किस्से आणि निरीक्षणं (भाग ८)....बदला - एक अवघड सूड.

Submitted by बग्स बनी on 5 April, 2017 - 19:46

बॅग टेकवतोय न टेकवतोय तोवर वाड्यातली पोरं म्हणजेच मित्र मंडळी दरवाज्याच्या भोवती गराडा घालून उभी राहिली. लय दिवसांनी आपला मित्र गावाला आल्याचा आनंद त्यांच्या तोंडावरून ओसंडून वाहत होता. त्यातली काही एक बाहेर येण्यासाठी हाथवारे करत होती. बाहेर जाण्याची ओढ होतीच, मी इशाऱ्यानंच खुणावलं “पुढं..व्हा...!!! आलोच. तितक्यात आजी लुटपुटत माझ्याजवळ आली आणि गच्च तोंड धरून गालाचा ओलसर मुका घेतला. अख्खा गाल ओला झाला. तोंडात सतत मिस्रीचा बुकना असल्याने मुका घेतांना गचाळ वासाने नाकाची कोंडी केली, पण शेवटी आजीच ती. “लय मोठा झालाय माझा राजा...” आपले थरथरणारे हाथ माझ्या डोक्यावरून अन गालांवरून मायेने फिरवत आजी म्हणली. मी नाईलाजाने हसत ते सगळ सहन करत होतो. स्वागत झाले, एकमेकांची विचारपूस करण्यात सारे गुंग झाले. याच संधीचा फायदा घेत सगळ्यांच्या नकळत आतल्या कोनाड्यात ठेवलेल्या बॅगेकडे सरकलो. आवाज न करता हळूच बॅगेची चैन खोलून टॉवेल अन चड्डी बाहेर काढली. पँटच्या खिश्यात चड्डी दडवून एकदम स्टाईल मध्ये टॉवेल गळ्यात अडकवला आणि चोरासारखा बाहेरच्या खोलीत आलो. कोणाचाच लक्ष नाही हा डाव साधून पाऊल घराबाहेर टाकल. एकदम स्वतंत्र असल्यागत वाटत होतं. पुढं गेल्यावर, माझी वाट बघणारी पोरं, जवळ आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड आनंद आणि उत्साह होता. गण्या, आमल्या, परश्या, सोम्या, आणि बबल्या, सारे मला भेटायला आले होते. खूप आनंद होत होता.
“लय बदललायस...लका..” सोम्या डोळे उडवत म्हणाला.
“कुठं बदललोय रं...?” मी म्हणालो. “बाहेरनं बदललो आसलो तरी वात्रटपणा बदलला न्हाय अजून.”
“हुं रं माझा पठ्या...” पाठीवर थाप टाकत बबल्या चेकाळला.
“काय मंग...? कशे आहात सगळे..? बाकी कसं चाललंय...?” मी सलग प्रश्न केले.
“आरं हो हो हो....किती प्रश्न इचारशील...?” आमल्या म्हणाला.
“आम्ही सगळे मजेत आहोत” गण्या बोलता झाला. इतकावेळ गप्प असलेला परश्या म्हणाला...
”मागच्याच महिन्यात इनामदाराचा मळा जाळला...”.
“अख्खा मळा..???” मी परश्याला मधेच तोडत आश्चर्यानं विचारलं.
“व्हय, अख्खा मळा...” सोम्या म्हणाला.
“का रं..” मी पुन्हा विचारलं. “फुकनीच्यान आमच्या वर आळ आणला...” बबल्या फुत्करत म्हणाला.
“व्हय, अन त्या दिवशी याच्या बा नं याला लई तुडीवला, रातच्याला.” खें खें खें, दात काढत आमल्या म्हणाला.
“पण कसला आळ...?” मी पुन्हा म्हणालो.
“आरं, वांडरांनी तेच्या मळ्यातलं सगळं हरभर उपटून टाकलं. त्याच्या नंतर हावळा भाजाय आम्ही एक ढाळा उपटला, अन नेमकं त्या बाबू आगलाव्यानं पाह्यलं. मग केला कि बोभाटा...लय शिव्या घातल्या इनामदारानं...” सोम्या म्हणाला.
“म्हणून अख्खा मळा...?”. मी म्हणालो.
“ह्म्म्म...मग सोडतुय का काय..? मग आख्या वावराचाच हावळा केला. बस बोंबलत...” परश्या म्हणाला.
“लय धुडगूस घातला लका.., तू हवा व्हातास. लय आठवण आली तुझी.” गण्या म्हणाला.
“आयघाल्यांनो, मला सोडून मजा करताय ना...??” मी नाराजीच्या स्वरात म्हणालो.
“त्या आगलाव्याच्या आयची तर....लय तुडीवलाय मला, त्याच्या मुळं, घावला पायजे....पोत्यात घालून हानीन...” कसस तोंड करीत बबल्या म्हणाला.

(बाबू आगलावे उर्फ बाबुराव दगडू आगलावे, खऱ्या अर्थानं आग लावणारा आसामी. जेमतेम ६०-६५ वर्षाच म्हातारं. पण जावानिच्या आगीत फडफडत होतं. जस जस वय वाढत होतं, तसं तसं तरणं (तरुण) व्हत होतं. गावातला पंच, नेहमी पुढं पुढं करणारा. नेहमी काहीतरी होपाळल्यागत बोलायचं, त्यामुळं बरीच गावकरी त्याच्या माघारी त्याला शिव्या द्यायची. बरीच कशाला सगळेच गावकरी. बायकांशी लगट करणे, गुलूगुलू बोलणं या साठी लय फेमस. त्या उलट बाप्या माणसांवर डाफरनं, खेकसनं हे त्याच नेहमीचच.)

“हाय व्हय ती म्हातारं अजून....?” मी विचारलं.
“तर...तेला काय हुतंय...? हाय अजून टांग टुंगीत” परश्या म्हणाला.
“घ्या नाव घेतलं आन गयबानं हाजर...फुकनीच.” आमच्या दिशेनं येणाऱ्या बाबू आगलाव्याच्या आकृति कड बघत आमल्या त्वांड वाकडं करीत म्हणाला.
तो पर्यंत बाबू आगलावे आमच्याजवळ आला. आपल्याच तंद्रीत घाई घाईत निघालेला. मी सगळ्यांना डोळा मारत म्हणालो
“थांबा... ह्याची मजा करतो.” आणि मी आवाज दिला.
“ओंव...नाना....काय..मंग..?? कुठं..??”
ढुंगणावर हाताची घडी आणि मान खाली घालून चालेलं म्हातारं. माझ्या आवाजानं तंद्रीतन बाहेर आलं, आन ठेसकाळलं....”आर...हो हो हो हो...पडलं पडलं....” सगळी पोरं खें खें हसु लागली.
“हो हो नाना... सावकाश, जरा बघून...जाशान अशानं...” मस्करीच्या स्वरात मी म्हणालो.
“आरं, लेका तू...?? कवा आलायस..??”. त्यांनी स्वतःला सावरत इचारलं.
“हे काय आत्ताच आलोय.” मी पुन्हा म्हणालो.
“सगळे आलाय व्हय...??”. खिशातन तंबाखूची पिशवी काढून त्यातली थोडीशी तंबाखू हातावर घेत त्यांनी पुन्हा प्रश्न केला. “बा..??...बा आलाय का तुझा...???”. तंबाखू मळत त्यांनी विचारलं.
“हो आलेत कि, सगळेच आलोय आम्ही. हायेत घरात.” मी उत्तरलो.
“बरं बरं...” मळलेली तंबाखू चिमटीत पकडून, ओठांच्या मागे दडवीत त्यांनी त्यांचा मोर्चा आमच्या घराकडं वळवला. पुन्हा ढुंगणावर हातची घडी घातली, मधेच तोंड एका बाजूला काढून पिचकारी मारत ते निघून गेले.
“कशाला अडवायचं रं तेला...?, तरी नशीब काय पाचकळ आस बोललं न्हाय.” सोम्या म्हणाला.
“जाऊ दे रं त्याला....तुम्ही बोला राजं काय करायचं..? कुठं जायचं...??”. आमल्या मझ्याकड बघत म्हणाला.
“चला आडात...” मी चटकन म्हणालो. “पाणी हाये का रं...?” मी माझी शंका मांडली.
“तर लेका, ढीग हाय पाण्याचा.” गण्या म्हणाला.
“चला मग...नंतर तसच रानमेवा चरुया...” मी म्हणालो.
ठरलं आम्ही आडाच्या दिशेनं निघालो........

-------------------------------------------------------------------------

इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकत आम्ही आडाजवळ पोहोचलो. पाण्यात उतरलो. हे खोच, हे मुठका, ह्या उड्या...अख्खा आड गजबजावून सोडला. पाण्याच्या अक्षरशः लाटा केला. एक-दीड तास मनमुराद पोहण्याचा खेळ खेळून आता जाम दमलो होतो. भूक हि लागली होती.
“चला ये मी बास...” मी पायऱ्या चढत ओरडलो.
“का रं...?” सगळ्यांनी एका सुरात विचारलं.
“भूक लागलीय रं...” केविलवान तोंड करत मी म्हणालो.
“मग घरी जाणार...??” गण्या धापा टाकत म्हणाला. “न्हाय रे....
चला, थोडीशी शोध मोहीम करून याव म्हणतोय. रान मेवा..?” मी कट्ट्यावर उभा राहून डोकं पुसित म्हणालो.
“बेस...चल, ये चला रं...” आमल्या म्हणाला. एकापाठोपाठ एक सगळे आडाच्या बाहेर आले. अंग पुसण्याचा कार्यक्रम झाला. कपडे बदलले. आता रानमेवा हंट करायला सारे सज्ज झाले. गळ्यात टॉवेल अडकवून ओल्या झालेल्या चड्ड्या डोक्यावर अडकवण्यात आल्या. (अस केल्याने चड्डी सुखते हि लवकर आणि उन हि लागत नाही.)
“आरं..पण जायचं कुठं...??” परश्यानं विचारलं.
“मला काय माहित...तुम्हाला माहित असेल...मी थोडेच राहतो इथ..” मी म्हणालो.
“संज्या पिसाळाच्या बांधाला चिच च (चिंचेच) झाड आहे, लई मोठ्ठा बहर आलाय. कालच पाह्यलं.” सोम्या म्हणाला.
“आरं पण त्यो लय खडूस हाय. मागं त्या मन्याला सरळ फोडला हुता...ते बी नेमकं गावलं तेच्या तावडीत.” बबल्या नकार दर्शवण्याच्या उद्देशान म्हणाला.
“ए हो रं, ते तर सरळ हाणत....नगं तिथं....आपण एक काम करू त्या पाटाच्या बाजूला आंब्याच झाड आहे तिथं जाऊ. आंबे बी खाऊ आणि थोडसं लोळू..तिथच रामफळ बी लागलेत.” गण्या एका दमात म्हणाला.
“ए पाटात जाऊ कि...चीलापी....रात्री मस्त बेत करू मग...काय म्हणतुस.?” आम्ल्यान विचारलं.
बराच वेळ शांततेत गेल्यानंतर तिथेच बाजूला पडलेली लांबसडक काठी उचलत मी म्हणालो.
“काय नाय होत... जाऊ तिथच...चिचा पडाय...आन मग आंबे, रामफळ, आणि मग चीलापी. काय करतोय पिसाळ तवा, मी आहे कि, चला.”
“आरं पण...”,
“व्हय काय करतोय पिसाळ तवा, आपण बी काय कमी आहोत व्हय..? दावू कि मंग आपला मासा.” गाण्याला मध्येच तोडत सोम्या म्हणाला.
परश्या एव्हाना वाटेला सुद्धा लागला.
“आरं, ते बघ ते निघालं.” अस म्हणत मी सुद्धा त्याच्या मागे निघालो.

-----------------------------------------------------------------------------------

संज्याचं रान तसं बरंच लांब होतं. म्हणून मग कोणाच्या तरी शेतात शिरून संज्याचा माळ सर करत होतो. उसाच्या गर्दीतनं आम्ही मोकळ्या वाटेवर आलो. इतक्यात परश्या जोरश्यान आराडला....
”ये मन्या....हय”.
लांब तिथं एका झाडाखाली कोण तरी झोपलं होतं. परश्याच्या ओरडण्यानं ती व्यक्ती उठून बसली, आणि हाथ वर करून परश्याच्या आरोळीवर प्रतिसाद दिला. ती व्यक्ती उठून उभी राहिली, आणि पॅंट झाडत आमच्या दिशेनं येऊ लागली.
“कोण हाय रं...??” मी विचारलं.
“आरं मन्या हाय आपला...” परश्यानं सांगितलं.
मन्या आता आमच्या जवळ येऊन पोहोचला. येत येतच त्यानं मला विचारलं,
“आरं तू...? कवाशी आलायस..??”. मी काही म्हणणार इतक्यात सोम्या म्हणाला. “झालं २-३ तास....तू काय करतुयास..?”
“काय न्हाय पडलो हुतो जरा...” मन्या उत्तरला.
“येतुईस का..?” परश्यानं विचारलं.
“कुणीकडं निघालाय तुम्ही सगळे..?”. मन्यानं प्रश्न केला.
गाण्यानं सारं नियोजन मन्या समोर मांडलं.
“चला...मी बी येतू..” मन्या उत्साहानं म्हणाला.
“मागल्या पावटीचा मार कमी झालाय व्हय..?” बबल्या मन्याला खिजवत म्हणाला.
“गप ये, शाना हायेस...संज्या पिसाळ गेलाय गावाला सांच्याला ईल माघारी तवर चिचा आपल्याच.” मन्या भाव खात म्हणाला.
अरे वा आमच्या साठी तर हि एक पर्वणीच होती. चला, आमच्यात आणखीन एक सवंगडी सामील झाला. मस्ती करीत हुंदडत आम्ही संज्याच्या रानाजवळ पोहोचलो होतो. दुपारच्या पिवळ्या रंगात न्हाहत संज्याच्या रानातला शाळू ऐटीत डुलत होता. लांब-लांब वर पसरलेला तो शाळू दुपारच्या गडद शांततेत कुजबुजत होता. चिचेचं झाड रानाच्या त्या कोपऱ्यात होतं.
“त्योक ए...किस्त्या चिचा लागल्यात लका...” बबल्या जवळ जवळ चेकाळलंच.
“ए चला, बघू कोण पयलं पोचतंय..” म्हणत मी धावू लागलो, माझ्या मागनं सारी. बांधा-बांधानं आम्ही धावत चिचेचं झाड गाठलं. सगळे धापा टाकत त्या चीचेच्या झाडाखाली आपापल्या गुडघ्यांवर हातांचा टेकू देऊन हसत होतो. व्वा...काय घबाड मिळालंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड आनंद, गगनात देखील मावणार नाही असा. झाडाला खरंच भरघोस बूटबुटीत चिंचा लोंबत होत्या. इतक्या चिंचा इतक्या चिंचा...आहाहाहा... तोंडाला पाणी सुटलं. झाडाभोवती खाली स्वतःहून पडलेल्या चिंचा पाहूनच पोट भरलं होतं. सभोवताली नुसता सडाच जणू. आता कधी एकदा ते चिंचेच बुटुक जिभेवर टेकवून तोंड आंबूस करतोय असं झालं होतं. सर सर सर ... हे हे म्हणता मन्या झाडावर पोचला पण. त्याच्या माग बबल्या, मग सोम्या, मग मी, मग गण्या. एकापाठोपाठ झाडावर आक्रमण केलं. वांडरं उड्या मारावीत तशी मन्या आणि बबल्या रपरप झाडाच्या शेंड्यावर पोहोचले. आमल्या आणि परश्या खालीच चिचा गोळा करायला उभे राहिले होते. आम्ही एका एका फांदीवर उभे राहून गदागदा फांदी हलवून चिचा पाडायला सुरुवात केली. चिंचेचा जणू पाऊसच तो. आमल्या आणि परश्याला कोणती चिंच उचलू न कोणती नको अस झालं. हे हे म्हणता म्हणता चिंचांचा ढीग जमा झाला. झाडावरल्या चिचा झाडावर कमी आणि खालीच जास्त दिसत होत्या. तरी बऱ्याचश्या चिचा बाजूलाच असलेल्या विहिरीत पडल्या त्यामुळे त्या वायाला गेल्या. काही चिचा तिथच बाजूला असलेल्या मोटारीतन वगळून झालेल्या चिखलात बरबटून बाद झाल्या. एक टॉवेल खच्चून भरला. पण आमची हाव काय गेली नाही. जवळ जवळ बऱ्याच चिंचा झाडांवरून गायब झालेल्या. हळू हळू झाड लंकेच्या पर्वतीप्रमाणे भासू लागलं. आम्ही सारे ताकदीन एक एक फांद्या हलवून चिंचा पाडत होतो. खालून चिंचेच बुटुक चोखत परश्या म्हणाला...
”ए बास झालं...या खाली.”
बऱ्याच चिंचा गोळा झाल्या होत्या. हळू हळू आम्ही सगळे खाली आलो. पण मन्या अजून वरच होता. झाड तसं लयच जुनं होतं, म्हातारं झालं होतं. मन्या पार शेंड्याला पोहोचला होता. एका मोठ्या भरगच्च फांदीवर जाऊन उभा राहिला, आणि जोर जोरात फांदी हलवू लागला. त्या फांदीला भरपूर चिंचा लागल्या होत्या. मन्या नाचतंय नाचतंय, इतक्यात कड..कडामम्म....आवाज आला, क्षणात मन्या त्या भल्या मोठ्या फांदिसकट जमीनदोस्त झाला. सगळे खिदळायला लागले. त्या फांदीवरच्या बुटक्या काट्यांनी मन्याच्या शरीरावर बरेचशे ओरखडे आले होते. मन्या ढुंगण चोळत उठला, आणि वर पाहिलं. झाडाची अक्षरशः हालत झाली होती. आता सारे भानावर आले होते. झाड एकदमच खिन्न वाटत होतं. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. संज्याला कळलं तर आपली पुरती वाट लागणार.
“ए चला, कोणी बघायच्या आत निसटुया इथनं...” टॉवेल ची गाठ मारत सोम्या काळजीनं म्हणाला.
“आयघातली....गेलो...” आमल्या रडवेला होऊन म्हणाला.
“का रं काय झालं..?” आम्ही साऱ्यांनी एकसुरात विचारलं.
“आरं ते बघ, आगलाव्या येतुय...” गण्या घाबरून म्हणाला.
पळा पळा म्हणत आम्ही सगळे तिथनं पळतच सुटलो. सगळ्यांनी धास्ती खाल्ली. आज राडा होणारच, आगलाव्या चोंबडेपणा करणार.
“न्हाय रं उगी घाबरताय तुम्ही, नसल पाहिलं त्यानं...” आमल्या धीर खात म्हणाला.
तिथच एका बाभळीच्या झाडाखाली आम्ही आमची फतकल टाकली. आणि बसून चिंचेच्या वाटण्या करू लागलो. चिंचेच्या वाटण्या झाल्या. प्रत्येकानं वाटणीला आलेल्या चिंचा आपापल्या टॉवेलात बांधल्या.
“ए चला घरी...लई उशीर झालाय.” मी म्हणालो.
“ए हो रं...चला, खरंच जाऊयात बास झालं आजच्याला एव्हढ..” बबल्या म्हणाला.
आगलाव्याच्या येण्याने पळून पळून एकूण एक दमले. थोडावेळ बसून आम्ही घराच्या वाटेला लागलो. संध्याकाळ होऊ लागली होती. जाताना मुद्दामून आम्ही फिरून गेलो. घर जवळ आलं होतं. डोक्यावरच्या चड्ड्या केव्हाच वाळल्या होत्या. त्या पुन्हा खिशात दडवल्या गेल्या. सगळे आपल्या घरी पोहोचले. मी हि. दिवसभर पोहून, पळून, चालून, मस्ती करून लय दमायला झालं. घरात पाऊल टाकल्या टाकल्या आमच्या पिताश्रींची जोरदार चपराक माझ्या कानाला सुन्न करून गेली.
“कुठं होतास रे भाड्खाऊ..?” शिव्यांच्या विजा माझ्यावर कडाडू लागल्या.
झालं...घरात सगळ्यांची बडबड सुरु झाली. सगळे जन चारही बाजूंनी माझ्या वर तुटून पडले. त्या सगळ्यात आजी मात्र माझी बाजू घेत होती. आणि सगळ्यांना गप्प बसवत होती. मी आपला एका कोपऱ्यात बसून रडत होतो. रडून रडून झोपी गेलो. थोड्या वेळानं बाहेरच्या कालव्यान जाग आली.

---------------------------------------------------------------------------------

बाहेर प्रचंड शिव्या हासडा हासाडीची स्पर्धा रंगावी अस काहीस ऐकू येत होतं. मनात शंकेची पाल चुकचुकली. बाहेर कडूस पडलं होतं. मी हळूच बाहेर आलो. व्हरांड्यात उभा राहिलो. इतक्यात समोरून आवाज आला...
”ह्योक ए संज्या ह्यो पठ्ठ्या बी हुता...”
माझी तर दातखिळीच बसली. पिताश्रींनी कानाला धरून बाहेर ओढलं, मोकळ्या आवारात. एव्हाना कळून चुकल नक्की कसला कालवा आहे. खाली असलेली मान हळू वर झाली, समोर बघतोय तर...ओळखीचीच कार्टी. दुपारच्या चिंचहरणात सामील असलेले साथीदार.
“माझ्या पणज्यानं लावलेलं झाड, काय दशा केलीय....” संज्या पिसाळ आक्रोश करत होता.
मध्ये मध्ये शिव्या देत होता. इतक्यात बबल्याचा बा हासुड घेऊन आला, आन त्यानं बबल्याला फोडायला सुरुवात केली. झालं .... आमच्या सगळ्यांच्या बापांना चेव आला, हे...सगळ्यांनी आम्हाला फोडायला सुरुवात केली. दिवसभराच्या दमलेल्या वातावरणात आता माराची भर पडली. आम्हांला मारत असतांना बऱ्याच वेळानंतर आगलाव्या मध्ये पडला आणि थांबायची विनंती केली.
“संज्या आरं, जाऊ दे लहान हायेत पोरं...जाऊ दे..”.
सगळ्यांनी आपापली पोरं वढत, मारतच घरात नेली. मला हि. थोड्याच वेळात गर्दी पांगली. मन्याला तर मारून मारून सुजीवला. अपमान....घोर अपमान, चार चौघात मार बसला. बऱ्याच वेळान वातावरण निवळल. मी रुसून आपला नेहमीच्या जागेवर बाहेर कट्ट्यावर जाऊन बसलो. माझ्या सारखेच बाकीचे पण आले होते. एव्हाना सगळं जिथल्या तिथं झालं होतं. अंधार पडला होता. कुठे तरी लांब एका डांबावर बल्ब पेटला होता. आमचा कट्टा जमला, चर्चा सुरु झाल्या.
“लई हाणला रं...” कण्हत मन्या म्हणाला.
“तर....., आमची मोठी पूजा केली....म्हणे लई मारला.” सोम्या वैतागून म्हणाला.
“झक मारली न तुमच्या सोबत आलो...मी आपला मस्त झोपलो हुतो....” पुन्हा मन्या म्हणाला.
“आग्लाव्यान काशी केली...” आमल्या डोळ्यात आग आणत म्हणाला.
‘लई झालं हा याच....तेला इंगा दावलाच पायजे...” सोम्या म्हणाला.
“या आगलाव्याच्या आयच्या गावात....कावळे नाचले....याचा काय तरी बंदोबस्त कराय हवा.” बबल्या जाम वैतागून म्हणाला.
“व्हयं रं, पण करायचं काय...? गण्या म्हणाला.
“आस काहीतरी करायला पाहिजे कि बस पुन्हा आगलावायच्या आधी दहा वेळा विचार केला पाहिजे त्याने....आगलावे नाव लावायला घाबरला पाहिजे.” मी म्हणालो.
“चार चौघात आब्रू काढली फुकनीच्यान...” परश्या म्हणाला.
“नाय....याचा बदला घेतलाच पाहिजे....” सोम्या म्हणाला.
“म्हणजे सूड..??” मन्या म्हणाला.
“व्हय सूड...आन असा तसा न्हाय....”
“ए बाबा माराय-बिरायचा प्लान नाही ना तुमचा..?” आमल्याला मधेच तोडत मन्या पुन्हा म्हणाला.
“माझ्याकडं एक कल्पना हाय...” परश्या चुटकी वाजवून म्हणाला.
“पुन्हा कधीच त्यो आपल्या वाटेला जाणार न्हाय.” तो पुन्हा म्हणाला. सगळ्यांना जवळ घेऊन त्यान दबक्या आवाजात आपला सगळा प्लॅन आमच्या समोर मांडला. त्याची ती कल्पना ऐकून सगळेच चेकाळले.
“एक नं. आसच करूया...” सोम्या म्हणाला.
“ते मटेरीअल म्या आणतो....लय जालीम हाय....धूरच निघल....कालच नवीन बनवून आणलीय...” गण्या म्हणाला.
ठरलं तर, उद्या सकाळी....आता याला दावूया....आपण काय चीज हाय ते.
“मला तर आत्तापासनच हसाय येतंय.” परश्या म्हणाला.
“आरं, थोडं साठवून ठिव उदयाला...” मन्याला टाळी देत बबल्या म्हणाला.
“बरं पक्याच्या बाभळी खाली भेटू. चालतंय का...?” सोम्या म्हणाला.
“चालतंय...” सगळे एकसुरात ओरडले.
एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या घरी गेलो.

---------------------------------------------------------------------------------------

कधी एकदा सकाळ होतेय असं झालं होतं. जेवणं झाली. झोपलो. पण झोप कुठली येतेय. कशीबशी रात्र ढकलली सकाळ झाली. ठरल्या प्रमाणे पहाटे ६ ला आम्ही सारे बाभळी खाली जमलो.
“आणलाय का मटेरियल..” सोम्यान गाण्याला विचारलं.
खिशावरून हाथ फिरवत गण्या म्हणाला “हे काय...”.
“चला बेस....” सोम्या म्हणाला.
थोडावेळ असाच निघून गेल्या नंतर लांबून बाबू आगलावे येताना दिसला.
“ए आला आला, लपा....” म्हणत तिथच एका तडकीच्या माग आम्ही सगळे जाऊन लपलो. नेहमीप्रमाणे बाबू आगलावे तोंडातल्या तंबाखूच्या पिचकाऱ्या उडवत, ढुंगणावर हाताची घडी घालून, तिथच माग एका हातात चिम्पाट (टमरेल) धरून येत होता. थोडासा पुढ गेल्यावर आम्ही त्या तडकीतनं बाहेर आलो. म्हातारं आपल्याच तंद्रीत, गाण गात निघालेलं. आवाज न होता आम्ही त्याच्या मागून चालू लागलो. गाण्यान खिशातन मटेरियल काढलं. एक भरीव कागदाची पुडी, त्यान हळूच उघडली. आत मध्ये लालबुंद चटणी आग ओकत होती. गाण्यानं ती अख्खीच्या अख्खी आगलाव्याच्या चीम्पाटात ( टमरेलात ) रिकामी केली. मग आम्ही त्याच्या मागून संशय न येता त्याच्या पुढे निघून गेलो…………..
सकाळी अंघोळ करायला सगळ्यांनी आडात उड्या घेतल्या. एकदम निवांत झाल्यासारखं वाटत होतं. आता फक्त वाट बघायची होती. मस्तपैकी पाऊन-एक तासाची अंघोळ उरकून आम्ही घरी आलो. चटणीनं आपलं काम चोख केलं होतं. आगलाव्याच्या दारात आख्खी आळी जमा झाली होती. बाबू आगलावे भेकडा सारखा आरडत, व्हीवळत होता. त्याचा आवाज घराबाहेर येत होता. सगळ्यांच्या मनासारखं झालं होतं. आमच्या पण आणि बाकीच्यांच्या पण. आम्ही आत डोकावून पाहिलं...बाब्या ढुंगण वर करून पडला होता. त्याची म्हातारी बडबड करत होती. दिवसभर गावातली माणस बाबू दगडू आगलावे (नाना) ची मज्जा बघायला गर्दी करत होते. दिवसभर बेरडून बेरडून म्हातारं चांगलच बेजार झालं होतं. दुपार नंतर आवाज कमी होऊ लागला होता, आराम मिळाला होता पण.............
संध्याकाळी त्याला फेगडया बदकावानी चालताना पाहून हसु अनावर झाले. अशा प्रकारे एक अवघड सूड म्हणजेच अवघड जागेचा सूड योग्यरीत्या सफल झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावाकडच्या जीवनशैलीचं तूम्ही खूपच छान वर्णन केलं आहे.
दोन व्यक्तीच्यां संवादांमध्ये परीच्छेद द्या त्यामूळे वाचकाना वाचायला सोपं जाईल
बाकी कथा अगदी ऊत्तमच आहे. मला आवडली.

वा वा.. उत्तम ! मजा येतेय वाचायला.. पण शेवट्च्या २ पॅरा मधे थोडी निराशा झाली. लवकर अर्थ लागला नाही.. चिम्पाट शब्द कधी ऐकला नव्हता.. टमरेल चालला असता का?

गळ्यात टॉवेल अडकवून ओल्या झालेल्या चड्ड्या डोक्यावर अडकवण्यात आल्या. (अस केल्याने चड्डी सुखते हि लवकर आणि उन हि लागत नाही.)
+ १

दोन व्यक्तीच्यां संवादांमध्ये परीच्छेद द्या त्यामूळे वाचकाना वाचायला सोपं जाईल>>>> बदल केला आहे.
.
.
धन्यवाद मयुरजी....मनापासुन आभार... Happy Happy

छान... आवडली

“लय बदललायस...लका..” सोलापुरकडची भाषा वाटते...

नाही राजेंद्रजी....ही सातारी भाषा आहे.

तसं पाहता बऱयाच जिल्ह्यांतली भाषा जवळ जवळ सेमच असते. विशेषनांचाच काय तो फरक... Happy अस मला वाटतं.
तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार... Happy

थोडाफार बादल सोडला तर पश्चिम महाराष्ट्रात हीच भाषा बोलली जाते .
किस्सा कडक भाषेचा गोडवा तर भारीच जमलाय. अगदी गावी आल्यागत वाटलं. भारी किस्सा असेच लिहीत राहा पु.ले.शु

>>गळ्यात टॉवेल अडकवून ओल्या झालेल्या चड्ड्या डोक्यावर अडकवण्यात आल्या---

मला एक प्रश्न पडलाय, पण जाउ दे.

मला एक प्रश्न पडलाय, पण जाउ दे.>> Lol राया, मला कळला प्रश्न काय असेल ते.

दुसर्‍या घेतल्या असतील ना सोबत. त्याच घातल्या अस्तील Lol

धन्यवाद ...प्रिया जी. Happy
.
दुसर्‍या घेतल्या असतील ना सोबत. त्याच घातल्या अस्तील >>>> Lol Lol Lol Lol सस्मित जी ...

दुसर्‍या घेतल्या असतील ना सोबत. त्याच घातल्या अस्तील>>>>

<<<<< मालकांनी आधीच डाउट किल्लेर केलाय ना !!
पँटच्या खिश्यात चड्डी दडवून एकदम स्टाईल मध्ये टॉवेल गळ्यात अडकवला आणि चोरासारखा बाहेरच्या खोलीत आलो.