भाग मिल्खा भाग बापुड्या
अन्नासाठी भाग..
धावशील तू तेव्हा जगशील,
पोटामध्ये आग....
तूझ्यासारखे कैक दिवाणे
आपल्या देशामध्ये भरले
पोट खपाटी दारिद्र्याने,
जीव काढूनी पळणे उरले...
अन्न मिळाले खायला तर,
पाण्यासाठी भाग....
संकट सांगून येणार नाही,
रात्री सार्या जाग....
भूक लावते कधी पळाया,
भुक लावते कधी जळाया...
भूक मारते जगवतेही,
भूक लावते मर्म कळाया...
घरच्यांसाठी परक्यांसाठी,
देशासाठी भाग...
भाग मिल्खा भाग बापुड्या,
भूक लागता भाग....
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.