सुट्टी
दिवाळीची सुटी तोंडावर आलेली.
हवेत गारवा वाढायला लागलेला.
दुपारचं मऊ ऊन हवंहवंसं वाटणारं.
जवळपास रिकामं झालेलं कॉलेज आणि होस्टेल.
कुठेतरी तुरळक चुकार मुलंमुली.
तेही आपल्यासारखेच निवांत.
कॅन्टीनही शांत.
किंबहुना सगळ्या हवेवरच एक उबदार, आनंदी निवांतपणा पसरलेला.
आपलं काही तरी बारीकसं काम कॉलेजमध्ये.
ते आटपून आपणही दिवाळीला घरी जायला निघणार.
अशा वेळी कॅन्टीनमध्ये अनपेक्षितपणे भेटलेला मित्र आणि त्याच्याबरोबर घेतलेला चहा.
काय रंगतात ना गप्पा अशा वेळी!