लहानपणापासून आईचा शिस्तीचा स्वयंपाक पहात आले मी. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी पाच हा वेळ आईचा स्वतःचा असे. माझ्या लग्नानंतर नोकरीत जाणारा माझा ११ ते ५/६/७ जाणारा वेळ पहाता माझ्या स्वतः साठी मला वेळ काढायला मला जे स्वयंपाकाचे व्यवस्थापन उपयोगी पडले ते तुमच्याशी शेअर करावे वाटते. हे काही माझ्या आईकडून आलेले, काही कालानुरूप घडलेले, काही अनुभवातून शिकलेले. जवळ जवळ तीस वर्षात घडलेली ही सारी प्रक्रिया. एका दमात सांगणे अवघड. पण जसे जमेल तसे लिहित जाते. तुम्हीही आपले अनुभव, प्रयोग शेअर कराल ? नव्या गृहिणींना नक्की उअपयोगी पडतील यातले काही नुक्से !
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
९. नाश्त्यासाठी कांदा चिरणे/ पोळ्यांचा कुस्करा करणे/ रवा भाजणे वा तत्सम तयारी करणे. मधून मधून झाकण काढून ( झाकणाखाली साचलेले पाणी भाजीतच पडेल हे पहावे ) भाजी परतणे, झाकण पुन्हा ठेवणे ( हट्टी भाज्यांसाठी झाकणावर पाणी ठेवणे. )
१०. आता परत कणके कडे वळावे. हवे तितके पाणी घालून कणीक भिजवावी. त्यावर पोळ्यांचा डबा झाकून ठेवावा.
११. एव्हाना भाजी होत आली असेल. त्यात मीठ (गरजे नुसार गूळ ) टाकून भाजी परतत ठेवावी. भाजीत मीठ घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नये. मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते, ते पुन्हा भाजीतच मुरले तरच भाजी चविष्ट लागते. तेव्हा मीठ टाकल्यावर किमान २-४ मिनिट भाजी गॅसवर ठेऊन परतावी. १२. नाश्त्यासाठी कढई/ भांडे गॅसवर ठेवावे. दुसर्या गॅसवर आवश्यक असेल तर ( उपमा, शिरा इ. साठी ) पाणी / दूध गरम करत ठेवावे. फोडणी करून नाश्ता करावा. त्यावर झाकण ठेऊन वाफ यायला ठेवावे.
१३. आता भाजी झाली असेल. ती उतरवून पोळ्यांचा तवा बारीक गॅसवर तापायला ठेवा. भाजीत त्यात कोथिंबीर, खोबरे टाकावे. आता झाकण ठेऊ नये. झाकून ठेवलेली कणीक उघडा. आता तेलाचा हात लावून छान मळून घ्या. त्यांचे मुठीच्या अंदाजाचे गोळे करून ठेवा. (त्यांना आताच पोळळी लाटण्यायोग्य आकार देऊ नका. तसेच उबड धोबड असू द्या.)
१४. एकदा नाश्त्याच्या कडे बघा ( म्हणजे तो हलवा, फक्त प्रेमळ दृष्टी नको ) तो झाला असेल तर गॅस बंद करा, झाकण तसेच ठेवा.
१५. प्रत्येक पोळी लाटताना प्रत्यक गोळ्याला पोळपाटावर पुन्हा पटकन मळून गोल करा.) पोळ्या करून घ्या. ( शक्य असेल तर पाठीला वारा लागेल असा फॅन सुरू करा अन मग पोळ्या करा. चिडचिड कमी होते )
पहिली पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्यावर चिमुटभर पीठ भुरभुरवा. पोळी तव्याला चिकटणार नाही. तसेच पोळी तव्यावर टाकली की ती हलतेय ना, चिकटली नाही ना हे तपासा, चिकटत असेल तर एकदा सोडवून घ्या.
गॅस प्रथम बारीक ठेवा. पोळी पहिल्यांदा उलटवली की मग गॅस मोठा करा. पहिली पोळी तव्यावरून खाली घेताना गॅस पुन्हा बारीक करा. सर्व पोळ्या करून घ्या.
१६. आता तोंड, हात गार पाण्याने स्वच्छ धुवा, खसाखसा पुसा. एक भांडं गार पाणी प्या, हुश्स्य म्हणा
१७. कूकर काढून त्यातली डाळ मोडून घ्या. हवा तो मसाला घालून, पाणी घालून कमी आचे वर उकळवत ठेवा. दुसरीकडे नाश्ता पुन्हा गरम करा. माश्त्यासाठी सगळ्यांना टेबलावर बोलवा. नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम ) आमटीला हलवा. गॅस बंद करा. तुमचे आंघोळीचे पाणी गिझरला लावा. सर्वांचे दुधाचे कप भरा. अन मग सगळे नाश्ता करा.
१८. नाश्ता झाला की नवर्याला सर्वांचे डबे टेबलावर काढून ठेवायला सांगा अन तुम्ही तुमचे आवरायला जा.
१९. आता सगळ्यांचे डबे भरा. तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.
२०. तयार व्हा. आरशात पहा. आरशात स्वतःलाच म्हणा, "आजची पहिली मोहिम फत्ते ! " आरशात स्वतःकडे बघून छानसे हसा ! नोकरीसाठी, नव्या मोहिमेसाठी बाहेर पडा
स्वयंपाकाचे व्यवस्थापन
Submitted by अवल on 26 March, 2012 - 01:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं सुमेधा, ती चव किंवा तू
अगं सुमेधा, ती चव किंवा तू म्हणतेस ते असायला हातात कौशल्य असावे लागते ना ते माझ्यात शून्य आहे म्हणून म्हणले मी माझ्यासाठी अतर्क्य!
नीधप, ते कौशल्य आहे ना तुझ्या
नीधप, ते कौशल्य आहे ना तुझ्या हातात, मी आत्ता तुझाच मंथली प्लॅन माझ्या गरजेप्रमाणे बदलते आहे. मस्त आहे तुझा प्लॅन. प्लॅनींग नीट असले म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखेच असते ना
भरत फ़ुप्रो आणि मावेसाठी +
भरत फ़ुप्रो आणि मावेसाठी + १०.
मी फ़ुप्रो आणि मावेवर पूर्णपणे अवलंबून असते.त्यासाठी लाइट असताना या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर वापर करते.
पुर्या/पराठे/पोळ्यांची कणीक भिजवणे, भाज्या चिरणे, दुधी/गाजरं वगैरे खिसणे या आणि अनेक गोष्टी मी फ़ुप्रो त करते.
एरवी आम्ही दोघेच असतो तेव्हा आणि पाहुणे/मित्र मंडळी जेवायला असतात तेव्हाही/तेव्हा तर फ़ुप्रो आणि मावेचा पुरेपूर वापर करते. खूप सुटसुटीत वाटतं.
मावेचाही असाच बर्याच गोष्टींसाठी वापर करते.
अर्थातच माझी बाई फ़ुप्रो आणि मावे दोन्हीतली भांडी घासते. मावेत मी प्लॅस्टिक वापरत नाही.
मयेकर, अहो मी
मयेकर, अहो मी लिव्ह-लायसन्सच्या घरात रहाते. गेल्या २ वर्षातलं हे चौथं घर आहे माझं. त्यामुळे किचनची मांडणी प्रकरणातला अर्धा भाग माझ्या हातातला नाही. कायमची काही व्यवस्था करता येण्यासारखे नाही. तरी मी मूव्हेबल आणि कुठेही बसतील अशी युनिटस घेतली आहेत त्यामुळे ती युनिट ठेवण्याची जागा बदलत राह्यली तरी आतली व्यवस्था चार वर्षांपूर्वी लावली ती पक्की आहे. प्रत्येक शिफ्टिंगनंतर साधारण दोन तासात माझं सगळं किचन लागलेलं असतं ह्यामुळेच
पिंटरेस्टवर हे सापडलं. या
पिंटरेस्टवर हे सापडलं.
या धर्तीवर कामवाल्या बाईसाठी किंवा स्वतःसाठीही काहीतरी चार्ट करून ठेवता येईल का?
मी फार अनुभवी गृहिणी नाही, पण
मी फार अनुभवी गृहिणी नाही, पण तरी....
मला लग्नाआधी भाजी-भात-आमटी-चटणी-को वगैरे येत होतं. पोळ्या शून्यात! साबानी पोळ्या शिकवल्या. परदेशी असताना मी नोकरी करत नव्हते त्यामुळे खूप वेळ हाताशी असे. तेव्हा अडचण नाही आली काही. आता मी नोकरी करते. माझ्या कामाच्या रोजच्या वेळा वेगळ्या आहेत. मी आणि साबा मिळून उरका पाडतो. नवरा आणि साबु मदत करतात. उद्याची भाजी आज रात्री चिरायचं काम नवर्याचं. कोशिंबीर/ चटणी करायची असेल तर त्याचीपण तयारी तो करतो. तोवर मी दोघांचे डबे घासून ठेवणे, ओटा-टेबल आवरून ठेवणे, भांडीवाल्या मावशीना न ठेवायची भांडी घासणे आणि दूध तापवून ठेवणे (सकाळसाठी नाही, जे उरलेलं असेल तेच) हे उरकते.
सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन, चिरलेलं सामान बाहेर काढून ठेवते. फुप्रोवर कणीक मळते. पाणी बरेचदा साबु भरतात. कणीक मळली की भाजी फोडणीला टाकते. करताना फोडणि जास्त करते, कोशिंबिरीत घालायला. चटणी करायची असेल तर ती भाजी शिजेपर्यंत करते. पोळ्या करायला घेते. शक्यतो दोन्ही वेळच्या + डब्याच्या एकदमच करते कारण संध्याकाळी आल्यावर स्वयंपाक करायची इच्छाच नाही रहात. पोळ्या होईतोवर भाजी, चटणी आणि को. होऊन जाते. याला सगळा मिळून सव्वा तास लागतो मला तरी. मग ब्रेफा आयटम. तोही शक्यतो रात्रीच प्लान आणि तयारी होऊन झालेला असतो. फक्त मुख्य पाकृ सकाळी. दुपारचा कुकर साबा लावतात. सकाळी माझी गडबड होतेयसं दिसलं तर साबा भाजी करतात, आणि ब्रेफा पण करून ठेवतात.
किराणा ज्याला जमेल त्यानी आणायचा. साबु, नवरा, मी... बिलं भरणंही असंच. आणि सगळेच जण आलटून पालटून हे करतोच. मशीन लावणे- कपडे वाळत घालणे साबा करतात. साबु त्याना मदत करतात. सुटी असली की मी करते. संडास-बाथरूम इत्यादी साफसफाई पण जमेल त्याने वेळोवेळी करायची.
सकाळी अर्धा तास व्यायाम माझ्यासाठी अत्यावश्यक. सकाळी लवकर लेक्चर असेल तरच संध्याकाळवर जातो माझा व्यायाम. मुद्रा, १२ सूर्यनमस्कार, प्राणायाम = ३० मिनिटं. ते झालं की आंघोळ. मग ब्रेफा खाऊन कॉलेज.
संध्याकाळी आल्यावर शक्यतो फक्त कुकर. रात्रीची भाजी साबा त्यांच्या सोयिने संध्याकाळपर्यंत करतात. लागलीच तर भाकरी मात्र ताजी करते मी. पूर्वी मला फार ताण येई, आता नाही येत.
असो.
सर्वांच्याच पोस्ट्स मस्त
सर्वांच्याच पोस्ट्स मस्त !
मुळात मला स्वयंपाक हे काम "काम" वाटत नाही. कारण ते माझ्या आवडीचे काम आहे जसे माझ्या एका काकांना आवडायचे, माझ्या मामाला आवडते आणि माझ्या जवळच्या अनेक मैत्रिणीं अन अनेक मित्रांना आवडते.
पण आवडते काम म्हणून त्यात व्यवस्थापन करू नये असे का बरे? हे जरी आवडीचे काम असले तरी ते एकमेव आवडीचे काम नाही ना ? मग इतर आवडीच्या कामांसाठीही वेळ मिळावा म्हणून जर सगळ्याच कामांना मग ते आवडीचे असो वा नसो, त्यात व्यवस्थापन करावेच असे माझे मत.
स्वयंपाक हे फक्त बाईचे काम असे मी कधीच मानले नाही. पण एखादे काम माझ्या आवडीचे, माझ्या कौशल्याचे, माझ्या सवयीचे असेल तर ते मी करावे या मताची मी नक्की आहे. जे काम मला आवडत नाही, ज्यात मला कौशल्य नाही अन त्यात परिश्रमाने कौशल्य निर्माण करावेसे मला वाटत नाही- गरज नाही ते काम मी जबरदस्ती का करावे बरे ? अन हे माझे मत, प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात, मग ती बायको असो, नवरा असो, लेक असो, सासू असो नाही तर सहकारी असो.
माझ्या लेकाला मी स्वयंपाक शिकवला, तसे खेळायलाही शिकवले, गणितही शिकवले, वाचनाची गोडीही लावली, लाईटचा फ्युजही लावायला शिकवला अन भरतकामही शिकवले. हे सर्व शिकवले ते, त्याला सर्व गोष्टी कळाव्यात, याव्यात या साठी. त्याने त्या आता त्याच्या आयुष्यात आवडले म्हणून किंवा गरज भासली म्हणून कराव्यात वा करू नयेत. पण त्या कशा करायच्या, अन करताना त्यातला आनंद कसा घ्यायचा हे त्याला कळल्याशी माझा मतलब.
अन मला वाटतं एखादी गोष्ट मला आणि मी ज्याला नीट ओळखते - ज्याचा मी म्हणते यावर पूर्ण विश्वास आहे त्याला, एखादी गोष्ट जमत नाही हे म्हणण्यात एव्हढे अवघड काय आहे ? प्रत्येक माणूस काही सर्वगुण संप्पन्न नसतो ना ! जसे मी इ-अक्षर शत्रू आहे हे मला म्हणायला काही वाटत नाही तसेच ते माझ्या नवर्याला, मुलाला, बहिणीला, मेहुण्याला, भावाला, वहिनीला, सख्ख्या मैत्रिणी-मित्राला म्हणायला काही वाटत नाही. अन त्यांनी माझ्या समोर, मागे असे म्हटले तरी मला वाईटही वाटत नाही . का वाटावे ? त्यांच्या बोलण्यात सत्यच आहे, अन ते काही माझी कुचेष्टा वा माझे वैगुण्य म्हणुन ते सांगत नाहीयेत. किंवा स्वतःचे महत्व सिद्ध करायलाही ते सांगत नाहीयेत. एव्हढा विश्वास किमान जवळच्या व्यक्तींबद्द्ल असलाच पाहिजे ना ? अशी स्वच्छ दृष्टी असणारे अनेकजण माझ्या आजूबाजूला आहेत. अन तसेच मी ही त्या सर्वांच्या आजूबाजूला आहे.
हां ती गोष्ट मला कशी जमवता येईल त्या साठी सल्ले मी फक्त ओळखींच्याकडूनच मिळावेत असे मानू शकते, पण ती गोष्ट मला येत नाही हे कोठेही सांगायला मला लाज नाही वाटत किंवा त्यात काही कमीपणाही नाही वाटत.
या सर्वात अकारण स्त्री-पुरुष समानता, घरातली सर्व कामे सर्वांनी करावीत हे मुद्दे का यावेत हे ही मला कळले नाही. घरात केवळ स्वयंपाक हे एकच काम असते की काय ? मुलांचे आवरणे, साफसफाई, बाजारहाट, भाज्या निवडणे, घरातल्या वरिष्ठांची काळजी घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, आर्थिक तपशील ठेवणे, फ्रिज्-कपाटं लावणे, एकमेकांशी संवाद, ही आणि अशी कित्त्येक कामे असतातच की घरात. ज्याला जे आवडते, ज्याची ज्यात गती ते त्याने करावे. हं त्यातून काही कामे जी सर्वांच्याच नावडीची त्याचे व्यवस्थापन सर्वांनी बसून ठरवून करता येते. त्यामुळे या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब या नुसार वेगवेगळ्याच होतील ना ?
असो फार लिहीले. सहसा मी अशा वादंगात पडत नाही . पण काही पोस्टी वाचून या वेळेस वाटले लिहावेसे....
पण अशा सोशल साईटवर अशा गमती जमती कधी कधी होणारच नाही का
अवल, <नवरा-मुलं यांना
अवल,
<नवरा-मुलं यांना ताटल्या, पाणी घ्यायला लावा ( हे सर्वात अवघड काम )
तुम्ही फारच चतूर अन गोड बोलणार्या असाल तर हे काम नवर्यावर सोपवा.>
या वाक्यांतून काय संदेश जातोय ते तुम्हीच बघा. ती विनोदाने लिहिली असली तरीही.
तसंच १ ते २० या पायर्यांमधली सगळी कामे एकच व्यक्ती करताना दिसतेय. मला ते सगळे वाचूनच दमायला झाले. यात श्रमविभागणी नक्की आणि सहज शक्य आहे.
नायजेरियात आम्ही सहा मॅनेजर्स
नायजेरियात आम्ही सहा मॅनेजर्स एका मोठ्या घरात रहायचो. २४ तास चालणारा
प्लांट म्हणून, त्या सर्वांना रविवारी फॅक्टरीमधे जावे लागायचे. रविवारशिवाय इतर दिवशी काही शॉपिंग करणे अशक्य (कारण जवळपास शॉप्स नव्हती.)
मग सगळ्या सहा जणांच्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर. दर रविवारी, २/३ तासाचा
प्रवास करुन लेगॉसला जायचे, तिथल्या दोन/तीन बाजारातून भाजीपाला, वाणसामान
आणायचे. ते स्टोअरमधे व्यवस्थित लावायचे हे माझे काम.
रोजच्या भाज्या नीट करणे वगैरे मेड करायची, आणि भांडी, डिशेस साफ करण्याचे
काम मात्र तिच करायची.
रोज रात्री कणीक मळून ठेवायची. सर्वांना दही आवडायचे म्हणून रात्री विरजण
लावून ठेवायचे. सकाळी नाश्ता, भाजी, आमटी करुन माझ्यापुरत्या चपात्या करायच्या. (मेड बाकिच्यांच्या करायची. मला तिच्या हातच्या आवडत नसत.) भात मात्र ती करायची.
तिला स्टोअरमधून सामान काढून देणे, हे पण माझेच काम.
कधी कधी एखादा रविवार मलाही लेगॉसला जायचे जमायचे नाही, पण पर्यायी
बाजारातून मिळतील त्या भाज्या आणायच्या. त्या बहुदा स्थानिक असायच्या. मग
त्या भारतीय पद्धतीने शिजवायच्या. हे माझे काम.
एवढ्या मर्यादीत साधनातूनही आमच्याकडे एक भाजी महिनाभरात एकदाच व्हायची.
आमटी प्रकारही रोज वेगवेगळा.
महिन्यातून एकदा पार्टी असायची. त्यावेळी सहज २५/३० माणसे जेवायची.
या सर्वाचे आर्थिक नियोजनही माझेच असायचे. कुठलेही जास्तीचे सामान न आणता,
आमच्या घरच्या वाणसामानातूनच पार्टी होत असे.
साधनांची कमतरता नव्हती. फ्रीज, डिप फ्रीझर, मिक्सर, फुड प्रोसेसर, मावे सर्वच होते, पण ते मलाच हाताळावे लागत असे. (मेडच्या ताब्यात दिले तर ती त्यांची वाटणे
करुन ती मिक्सरची वाट लावायची.)
शिवाय सहा जणांची पत्थं, आवडी निवडी, व्रतं हे पण मीच संभाळायचो. (सहा जणांपैकी एक काश्मिरी, एक पंजाबी, एक तामिळ, एक गुजराथी, एक लखनवी) प्रत्येक जणाच्या प्रांतातले शिवाय काँटीनेंटल असे सर्वच प्रकार व्हायचे.
आणि हे सगळे निव्वळ हौस म्हणून मी करायचो. त्या गावात तर हॉटेलही नव्हते,
आणि फॅक्टरीत कुणी भारतीय पाहुणा आला तर, त्याला आम्ही जेवल्याशिवाय सोडत
नसू. (काही जण तर आधी फोन करुन फर्माईश करत असत.)
उत्तम चवदार जेवण मिळाल्यावर अर्थातच समाधान असायचेच. सगळ्यांकडून शाबासकी आणि प्रशंसा मला कायम मिळायची.(त्यात मंगला बर्वे यांच्या कन्या आणि
जावई पण होते.)
तिथे निव्वळ मेडवर अवलंबून असणारी माणसे, कायम असमाधानी असायची.
तब्येतीच्या तक्रारी कायमच्याच.
मला तरी वाटते, आपले आरोग्य, कार्यक्षमता हि आहारावर अवलंबून असते, त्यामूळे
त्याकडे थोडेतरी गांभीर्याने बघायला हवे.
भरत, त्या वाक्यापुढचा स्माईली
भरत, त्या वाक्यापुढचा स्माईली पाहिला नाहीत का ?
माझ्याकडे ही सर्व कामं मीच करते. मी काही आदर्श व्यवस्थापन असा धागा नाही काढला प्रत्येकाने आपापले लिहावे. अन श्रमविभागणी प्रत्येक कामात न करता अनेक कामांची विभागणी केली तरी चालते ना? वरची माझी पोस्ट पुन्हा पहाल ?
वा दिनेशदा ! असे काम असेल तर मिळणारच शाब्बासकी
>>>पण एखादे काम माझ्या
>>>पण एखादे काम माझ्या आवडीचे, माझ्या कौशल्याचे, माझ्या सवयीचे असेल तर ते मी करावे या मताची मी नक्की आहे. जे काम मला आवडत नाही, ज्यात मला कौशल्य नाही अन त्यात परिश्रमाने कौशल्य निर्माण करावेसे मला वाटत नाही- गरज नाही ते काम मी जबरदस्ती का करावे ब>>><<
ह्याला १००० मोदक.
ह्या नुसारच आम्ही कामं घेतली आहेत न ठरवता मग ते काम कुठलेही असो. जेवण करणं नवर्याला आवडते, मला १ तासाच्या वर राहिले की चिडचिड होते. मी बाहेरची कामं छान करते.. गाडी धूवणे, बिलींग करणे वगैरे वगैरे.
उगाच जिथे तिथे कशाला न्युनगंड असावा की अरे, मला किचनचे काम करावे लागले, त्यात मी स्त्री मग हा अत्याचार होतोय की काय एका पुरुषाकडून (नवर्याकडून) ..अश्याने कशाला पछाडून घ्यायचे स्वतःला
प्रिन्सेस, तुम्ही खूप मेहनत घेता किचनमध्ये. प्रामाणिक पणे सांगतेय. ते फ्रीजवर भाजीचा तक्ता लिहून मग वापरली की काटा मारणे वगैरे खूपच ऑर्गनाईज्ड आहे.
माझ्या नवर्याला खरेच काहीही
माझ्या नवर्याला खरेच काहीही येत नाही . पण त्याचे त्याला किंवा मला कौतुक वाटत नाही. >>> +१
मवा एकाच बोटीत ना ?
मवा
एकाच बोटीत ना ?
अगदी.. कौतुक तर नाहीच, संतापच
अगदी..
कौतुक तर नाहीच, संतापच येतो.. म्हणून तर म्हणले ज्यांचे नवरे आधी करत नव्हते पण आता करतात त्या बायांचे डबल कौतुक.
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण
नवरा स्वयंपाक करत नसेल, पण इतर कामात अधिक वाटा उचलत असेल तर? उगाच संताप करण्यात काय हशील?
ते आहेच की कायम.. म्हणून तर
ते आहेच की कायम.. म्हणून तर सुरळीत चालू आहे.
पण मग इतरांचे नवरे करतात हे कळल्यावर संताप होतो हो...
आमच्याकडे स्वयंपाक एकदाच होतो
आमच्याकडे स्वयंपाक एकदाच होतो संध्याकाळी. कुणी पाहुणे असतील तर सकाळी त्यामुळे जास्त व्यवस्थापनाची गरज पडत नाही.
मी ,नवरा कंपनीतच नाष्टा+ जेवण करतो (सुदैवाने चांगले पर्याय उपलब्ध असतात). फक्त लेकीचा शाळेचा डबा सकाळी करावा लागतो.
१)दोन तीन दिवसांचे कणीक एकदमच भिजवुन ठेवते.
२)रोज संध्याकाळी जी भाजी करेन त्यातलीच थोडी सकाळी लेकीच्या डब्यासाठी वेगळी काढुन ठेवते.
३) भाजी+किराणा+दुध्+फळे+बेकरी आयटम्स सगळे नवरा बघतो. तो दोन तीन दिवसांची भाजी एकदम आणुन ठेवतो (निवडणे+धुणे+फ्रीजमधे ठेवणे ही सगळी कामे त्यात समाविष्ट आहेत)
४) फ्रीजमधे कायम उकडलेले बटाटे, पराठ्याचे स्टफिंग (पनीर/परतलेला कोबी/गाजर्/वाटली डाळ्/रताळ्याचे पुरण्/चीज) तयार असते त्यामुळे लागलाच नाष्टा कुणाला तर हातासरशी करता येतो.
५)हिरवी पालेभाजी (ताकातला चाकवत्/अळुभाजी/शेपु+चुका/पालक्+चुका/पालक)/ रस्साभाजी/ करी केलीतर आमटीला फाटा असतो व एखादी कोशिंबीर अॅड होते.
६) मी घरीच पोचते संध्याकाळी ७.४५ त्यामुळे स्वयंपाक करताना तयारी उपयोगी पडते. एकीकडे कुकर लावला की दुसरीकडे भाजी फोडणीस टाकते. आमटी/भाजी होईतो पोळ्या होतात. नवरा/लेक पाटपाणी घेइतो कोशिंबीर होते. सगळे एकदम बसतो जेवायला. मी दुसर्या दिवसाची तयारी करेपर्यंत नवरा दुध तापवणे/लेकीचा दिवसभराचा आढावा/बेडशीटस बदलणे असली कामे करतो.
७) नवरा सकाळी लवकर जात असल्याने तो त्याचा आणि माझाही चहा करतो.
अर्थात मी हे किंवा त्याने ते अस काहीही ठरलेलं नाही. ज्याला जे जमेल तो ते करतो. मी कधी लवकर गेले तर भाजी मी घेऊन जाते.
पाहुणे जेवायला असतील तर मात्र मेन्यु ठरवण्यापासुन त्याला लागनार्या जीनसा बाजारातुन आणुन/चिरुन्/धुवुन्/मसाला वाटुन देण्याचे काम तो करतो.
विषयाशी संबधीत नाही पण
विषयाशी संबधीत नाही पण सांगितल्यावाचुन राहावत नाही
माझे बाबा पुरणपोळीपासुन सगळा स्वयंपाक उत्तमरित्या करायचे जेंव्हा केंव्हा ते घरी असायचे. पोलिसफोर्समधे असल्याने त्यांना तसे प्रसंग घरी असण्याचे कमीच मिळायचे पण ते असतील तर आमची चंगळ असायची. आईला तर सुट्टीच असायची स्वयपाकाला. इतरही वेळी ते बाजारहाट करणे धान्याचे डबे भरणे, भाज्या निवडुन, धुवुन, चिरुन ठेवणे. तेंव्हा फ्रीज नव्हता पण ते ओल्या पंचात गुंडाळुन माठात ठेवत भाज्या. तीन चार दिवस आरामात टिकत. माझ्या घरी सगळेच भाऊ बहिणी सगळीच कामे करत असु. आई स्वयंपाक करायची नंतर जेवण सगळे एकत्र असतील तर एक्त्र किंवा प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार करायचा. वडिलांचा एकच नियम होता कुणी कुणावर कशासाठीही अवलंबुन राहायच नाही.
लग्न झाल्यावर मात्र वेगळाच प्रकार अनुभवला. नवर्याला हातात पाण्याचा ग्लास द्यायची सवय. तो सकाळी लवकर जातो म्हणुन आंघोळीचे पाणी काढण्यापासुन ते टॉवेल,युनिफॉर्म्,घड्याळ्,रुमाल सगळ हातात अगदी शुजपण द्यायचे नेऊन. मी पहिल्यांदा काहीच बोलले नाही पण काही केलेही नाही. फ्रीजजवळ असला तरी आई पाणी दे ग आणि आई यायची धावत हातातल काम टाकुन. यात आळशीपणा हा एक भाग असला तरी सवय आणि हे असच असत ही समजुत खुप ठसलेली होती मनात. मी मात्र ठाम राहिले माझ्या मतांशी. इगो दुखावला जाणार नाही पण आपली कामेही होतील अश्या रीतीने सगळे गळ्यात मारले त्याच्या आधी आधी पण आता तो ते सगळं आवडीने करतो. अर्थात या सगळ्याला त्या त्या वेळची परिस्थिती जबाबदार होती पण मुळातच मोल्ड व्हायची पण तयारी लागते. पुढचा माणुसही तितकेच कष्ट करतोय मग जबाबदार्या वाटुन घ्याव्यात ही समजूत घातली की झाले.
२ ही पोस्ट छान आहेत शुभांगी
२ ही पोस्ट छान आहेत शुभांगी
शाब्बास शुकु!!
शाब्बास शुकु!!
शुभांगी, हे असले प्रकार मी
शुभांगी, हे असले प्रकार मी बाकीच्या राज्यातील (पाणी पण हातात द्यावे लागणे) लोकांत खुप बघितलेत. त्यात त्या बाईला आणि पुरुषाला पण काहीच वाटत नाही,
हे जास्त वैताग आणणारे आहे. सांगायला गेलो तर आपणच वेडे ठरतो.
लग्न झाल्यावर मात्र वेगळाच
लग्न झाल्यावर मात्र वेगळाच प्रकार अनुभवला. नवर्याला हातात पाण्याचा ग्लास द्यायची सवय. तो सकाळी लवकर जातो म्हणुन आंघोळीचे पाणी काढण्यापासुन ते टॉवेल,युनिफॉर्म्,घड्याळ्,रुमाल सगळ हातात अगदी शुजपण द्यायचे नेऊन.
>>>>>>>>>>>>>>>>>>
हे अजूनही घडतं की काय खरोखर कोणाच्या घरी
भुंग्या, मलाही असाच प्रश्न
भुंग्या, मलाही असाच प्रश्न पडायचा कारण स्वतःच्या घरात हे कधी बघितलं नव्हतं. पण पार भ्रमनिरास झाला माझा नंतर.
भुंगा, याबाबतीत
भुंगा, याबाबतीत महाराष्ट्रातील शहरे पुढारलेली आहेत. कदाचित बंगळुरू सारख्या
शहरात देखील असे असेल. पण बाकीच्या राज्यातील शहरात अजून भयाण परिस्थिती आहे. केवळ घरचे वडीलच नव्हे तर लहान मुले देखील, आईला कस्पटासमान वागवताना मी बघितली आहेत.
मला न राहवून ज्यावेळी मी मुलांवर रागावतो, त्यावेळी त्यांच्या आईच्या डोळ्यातले पाणी बरेच काही सांगून जाते.
सॉरी.. अवांतर झाले हे.
.
.
वरदा हो ग एकदम मान्य. तेच मी
वरदा हो ग एकदम मान्य.
तेच मी पण म्हणतेय. स्वयंपाक जरी माझ्या खात्यात असला तरी इतर कामे त्याच्या खात्यात आहेत. आणि ते पण न ठरवता. त्याला अन मला दोघांना पक्के माहितीय की तो स्वयंपाकाच्या मामल्यात काहीच करु शकत नाही. मला भाज्या आणायचा कंटाळा . मग अपोआपच ते काम त्याचे.
तू म्हणतेस तशी जाणीव मात्र प्रत्येकलाच हवी, हे खरे.
अवलची आताची लेटेस्ट पोस्ट खूप आवडली. लेकाला इतके काय काय शिकवलय... मस्तच !
>>Princess, aga navaryane
>>Princess, aga navaryane swayampakat madat kelich pahije ashi apeksha nahiye tar tyala ya goshti alya pahijet asa mat ahe
फारसा सहमत नाही. तीव्र नावड असली तर?
मी वर म्हणालो त्याप्रमाणे इतर बाबीत जास्त वाटा उचलला जात असेल तर याविषयी खरं तर तक्रार सुद्धा असता कामा नये.
क्रिकेटमधे नाही का, एखाद्या खेळाडूचं क्षेत्ररक्षण चांगलं नसेल तर त्याला अशा जागी 'लपवलं' जातं जिथे फारसा चेंडू जात नाही. त्याप्रमाणे घरात सुद्धा एखादी गोष्ट जमतच नसेल (किंवा आवड नसेल तर असे म्हणू) तर सोडून द्यावं आणि इतर जबाबदार्या जास्त सोपवाव्या.
हा धागा मला विनोदी
हा धागा मला विनोदी वाटला
=============================
१. शक्यतो करावयाची भाजी आधल्या दिवशी आणुन ठेवावी, निवडण्याची असेल तर निवडूनही आधल्या दिवशीच निवडून ठेवावी. चिरण्याचे काम मात्र आयत्या वेळेसच करावे, चव टिकून राहते.
२. सकाळी चहा - दूध उकळवत असतानाच, स्वयंपाकाच्या तयारीचे विचार, मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी सुरू करावेत.
३. फ्रिजमधून भाजी, मिरच्या, कोथींबीर, आलं, कढिपत्ता काढून ठेवावे.
४. चहा उकळे पर्यंत कुकरची तयारी करावी. डाळ, भात कुकरमध्ये लावावा. ( स्वयंपाकात उकडलेला बटाटा लागणार असेल तर तोही कुकरमध्ये टाकावा - जसे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला असेल तर...)
५. चहा उकळला की तिथे कूकर गॅसवर ठेवावा. अन निवांत चहा प्यावा, पेपर वाचावा.
६. कूकरने शिट्ट्या दिल्या की उठून गॅस बारीक करावा अन स्वयंपाकाला लागावे
७. भाजी चिरावी चिरावी. मग कूकर उतरवून भाजीसाठी कढई तापत ठेवावी. मिरच्या, किथिंबीर चिरावी. फोडणी करून भाजी मोठ्या आचेवर परतावी. आता आच कमी करून झाकण ठेवावे.
८. कणीक घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल अन थोडे पाणी घालावे. ( आताच मळू नये.)
===============================
हे असे ठरवून काय करता येते? प्रत्येकाची परिस्थिती समान कशी असेल? मुद्दा क्रमांक पाच प्रमाणे 'निवांत चहा पिताना' एखादे कार्टे घसरून पडले आणि केकाटले तर काय करणार? आदल्या दिवशी घरातले सगळेच रात्री दहा वाजता परत आले तर भाजी कशी आणून ठेवणार?
अर्थातच, आता उत्तर येईल की 'हे सर्व शक्य तेव्हा करावे' असे म्हणायचे आहे.
पण कौटुंबिक जबाबदार्या घेणारी व्यक्ती या सर्व गोष्टी स्वतःच्या सोयीनुसार ठरवत असते (ठरवू शकते हे तर आहेच). तिला त्या गोष्टी तशाच करणे सोयीस्कर पडते. एखादी दुपारी बारा वाजता कामाला जात असेल तर ती भाजी सकाळी आणून सकाळीच निवडणार नाही का? बॅन्केच्या परिक्षेचा अभ्यास असला तर बाहेरून पार्सल आणले जाते.
आयुष्यातील अत्यंत दैनिक बाबीत असे कोणतेही खास टिपण्णीयुक्त मार्गदर्शन उपयुक्त पडू शकत नाही, किंबहुना ते कुचकामी ठरते.
आता 'कणकेच्या' बाबतीत 'आताच मळू नये' हे जे लिहिले आहे ते एखाद्या व्यक्तीला वेळच नसला तर ती कशी काय पाळू शकेल?
हे सर्व लिहिताना मूळ धागाकर्ता यांच्याबाबत कोणताही आकस नाही. (हो, हे लिहिलेले बरे)
मात्र मला प्रामाणिकपणे हा धागा विनोदी वाटला.
चहा उकळल्यावर तिथे (गॅसवर) कूकर ठेवायचा असला आणि कूकरच्या शिट्या झाल्या की भाजीचे पातेले ठेवायचे असले तर दोन बर्नर्स असलेल्या, चार बर्नर्स असलेल्या शेगड्या का असतात?
न प्रतिसाद देता शांत बसणे शक्य आहेच. पण नाही जमले मला ते, क्षमस्व!
-'बेफिकीर'!
.
.
वरदा, पण सगळे घरीच स्वयंपाक
वरदा, पण सगळे घरीच स्वयंपाक करतात हे गृहतिक का? अशा वेळी सरळ बाहेर जातात जेवायला!!
Pages