बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग २ - स्प्लिट, ह्वार (Hvar)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भाग पहिला - http://www.maayboli.com/node/48703

स्प्लिट हे क्रोएशियामधलं राजधानी झाग्रेबनंतरचं दुसर्‍या क्रमांकाचं मोठं शहर. हेही साधारण २००० वर्षं जुनं शहर. एक्कावन्नावा रोमन सम्राट डायोक्लेशियनच्या राजप्रासादाच्याभोवती वसलेले. डायोक्लेशियन मुळचा स्प्लिटजवळच्या सलोना गावातला. रोमन सैन्यात सैनिक म्हणून भरती झालेला डायोक्लेशियन आपल्या कर्तुत्वानं सम्राट पदापर्यंत पोहोचला. त्याला निवृत्तीनंतर आपल्या मूळगावाजवळ रहायचं होतं म्हणून त्यानं स्प्लिटमधे 'रेटायरमेंट-होम' जवळच्याच ब्राच बेटांवरच्या पांढर्‍या दगडांनी बांधून घेतलं, जे एखाद्या किल्यापेक्षा कमी नाही. डायोक्लेशियन हा स्वतःहून निवृत्त होणारा पहिला रोमन सम्राट. त्याच्या मृत्युनंतर मात्र बरीच वर्षं हा राजप्रासाद रिकामाच होता. नंतर आजूबाजूच्या परीसरातील लोकांनी शत्रूपासून बचाव सोपा जावा म्हणून नंतर राजप्रासादातच रहायला सुरुवात केली. अजूनही लोक इथे रहातात. आतमध्ये अनेक दुकानं/रेस्तराँ आहेत. आम्ही तिथली 'स्प्लिट १ पेनी टूर' घेतली. १ युरो (किंवा ७ कुना - क्रोएशियाची करन्सी) देउन तिकीट घ्यायचे आणि जर टूर आवडली तर गाइडला टीप द्यायची. आम्हाला बुडापेस्टमधे अशा गाइडचा चांगला अनुभव होता म्हणून इथं पण ही टूर घेतली. इथंही आमचा अपेक्षाभंग नाही झाला. हे टूर गाइड स्थानिक असतात शिवाय प्रशिक्षित असतात .

डायोक्लिशियननं इथं लावण्यासाठी इजिप्तमधून काही स्फिंक्स आणले होते त्यातले ३ अजूनही अस्तित्वात आहेत (३५०० वर्षं जुने). ३ पैकी एक आता 'धडविरहित' आहे.

पेरिस्टाइल -

राजप्रासादाच्या बाहेर क्रोएशियाचा हिरो ग्रेगरी (बिशप) ऑफ निनचा एक खूप मोठा पुतळा आहे. याने दहाव्या शतकात पोपला विरोध करून चर्चमधे रोमनऐवजी स्थानिक क्रोयेशियन भाषा वापरायला सुरूवात केली.

राजप्रासाद पाहून झाल्यावर तिथून आम्ही खादाडीच्या शोधात बाहेर पडलो. स्प्लिटमधे २-३ शाकाहारी रेस्तराँ आहेत. त्यातल्याच एकात आम्ही गेलो. भरपेट जेवण करून तिथून मार्यन (Marjan) टेकडीवर गेलो जिथून स्प्लिटचा खूप मस्त नजारा दिसतो. यासाठी टेकडीवर पूर्ण वरपर्यंत जायची गरज नाही पडत. थोडं चढून गेल्यावर एक कॅफे लागतं तिथंच पहिला स्टॉप आहे. तिथूनच स्प्लिटचे आणि समुद्राचे असे मस्त व्हूज दिसतात.

हा राजप्रासादाच्या मागचा समुद्राकडचा भाग. क्रोयेशियावर जेव्हा फ्रेंचांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी हा भाग (प्रोमनेड promenade) सुशोभित आणि विकसित करून घेतला.

तिथून आम्ही जवळच्याच बेनी बीचवर गेलो. इथल्या समुद्रात एकंदरच बाकिच्या समुद्रांप्रमाणे फारशा लाटा दिसल्या नाहित. या बीचवर पण लाटा अशा नव्हत्याच शिवाय हा वाळूचा बीच नाहिये. आणि वर्षातल्या यावेळी पाणी खूपच थंड असतं. तरीपण मुलींनी पाण्यात खेळायची थोडिफार हौस भागवून घेतलीच. बीच खूपच सुंदर आहे. पाणि एकदम नितळ ज्यातून तळसुध्दा दिसतो.

तिथला सुर्यास्त -

दुसर्‍या दिवशी ह्वार (Hvar) बेटांवर जायचं होतं. हे स्प्लिटमधलं सगळ्यात मोठं बेट आहे. जास्तकरून पार्टीप्लेस म्हणून प्रसिध्द आहे. शिवाय इथे लव्हेंडरची शेतं आहेत. स्प्लिटहून सकाळी ८:३० ची फेरी पकडली जेणेकरून तिकडून परत यायला ५:३० ची फेरी पकडता येइल. प्री-सीजनमुळं फेरींची फ्रिक्वेन्सी फार जास्त नव्हती.
या फेरीज म्हणजे मोठया बोटी आहेत ज्यातून कार्सपण नेता येतात. कॅटरमरान्सपण आहेत ज्या फक्त प्रवाशांना नेतात आणि तुलनेनं जलद जातात. ही फेरी बेटावरील स्टारी ग्राडला घेउन जाती. तिथून ह्वारला जायला बसेस असतात.

ह्वार मधलं चर्च

इथे थोडी चौकशी केली तर क़ळालं की लव्हेंडरचा फुलोरा जून मधे असतो त्यामुळं ती शेतं बघायला जाण्यात काही पॉइंट नव्हता. एक टूरिस्ट कंपनी आम्हाला पुढच्या बेटांवर (व्हिस Vis) ब्ल्यू केव्हज आणि ग्रीन केव्हज बघायला स्पीडबोटीनं घेउन जायला तयार होति. या गुहा म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहेत. गुहांमधे एका अतिशय लहान जागेतून सूर्यप्रकाश आत येतो आणि आतमधे निळ्या आणि हिरव्या रंगाचा खेळ दाखवतो. ब्ल्यू केव्हज खूप जास्त सुंदर आहेत पण हवामान अनुकुल नसल्यानं तिथं आतमधे जाता येणार नव्हतं. पण आम्ही ग्रीन केव्हज मधे जाउन आलो.

बोटीतून ह्वार बेटाचा किनारा -

जाताना हे दीपगृह लागलं जे अ‍ॅड्रियाटिकमधलं सगळ्यात मोठं दीपगृह आहे

ग्रीन केव्हज -

तिथलाच एक सेक्लूडेड छोटासा बीच- कधीकाळी (२०० वर्षापूर्वी ही पण एखादी गुहा होति पण छत आणि एका बाजूची भिंत पडल्यानं तिथं मस्त बीच तयार झालाय.)

तिथून आम्ही एका दुसर्‍या बीचवर गेलो. आमच्याशिवाय तिथं कोणिही नव्हतं. इथं एक रेस्तराँशिवाय दुसरं काहिही नाही. पण हे रेस्तराँ इतकं प्रसिध्द आहे की ते जेव्हा सीझनमधे उघडं असतं तेव्हा तिथं अपॉइंटमेंट खूप आधी घ्यावी लागती.

परतताना दिसणारं ह्वार आणि तिथला किल्ला -

किल्ल्यावर जाण्यासाठी फारसा वेळ नव्हता कारण परतीची फेरी पकडायची होति. जेव्हडं शक्य तेव्हडं वर जाउन ह्वारचा नजारा टिपावा म्हणून आम्ही काहीवेळ चढून गेलो. तिथून दिसणारं ह्वार आणि आजूबाजूची बेटं -

तिथून परत स्टारी ग्राडला जाउन परतीची फेरी पकडली. परततानाचा सूर्यास्त आणि स्प्लिटचं दृष्य -

दुसर्‍या दिवशी सकाळी १० च्या बसनं दुब्रॉव्निककडं (Dubrovnik) ज्याला 'पर्ल ऑफ अ‍ॅड्रियाटिक' म्हणतात तिकडे रवाना झालो.

भाग तिसरा - http://www.maayboli.com/node/48810
भाग चौथा - http://www.maayboli.com/node/49119

खूप छान. त्या पुतळ्यात मी क्रोए शिअनच बोलेन हा निर्धार जाणवतो आहे लव्हेंडरची शेते! ऑसम. आत्ताच तिथे जाउन राहावेसे वाट्ते आहे.

मस्तच! या भागातले फोटो खूपच आवडले.

(का कोण जाणे, जुन्या मॉन्युमेण्टसवर एक अवकळा आल्यासारखं वाटतं फोटो पाहताना...)

सेक्लुडेड बीचचा फोटो पाहून रोमांच उभे राहिले. तिथली निर्मनुष्य शांतता अफाट असणार. (कहो ना प्यार है आठवला.)

जुन्या मॉन्युमेण्टसवर एक अवकळा आल्यासारखं वाटतं फोटो पाहताना >> युगोस्लावियाच्या काळात इथे पर्यटन व्यवसायाची भरभराट चालू झाली होती पण नंतर यादवीमधे ५-७ वर्षं सगळं बंद पडलं होतं. आता परत तिकडे पर्यटन जोरात चालू आहे. बरेचसे मॉन्यूमेंटस 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून जाहिर झालेत आणि आता युनेस्कोतर्फेच बरेचसे रिस्टोरेशनचे काम चालू आहे. स्प्लिटच्या राजप्रासादातसुध्दा सध्या थोडे थोडे काम सुरू आहे (जसा निधी मिळेल तसं). शिवाय तिथे लोक अजूनही राहतात त्यामुळं या कामावर बरीच मर्यादा येते. तो ग्रेगरी ऑफ निनचा पुतळा दुसर्‍या महायुध्दाच्या सुरूवातीपर्यंत प्रासादातच होता. नुकसान होउ नये म्हणून त्याचे ३ तुकडे करून तो एका सुरक्षित ठिकाणी हलवला होता. युध्द संपल्यावर तो सध्याच्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्या ३ भागांच्या खुणा त्यावर अजूनही दिसतात.

या इतक्या सुंदर देशावर आजवर इतकी आक्रमणं झालीत त्यातूनही एवढं सगळं टिकून आहे हेच खूप आहे. शिवाय एवढया आक्रमणांनतरही स्थानिक लोक इतके प्रेमळ आहेत की बस. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी कायम तयार असायचे.

इथे इंग्रजीमध्ये संवाद साधताना काही अडचण नाही आली ना? >> अजिबात नाही. पर्यटनावरच या भागाचा भर असल्याने बहुतेक सगळ्यांना इंग्रजी (मोडकंतोडकं का होइना) येतं. येत नसेल तरी वर म्हटल्याप्रमाणे ते लोक मदतीसाठी कायम तयार होते.

तिथली निर्मनुष्य शांतता अफाट असणार >> खूपच. सीझनमधे कसं असतं माहिती नाही पण या बीचवर जायला बोटीनंच जावं लागतं. आणि हार्डली ७०-८० मीटर लांबीचा बीच आहे. तिथेही एक बार-रेस्तराँ आहे Happy जे फक्त सीझन मधेच चालू असतं

मस्त फोटो !!!!
विश लिस्ट वर आहे हे ठिकाण
३-४ महिन्या पुर्वी एक कलिग गेला होता तिथे.. त्याने काढलेले फोटो पाहून आणि वर्णन ऐकुन लगेच जावेसे वाटले होते Happy

मस्त Happy