स्वयंपाकाचे व्यवस्थापन

Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43

लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे Happy
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्‍या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको Wink ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते Happy )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा Happy
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम Wink ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्‍याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्‍या असाल तर हे काम नवर्‍यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, शक्य तेवढी फळे, भाज्या पटकन तशीच आणणे हे मी करतेच. पण फळं व कच्च्या भाज्यांचा कोटा जास्तीत जास्त घरात असतानाच सकाळ, संध्याकाळ, सुटीच्या दिवशी पुरा करणे हे मी जमवते.

सॅलड, फळे डब्यातून नेण्यासाठी सोलणे चिरणे ते डब्यात भरणे ही कामे सकाळच्या गडबडीत वेळखाऊ होत असतील तर अख्खी काकडी, टोमॅटो, गाजर, उकडलेलं बीट इत्यादी धुवून नेता येईल

असेच न्यावे. कापलेल्या सॅलडमधुन विटामिन्सचा नाश होत राहतो.

Pages