चिंब चिंब ... टिंब टिंब ...
आला आला ... अबे जाईल. नाही रे कसला जातोय, त्या खिडक्या कसल्या सपासप धुतल्या जातायत बघ, पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली. धावतोय, धावतोय लिफ्टकडे त्या काळ्यापांढर्या कॉरिडॉरमधून ... प्रेग्नंट बायकोच्या रूमकडे धावत जावं कोणी आतुर नवर्याने तसं धावतोय ... अजगरासारख्या रात्री श्वासांचा जड आवाज ... लिफ्टची खडखड ... आलो खाली. धाव त्या दारातून, सोड तो सेंट्रलाईझ्ड एसी. आणि मग तुम्हाला दिसतो तो पाऊस. चित्त्यासारख्या झेपा घेत येतोय च्यायला. पाण्यालासुद्धा धरतीची ओढ आहे. हा भिजण्याचा पाऊस नाही. तो सांगतोय तुला, बाजूला सर मुकाट, नाहीतर छिन्नविछिन्न करून टाकेन.