लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार
मंदार
.
.
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील>> सहमत.
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील>>
असे कोण म्हणाले आहे 'मी चिऊ'?
एक उत्सुकता
आमच्या घरात आमची आज्जी खरोखर
आमच्या घरात आमची आज्जी खरोखर आदर्श व्यक्ती म्हणावी लागेल. माझे पप्पा सांगतात शिवाय मी पण लहान असताना कायम पाहिलेय. तिचे स्वैपाकाचे, पूर्ण घराचे, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन योग्य प्रकारे केलेले असायचे. एवढे सर्व करून परत ती समाजसेवा करायची. त्यातूनही वेळ मिळाला की टेनिस व बॅडमिंटन खेळायची. (शरदचंद्ररावजी पवार तिच्याचकडे बॅडमिंटन शिकले.) त्यातून वेळ काढून ती योगाचे क्लासेस घ्यायची. हे क्लासेस म्हणजे तिच्या फावल्या वेळातला छंद
तेव्हा फ्रीझ मिक्सर नसताना पण ती दीड तासात सहा माणसाचा स्वैपाक आटपायची. शिवाय ब्रेकफास्ट वेगळा, मुलांचे डबे वेग़ळे शिवाय आजोबा दुपारी जेवायला घरी यायचे त्यांचा वेगळा स्वैपाक. स्वतःच्या तीनही मुलीना तिने घरातले एकही काम कधी करायला लावले नाही. तुमचे तुम्ही आवरा आणि अभ्यास करा एवढ्.च म्हणायची.
"अडाण्यातली अडाणी बाई पण स्वैपाक करते. त्याला अक्कल लागत नाही. शाळा शिकायला अक्कल लागते. तेव्हा तुमची अक्कल तिथे वापरा. पुस्तक वाचायला शिकलात की स्वैपाक पण करता येइल" तिचा हा बहुमोल सल्ला.
ते मी म्हणालो आहे.
ते मी म्हणालो आहे.
सहमत आहे मंदार या धाग्याला
सहमत आहे मंदार
या धाग्याला पती वि पत्नी असे वळण लागू नये
पण स्वयंपाकाचे व्यवस्थापन ही संज्ञा ज्याच्यात्याच्यापुरती असते व प्रत्येकाची वेगळी असते
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील>> या वाक्यात "नवरा" ऐवजी "बायको" हे घालून वाचलेत तरी चालेल
>>या धाग्याला पती वि पत्नी असे वळण लागू नये
सहमत.
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील>>
असे कोण म्हणाले आहे 'मी चिऊ'?
एक उत्सुकता>> गैरसमज नसावा. बेफी अहो तस मंदार म्हणालेत.
>>या धाग्याला पती वि पत्नी
>>या धाग्याला पती वि पत्नी असे वळण लागू नये >> मान्य.
असे कोण म्हणाले आहे 'मी चिऊ'?
एक उत्सुकता>> तुमच्या या वाक्या वरुन मला असा संदर्भ लागला की तुम्हाला वाटतय मी घरात ऐकुन आलेल वाक्य इथे लिहीलय. म्हणुन हसले. गै. न.
आज सगळीच मंडळी (स्त्री-पुरुष)
आज सगळीच मंडळी (स्त्री-पुरुष) सर्वच क्षेत्रात बरोबरीने काम करतात तिथे परिस्थितीच्या गरजा ओळखुन इतरही कामे केली तर काही हरकत नसावी. मुळात आपण चुकतो कुठे तर हे काम माझे, हे तुझे या विभागणीत. कुठलेच काम कुणा एकाची मक्तेदारी नसते. ज्याला जे जमेल ते तो करतो. पण काही अपरिहार्य गोष्टी ज्या टाळल्याच जाऊ शकत नाही तिथे आवड-निवड कशाला? हे माझं वैयक्तित मत आहे अर्थात. स्वयंपाक ही अपरिहार्य गोष्ट आहे, नाही केला तर जेवायला मिळणार नाही. प्रत्येक वेळी बाहेरचे खाणे/हॉटेल्स (बरीच कारणे आहेत जसे पैसा,वेळ, शारिरिक तक्रारी, पथ्यपाणी) शक्यच आहे असं नाही म्हणुन बेसिक गोष्टी तरी शिकाव्यात प्रत्येकाने (इथे स्त्री/पुरुष्/मुलं) असं वाटतं.
मी तर कित्येकवेळा रात्री
मी तर कित्येकवेळा रात्री जेवणानंतर सगळ्यांची भांडी आणि इतर पातेली विसळून ठेवतो
(याशिवाय या व इतर स्वरुपाची घरकामेही करतो. झाडू फरशी पासून. अनेक जण करत असतील. )
पण तो प्रश्न का निघावा हे लक्षात आले नाही
मुळात स्वयंपाक व्यवस्थापन हे फक्त विवाहितांसाठीच आहे असे कोठे म्हंटले आहे? आणि तसे म्हंटले असल्यास तर ते चूक ठरेल
कुणी काय काम करावं हा ज्याचा
कुणी काय काम करावं हा ज्याचा त्याचा वैयत्तिक/कौटुंबिक प्रश्न आहे. हे केलंच पाहीजे अशी जबरदस्ती कशाला?
ह्म्म्म. स्वयंपाकाचे व्यस्थापन याकडे वळूया पुन्हा.
अवल छान लिहिल आहेस. माझाही
अवल छान लिहिल आहेस.
माझाही काहीसा असाच प्रोग्राम असतो.
मी कणीक आदल्या रात्री मळून ठेवते. चहा ठेवल्यावर कांदा चिरायला घेते. चहा होताच कढईत मंद आचेवर कांदा शिजवत ठेवते मग तोपर्यंत चहा घेते. चहा घेउन झाला की लगेच भाजी घालून एकीकडे चपाती करायला घेते. तिसर्या गॅसवर नविन दुध किंवा वरण लावते.
खोबर माझ्याकडे आधीच खरवडून फ्रिजमध्ये ठेवलेल असत. तसेच आल लसुण वाटणही.
उपम्यासाठी रवा आणतो तेंव्हाच कोरडा भाजून ठेवायचा म्हणजे सकाळी घाई होत नाही.
ओटा खराब न होण्यासाठी मी पोळीपाटाखाली वर्तमान पत्र ठेवते. त्यामुळे पिठ कोपर्यांमध्ये अडकत नाही आणि ओटा पुसायला सोप्पा जातो.
अजुन आठवेल तसे लिहेन.
जागू, तुझ्याकडुन तर खुपश्या
जागू, तुझ्याकडुन तर खुपश्या टीप्स अपेक्षित आहेत
स्वयंपाकाचे व्यवस्थापन हा फार
स्वयंपाकाचे व्यवस्थापन हा फार गहन प्रश्न आहे. पटापट विचार करून आमलात आणणे हे एका अनुभवी स्त्रीचे लक्षण आहे. आमच्यासारखे लोक जे १२-१३ तास नोकरीनिमित्त घराबाहेर असतात, त्यांना व्यवस्थापनाचे किती पण धडे द्या. व्हायचे ते वांदे होतातच.
दक्षे, तरीही तुझं व्यवस्थापन
दक्षे, तरीही तुझं व्यवस्थापन स्वयंपाकघरातल अचाट आहे. १२ तास बाहेर राहुनही चटणी कोशिंबीरीपासुन तू सगळा स्वयपाक सकाळी करुन डबा घेऊन जातेसच की.
अरे वा, जागू ! तुझीपण वाट बघत
अरे वा, जागू ! तुझीपण वाट बघत होते. तू इतकं काही करत असतेस ते कसं जमवतेस त्याचे इंगीत कळावं म्हणून तर हा प्रपंच
रच्याकने तिसर्या असं लिहिलय्स ते मला आधी माश्यातल्या तिसर्या असंच वाटलं स्वाभाविकच आहे ना ते !
दक्षे असे बोलूच नकोस तुला
दक्षे असे बोलूच नकोस तुला अजुन मासे शिकून त्यांचेही व्यवस्थापन करायचे आहे. कधी येतेयस शिकयला ?
शुभांगी जेवढे जमेल तेवढे नंतर लिहिते. सगळ्यांच्याच टिप्स महत्वाच्या आहेत.
या टिपा स्वयंपाकघरात काम
या टिपा स्वयंपाकघरात काम करणार्या नवोदितांसाठी आहेत. अनुभवी लोकांना हे सर्व माहित व सवयीचे असेलच!
१. स्वयंपाकघरात / कोठीत सर्व धान्य - जिन्नस सहज सापडतील / डब्यांवर लेबले व त्यात तेच जिन्नस असतील तर शोधाशोध करण्यातला वेळ वाचतो. तसेच रोजच्या जेवणासाठी लागणार्या जिन्नसांचे डबे पुढे व क्वचित / कमी लागणार्या जिन्नसांचे डबे / बरण्या मागे अशी मांडणी सोपी पडते.
२. फ्रीजमध्ये तुम्ही भरपूर सामान साठवत / ठेवत असाल तर किमान दर ८ दिवसांनी फ्रीजची आवराआवर, सफाई आवश्यक. पुन्हा इथेही सारख्या लागणार्या भाज्या / वस्तू (उदा : आले, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबे, मिरच्या - चटण्या -लोणची - मसाले - बटर - चीझ इ.) फार वाकावाकी न करता चटकन हाताला लागतील अशा ठिकाणी ठेवलेत (साईडचे कप्पे) तर चांगले.
३. रोजच्या वापरातील स्वयंपाकाची व जेवणाची भांडी, ताटे, वाट्या, चमचे, कप-बश्या-मग-गाळणी-चिमटे-सोलाणी इ. वेगळी ठेवावीत. तसेच भाज्या-आमट्यांसाठी वापरायचे चमचे, उलथणी इ. सहज सापडतील अशी जागेवर ठेवावीत. (मांडणीत / ट्रॉल्यांमध्ये त्यासाठी कप्पे असतातच!)
४. घरात लहान मुले असतील आणि तुम्हीच जर त्यांच्याकडे लक्ष देणारे असाल तर त्यांना सांभाळत स्वयंपाक करणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे. त्यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळात ती कामे उरकता आली तर बेस्ट! म्हणजे ती जागी असताना तुम्ही त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकाल, त्यांच्याशी खेळू शकाल व स्वयंपाकही निर्वेध होईल.
५. भारतात राहत असाल तर ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा ठेवा. ओल्या कचर्याचा वापर तुम्ही झाडांसाठी खत म्हणून करू शकता. खरकटे अन्न उघडे ठेवू नका. वास येतो. तसेच खिडकीतून/ बाल्कनीतून शिळे/ उरलेले अन्न खाली रस्त्यावर / आवारात टाकत जाऊ नका. ते तुमच्या व इतरांच्या स्वास्थ्यालाही अहितकारक आहे. परदेशात गार्बेज डिस्पोजल ची वेगळी यंत्रणा असते. त्या त्या देशाच्या/ ठिकाणाच्या व्यवस्थेप्रमाणे लाभ घ्या.
६. स्वयंपाक करताना एका मोठ्या भांड्यात / टबात गरम पाणी करून त्यात थोडा लिक्विड सोप घालून एका बाजूला ठेवले व जसजशी भांडी खरकटी होतील तसतशी त्यात ती भांडी / चमचे / डाव इ. टाकत गेले तर ती भांडी स्वच्छ करणे नंतर सोपे जाते. तुमच्या किचन सिंकला जर गरम पाण्याचा नळ असेल तर आणखी छान!
७. क्वचित लागणारी भांडी, क्रोकरी इ. वापरायला घेताना ती स्वच्छ करून वापरावीत. अनेकदा त्यांना कपाटात / ट्रॉलीत/ माळ्यात साठवल्यावर पेस्ट कंट्रोलच्या औषधांचे किंवा डांबराच्या गोळ्यांचे वास लागलेले असतात.
रात्री ८.३०ला हापिसातून
रात्री ८.३०ला हापिसातून येताना दूध आणले तर ते तापवून गार होईपर्यंत वाट पहावी लागते कारण फ्रिजात ठेवावे लागते. वरच राहू दे... उद्या तापवून फ्रिजात टाकू असा विचार केला, तर परत तिच बोंब शिवाय सकाळी गॅस रिकामा सापडणे निव्वळ मुश्किल. दुध झटपट गार कसे करावे? हा एक फालतू प्रश्न वाटेल पण मला जाम जीवावर येतं एक लिटर दूध गार होईतो वाट पाहण्याची. द्या व्यवस्थापनाचा धडा..
अर्ध्या लिटरीच्या दोन पिशव्या
अर्ध्या लिटरीच्या दोन पिशव्या आणाव्यात
दक्षे एका मोठ्या भांड्यात
दक्षे एका मोठ्या भांड्यात बर्फ ठेवून त्यात दूधाचे पातेले ठेवून, पंख्याखाली ठेव.
झटपट गार होते आणि सायही जमते.
पसरट तसराळेवजा भांड्यात साधे
पसरट तसराळेवजा भांड्यात साधे पाणी घेऊन त्यात गरम दुधाचे भांडे ठेवले की पहिल्या ४ ते ५ मिनिटांत बरेचसे तापमान खाली येते. ते पाणी टाकावे, पुन्हा एकदा पाणी घेऊन त्यात दुधाचे भांडे ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवण्याइतके दुधाचे तापमान नक्कीच १० ते १५ मिनिटांमध्ये खाली येते.
थॅंक्स सगळ्यांना नक्की करून
थॅंक्स सगळ्यांना नक्की करून पाहते.
अवल अर्धा लिटरच्या २ पिशव्या आणल्या तर फ्रिजात ते दूध किती दिवस टिकणार? तापवून फ्रिजात टाकलं की जास्ती टिकतं.
स्वयंपाक घराचे व्यवस्थापन हे
स्वयंपाक घराचे व्यवस्थापन हे अजिबात खाण्याचे काम नाही.
एखाद्या मोठ्या कंपनीमधील मटेरियल मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट इतकेच ते कठीण आहे.
कंपनीमधे समजा स्टॉक कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी एखादा प्रोग्रॅम, किमान बिन कार्ड तरी असतात. कुठल्या मटेरियलचा किती स्टॉक उरलाय. तो रीऑर्डर पातळीवर आलाय का ? त्याचा पुरवठा कोण करेल. त्याला किती दिवस लागतील,
हे बघावे लागते.
उत्पादन करणारे खाते, त्यांना काय माल लागणार आहे ते कळवत असते. पुढच्या
काळात मागणी काय असणार आहे. त्यासाठी उत्पादन कसे आणि कधी करायचे.
त्याला काय माल, कधी लागेल. याचा विचार त्या खात्याने केलेला असतो.
हे मी थोडक्यात लिहिले आहे. पण सांगायचा मुद्दा कि तिथे तूमच्या हाताखाली मदतनीस असतात. पण स्वयंपाक घरात मात्र सर्वच भुमिका एकाच व्यक्तीला कराव्या लागतात.
स्वयंपाक घर संभाळणार्या कुणाही व्यक्तीच्या डोक्यात, घरात काय किती शिल्लक आहे, ते कुठे ठेवले आहे. हे सगळे तयारच असते. कुठल्याही मराठी स्वयंपाक घरात,
चहा साखरेचे डबे, मसाल्याचा डबा, गाळणी, लायटर हे सगळे कुणालाही सापडेल
असेच ठेवलेले आढळेल.
काम लवकर करण्याच्या, नंतर जास्त काम करावे लागू नये म्हणून आधीच काळजी
घेण्याच्या युक्त्या अंगात बाणलेल्याच असतात. (वरती जागूने लिहिल्याप्रमाणे, पोळपाटाखाली कागद घेणे वगैरे)
काही साध्या बाबी, कुणाच्या लक्षातही येत नाहीत, पण त्या स्वयंपाकघ्ररात नियमित वावरणार्या व्यक्तीला सहज कळतात.
एक उदा. बघा. चपातीच्या कॅसरोलचे झाकण काढून बाजूला ठेवताना, आमच्या घरी
ते नेहमी उलटेच ठेवतात. म्हणजे त्याला कचरा लागत नाही व परत कॅसरोल झाकल्यावर तो कचरा आत जात नाही. ही आईची शिस्त आहे. आणि ती आमच्या
सर्वांच्या अंगी इतकी भिनलीय, कि कुठेही आमच्या कुणाच्या हातून, ही चूक होत
नाही.
>>अवल अर्धा लिटरच्या २
>>अवल अर्धा लिटरच्या २ पिशव्या आणल्या तर फ्रिजात ते दूध किती दिवस टिकणार?
चितळ्यांचं दूध असेल तर तीन दिवस सहज टिकतं.
दुधाच्या पिशवीवर युझ बिफोर
दुधाच्या पिशवीवर युझ बिफोर डेट छापलेली असते की. आमच्याकडे अमूलचे दूध मिळते ते पॅक केल्याच्या दुसर्या दिवशी मिळते. त्यामुळे दुसर्या दिवसापर्यंत ते न तापवता फ्रीजमध्ये राहते.
चितळ्यांचं दूध असेल तर तीन
चितळ्यांचं दूध असेल तर तीन दिवस सहज टिकतं.>>मंदार त्यांच्याकडे कुठल स्पेशल असत का?
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील>
माझा मुद्दा तरी रोज नवरा बायकोने सगळी कामे निम्मी निम्मी वाटून घेतली पाहिजेत हा नव्हता. कामाची विभागणी प्रत्येक कुटुंबात अन काळानुसार बदलू शकते. माझा मुद्दा फक्त एवढाच होता की थोडा तरी बेसिक स्वैपाक प्रत्येकाला आला पाहिजे. कधीही गरज पडली तर तीन वेळचे घरच्यांचे जेवण खाण सांभाळता आले पाहिजे .
Pages