निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे लकी आहात तुम्ही. मी न पाहिलेल्या पक्ष्यांच्या यादीत हा देखील आहे. तुम्ही म्हणालात तसे हा ही Drongo च आहे. Happy

काय एकेक फोटो पक्षांचे आणि भन्नाट नावं. ग्रेट आहात तुम्ही सर्व, समृद्ध होते मी एकेक वाचून, बघून. फक्त माझ्या लक्षात फार रहात नाही, हा दोष माझ्यातला.

गोगलगाय पोटात पाय म्हणतो आपण त्यापेक्षा ही वेगळी. मालवणला याला घुला म्हणतात. जेमतेम १ सेमी व्यास असतो. गुलाबी रंगाच्या अनेक छटा दिसतात यात. तिथे या खातात. सुईने एकेका घुलातील मांस (जे काय असेल ते) बाहेर काढावे लागते.
(वरील माहिती दिनेशदांनी दिली आहे. मी कॉपी पेस्ट केलीय)
प्रचि १

प्रचि २

शालीदा, वावे धन्यवाद. याच पक्ष्याबद्दल विचारत होते मी. भृंगराज नाव पण किती छान आहे.
माझ्या माहेरी बागेत हा पक्षी बरेचदा येतो. पण फोटो काढू शकले नाही ( तसंही मला कोणताच पक्षी फोटो काढू देत नाही Sad .)

या गोगलगायी कुठे सापडल्या तुम्हाला शालीदा?
आमच्याकडे भातशेतीमध्ये असे कोके सापडतात ज्यांना उकडून आतलं मांस काढून कालवण बनवले जाते ( फार फार वर्षापूर्वीची गोष्ट) पण ते बिचारे ईतके आकर्षक नसतात साधे मातकट रंगाचे असतात.

जागूताई फोटो दिसत नाहीए. ती लाल फुलेही दिसत नाहीएत आणि मधे मधे असलेली पांढरी फुलेसुध्दा दिसत नाहीत.
Lol

जागूताई अप्रतिम फोटो. एकाच जागी इतक्या रंगांचे तेरडे प्रथम पाहतोय मी.
तुमच्याकडेच का?
मला पाहिजे.
भारद्वाज मस्तच ...

शालीदा आधी घाबरलेच मी. ::))

ऋतूराज हो मी रोपे करण्यासाठी बी लावल होत पण वेळ मिळाला नाही आणी आता तिथेच फुलू लागली आहेत. जास्त पाउस चालू झाला तर आता वेगळी लावेन. ही नेमकी शेतात आहेत.

शाली तूमचा ह्या पानावरचा अ‍ॅशी प्रिनिया मला खुप आवडला. काही दिवस माझा व्हॉट्सअप डीपी म्हणून लाऊ का?
फोटोचे क्रेडीट स्टेटस मधे टाकीन…

मस्त मस्त फोटो एकेक. चक्क मला सगळे दिसतायेत. नाहीतर फोटो दिसण्याबाबत जरा नशीब आडवं येतं Lol

शाली यांच्या पोतडीतून काय निघेल याचा नेम नाही, भारी एकदम. कधीही न पाहिलेले, ऐकलेले असतात बरेचदा.

जागू गुलछडी/रजनीगंधा सुवास पोचला.

वरील माहिती दिनेशदांनी दिली आहे. मी कॉपी पेस्ट केलीय >>> दिनेशदा यांचे नाव वाचून बरं वाटलं, आठवण येते त्यांची.

मानुषीताईपण अजिबात दिसत नाहीत हल्ली.

शालीदा,
त्या गोगलगायी पण मस्त आहेत काचेवर ठेवून फोटो काढलाय का? सुंदर...
गुलछडी पण मस्त फुलली आहे
मनिम्याऊ, अप्रतिम गुलाब......एवढ्या कुंड्या? बापरे

वरील माहिती दिनेशदांनी दिली आहे. मी कॉपी पेस्ट केलीय >>> दिनेशदा यांचे नाव वाचून बरं वाटलं, आठवण येते त्यांची>>>>> खरंय

जागूताई मी गम्मत केली जराशी. तू खुप दिवस हा फोटोंचा प्रॉब्लेम फेस करतेय म्हणून. Wink
vt220 तुम्हाला आवडेल तो फोटो घ्या. त्यात विचारायचं काय! क्रेडीट द्यायची आवश्यकता नाही. Happy
थॅंक्यू अन्जू! न पाहिलेले नाही म्हणता येणार. आजूबाजूला असते हे सर्व फक्त नुसत्या डोळ्यांनी बारकावे दिसत नाहीत इतकेच.

Pages