स्वयंपाकाचे व्यवस्थापन

Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43

लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे Happy
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्‍या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको Wink ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते Happy )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा Happy
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम Wink ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्‍याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्‍या असाल तर हे काम नवर्‍यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयुक्त धागा. पण मग बछड्यांची शाळेची तयारी वैगेरे?
मला तर लेकीसाठी जवळ जवळ ३० ते ४० मिनिटे लागतातच. तिची अंघोळ, तयारी, नाश्ता (हे मोठ्ठ काम ), वेणी फणी, टिफीन भरणे, शुज घालने ई.

मी कोथिंबीर रोज घरी जाताना बरोबर (किमान ५ रू ची) घेऊन जाते, म्हणजे वेळेवर ताजी कोथिंबीर वापरता येते आणि अतिरिक्त नसल्याने खराब होत/पडून रहात नाही.

तसेच पुदिना आणून तो निवडून सुकवते, मग हा डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. (बाहेरपण टिकतो) भाज्यांमधे चुरून घातल्याने चव वाढते.

एक सुचवू का? खालील कामे रोज करण्याची गरज नाही. काही दोन-तीन दिवसांची एकत्र करून ठेवली तरी चालतात. काही तयारी आधी करून ठेवली तरी चालते. फ्रीज कशाकरता आहे?
१. एकदाच ४-५ बटाटे उकडून ठेवणे.
२. दोन दिवसांची कणिक मळून ठेवणे.
३. रात्रीच सकाळकरता कांदा, टोमॅटो कापून ठेवणे.
४. फळभाजी, शेंगाभाजी रात्रीच धुऊन ठेवणे.
५. पालेभाजीही धुऊन जाळीत उघडी ठेऊन फ्रिजमध्ये ठेवणे. पाणीही निथळून जातं आणि सकाळी पटकन चिरता येते.

रच्याकने, सकाळच्या स्वयंपाकाबरोबरच संध्याकाळच्या स्वयंपाकाचं व्यवस्थापनही लिहा ना.

अवल खरच खुपच मस्त लिहिलं आहेस.....

सुट्टीच्या दिवशी मी जरा आरामात करु म्हणत सावकाशीने पेपर १ तास वाचुन नाश्टा करते. मग हळुहळु
वेगळा काही तरी ( सुट्टी म्हणुन पदार्थ केला जातो. ) सगळे मस्तच होते पण कधी कधी खुप उशीर झाला की
जेवण झाल्यावर आवरायचा खुप कंटाळा येतो. मग मी निश्चय करते की परत असे न करता रोजच्या प्रमाणेच
सुट्टीच्या दिवशी पण लवकर स्वयंपाक करायचा....:)

अवल माझ्या घरचे २ मेम्बर सकाळी ७.३० , ८ ला रवाना होतात. त्यामुळे सकाळ चे मिनीट न मिनीट वापरावे लागते.
भाज्या निवडुन आदल्या दिवशीच ठेवते. कान्दा चिरुन ठेवलेला असतो. रात्री झोपतानाच उद्याचा मेनु आणि क्रमवार काम ठरवुन झोपते. सकाळी ५.३० ला दिवस सुरु. पहिल्यानदा भाज्या दुध फ्रीज्म्धुन काढुन ठेउन कणिक मळुन ठेवते . ६ ते ७ व्यायामाला जाउन येते. मग दुध तापवत ठेवते एकीकडे भाजी फोडणीला टाकते.चहा टाकते. न्याहारीसाठी सहसा वेगवेगळी धिरडी/पोहे उपमा /दडपे पोहे (इतपतच कॉम्प्लिकेटेड) करते. धिरडी मोठी न करता पुरीच्या आकाराची करते. म्हणजे २ जणाना एकाच वेळी देता येतात. दोघान्ची न्याहारी झाली की पोळ्या. ते होइतो भाजी तयार होते. डबे भरले की एक पार्सल रवाना. मग उरलेली धिरडी माझ्या साठी करुन मोठ्ठा मग भरुन कॉफी बनवते आणि निवान्त १५ मि. पेपर वाचत बसते. तोवर दुसरे पार्सल रवाना होत असते. बाई कामाला आलेली असते तिचे काम उरके पर्यन्त माझी तयारी करुन तिसरे पार्सल ( अस्मादिक) रवाना.
रवा भाजुन ठेवणे, उत्तापे , डोसे वा तत्सम आदल्या रात्री वाटुन ठेवणे, मसाल्याची वाटणं करुन फ्रीज मधे ठेवणे, ऐनवेळी साखर , मीठ, मसाले , साठवणीच्या डब्यातुन काढावे लागणार नाहित हे पाहणे. डबे घासुन तयार ठेवणे, भाज्या , कान्दा चिरुन ठेवणे ( यादी अजुन मोठी आहे) हे सगळ आधीच तयार असेल तर ३० मि. ही पुरतात.
इतरान्चा सहभाग म्हणजे घाइच्या वेळी मागे लागुन खा रे, दुध पी रे , लवकर आटप रे ची रेकॉर्ड लावावी न लागणे. Happy
नवर्याचा सहभाग म्हणजे ,स्वयपाक सोडुन इतर सर्व सकाळची कामे उरकणे.
बर्याच वेळा एखाद्या पदार्थाचा बायप्रोडक्ट दुसर्या पदार्थात वापरता येतो. अशा वेळी फक्त वेळ नाही तर मेन्यु च ही व्यवस्थापन केल की बेस्ट!
एक मात्र नक्की, व्यवस्थापन आणि कार्यवाही समान्तर( एकाच वेळी) करायच नाही. व्यवस्थापनाचा रोल रात्री झोपताना निभावला की घाइच्या वेळी फक्त कार्यवाही.

.

कांद्यामधे उडून जाणारे घटक असतात, त्यामूळे आधी कापणे योग्य नव्हे.
रोज कापायचाच असेल तर व्ही स्लाईसर किंवा तत्सम यंत्र हाताशी असलेले बरे.
जास्तच कांदा लागत असेल तर त्याची उकडून पेस्ट, तळून पेस्ट, किंवा बारिक चिरून तेलात परतून ठेवायचा. (हे सगळे हवाबंद डब्यात, फ्रिझरमधे.)

ज्यात वाटण असेल त्या भाज्यात, तो बाकिच्या जिन्नसांबरोबर मसाल्यातच वाटून घ्यावा.

अभ्यासातल्या अनेक अवघड आणि अनघड जागा माझ्या या वेळात सुटल्यात, नवे सनसनाटी विचार सुचलेत.. तेव्हा स्वयंपाकघरातल्या कामांमधे माझं हे अभ्यासाचं पण व्यवस्थापन आहे>> Lol वेळेचा उत्तम वापर. Happy

स्त्री करतेय, पुरुष करतोय, एकच जण करतोय की चार जणं मिळूण करताहेत यापेक्षा ते कसं करताय याला महत्व आहे. एकूणात काम नीट तर व्हावं पण लवकरही व्हावं हाच उद्देश ! >>>
नाही पटले अवल. माफ कर.
महत्त्व दोन्ही गोष्टींना आहे. कोण करतं आहे यालाही महत्त्व आहे. Happy

देशात असताना कामाच्या वेळा जाण्यायेण्याचा वेळ धरून
सकाळी साडेसात ते रात्री आठ/नऊ/दहा कसेही.
सकाळी- बाई पोळ्या/भाकरी करतात आणि दूध तापवतात, ओटा आवरतात. मी स्वैपाक करुन, डबे (मुलीला सांभाळणार्‍या ताईच्या डब्यासकट) रात्रीच भरून ठेवते फ्रीजमध्ये. ब्रेकफास्टही रात्रीच तयार करुन ठेवते. कधी ताजी भाकरी हाच ब्रेकफास्ट असतो. बाई करतात.
मुलीच्या शाळेत डबा द्यावा लागायचा तेव्हा तिच्या डब्याची तयारी रात्री करुन, सकाळी फक्त तिचा डबा मी करायचे. नंतरच्या वर्षी शाळेतच खाऊ द्यायचे.
सकाळचा चहा करणे, डबे भरणे - नवरा
रात्रीचा आणि दुसर्‍या दिवशीचा स्वैपाक- आल्यावरती. चिरुन संध्याकाळी बाई ठेवायच्या. वहीत लिहुन ठेवायचे कायकाय तयारी करायची ते. आल्यावरती भाज्या/आमटी/कोशींबीर वगैरे योजिल्याप्रमाणे मी करायचे. झाकपाक आणि ओटा आवरणे - नवरा.
रात्री खूपच उशीर होणार असेल यायला तर गरजेपुरता सर्व स्वैपाक नवर्‍याला येतो. जो येत नव्हता तो शिकवला. आणि जो त्याला येत होता पण मला येत नव्हता तो त्याच्याकडुन शिकले.
शनिवार, रविवारी स्वैपाकघरात. पाहुणे असतातच सतत. याद्या करुन देणे माझे काम. सामान आणणे नवर्‍याचे.
आठवड्याची भाजी शनिवारी घरी येते. निवडुन लगेच फ्रीजात.

परदेशात असताना
दोघांपैकी जो आधी घरी येईल त्याने कणिक मळून ठेवायची, कुकर लावून ठेवायचा. आल्यावर भाजी चिरुन पोळ्या, भाजी मी करायचे, दुसर्‍या दिवशीचे डबेही. झाकपाक, ओटा आवरणे आणि भांडी डिशवॉशरमध्ये लावणे- नवरा. जेव्हा डिशवॉशर नव्हता तेव्हा भाजी होईपर्यंत जेवढी भांडी होतील तेवढी हातासरशी घासून घ्यायचे. उरलेली जेवणानंतरची नवरा घासायचा.

काटेकोरपणे, हिशेबीपणे नाही केले तरी कामं मात्र वाटुनच करतो घरातली. वेळ असला तर पूर्वी दोघे आता तिघे मिळून स्वैपाक करतो. मुलगी लहान आहे. तरी उत्साहाने पाणी घेणे, पाणी सांडणे करत असते.
कधीकधी घरचे खटले कमी म्हणून दोघांच्या सहकारी मित्रमैत्रिणींसाठी/ इतर कुणासाठी काहीतरी करुन न्यायचे असते. तेही आम्ही दोघे मिळून करतो. उद्या ३० पुरणपोळ्या करुन दे, २ किलो साबुदाणा खिचडी करुन दे, बिर्याणी करुन दे असल्या आर्डरी दोघांनी केल्यामुळे उत्तम होतात.

वरदा, माझ्या पोळ्या करपतात बै मी खयालोमे पोचल्यावर Wink
त्यामुळे ४५ मि लक्षपुर्वक स्वैपाक . सगळे आपापले डबे घेउन रवाना झाले की मग वेळ माझा. Happy

रैनाला अनुमोदन. आमच्या घरी स्वैपाकात जरी उरलेल्या दोघान्ची मदत नसली तरी घरातील सगळ्या कामांमधे सहभाग नक्कीच (बरया बोलानी) असतो. कपडे मशिनमधे लोड करणे , वाळत घालणे, नन्तर घड्या घालुन कपाटात / इस्त्रीवाल्या कडे पोचवणे , आणणे. दुध , पेपर, सोसायटी मेंटेनन्स , गॅस, टेलीफोन, वीज, मोबाइल वगैरे बीलं भरणे. रद्दी, नको त्या वस्तु, बाटल्या, डबे , बुट चपला वेळीच काढुन टाकणे. जेवणा पुर्वी आणि नन्तर टेबल आवरणे. घरात दोघे ही नोकरीनिमित्त बाहेर पडणारे असल्यावर कामात सहभाग क्रमप्राप्त आहे.

रैना, उत्तम पोस्ट.
सगळ्या गोष्टींचा खूप बाऊ करण्यापेक्षा विभागणी करणे हे कधीही योग्यच.

माफ करा पण 'नवर्‍याला साधा चहा सुद्धा करता येत नाही' हे अंमळ मला विनोदीच वाटलं. साधा चहा करण्यात असं काय अवघड आहे की जमू नये? आणि ते एवढं कौतुकाने सांगण्यासारखं आहे का? ४ वेळा वाईट होईल, ५व्या वेळेला वाईट प्यायला लागू नये म्हणून तरी जमेल. 'जमतच नै बै!', 'माझ्याशिवाय कुणाच्या हातचं चालतंच नै!' असली कौतुकं करून अडकून बसायची बायकांनाच जास्त हौस असते असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय.

मानुषीताई आणि अवल दिवे घ्यालच.

सगळ्यांच्या पोस्टी छान आहे! अगदी लगबग डोळ्यासमोर उभी राहिली वाचताना!

घरातल्या कामांची जबाबदारी वाटुन घेण्याबाबत रैनाला अनुमोदन!

वरदा, तुझ्या दोन्ही पोस्ट आणि पोळ्या करतानाचे विचारमंथन आवडले!

अनुसया, भिऊ नकोस! आम्ही तुझ्या पाठीशी आहोत!

फ्रीज-फ्रीजर चा योग्य वापर केल्यास ४-५ दिवसांची कणिक भिजवुन ठेवता येते हा स्वानुभव आहे!
लसुण सोलण्याचे काम लेकी आवडीने करतात!

अनुसुया, चुकत माकतच जमत सगळ. (रोजच सगळ इतक सफाइदार होत असही नाही) आणि नैतर माझ काय चुकल चा धागा आहेच! Happy प्रत्येकाच घर त्यातली माणस व इतर घटक वेगवेगळे असतात . तुझ्या घरी बसवायची घडे जमवशिल तु ही. Happy

स्वयंपाक = किचन = बाई असंच समीकरण दिसतंय बहुतेक!! Happy त्यात बदल केले तर किचनमध्ये जाणारा वेळ कमी करता येईल व तोच वेळ आपण आपल्या परिवारासमवेत घालवू शकू किंवा अन्य गोष्टींसाठी वापरू शकू. Happy
शिवाय एकमेकांसोबत काम करताना टीमवर्क, व्यवस्थापन, इत्यादींचेही धडे मिळतील.

काही टिपा :

१. किचनमधील तुमचा वावर प्रसन्न वातावरणात करू शकता. उदा. आवडती गाणी/ संगीत ऐकत, एक्झॉस्ट फॅन / वॉल फॅन लावून काम करणे. आनंदी/ प्रसन्न वातावरणात काम करणे. अगदी आपल्या आवडत्या सुगंधाची फुले जवळपास असणे हेही मनाला प्रसन्न करते.

२. तुम्ही रोबोट नाही. तेव्हा दर अर्ध्या/पाऊण तासाने छोटासा ब्रेक अवश्य घ्या. खिडकीतून बाहेर झाडं - आभाळ दिसत असेल तर त्याकडे बघून या, बसा, पाणी प्या, काहीतरी तोंडात टाका, घरातून छोटीशी चक्कर मारून या.

'नवर्‍याला साधा चहा सुद्धा करता येत नाही' >> मला असे काही चारचौघांमधे सांगणे हे सुद्धा ऑक्वर्ड वाटेल. माझे वडील , काका, आतोबा, आजोबा सर्वांना उत्तम स्वैपाक येत असे, येतो. वाणसामान, भाज्या, मासे यांची खरेदी उत्तम जमते . सख्खे /चुलत्/मावस्/आते इत्यादी भाउ, मेव्हणे, दीर, सगळ्यांना बायकोच्या अनुपस्थितीत ४-६ दिवस स्वतःचे अन मुलांचे डबे, रोजचा नाश्ता, जेवण सगळे व्यवस्थित येते. बर्‍याच जणांच्या सिग्नेचर डिशेस आहेत ज्या त्यांच्या बायकोपेक्षा ते स्वत: जास्त चांगल्या करतात.

नवरा तर लोणची, चटण्या, मसाले पासून बिर्याणीपर्यंत सर्व काही करतो . पराठे व्यवस्थित जमतात .पोळ्या / भाकर्‍या हाच काय तो अपवाद . पण लग्नाची पहिली दहा वर्षे हे प्रकार मला सुद्धा अजिबात येत नसत, त्यामुळे त्याला शिकवणे झाले नाही Proud

तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्‍या असाल तर हे काम नवर्‍यावर सोपवा. >> याला सुद्धा माझा आक्षेप आहे . हेच काय कुठलेही काम चतुराईने आपल्या पार्टनरवर सोपवणे मला पटत नाही. कामाची विभागणी करण्यात वेळेची अव्हेलेबिलिटी अन कामाची केपेबिलिटी हे महत्वाचे. अगदीच नावडते काम असेल तर ते स्पष्ट बोलून ठरवावे.

नवर्‍याने चतुराईने अन गोड बोलून त्याच्या नावडत्या जबाबदार्‍या तुमच्यावर सोपवल्या तर ?

वत्सलाजी....

स्वयंपाक, उपकरणे, तयारी, ३० मिनिटात करणे वगैरे कितीतरी बाफ मायबोलीवर उघडले जातात.. माझ्यासारखे आठवड्याचा स्वयंपाक करणारे, करू शकणारे काही असतीलच. ते प्रतिसाद टाकत नाहीत म्हणजे काही करत नाहीत असा विचार नसावा.

काल रात्री आलू-पालक, कटाची आमटी स्वतः आणि खडे-आलू तयार करण्यामधे बायकोला मदत केलीय. माझ्या घरी येऊन गेलेल्या सर्व मराठी/भारतीय मित्रांना मी बर्‍याच वेळा जेवण करून घालतो. मी तयार केलेले पदार्थ कित्येक मायबोलीकरांनी चाखलेले आहेत. फक्त सगळीकडे मी हे केले, ते केले असं टाकत बसल्याने फारसं काही साध्य होत नाही म्हणून प्रतिसाद टाकतोच असे नाही.

माझ्या दॄष्टीने स्वयंपाक हे ५/१० मिनीटांचे काम नसून तास दिड तासाची विश्रांती आहे. नेहमीच्या कामातून बाहेर पडून एकादा छंद जोपसल्यासारखे आहे.. तेव्हा जेव्हा इथे लोक (पुरूष आणि बायका) ३० मिनिटे म्हणजे खूप, कणीक मळायचा कंटाळा येतो, पोळ्या करणे अवघड असल्या चर्चा करतात तेव्हा फक्त हसून घेतो.
कधी संधी आली तर तुम्हालाही जेवायला घालीन.. Happy

माझ्या दॄष्टीने स्वयंपाक हे ५/१० मिनीटांचे काम नसून तास दिड तासाची विश्रांती आहे. नेहमीच्या कामातून बाहेर पडून एकादा छंद जोपसल्यासारखे आहे.. तेव्हा जेव्हा इथे लोक (पुरूष आणि बायका) ३० मिनिटे म्हणजे खूप, कणीक मळायचा कंटाळा येतो, पोळ्या करणे अवघड असल्या चर्चा करतात तेव्हा फक्त हसून घेतो. >>

है शाब्बास विनय. विनयच्या हातचे पदार्थ खाल्ले आहेत त्यामुळे वरच्या पूर्ण पोस्टला अनुमोदन !

परदेसाई Happy

मी या बाफवर येते म्हणजे मी जाम सगळ्याचा उरका पाडते, कैच्याकै सुगरण आहे असं नाही. तस्मात बाफवर येणे न येणे यावरून काही ठरत नाही.

हा पण इतर बायाबापड्यांबरोबर परदेसाईंसारख्यांनी टिप्स दिल्या तर फार बरे होईल. विशेषतः ज्यांना हे व्यवस्थापन म्हणजे अवघड डोंगर वाटतो त्यांना टिप्सची फार जरूर आहे. (मला नाही. मी माझ्याकडचं व्यवस्थापन उरकून टाकून उंडारते भरपूर.)

सतत कौतुकात नहायची हौस नसेल आणि आयुष्य सोप्पंच करायची इच्छा असेल तर स्वयंपाकाचे व्यवस्थापन हे काही रॉकेट सायन्स नाही Happy

विनयच्या हातचे पदार्थ खाल्ले आहेत त्यामुळे वरच्या पूर्ण पोस्टला अनुमोदन <<<<
मी पदार्थ न खाताही अनुमोदन देतेय.. बघा म्हणजे! Wink

स्वयंपाक = किचन = बाई असंच समीकरण दिसतंय बहुतेक!! त्यात बदल केले तर किचनमध्ये जाणारा वेळ कमी करता येईल व तोच वेळ आपण आपल्या परिवारासमवेत घालवू शकू किंवा अन्य गोष्टींसाठी वापरू शकू>> अकु. बरोब्बर. मला किचनमधे तासनतास खपायला आवडत नाही. त्यामुळे तो वेळ मिनिमाईझ करण्याकडे माझा जास्त कल असतो.

मला स्वतःला बेलापूरला होते तेव्हा स्वैपाकाचा गमभन पण येत नव्हता. त्यातही पोळ्या म्हणजे कैच्याकैच कठीण वाटायचं. पण आता हळू हळू सवय झाली, आणि चक्क सीरीयलच्या ब्रेकमधे माझ्या पाच सहा पोळ्या करून होतात. माझ्यादृष्टीने ही फारच मोठी अचिव्हमेंट आहे. Happy पुरण पोळ्या खव्याच्या पोळ्या वगैरे जमायला लागल्यावर तर स्वैपाक करणे ही काहीच कठिण बाब नाही असे मला वाटते. त्यातही नवनवीन उपकरणानी आपला वेळ कितीतरी वाचवलेला असतो.

मी मागे कधीतरी वेळ वाचवण्याच्या युक्त्या असा एक बाफ काढला होता, त्यामधे भरपूर चांगल्या टिप्स होत्या. मेधाचा आस्वपू नामक धागा तर चक्क माझ्यासाठी प्रेरणादायी वगैरे ठरला होता. Proud

इथे अमेरिकेत रहातो म्हणून....

१. रविवारी सकाळी ५/७ कांदे Food-processor मधे चिरून सगळे एकत्र भाजून ठेवतो. एकदा तेवढी तयारी झाली, की कुठलीही भाजी १०/१५ मिनिटात होऊन जाते. आपल्याकडे ९०% भाज्यांची पाककृती 'कांदा भाजणे' या पहिल्या पायरीने सुरू होते.

२. मी आणि योगिनी (माझी बायको) शनिवार किंवा रविवार एक कुठला तरी दिवस घेऊन त्याचे दोन तास स्वयंपाकासाठी वेगळे ठेवतो. त्या आधी आठवड्याच्या भाज्यांची खरेदी करून घेतो, आणि मग त्या दोन तासात ६/७ भाज्या तयार करून टाकतो. ती बरोबर असेल तर कापणे, चिरणे, भाजणे आणि आवराआवर अशी कामे की करतो, आणि योग्य वेळ शिजवणे, मसाले घालणे, मिक्सर चालवणे वगैरे काम ती करते. पार्टी असेल तर २ तास (५० माणसांपर्यंत) आणि नसेल तर १:३० तासात सगळ्या भाज्या तयार होऊन फ्रीजमधे जातात. आमच्या घरात महिन्यातून एकादी तरी पार्टी असते.
३. मुलांना काही झटपट प्रकार शिकवून ठेवलेत. पास्टा, केक, ब्राऊनी वगैरे त्या काहीही करू शकतात.
४. नेहमी नेहमी त्याच भाज्या होऊ नये म्हणुन मायबोली, खाद्यविषेशांक, स्वयंपाकाची पुस्तकं यावर लक्ष ठेऊन असतो. आणि त्यातल्या पाककृती वाचून त्या तयार करतो. एकदा स्वयंपाकाची सवय असेल तर शक्यतो चुका होत नाहीत, आणि झालीच तर त्यात काय घातल्यावर ती सुधारता येईल हे आपोआप कळतं.
(आतापर्यंत वापरलेल्या पुस्तकात काळे/परूळेकर या दोन बायकांनी लिहिलेलं पुस्तक सगळ्यात जास्त आवडलं.. त्यातली एकही पाककृती 'वाईट' निघाली नाही).
५. पोळी/चपातीचं पीठ हाताने मळण्यापासून, लाटण्याची, भाजण्याची सवय आहे, त्यामुळे त्याही करायचा त्रास नसतो.
७. संध्याकाळचं जेवण ७:३० ला जेवतो, त्यामुळे ८ वाजता स्वयंपाकघर स्वच्छ करून बंद करता येतं आणि उरलेला वेळ दोघानाही वापरता येतो.
८. वापरलेलं भांडं अगदी चिकट झालं नसेल तर लगेच विसळून, धुवून जाग्यावर ठेवायची सवय लाऊन घेतलेली आहे, त्यामुळे पसारा होत नाही, आणि दोन/तीन भांड्यात सगळा स्वयंपाक होऊन जातो.
९. काही पाककृती योगिनीला आणि काही पाककॄती मला विशेष जमतात त्यामुळे त्या-त्या वाटून घेतो आणि करतो..
१०. भारतात गेलो, तर एकाद्या दिवशी आईला आणि एकाद्या दिवशी सासूबाईंना पण जेवण करून घालतो. त्या माझ्याकडे असल्या की त्यांना माझ्या हातचे खावेच लागते. Happy

(आता पुरतं एवढंच)..

रैना, उत्तम पोस्ट. >>> +१

सगळ्या गोष्टींचा खूप बाऊ करण्यापेक्षा विभागणी करणे हे कधीही योग्यच. >>> +१००

.

Pages