निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>आपला हा बीबी फक्त फोटोंचा नाही तर निसर्गाच्या गप्पांचा आहे. फोटो तर हवेतच पण फोटोंसोबत फोटोतील निसर्ग व सजीवांची माहितीही आली तर धाग्याचे वेगळेपण राहील.<<<<

हे एकदमच मान्य...

>>>तरी तुम्हाला हे झुडूप नदीकिनारी सापडले. यावरून परदेशी वाणाचा प्रसार कसा होतो हे लक्षात येते. प्रत्येक परदेशी वाणाची टणटणी होत नाही हे खरे असले तरी टणटणी होण्याची शक्यता प्रत्येक परदेशी वाणात असू शकते हे लक्षात ठेवून आपण काळजी घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या बाजूने याचा पुढे प्रसार होणे थांबवा ही विनंती. बाकी इतरत्र थालिया पसरली असेल त्यावर आपले नियंत्रण नाही.<<<

हे ही बरोबर आहे. फक्त : मी हे एकच झाड माझ्या Eco-Pond मधे लावले आहे.. त्यामुळे त्याचा प्रसार न व्हावा.
माझे आतापर्यंतचे निरीक्षण असे की ह्याची मुळं दाट वाढतात ज्यामुळे माशांच्या पिल्लांना लपायला जागा होते. ह्याच्या उघड्या पडलेल्या मुळांवर खूप मधमाशा घोंघावत असतात, मुळाशी गोगलगायी वाढतात आणि फुलांवर किटक येतात.. त्यामुळे मी ह्याला पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त समजत होतो.
तरीही यापुढे यावर अधिक माहिती घेउन पुढील निर्णय घेतो.
माहितीबद्दल आभार आणि पर्यावरणाच्या कळकळीबद्दल सलाम..

आज़ पुन्हा प्रयन्त केला फोटो अपलोड करण्याचा . Sad मनोगतात ह्याची क्रिया लिहुन ठेवावी का? नवख्या सभासदाला फ़ायदा होईल.

रेणू, तुमचा एकही फोटो अपलोड झाला नाही का?

तुमच्या वरील लिंक वर क्लिक केले, तुम्ही लिंक तयार करताय पण पुढे जाऊन त्याची एमबेडेड लिंक बनवत नाही, ctrlq.org वर जाऊन एमबेडेड लिंक बनवून ती इथे द्यावी लागणार.

गुगल फोटोवर तर तुमचे फोटो दिसताहेत तुम्हाला.

तिथे जाऊन शेअर बटन वर क्लिक केले की बरेच ऑप्शन येतात

त्यात क्रीयेट लिंक वर क्लिक केले की काही सेकंदानी लिंक तयार झाली असा संदेश दिसतो

मग एम्बेड लिंक च्या साईटवर जाऊन तितक्या चौकोनात लिंक कॉपी करून generate कोड वर क्लिक करा

मग खाली लिंक तयार होते. खालच्या चौकोनात 2 कोड असतात, त्यातला < I M G SRc पासून सुरू होणारा कोड माबोवर चालतो.

तुम्ही तिथला पूर्ण कोड कॉपी करा, इथे पेस्ट करा आणि मग <
img src पासून चा ठेऊन उरलेला उडवा. उडवला नाही तरी फरक पडत नाही.

ही href वाली कामाची नाही.
< a href
='https://photos.google.com/share/AF1QipOir4b26ugun5wuto0fm4Dzm45xAwbru85rNl6Z5DON5EPXRHOg6zW4iGQl0Cd3tg?key=MURVLVI0NXdjeFJMeTlLMnRkVE5BQmE3ZFVzMXRB&source=ctrlq.org' >

ही img src। वाली कामाची आहे.

< img src='
https://lh3.googleusercontent.com/WJ5HzQtkrwVDOBMbLt17ksJMhYvofSr9fE3SIzf8_FfP9xWhU6aFi0uq24YCjvu7To-OZcaIeRXl8QE0Rp6PXzYegB5ojYaONuJxyiBehuYze4Dd79yHaYNKyzQFXw9pvw2dft6Lnus=w2400
' />

ह्यातला फोटो हा खालचा आहे. मी एम्बेड मध्ये मिळालेली लिंक जशीच्या तशी कॉपी केली, काहीही न उडवता.

साधनाताई
ही तिच मधमाशी व तेच फुल आहे. फोटो काढताना vivid warm मोड अॉन असावा बहुतेक. फोटो खुप क्रॉप केला आहे.

कमाल आहे, ओळखणे इतके कठीण जावे..

नीटनेटकी चापूनचोपून तयार होऊन कामाला लागलेली ती सौ आणि 'काय ही ब्याद, लग्न करताना अक्कल कुठे गहाण पडलेली माझी, स्वतः झोपत नाही इतरांना झोपायला देत नाही' हा वैताग चेहऱ्यावर घेऊन अव्यवस्थित, अजागळासारखे शेजारी आहेत तेच श्री.

राखी वटवट्या (Ashy Prinia)
यात कवड्या वटवट्याही असतो पण मी पाहीला नाही. विकीवर याच्या आवाजाविषयी वाचले की कर्कश्श ओरडतो पण आज याला गोड आवाजात हाका मारताना ऐकला. याचे घरटे कुठे आहे ते समजलय पण त्रास नको द्यायला म्हणून पाहीले नाही जवळ जाऊन. यात नर मादी वेगळे असतात का ते माहीत नाही. नसावेत. कारण दोघे एकत्र असतात तेंव्हा सारखेच दिसतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात हा छान तेजस्वी दिसतो.
आकार १० सेमि. म्हणजे चिमणीपेक्षा लहान. किडे, सुरवंट खातो. गवताळ भागात आढळतो. विणीच्या काळात रंगात थोडा बदल होतो.

.

(साधनाताई माहीती दिलीय बरका जमेल तेवढी)

(साधनाताई माहीती दिलीय बरका जमेल तेवढी)>>>>

आज्ञाधारी वत्सा, तुजप्रत कल्याण हो!!

अहो, पहिल्यांदा घरटे बांधताना मधुर सुरच गळ्यातून निघतात. ते तुमचे मुनिया आता दरवर्षी घरटे बांधतात, त्यामुळे नावीन्य राहिले नाही.

प्रत्येक परदेशी वाणाची टणटणी होत नाही हे खरे असले तरी टणटणी होण्याची शक्यता प्रत्येक परदेशी वाणात असू शकते हे लक्षात ठेवून आपण काळजी घ्यायला हवी.>>>>>>> साधना ताई खूपच महत्वाचा मुद्दा मांडलात .
खर तर देशी -विदेशी वनस्पती आणि त्यांची लागवड हा सध्या अगदी चर्चेत असणारा विषय. त्याबाबत संदिग्धताही तितकीच. काही वनस्पती देशी कि परदेशी ते माहिती आहेत परंतु बागेत लावतो ती असंख्य झाडे/ रोपे देशी कि विदेशी हे माहितीच नाही. त्यामुळे नर्सरी वाल्याकडून रोपे घ्यायची व लावायची असे सर्रास चालू आहे.
देशी वाणांची उपलब्धता कमी हे हि एक कारण. याविषयी पुण्यातील आयकॉस संस्थेच्या मानसी करंदीकर व केतकी घाटे यांचे खूप जोरदार काम चालू आहे व त्यांचे अनेक लेख हि खूप माहितीपूर्ण आहेत. टणटणीच उदाहरण घ्यायच तर प्रत्येक फुलपाखरू उद्यानात हि आवर्जून लावतात, त्यावर अनेक फुलपाखरे येतातही. विदेशी वनस्पतींना देशी वनस्पतीचा पर्याय उपलब्ध हवा, तो आहेही, मुळात याबाबत अधिक जनजागृती व त्यावर उपाययोजना व्हायला हवी.
धन्यवाद.

ही href वाली कामाची नाही.......
साधनाताई कोडमधील href चा भाग उडवला तर फोटो दिसतो पण कॉमेंट करता येत नाही. तो भाग तसाच ठेवला तर फोटोवर क्लिक करुन मायबोलीतूनही गुगल फोटोवर प्रतिसाद देता येतो. माझ्या मागील फोटोंमधे मी पुर्ण कोड वापरला आहे. वरील फोटोंमधे नाही वापरला.

रेणू तुमचा ह्या पानावरचा फोटो दिसला. पांढरा गुलाब आहे ना, मस्त आहे. साधना यांचा पण मस्त.

Spotted मुनिया कपल फोटो मस्त आहे.

तो भाग तसाच ठेवला तर फोटोवर क्लिक करुन मायबोलीतूनही गुगल फोटोवर प्रतिसाद देता येतो>>>>

Ok. म्हणजे href वर क्लीक केले तर आपण पब्लिक केलेल्या गुगल फोटोवर इथून जाता येते. वर रेणू यांनी दिलेल्या लिंक वर क्लिक केले की त्यांच्या अल्बमवर जाता येते. तुमच्याही काही फोटोंवर जाता येते.

हे मला थोडे रिस्की वाटते, विशेषतः तुम्ही जर आंतरजालावर स्वतःची जास्तीची माहिती द्यायच्या विरोधात असाल तर. अर्थात आज काहीही लपवणे अशक्य आहे.

आणि लिंकवर जाऊन फोटो चोरणे जास्त सोपे आहे Happy तुम्ही तो फोटो तिथे जाऊन इतर सोशल साईट्स वर शेअर करू शकता, डाउनलोड करू शकता. मायबोलीवरच्या फोटोचा फारतर स्क्रीनशॉट घेता येईल. अर्थात हे माझे निरीक्षण आहे. कॉम्प्युटर सॅव्ही लोक तुमच्या अल्बमवर जाऊन अजून काय काय करतील सांगता येत नाही. Happy मी मुद्दा खूप ताणतेय पण आपले खाजगी अल्बम माबोसारख्या मोठ्या सोशल साइटवर देऊ नयेत असे मला वाटते.

टणटणीच उदाहरण घ्यायच तर प्रत्येक फुलपाखरू उद्यानात हि आवर्जून लावतात, त्यावर अनेक फुलपाखरे येतातही. >>>

फुलपाखरू हा कीटक टणटणी भारतात येण्याआधीपासून होता आणि त्याला देशी झाडेही चालतात. लोक नर्सरीत टणटणी मागतात म्हणून नर्सरीवाले ती जास्त प्रमाणात ठेवतात आणि आपण जातो तेव्हा तीच घ्या म्हणून गळ घालतात. भारतीय वन खात्याला आज करोडो रुपये खर्च करून टंटणीचा बिमोड करावा लागतोय. तिच्यामुळे हरणे, हत्ती वगैरे तृणवर्गीय प्राण्यांची उपासमार होतेय कारण हिच्या जाळ्यामुळे खाली गवत वाढत नाही, वाढलेल्या गवतापर्यंत प्राण्यांना पोचता येत नाही.

आपल्या पर्यावरणावर कोणाचा किती परिणाम होतो ह्याचा अभ्यास करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे की नाही याचा पत्ता लागत नाही, असल्यास तिला कोणी भाव देत नसावे. हाहाकार माजला की आपल्याला कळते. त्यामुळे निदान आपल्या बाजूने आपण जागरूक राहून शक्य तितकी देशी वाणे वापरायला हवीत. आपण नर्सरीत देशी वाणे मागत राहिलो तर ती वाणे उपलब्ध होणार. कुठली वाणे देशी हे समजण्यासाठी आपला अभ्यासही वाढवावा लागणार Happy Happy . कित्येकजण 'देशी विदेशी हा भेद करणे' चुकीचे आहे असे समजतात. त्यांना पर्यावरण म्हणजे काय ह्याचा पत्ता नसतो.

https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/lost-to-lantana...

त्यात मला फारसे रिस्की वाटत नाही. तुम्हाला जे शेअर करायचे आहे तेच दिसेल. येथेही प्रायव्हसी सेटींग आहेच. उलट माझ्या फोटोवर कुणाला कॉमेंट करायची असेल तर करता येते. शेअर करता येतो. इतरही फायदे आहेतच. आणि मायबोलीवरुनही फोटो सेव्ह करता येतात. स्क्रिनशॉट घ्यायची आवश्यकता नाही.

देशी वाणाचा हट्ट धराच, पहील्यांदा हट्टाने व कौतुकाने परदेशी झाडे, रोपे, बीयाणे आयात करणे थांबवा. ती झाडे इकडे रुजत नाहीत सुरवातीला. त्यांनाही हौस नसतेच आपली माती सोडून दुसरीकडे रुजायची. पण अगदी प्रयत्नपुर्वक त्यांना इकडे आणून जोपासले जाते. गेल्या काही वर्षात मावळ प्रांतात सोनकी सारख्या दिसणाऱ्या पण आकाराने मोठ्या असणाऱ्या फुलांनी अगदी उच्छाद मांडला आहे. सप्टेंबर ऑक्टोंबर मधे सगळे घाट या फुलांनी पिवळे होऊन जातात. जनावरे यांना खाऊ शकत नाहीत, या भागातली फुलपाखरे यावर बसत नाहीत, अनेक किडे यापासुन दुर रहातात. नकळत सगळी अन्नसाखळीच डिस्टर्ब झाली आहे. आता त्या फुलांचे उच्चाटन अशक्य झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांचा, फुलपाखरांचा, किड्यांचा विणीचा काळ बदलत चालला आहे. काही पक्षी अंडी देतात पण त्यातुन पिल्ले जन्माला येत नाही. असे अनेक प्रकार सुरु आहेत. बहुदा हे सुरु झाले कुणा निसर्गप्रेमीने मुंबई-पुणे या प्रवासात घाटात कसल्याशा बीया फेकल्याने. ट्रेनमधून बीया फेकण्याची मोठी चळवळच उभी होती तेंव्हा. निसर्गावर प्रेम करा पण डोळसपणे असं म्हणावं वाटतं.

आज्जी आजोबांना, त्यांच्या चालीरीतीला नावे ठेवण्याची फॅशनच आहे सध्या पण त्यांचा या निसर्गाच्या बाबतीतला अनुभव किती मोठा आणि रोजच्या जगण्यात कामाला येणारा होता हे कुणी पहात नाही. सकाळी दुध भाकरीचा पहिला घास घेतला की माझे आजोबा कैकदा घरच्या गड्यावर ओरडायचे "तुला किती वेळा सांगीतले की गायी खालच्या शेतात जाऊ देऊ नकोस म्हणून" काल आपली दुभती जनावरे कोणत्या शेतात चरली हे दुधाच्या चवीवरुन सांगणारे आजोबा गेले. त्यांच्याबरोबर खुप काही गेलं. जात आहे अजुन.

देशी वाणाचा हट्ट धराच, पहील्यांदा हट्टाने व कौतुकाने परदेशी झाडे, रोपे, बीयाणे आयात करणे थांबवा>>>>>

मीही हेच म्हणतेय. परदेशातून येणारे आपले मित्र मैत्रिणी येताना तिथले बियाणे आणतात, इथले घेऊन जातात. आपल्या नि ग वर पण ही देवाण घेवाण वारंवार होते. हे आपण थांबवायला हवे हे आता प्रकर्षाने जाणवतेय. पुढे जाऊन ज्याचे परिणाम काय होणार हे कळायची कुवत आज नसल्यामुळे ह्या भानगडीत पडूच नये हे माझें मत होतेय.

साधना ताई, शालीदा धन्यवाद
खरं तर ह्या विषयाचा अवाका खूप मोठा आहे
परदेशी वाणांची लागवड ही नुसती वनीकरण, वृक्षारोपण, बागेतील झाडे इतकीच मर्यादित राहिली नसून आता तर शेतीतही ती दिसून येते
कालच्या लोकसत्तात बातमी वाचली की नगर च्या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुट चे विक्रमी पीक घेतल, परदेशी फळ लागवडीबाबत शेतकऱ्यांच्या वाढता कल दिसू लागला आहे.
तर याच बरोबर राहीबाई पोपरे यासारख्या बीजमाता देशी वाणांची जपणूक करून त्यांच्या प्रसारासाठी खुप मोलाचे कार्य करत आहेत.
आज संध्याकाळी झी वर उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात त्यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे

कोकीळा (Asian koel. Female)
कोकीळ गातो तशी ही देखील गाते पण आवाज तारसप्तकात असतो. नर आणि मादी दोघांचेही डोळे लाल असतात.

.

कोकीळ (Asian koel. Male)

Pages