किस्से आणि निरीक्षणं (भाग ८)....बदला - एक अवघड सूड.
बॅग टेकवतोय न टेकवतोय तोवर वाड्यातली पोरं म्हणजेच मित्र मंडळी दरवाज्याच्या भोवती गराडा घालून उभी राहिली. लय दिवसांनी आपला मित्र गावाला आल्याचा आनंद त्यांच्या तोंडावरून ओसंडून वाहत होता. त्यातली काही एक बाहेर येण्यासाठी हाथवारे करत होती. बाहेर जाण्याची ओढ होतीच, मी इशाऱ्यानंच खुणावलं “पुढं..व्हा...!!! आलोच. तितक्यात आजी लुटपुटत माझ्याजवळ आली आणि गच्च तोंड धरून गालाचा ओलसर मुका घेतला. अख्खा गाल ओला झाला. तोंडात सतत मिस्रीचा बुकना असल्याने मुका घेतांना गचाळ वासाने नाकाची कोंडी केली, पण शेवटी आजीच ती.