स्वयंपाकाचे व्यवस्थापन

Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43

लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे Happy
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्‍या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको Wink ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते Happy )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा Happy
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम Wink ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्‍याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्‍या असाल तर हे काम नवर्‍यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " एक छान स्माईल स्वतःला द्या. नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा >>>>>>>>>>>मस्तच Happy

हे सगळे अनुभवातून आलेले दिसतेय.
मला फक्त एकच सांगायचे होते कि हि सर्व तयारी एकट्या स्त्रीने अजिबात करु नये.
घरातील सर्वांचा सहभाग असायलाच हवा.

अवल बाई... हॅट्स ऑफ!!! मस्तच लिहिलयस!
यात पेपर वाचुन होतोय...स्वतःच आवरुनही होतय आणि साग्रसंगीत स्वयंपाक पण!
<<आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्‍या असाल तर हे काम नवर्‍यावर सोपवा<<<
खरच गं! डबे भरण्याचं काम मला महाबोरींग वाटतं! Sad

दिनेशदा, हे माझेही स्वप्न होते, पण माझ्या नवर्‍याने त्या स्वप्नाला सुरूंग लावला Biggrin त्याला आजही साधा चहा नीट करता येत नाही. दर वेळेस नवी चव ! याचा वचपा म्हणून माझ्या लेकाला सगळा स्वयंपाक शिकवतेय. मला झालेला त्रास माझ्या सुनेला होता कामा नये. अर्थात उलटा त्रास उदभवू शकतो तिला, 'नवर्‍याला फारच कलते' याचा Wink लेकाला वासावरून मीठ घातलय, कमी पडदलय हेही कळते आता. बटाट्याची काचरा भाजी फार छान करतो तो Happy माझा उजवा हात जायबंदी होता तेव्हा स्वतःच्या डब्याच्या २ पोळ्या तोच करून घेत होता. कणी़क मात्र नाही भिजवता येत त्याला Happy

स्वाती, सुरूवातीला जेव्हा मी जात्यात होते तेव्हा चुकत माकत करत होते तेव्हा ६.३० उठून ८.३० पर्यंत व्हायचं सगळं. नवरा ९ वाजता बाहेर पडायचा. मी पोराचं आवरून,पाळणाघराची सगळी तयारी करून मी १० वाजता बाहेर पडायची.
आता इतकं अंगवळणी पडलय की तासाभरात नवा शो चालू Happy म्हणून तर इतके नसते उद्योग करू शकते ना आता Wink

अवल अवल अवल.........तुला +१००....या खालच्या वाक्यांबद्दल!
>>>>>>>>>पण माझ्या नवृयाने त्या स्वप्नाला सूरूंग लावला त्याला आजही साधा चहा नीट करता येत नाही. याचा वचपा म्हणून माझ्या लेकाला सगळा स्वयंपाक शिकवतेय. मला झालेला त्रास माझ्या सुनेला होता कामा नये. अर्थात उलटा त्रास उदभवू शकतो तिला,>>>>>>>>>>>>
छानच आहे गं प्लॅनिंगच्या टिप्स!
आणि लेकाचं म्हणशील तर मी त्याला काहीही शिकवलं नाही. पण त्याला कुकिंगमधे इंटरेस्टच आहे. तो चक्क एन्जॉय करतो कुकिंग! आणि खूपच ऑर्गनाइज्ड आहे. कधी कधी माझ्याच कुकिंगचा पसारा वाटतो त्याला.

अवल, उत्तम लेख. दिनेशदांशी १००+ % सहमत आहे.
त्याला आजही साधा चहा नीट करता येत नाही. दर वेळेस नवी चव ! याचा वचपा म्हणून माझ्या लेकाला सगळा स्वयंपाक शिकवतेय. जरा प्रेमाने घ्या. पाठीला पंखा चालू करुन द्या. Happy काही दिवसांनी चहाची चव कांय स्वयंपाकही जमेल. Happy

>>>जरा प्रेमाने घ्या. पाठीला पंखा चालू करुन द्या. <<< झालं सगळं करून लग्नाच्या सुरुवातीच्या फुलपाखरी दिवसात Wink पण छे ! Proud

( बॅक ऑफ द माईंड हे विचार सुरू करावेत. - मंदार क्षमस्व, हे मराठीत चपखल येईना ) >> आपण विचार शक्यतो मनातल्या मनातच करतो, त्यामुळे <<विचार सुरू करावेत>> हेच चपखल आहे Wink

माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा.>>
सर्वांचे दुधाचे कप भरा.>>
आता सगळ्यांचे डबे भरा.>>

ही कामं घरातील इतर सदस्यांवर सोपवावीत. Happy

अवलताई, तुझं हे लेखन वाचुन सकाळी धावतपळत, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करणारी मी(टोकू) दिसली गं डोळ्यासमोर Happy माझं सकाळचं व्यवस्थापन पुढीलप्रमाणे. आय होप यातून कुणाला (माझ्यापेक्षा ज्युनियर गृहिणींना ) तरी मार्गदर्शन होईल.

माझं ऑफिस ८.०० चे असल्याने खुप धावपळ होते. ती मी पुढीलप्रमाणे कमी करते.

रात्री आवराआवरीची कामे करताना एकीकडे दूध तापवून ठेवून देते.कठण करायचे असेल तर रात्री ते भिजत घालते.
सकाळी ऊठल्यावर तोंडावर पाण्याचे हबकारे मारते झोप उडावी म्हणून.:)
गायत्री मंत्र/एफ एम सुरू करते.
सर्वात आधी परातात कणीक+मीठ घालते. मग फ्रिजमधून भाजी बाहेर काढते, तिच्याजवळ कटर्/स्लायसर्/एक ताटली असं ठेवते. मिरची कडीपत्ता व कोथिंबीरीच्या पिशव्या/डबा हे सगळं मी जमिनीवर काढून ठेवते जेणेकरून खाली बसून भाजी चिरता येईल.(तेवढाच व्यायाम गं Wink )
मग पाणी घालून कणीक भिजवते. तेल घालून गोळा मळून तो झाकून ठेवते.
आता ब्रश करत करत भाजी चिरते. एक कट झाला की ब्रश हलवायचा Proud
आता गॅसवर भाजीची फोडणी करते व भाजी झाकण ठेवून वाफेस टाकते. दुसर्‍या गॅसवर चहाचे आधण ठेवून तो उकळेपर्यंत तोंड धुवुन घेते.
आता दूध घालून चहाला उकळी येइइस्तोवर कणकेचे ओबडधोबड गोळे करते.
मग भाजीत पाणी, मीठ, गुळ वगैरे घातले की भाजी मागच्या गॅसवर ठेवते.
मग पहिल्या गॅसवर पोळ्यांसाठी बारीक गॅसवर तवा तापत ठेवते.
मग चहा बिस्किट खाते.
पोळ्या करायला सुरूवात करते, कुकर नसेल तेव्हा अधुन मधुन भाजी बघुन काय हवय? नकोय? गॅस बंद करायचाय का? काही घालायचे राहिलेय का? हे चेक करते व हवी ती कृती करते.
शेवटच्या ३-४ पोळ्या करायच्या उरल्या की गीझर सुरू करते. पोळ्या करताना आधीच सुरू केलेला फॅन बंद ठेवते शक्यतो.
भाजलेल्या पोळ्या डब्यामधेच टाकते डायरेक्ट. पोळ्या झाल्या की डब्याचे झाकण न लावताच अंघोळीला जाते.
मग आवरत आवरत नवर्‍याला द्यायचा चहा बनवते.
खोलीमधून बाहेर येताना पर्स्+वॉलेट घड्याळ वगैरे घेतल्याची खात्री करते. ते बाहेर आणून ठेवते आणि मग डबे भरते. आणि कार्यालयात जायला सज्ज होते Happy

खरं तर माझ्या मनात हे सारे जो कोणी स्वयंपाक करतेय त्याच्यासाठी आहे. जर चार जणं हे करत असतील तर त्या चार जणांनी हे वाटून घावे. जर चार गॅस असतील तर चारजणं मिळून अर्ध्या तासात स्वयंपाक होऊन जाईल. पण त्यासाठी व्यवस्थापन उपयोगी पडावं इतकच.
स्त्री करतेय, पुरुष करतोय, एकच जण करतोय की चार जणं मिळूण करताहेत यापेक्षा ते कसं करताय याला महत्व आहे. एकूणात काम नीट तर व्हावं पण लवकरही व्हावं हाच उद्देश !
सहसा स्वयंपाकघरात व्यवस्थापन होताना दिसत नाही. अनेक जणांचा ( फक्त जणींचा म्हणत नाहीये मी ) स्वयंपाकघरात खुप वेळ जातो. अन त्यांच्या आवडीच्या कामांना त्यांना वेळ मिळत नाही असे म्हटले जाते. त्यावरचा हा माझा उपाय एव्हढेच!
हां आता माझ्या कडे मी एकटीच हे सगळे करत होते म्हणून त्या दृष्टीने लिहिलेय. हेच काम तुम्ही दोघात किंवा चौघात वाटलत तर त्याचं व्यवस्थापन पुन्हा वेगळ्या काही पद्धतीने करावे लागेल. जसं ज्याचं आहे तसं त्याने लिहिलंत तर सर्वांना ते उपयुक्त ठरेल नाही का ? Happy

अवल, माझ्याही आईने अगदी हेच केलं माझ्या बाबतीत.
आणि हे जे प्लानिंग आहे ते ऑफिसच्या कामातही उपयोगी पडते.
मी वास्तव्य केलेल्या काही काही जागी, तर आठवड्यातून एकदाच शॉपिंगला जाता
यायचे. मग जे जे आणायचे आहे, त्याची यादी करायची सवय जडली, आता तर
ती यादी मनातच तयार असते.
मी कधी कधी २०/२५ जणांचे जेवण एकट्याने केले आहे (हाताखाली मेड असायची)
त्यातही सर्व पदार्थ डाळीचे, सर्व पदार्थ गुजराथी, सात रंगाचे पदार्थ अश्या थीम्स
असायच्या. त्यासाठी तर चक्क सी.पी.एम. (क्रिटिकल पाथ मेथड) वापरली होती.
प्रत्येक पदार्थाच्या तयारीतल्या सर्व पायर्‍या लिहून काढून, त्यापैकी आधी काय करुन
ठेवायचे, आयत्यावेळी काय करायचे हे ठरवायचो.

टोकू, हां अगदी हेच मला हवं होतं. प्रत्येकानं आपलं स्वयंपाकातले व्यवस्थापन इथे शेअर करावं. सगळ्यांना काही नवं मिळेल . मस्त आहे गं तुझंही व्यवस्थापन Happy फक्त ते दात घासत नाही... आवडलं Wink
दिनेशदा, अगदी खरं. मलाही माझ्या नोकरीत खुप उपयोगी पडायची ही सवय. सहसा माझे काम नाहीच रहायचे मागे.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या कामाकडे एक कला / छंद म्हणून
बघायची सवय लावायची. (ते अवल नक्कीच करत असणार.)
प्रत्येक पदार्थ हि कलाकृती असावी. तो सुंदर चवीचा तर असावाच पण दिसायलाही
देखणा असावा. रंगसंगती सुरेख असावी, तो आरोग्यदायी असावा.. असा विचार मनात
ठेवला, कि होणारा पदार्थ आपसूक तसा बनतो.

वा ! सौ पते की बात की आपने, दिनेशदा.
स्वयंपाक न चिडचिड करता,आवडून, निगुतीने, शांतपणे, तृप्तपणे, आनंदाने केला तर नक्की छान होतोच.
अन हो धन्यवाद दिनेशदा Happy

अवल, चांगला धागा आहे.

मी पण खूपसे असेच करते. माझ व्यवस्थापन लिहिते उद्या मोकळी असतांना.
पण आज एक महत्वाची टीप माझ्या डेंटिस्टकडुन:
बर्‍याचशा स्त्रिया सकाळच्या गडबडीत ब्रश करता करता बरीच कामे करतात. त्यामुळे त्यांचे दंत आरोग्य ढासळते. कृपया ब्रश तोंडात घेऊन काम करु नका त्याऐवजी पाच मिनिटे उशीर झाला तरी चालेल हे तत्व किंवा पाच मिनिटे लवकर उठण्याचे तत्व पाळावे.

टोकु, तुला नाही ग... एकुणच स्त्री वर्गाविषयी लिहिलय. मला स्वतःला काम करतांना ब्रश करण्याची सवय होती. दोन दाताच्या रुट कॅनल नंतर सवय मोडावी लागली Happy
पण एकुणच माझ्या मैत्रिणी, आई, मावश्या, सहकारिण्या... ज्या कुणी नोकरी करतात त्या सकाळी ब्रश करतांना बरीच कामे संपवतात म्हणुन ते लिहिले.

तुझी पोस्ट वाचतांना लक्षात आले म्हणुन लिहिले.

वैयक्तिक तुला नाही. गैरसमज नसावा.

एखादे वेळी भाजीचे प्लॅनिंग गडबडले (पाहुणे,उपास, भाजी चिरल्यावर खूपच कमी वाटली, सक्काळीच कुठे लवकर एखादे काम उरकुन नेहेमीची वेळ गाठायची असली ) तर हाताशी ऐनवेळी करता येईल आणि पटकन होईल अशी एखादी भाजी असावी.

प्रिंसेस गैरसमज नाहीच्चे मुळी Happy मी फक्त एक पर्याय सुचवला, दोनदा ब्रश केल्याने नक्कीच फायदा होईल ना?

रावी अशी पटकन होणारी भाजी : टॉमेटो कांदा चटणी, लसणाची फोडणी देऊन तिखटातला कांदा बटाटा, आलं लसूण लावून बटाट्याची भाजी किंवा लसूण-खोबर्‍याचं वाटण लावून तळलेली बटाटी Happy

.

Pages