दत्त पिसे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 October, 2015 - 11:28

मज लागले रे
गुरुदत्त पिसे
अवधूत पिसे
दिगंबर |
मन विटले रे
संसारा थकले
त्यांनीच दाविले
मृगजळ |
लावूनिया डोळे
तयाचिया वाटे
मोजितो मी बोटे
काळ गणी |
करितो नाटक
जगी जगण्याचे
ध्यानी मनी त्याचे
रूप सजे |
कधी गल्लीतले
श्वान भुंकतात
पाय धावतात
दाराकडे |
वाजे खटखट
वारियाने दार
हृदय अपार
उचंबळे |
चंदनाचा गंध
हीना दरवळ
ऐसे काही खेळ
मना चाले |
कधी एकटाच
असता घरात
विभूती धुपात
नादावतो |
घेवूनी चिमटा
नेसुनी लंगोटी
करुणा त्रिपदी
आळवतो |
असे कसेबसे
निर्लज्य नाचरे
कोंडीतो मी सारे
देहभान |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users