दत्त एक स्वप्न
निद्रेला गिळून
अस्तित्वा भरून
उरलेले ||
दत्त एक सत्य
विश्वाला गाळून
काळाला सारून
थांबलेले ||
दत्त एक जगणे
श्वासात भरून
हृदयात येवून
वसलेले ||
दत्त एक प्रार्थना
अवघे सुटून
एकटे उरून
उमटलेली ||
दत्त एक साधन
श्रद्धेत रुजून
शरण होवून
अंगिकारले ||
कृपे वाचूनिया
दत्तास कळणे
कदापि घडणे
नाही नाही ||
म्हणून विक्रांत
मीपण सोडून
उगाच पडून
दत्तपदी ||
अनवाणी पावलांनी
तंद्री लागलेल्या मनानी
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती
उंच उंच घाटावरती
उभी राहते
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी
डोळ्यात पाणी आणूनी
आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून
डोळ्यातून
अन स्वरातून
ओसंडत असते
विलक्षण श्रद्धा अन प्रेम
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी
मनाच्या एकांती तुझी याद येते
कानात गुंजते नाव तुझे ||
स्वप्नाचे आकाश भरून मानस
तुझा सहवास अनुभवे ||
कधी येता जाग कुण्या मध्यरात्री
तुझे भास गात्री जाणवती ||
तुझे वेड तूच देवून जागवी
भ्रमिष्ट चाळवी जन्म माझा ||
आता हरू द्यावे हे माझे मी पण
जगण्या कारण तूच होई ||
विक्रांत विज्ञानी झाला दत्तखुळा
म्हणे गोतवळा शिकलेला ||
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
दत्त माझा देव माझ्या ह्रदयात
मज दिनरात
सांभाळतो ||
सरल्या आयुष्या वर्ष आन देतो
प्रारब्धा ठेवितो
सोडवून ||
लायकी वाचून यश दे भरून
काढे पाण्यातून
बुडतांना ||
सुखाचे तोरण जीवनी बांधून
सांगतो हसून
बघ जिणे ||
आतले ते दार परंतु लोटून
राहीला थांबून
का न कळे ||
सरले खेळणे कळले जळणे
विक्रांता जगणे
दत्तात्रेय ||
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
मज लागले रे
गुरुदत्त पिसे
अवधूत पिसे
दिगंबर |
मन विटले रे
संसारा थकले
त्यांनीच दाविले
मृगजळ |
लावूनिया डोळे
तयाचिया वाटे
मोजितो मी बोटे
काळ गणी |
करितो नाटक
जगी जगण्याचे
ध्यानी मनी त्याचे
रूप सजे |
कधी गल्लीतले
श्वान भुंकतात
पाय धावतात
दाराकडे |
वाजे खटखट
वारियाने दार
हृदय अपार
उचंबळे |
चंदनाचा गंध
हीना दरवळ
ऐसे काही खेळ
मना चाले |
कधी एकटाच
असता घरात
विभूती धुपात
नादावतो |
घेवूनी चिमटा
नेसुनी लंगोटी
करुणा त्रिपदी
आळवतो |
असे कसेबसे
निर्लज्य नाचरे
कोंडीतो मी सारे
देहभान |
विक्रांत प्रभाकर
दत्तात्रेय माता दत्तात्रेय पिता
दत्तात्रेय भ्राता जिवलग
दत्तात्रेय दाता दत्तात्रेय त्राता
दत्तात्रेय सत्ता माझ्यावरी
सुखाचा सागर मायेचे आगर
जगण्या आधार दत्तात्रेय
अलोट कृपाळू अत्यंत दयाळू
पापीया सांभाळू करी देव
स्मरणा भुकेला जीव दे जीवाला
जागतो प्रेमाला खऱ्याखुऱ्या
धर्म वर्ण याती नसे तयास ती
जाणतसे रिती भक्तीचीच
आनंद कारक आपदी रक्षक
विश्वाचा नायक हरिहर
नाट्य सूत्रधार लीला भ्रमकार
काळ चक्राकार चालविता
जरी मायातीत खेळतो मायेत
मुक्ती बंधनात क्रीडा करी
थेंब पाणियाचा अंश सागराचा
तैसा हा तयाचा खेळ चाले
तयाच्या प्रेमाने सजले जगणे
दत्ताळलो आम्ही
भक्ताळलो आम्हीं
विरक्तीच्या पथी
रक्ताळलो आम्ही
तया प्रेमा साठी
आतुडलो आम्ही
शब्दांच्या बुडाडी
गोंधळलो आम्ही
लय सूर ताली
नादावलो आम्ही
घडेनाच काही
पस्तावलो आम्ही
बोलाविल्या विना
द्वारी आलो आम्ही
प्रतिक्षेत जन्म
खंतावलो आम्ही
कधी रानोमाळी
भटकलो आम्ही
शोधात तयाच्या
हरवलो आम्ही
पाशात व्यसनी
सापडलो आम्ही
न राहिलो जिते
वा न मेलो आम्ही