न धावणारा मिल्खा सिंग (Bhaag Milkha Bhaag - Movie Review)

Submitted by रसप on 13 July, 2013 - 03:38

राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.

वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.

'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.

सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.

Bhaag-Milkha-Bhaag-Mp3-Songs-Free-Download-2013.jpg

मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.

दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.

पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.

इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !

शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !

राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.

संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.

एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.

रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/bhaag-milkha-bhaag-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी खूप आवडला सिनेमा.

त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो.>>> शेकडो मोदक.

खास मित्राने आवर्जुन सांगितले आहे कि सहकुटुंब सहपरीवार पाहुन घे. नक्कि पहाणार.

रसप तुम्ही जरासे निगेटीव्ह लिहता असं वाटाय लागलया Wink किंवा यु आर ओन्ली वेटींग फॉर द बेस्ट इन ऑल कॅटेगरी (अगदी स्पॉट बॉय सकट) Happy

राकेश मेहेरा असल्यामूळे बघावा तर लागेलच.. काही चित्रपट हे लागू असतात ते बघावेच लागतात.. Happy Happy

अवान्तरः लुटेरा या चित्रपटाचं परीक्षण न लिहील्याबद्दल रसप यांचा णिषेध .. Happy Happy

(तुमचं परीक्षण वचायची सवय आहे हो.. लुटेरे चं परीक्षण नव्हतं तर चूकल्या सारखं झालं )

फरहान हा एक गुणी अभिनेता आहे, जर तो मिल्खासिंगची भुमिका जगला असेल तर फक्त तेवढे आणि तेवढ्यासाठीच चित्रपट बघायला हरकत नाही...

मी सुद्धा फेसबूकमित्रांकडून बरेच चांगले ऐकलेय चित्रपटाबद्दल .. हे परीक्षण सुद्धा तितकेसे निगेटीव्ह नाही.. जर काही प्रसंग कंटाळवाणे असतीलच तर त्याबद्दल जाताना मनाची तयारी करून जायची काळजी घ्यायची हेच सुचवले आहे.. Happy

@ रसप __ जेव्हा एखाद्या चित्रपटाबद्दल उत्सुकता असते तेव्हा मायबोलीवर तुमचे परीक्षण वाचायला आवर्जून येतो... नकारात्मक सकारात्मक जे काही आहे तुमचे वैयक्तिक मत म्हणून घेतो, पण तुम्ही बरेच ठळक मुद्दे कवर केलेले असतात, आणि शैलीबद्दल प्रश्नच नाही Happy

रसप- नक्कि बघणार. परीक्शण आवड्ल
मलातरी परीक्शण balanced वाट्लं, निगेटीव्ह नाही. शेवटी ते त्यांच स्वतःच मत आहे.
आपल्या मताशी ते १००% जुळेलच अस नाही ना.

रसप, तुमच लिखाण पटल. माझा अनुभव हि अगदि असाच आहे. तीन तास खुप अति झालय. काहितरि राहिलय अपुर्ण अस वाटल. काहि अनावश्यक भाग आहेत, सोनम, rebecca(austrailian) आणि ईतर बरेच.

Trelar tar khup aavaDala hotaa. tyaa Divyaa navhatee paN Sonam hotee.
Lokaprabhaat Original Milkha Singh yaanchee mulaakhat vaachalee. tyaanaa pN to aavaDalaa ase lihile aahe. tyaamuLe baghayachaa tar aahech.

चित्रपट पाहीलेला नाही पण प्रोमोजमध्ये भाग मिल्खा भाग आधूनीक पद्धतीने शुट केलेला दिसतो. पानसिंग तोमरची सर या तांत्रिक अंगाने या चित्रपटाला नाही हे नक्कीच.

सोनम कपूर किंवा ती ऑस्ट्रेलियन तरुणी चित्रपटात अनावश्यक आहेत, हे अजिबात पटलं नाही. मिल्खाच्या आयुष्यातल्या स्त्रियांमुळेच त्याचं आयुष्य घडतं. त्याच्या जीवनाला कलाटणी याच स्त्रियांमुळे मिळाली आहे.

सुंदर चित्रपट. चित्रपटाची लांबी जास्त असली तरी कुठलिही गोष्ट अनावश्यक नाही. फरहान अखर मिल्खासिंग जगलाय अक्षरशः. बालमिल्खासिंग पण मस्तच आहे.
रिबेका आणि सोनमच पात्र नसत तर मिल्खासिंग घडला असता का हा प्रश्नच आहे. Happy
मला सगळीच गाणी आवडली.

मिल्खाच्या आयुष्यातल्या स्त्रियांबद्दल.. अगदी अगदी. हेच लिहायला आलो होतो. Happy सोनम कपूर आता मला हळुहळू प्रॉमिसिंग वाटू लागली आहे. छोटीच भूमिका किती सुंदर केली आहे!

चित्रपटाचा वेग कुणाला खटकू शकतो, तर कुणाला आवश्यक वाटू शकतो. हा नुसता 'धावपट' होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. इथं 'मिल्खा' हे व्यक्तिचित्र उभं केलं आहे. त्याच्या आयुष्यात बर्‍या-वाईट, सामान्य-अतिसामान्य-असामान्य अशा घटना घडल्या आहेत. बॉलिवुडी स्पीड, स्टाईल आणि मेलोड्रामा घुसडला असता तर 'मिल्खा' या व्यक्तीला, त्याच्या व्यक्तिचित्राला न्याय मिळाला असता का.. असं वाटून गेलं.

फाळणीची दृष्ये अगदी ऑथेंटिक वाटतील अशी आहेत. या दृष्यांमागे घेतलेले कष्ट, केलेलं काम आणि अभ्यास जाणवल्याशिवाय राहत नाही.

फरहान- हे सर्वात मोठं अ‍ॅसेट या सिनेम्याचं तर आहेच. त्याचं 'भूमिका जगणं' याबद्दल सगळीकडे लिहून आलं आहे. त्यामुळे त्याबद्दल वेगळं काय बोलणार? त्याव्यतिरिक्त माझ्या पदरात पडलेली एक महत्वाची गोष्ट, म्हणजे 'मिल्खासिंग' या महान खेळाडूबद्द्ल मिळालेली माहिती. त्याच्या आयुष्याची कथा आणि त्याचा लढा रूपेरी पडद्यावर बघायला मिळाला ही मोठी गोष्ट.

सिनेमातील स्त्री पात्रांसोबत अनावश्यक दृश्यं आहेत, असं मला वाटलं.
बीरो(सोनम) - मिल्खा ही प्रेमकहाणी उलगडवण्यात खूप वेळ गेला आहे.
तसेच, त्या ऑस्ट्रेलियन तरुणीसोबतचे चुंबनदृश्य, नंतर त्यांचं समुद्रावर खेळणं, ह्यातही वेळ घालवला आहे.

अजूनही काही अनावश्यक भाग जाणवले होते... सगळेच आठवत नाहीत आता.. एक अजून आठवला.. जो वर उल्लेखलेलाही आहे.
तरुणपणी मिल्खा स्वतःच्या मूळ गावी, जुन्या घरी जातो. तिथे सगळ्या जुन्या भयंकर आठवणी ताज्या होतात आणि तो गुडघ्यांवर बसून हमसाहमशी रडतो. त्याचं गुडघ्यावर बसून रडणं जवळजवळ अर्धा मिनिट तरी कॅमेरा स्थिर ठेवून दाखवलं आहे. मला तर वाटलं की चित्र अडकलं आहे की काय !! पुन्हा पुन्हा तेच दिसतंय की काय !! Wink ह्या दृश्यात, ते इतकं लांबल्यामुळे असेल कदाचित, फरहान अख्तरचं रडणं अंगावर न येता, जरासं कंटाळवाणंच वाटतं. माझ्या आजूबाजूला तर लोक हसतही होते. माझ्या मते ५ ते १० सेकंदात परिणाम साधता आला असता... ते अनावश्यक लांबवल्यामुळे अपेक्षित परिणामही साधला गेला नाही, उलट एक महत्वाचा प्रसंग खाली पडला आहे.

चित्रपट चांगला आहे.....
पण लांबला आहे.

बीरो(सोनम) - मिल्खा ही प्रेमकहाणी उलगडवण्यात खूप वेळ गेला आहे >> हा वेळ प्रेमकहाणीसोबतच तो गल्लीछाप टपोरी असल्याचं दाखवण्यात घालवला आहे. नुसतं तिने काहीतरी सांगितल्यानेच त्याच्या आयुष्याला वळण लागतं- हे सांगण्यासाठी हा वेळ समर्थनीय वाटतो.

त्या ऑस्ट्रेलियन तरुणीसोबतचे चुंबनदृश्य, नंतर त्यांचं समुद्रावर खेळणं, ह्यातही वेळ घालवला आहे. >> यानंतर जे काय घडतं, त्याचा एकत्रित परिणाम साधण्यासाठीच हा वेळ घालवला असावा. इथंही मिल्खाचं आयुष्य नवं वळण घेतं.

असो. आणखी लिहिलं तर स्पॉयलर द्यावा लागेल. Happy

Pages