क्र क्रोएशियाचा!
काही महिन्यांपूर्वी पिताश्रींनी हसत-हसवत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत. आप्त-मित्र-परिवार आणि त्यांचे प्रियपात्र विद्यार्थी जमले. दृष्ट लागेल असा समारंभ झाला. साखरतुला, सत्कार, ७५ दिव्यांनी ओवाळणी-औक्षण, देणग्या, केक, शॅम्पेन, पार्टी सगळे सगळे झाले. आनंदलेला दिवस मजेत निघून गेला आणि रात्री उशिरा सत्कारमूर्ती म्हणाले - "मला हवे ते गिफ्ट मिळाले नाहीच अजून!"
मी चकित. किंचित ओशाळलेपणाने विचारले - "ते काय?"
"अरे, मला क्रोएशियाला जायचे आहे, तुझ्यासोबत, लवकरात लवकर."