऊन किनाऱ्याने चालत जायचं.. कितीतरी तास कितीही लांब सोबतीला गप्पा…
पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर आमच्या परीक्षा सुट्ट्या आणि बाकीच्यां बरोबर जुळत नसल्यामुळे मग एकटीच असे. परंतु संध्याकाळी समुद्रावर जाणं हे एक व्रतच होत. माझच नाही तर गावकऱ्यांचही .. म्हणजे अजूनही आहे.
त्यामुळे कोणी असेल तर बरोबर नाहीतर एकली चलो रे..
समुद्राच्या लाटा बघत वाळूवर बसायचं.. पण ते एकटेपण कधीच एकटं नसे. समोर पसरलेला अथांग समुद्र, उसळत्या लाटा , त्या समुद्राच्या लाटांची गाज, घोंगावणारा वारा, पिवळ्या-केशरी रंगा कडून गुलाबी-कुसुंबी-जांभळट होत जाणारं आकाश, अस्ताकडे निघालेला तो तेजस्वी गोळा, त्या संधी प्रकाशात न्हाऊन निघालेलं पाणी..
खडकावरूनी कधी पाहतो
मावळणारा रवी
ढगा ढगाला फुटते तेव्हा
सोनेरी पालवी
प्रकाश दाता जातो जेव्हा
जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जोडूनी
येती छातीवरी
तासनतास नुसतं बघत बसलं तरी मन भरत नसे. त्या अथांग समुद्रांनी आपण एक छोटा टिपका आहोत ही जाणीव दिली, एकांतात किती बळ असत, सामर्थ्य असतं त्याची जाणीव करून दिली, स्वतःच स्वतःशी संवाद साधायला शिकवलं, भवतालच्या, विचारांच्या कोलाहलात आपण नक्की काय शोधतोय, आपल्याला काय हवंय याचे उत्तर शोधायला शिकवलं. मग त्या शोधात कितीतरी नवनवीन कल्पना सुचतात, नवीन विचार डोक्यात येतात, न झालेल्या जाणिवा होतात..एकांतामध्ये आपण आपल्याशी संवाद साधण्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही मला या समुद्रानेच दिली.
'सांगावेसे वाटले म्हणून' या शांता शेळके यांच्या ललित लेखांच्या संग्रहातील एक लेखात, ‘एकांत: नकोसा हवासा’, सापडलेल्या या काही तुकाराम महाराजांच्या ओळी त्या हव्या हव्याशा सुखद एकांताविषयी म्हणतात:
येणे सुखे घडे एकांताचा वास
नाही गुण दोष येत अंगा
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणासी
त्यातून जाणवली ती विवक्षित ऊर्जा जी ऑक्सिजनच होऊन बसली जणू.. त्यानंतर मग कसंही करून एक दोन आठवडे तरी जायचंच आणि वर्षभरासाठी पुरेल एवढा ऑक्सिजन साठवायचा हा नेमच झाला कितीतरी वर्ष...
त्या सागराची किती रूप, ओहोटीचा शांत निशब्द समुद्र, उलट भरतीचा खळाळता समुद्र, भगवती किल्ल्यावरून बघितलेला खडकांवर आदळणारा खवळता रौद्र समुद्र, चौपाटी किंवा गोव्यावरचा कमर्शियल समुद्र, मरीन लाइन्सचा वैभवशाली समुद्र, बे एरिया आणि एंजलिस मधील अथांग निळाई दाखवणारा पॅसिफिक महासागर. प्रत्येकच रूप विलोभनीय.
आपले काही जवळचे मित्र असतात, कालांतराने ते पांगतात, रोज भेटत नाहीत, पण नंतर कितीही वर्षांनी भेटले तरी असं वाटतं मध्ये काहीच अंतर पडलं नाहीये आणि मागील पानावरून मैत्री तशीच सुरू रहाते.
तसंच काहीस इथेही झालं.. दरवर्षी होणारी भेट कधी दोन वर्षांनी तीन वर्षांनी व्हायला लागली. हळूहळू तो काळही वाढत गेला.
पुढे कॅलिफोर्नियाला आल्यावर दिसला तो पॅसिफिक महासागर. त्याचं ते साजरे रूप, अथांग पसरलेली निळाई, वर निरभ्र निळभोर आका, फेसाळत्या लाटा, पांढरट पिवळसर वाळू.. हे बाह्यरूप जरी वेगळं असलं तरी तोच मन व्यापून टाकणारा अथांगपणा आणि त्याला समर्पित होत, त्यात हरवत चाललेली वाळूवर बसून अनुभवणारी मी..
आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे
तळटीप - मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून, समुद्राशी जडलेल्या अतूट नात्यावरती व्यक्त केलेले हे मनोगत!
थोडं उशिरा का होईना, पण लहानपणी शिकलेली कुसुमाग्रजांची ‘आवडतो मज अफाट सागर’ ही कविता आठवली. पूर्ण कविता आंतरजालावरुनं शोधून काढली. कवितेच्या ओळी लेखांमध्ये समाविष्ट करत आहे.
-Prerana Kulkarni
#nisarganimi #निसर्ग #beachvibes #memories #समुद्र
खूपच सुंदर लिहिलं आहे. किती
खूपच सुंदर लिहिलं आहे. किती तरी वाक्यांना अगदी अगदी झालं.
समुद्राच्या लाटा बघत किती ही वेळ बसलं तरी समाधानच होत नाही. सूर्य अस्ताला जाताना लाटांवर स्वार होऊन सूर्यबिंब हातात घेत येईल इतकं जवळ येतं
पाण्यात जायला मात्र लहानपणापासून बिग नो.. ती ओली वाळू अंगाला चिकटलेली सहनच होत नसे.
दोन्ही एकच आहेत पण मुंबईचा आणि कोकणातला एकच आहेत का असा संभ्रम पडतो बघताना...
दोन्ही एकच आहेत पण मुंबईचा
दोन्ही एकच आहेत पण मुंबईचा आणि कोकणातला एकच आहेत का असा संभ्रम पडतो बघताना...>> Hmm खरं आहे. :
धन्यवाद मनीमोहोर
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
किती तरी वाक्यांना अगदी अगदी
किती तरी वाक्यांना अगदी अगदी झालं.
>>>>
+७८६
सुन्दर लिहिले आहे..
सुंदर लिहिले आहे आणि फोटोज
सुंदर लिहिले आहे आणि फोटोज अतिशय सुंदर.
समुद्राच्या पाण्यात पाय बुडवायचे ( शास्त्र असत ते) >>>अगदी अगदी मी पण कितीही अस्वच्छ वाटलं तरी समुद्रातल्या पाण्यात पाय बुडावल्याशिवाय राहू शकत नाही मग ते गिरगाव चं असो वा वसईचा समुद्र असो.
मला तर अश्या समुद्रकिनारी गाव असणार्याचा फार हेवा वाटतो.
समुद्रात तासंतास चालणे कधीही थकवत नाही .समुद्राच्या लाटा अनुभवत सूर्यास्त पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा भाग आहे
खूपच छान लिहीले आहे. शेवटचा
खूपच छान लिहीले आहे. शेवटचा फोटो किती गोड..किती गोड!!
सर्वच फोटो आवडले.
शर्वरी , ऋन्मेऽऽष, सिमरन
शर्वरी , ऋन्मेऽऽष, सिमरन आणि सामो अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
खूप छान लिहीले आहे.
खूप छान लिहीले आहे.
छान, सुंदर आठवणी.
छान, सुंदर आठवणी.
फोटो खूप छान आहेत.
छान लिहिले आहे. शेवटले तीन
छान लिहिले आहे. शेवटले तीन फोटो विशेष आवडले.
सामी, ऋतुराज, आणि मानव
सामी, ऋतुराज, आणि मानव अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
हळूहळू जसे मोठे होत गेलो तसं तसं समुद्रात च्या पाण्यात खेळणं कमी कमी होत गेलं, तेच पाणी मग खारट, अस्वच्छ वाटू लागलं. पण तरी समुद्रावर जायचं कधी थांबलं नाही. समुद्राच्या पाण्यात पाय बुडवायचे ( शास्त्र असत ते) , आणि एका हातात चपला घेऊन किनाऱ्याने चालत जायचं.. कितीतरी तास कितीही लांब सोबतीला गप्पा… >>> मला अजुनही समुद्रात या डुंबा डुंबा करायला आवडतं.
धन्यवाद नताशा!
धन्यवाद नताशा!