चिंब चिंब ... टिंब टिंब ...

Submitted by भास्कराचार्य on 10 July, 2017 - 16:28

आला आला ... अबे जाईल. नाही रे कसला जातोय, त्या खिडक्या कसल्या सपासप धुतल्या जातायत बघ, पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली. धावतोय, धावतोय लिफ्टकडे त्या काळ्यापांढर्‍या कॉरिडॉरमधून ... प्रेग्नंट बायकोच्या रूमकडे धावत जावं कोणी आतुर नवर्‍याने तसं धावतोय ... अजगरासारख्या रात्री श्वासांचा जड आवाज ... लिफ्टची खडखड ... आलो खाली. धाव त्या दारातून, सोड तो सेंट्रलाईझ्ड एसी. आणि मग तुम्हाला दिसतो तो पाऊस. चित्त्यासारख्या झेपा घेत येतोय च्यायला. पाण्यालासुद्धा धरतीची ओढ आहे. हा भिजण्याचा पाऊस नाही. तो सांगतोय तुला, बाजूला सर मुकाट, नाहीतर छिन्नविछिन्न करून टाकेन. हॅलोजनच्या दिव्यालासुद्धा झाकोळून टाकलंय त्याने. थांबलोय त्या मोठ्ठ्या कॉरिडॉरसमोरच. छप्पर असूनही जायची सोय नाही, कारण समुद्राकडून येणारा वारा घेऊन येतोय पावसाचे झोत. लढाईत साल्या अशाच सगळीकडून गोळ्या सुटत असतील. मर्ढेकरांसारखं 'हलायचीही सोय नाही, चलायचीही सोय नाही' म्हणत बसावं. सालं ह्या पावसात शांतही बसता येत नाही. पावसाचा आवाज, समुद्राचा आवाज ... मी मनातल्या मनातच विरघळतो. देऊन टाक सगळ्या विचारांचं दान च्यायला ... गणितातून उठून तू ह्याचा आस्वाद घ्यायला आलास. पहिल्यांदा हायर मॅथमॅटिक्स करायला सुरवात केली, त्यावर्षी कॉलेजमध्ये असाच भिजला होतास तू ... मस पाऊस पाह्यलाय च्यायला. पण अंगाचा प्रत्येक कण थेंबच व्हावा असं तीनदाच भिजलोय. दोनदा तर जबरदस्ती होती. एकदा २६/७मध्ये तासनतास भिजलो, एकदा बॉस्टनमध्ये वादळी थंडगार डिसेंबरचा पाऊस, सगळ्या गाड्या बंद. भरलेल्या स्टेशनला वैतागून तू जाऊन बसलास कॉमन्समध्ये आणि तो पाऊस, ओह तो पाऊस ... आय कॅन स्टिल फील इट इन प्लेसेस ऑन कोल्ड इव्हनिंग्ज ... तू भयंकर आजारी पडलास तेव्हा, पण तुझी मस्ती काही गेली नाही. पण हे कॉलेजमध्ये भिजणं ... मित्रांबरोबर ... माजलेले हत्ती झालो होतो आपण सगळे. सगळे रस्ते बंद, वाहनं सगळी कव्हरं मिटून गुडूप होऊन बसलेली, तेव्हा तू रस्त्यावर जाऊन अक्षरशः चिखलात खेळत होतास. पाणी एकमेकांवर उडवत होतात. फोटो काढत होतात. स्मार्टफोन्स नसल्याचा तो जमाना ... अजूनही ते फोटो तू जपून ठेवले आहेस. उद्या कधी पोरंटोरं फार सिरीयसपणाची झूल अंगावर चढवायला लागली, तर त्यांना दाखवायचे. आता तर साली लेप्टो, स्वाईन, काय कशाकशाची भीती वाटते. क्यूं इतना डरते हो यार ... कुछ मजा ले लो. लाईफ इज एनीवेज अ स्ट्रींग ऑफ रँडम इव्हेंट्स. कर लो रँडमगिरी. पाऊस साला आता ताशासारखा तडतड वाजतोय त्यानेच जमवलेल्या पाण्यावर. काय मस्त ताल धरलाय यार. मस्त स्टीरीओ आणावा आणि नाचावं मनसोक्त. ओढून घ्यावं तिला जवळ आणि ... 'छुप जाएँ कहीं आ कि बहुत तेज़ है बारिश, ये मेरे तिरे जिस्म तो मिट्टी के बने हैं' ... चल कहीं पिघल जाये हम दोनो साथसाथ. असा पाऊस एन्जॉय करता यावा, म्हणून तर रिसर्च बरा. वाटेल तेव्हा उठा आणि पाऊस बघायला जा. रात्रीचे २ वाजलेत च्यायला, पण आपल्याला काही आहे? ती बघ पोरं सिगरेट प्यायला आली. इट किल्स मॅन, इट किल्स ब्रुटली. कमी प्या च्यायला. पूर्वी शाळेच्या मैदानावर वारा सैरावैरा धावायचा तसा हा पाऊस धावतोय ते बघा. साला पाऊस आपल्याला लहान करून सोडतोय बघ. असू दे जोरात, जा उभा राहा त्या आभाळाकडे बघत. खा मार पावसाचा, लोकलमध्ये दारात खायचो तसा. हो चिंब, घाल धूडगूस त्या पाण्यात, बघू दे त्या पोरांना आश्चर्याने. आखिर जितने हम बडे हो जाते हैं, मनमें बचपना बढ ही जाता है ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहोत खूब! अगदी समोर बसून कुणीतरी कुणालातरी (स्वतःलाच) बोलल्यासारखं...अत्यंत ओघवतं,ऊत्स्फूर्त लिखाण! शुभेच्छा!

>>>'छुप जाएँ कहीं आ कि बहुत तेज़ है बारिश,
ये मेरे तिरे जिस्म तो मिट्टी के बने हैं'>>>सो रोमॅंटिक!

अवांतर—सबा इकराम यांच्या याच गझलेतील एक शेर अाठवला...
'इस घर में किसे देते हो अब जा के सदाएँ
वो हारे थके लोग तो अब सो भी चुके हैं'

मस्त भा! एकदम वेगळे!

उद्या कधी पोरंटोरं फार सिरीयसपणाची झूल अंगावर चढवायला लागली, तर त्यांना दाखवायचे. >>> हे सर्वात सही Happy

व्वाह! मजा आली वाचायला Happy असं मनसोक्त भिजायला मुकलोय बर्‍याच वर्षांपासून... कधी मधी हौस म्हणून घेतो भिजून, पण असा बेधूंद होऊन नक्की भिजायचंय परत...

लाईफ इज एनीवेज अ स्ट्रींग ऑफ रँडम इव्हेंट्स. कर लो रँडमगिरी.>>> अगदी, अगदी झालं या वाक्याला __/\__

वाह, मज्जा आली वाचताना! मुसळधार पावसात भिजताना मनातली inhibitions पण वाहून जातात असं वाटतं!

छान लिहिलंय, पण ते इतके टिंब टिंब का दिलेत? थांबत थांबत वाचावं लागलं त्याने.
पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली >> याने कुठली तरी `आठवण` येते का ते 'बघत' होतो. Proud

आवडलं.
पाऊस खूप आवडतो मला म्हणून पाऊस हे पात्र असलेलं लेखन आवर्जून वाचतो.
तुमचं हे लिखाण खासच!