अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
शोले मधली कव्वाली सिनेमाचा
शोले मधली कव्वाली सिनेमाचा कालावधी जास्त असल्याने काढून टाकावी लागली. त्याची ऑडीओ युट्यूबवर उपलब्ध होती.
https://www.youtube.com/watch?v=g7QjIewLu6U
ओह! हे माहीत नव्हतं.
ओह! हे माहीत नव्हतं.
*शोले मधली कव्वाली >>>
*शोले मधली कव्वाली >>> पाहिली.
तब्बल साडेसात मिनिटांची आहे.
नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे
नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी मुलाखतीत सांगितलेल्या काही विशेष गोष्टी :
https://www.youtube.com/watch?v=Hf9qCqVm-wI&t=2018s
छान धागा
छान धागा
>> मिस्टर नटवरलाल>>> भारीच.
विनोबा आणि रेडिओ
विनोबा आणि रेडिओ
पु ल देशपांडे आणि मंगेश पाडगावकर आकाशवाणीच्या नोकरीत असतानाचा हा प्रसंग. आकाशवाणीला विनोबा भावे यांचा संदेश हवा होता आणि त्याची कामगिरी या दोघांवर सोपवली होती.
तेव्हा विनोबांची पदयात्रा चालू होती. त्यांनी या दोघांना त्यात भरपूर पिदवून घेतले आणि संदेश द्यायचे मात्र ते टाळत होते. शेवटी पाडगावकरांनी, “आमच्या पदरात संदेश टाका” अशी विनवणी करणारा अभंग लिहून विनोबांच्या उशाशी ठेवून दिला.
अखेरीस विनोबांनी दिलेला संदेश असा होता :
“हे रेडिओवाले सांस्कृतिक बाबतीत माझा संदेश घ्यायला आलेत म्हणून देतो आहे. माझा सांस्कृतिक कार्यक्रम मी रात्री झोपलो की सुरू होतो. त्यात व्यत्यय आणणारे दोन प्राणी आहेत. एक म्हणजे रात्रीबेरात्री भुंकणारी कुत्री आणि दुसरा म्हणजे मध्यरात्रीपर्यंत किंचाळणारा रेडिओ !”
(एक शून्य मी या पुस्तकातून साभार)
संजय मोनेनी सांगितलेला हा
संजय मोनेनी सांगितलेला हा किस्सा आहे. त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग असताना मुख्य भूमिका असलेल्या अभिनेत्याला वाहतुकीत अडकल्यामुळे नाटकाच्या वेळेला पोचता येत नव्हते. मग आयत्यावेळी त्यांनी शक्कल लढवली. मुख्य पात्र शेतात काम करतय असं चित्र निर्माण करून फक्त त्याचे संवाद कानावर पडतील आणि त्यातून बाकीचे कलाकार स्टेजवरून त्याच्याशी बोलतील असं ठरवलं. नाटक चालू केल्यावर त्यांच्यातल्या एकजण स्टेजमागून मुख्य पात्राचे संवाद म्हणायचा. असं करत त्यांनी पहिला अंक संपवला. दुसऱ्या अंकात मुख्य अभिनेता स्टेजवर हजर झाला.
*संजय मोने>> किस्सा आवडला.
*संजय मोने>> किस्सा आवडला.
आचार्य अत्र्यांनी त्यांची
आचार्य अत्र्यांनी त्यांची पहिली कविता वयाच्या नवव्या वर्षी लिहिली. त्या कवितेची प्रेरणा म्हणजे सरदार पुरंदऱ्यांकडे स्वयंपाकीण म्हणून असलेल्या सीताबाई.
कवितेचा हा अंश :
सीताबाई वर्णू किती तव गुण
डोळा काणा नाक वाकडे बधिर असती तव कर्ण
सीताबाई वर्णू किती तव गुण
एकादशीला उपास करूनी खाई कांदा लसूण
सीताबाई . . .
…
“माझी पहिली कविता विनोदी व्हावी हा योगायोगही अर्थपूर्ण आहे’, असे त्यांनीच या कवितेबद्दल म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=VD5pkVt85b8
सॅमी डेविस हा हॉलीवूडचा एक
सॅमी डेविस हा हॉलीवूडचा एक गुणी कलाकार. तो केवळ ब्लॅक होता म्हणून त्याला अनेक अपमान सहन करावे लागले. मी त्याला प्रथम सार्जंटस -३ सिनेमात पाहिले. त्या मधला "I can either dance or sing" हा संवाद खूप भावलेला. त्याचा हा किस्सा.
त्याचे किम नोवाक(वर्टिगो) ह्या अभिनेत्रिशी प्रेम संबंध होते, त्यांना लग्न करायचे होते. किम तेव्हा कोलबिया स्टुडीओशी करार बद्ध होती. ही बातमी कोलबिया स्टुडीओच्या बॉस ला समजली तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्याच्या मते अशाने किमचे इंडस्ट्रीत अवमूल्यन झाले असते. (तेव्हाच्या अमेरिकेची कल्पना करा.) त्याने माफियाशी संबंध साधून हे लग्न थांबवण्याचे ठरवले. माफियाने डेवीस ला निरोप दिला की तू ४८ तासात कुठल्यातरी काळ्या स्त्री शी लग्न कर. नाहीतर त्याला आंधळे किंवा लंगडे केले जाईल. डेवीसने दुसऱ्या माफियाशी संपर्क साधून रक्षण करायची विनंती केली. तेव्हा "आम्ही तुला दोन महानगरात संरक्षण देऊ शकू. बाकी तुझे तू बघ." वैतागून त्याने एका ब्लॅक स्त्री शी विवाह केला. पण एका वर्षाच्या आत घटस्फोट घ्यायचा ह्या अटीवर! त्याला अर्थात त्याच्या श्वेत वर्णीय मित्रांनी मित्रांनी मदत होतीच. डीन मार्टिन, फ्रंक सिनात्रा, पीटर लाफोर्ड ( हा जॉन केनेडीचा मेहुणा) हे त्याचे मित्र.
* किमचे इंडस्ट्रीत अवमूल्यन
* किमचे इंडस्ट्रीत अवमूल्यन झाले असते. (तेव्हाच्या अमेरिकेची कल्पना करा.)
>>> ओह, खरंय.
१९६७ साली कायद्याने
१९६७ साली कायद्याने INTERRACIAL लग्न मान्य झाली!!
*INTERRACIAL लग्न
*INTERRACIAL लग्न
>>>
कुठल्याही प्रकारचे ‘विजातीय’ लग्न यावरुन विजय तेंडुलकरांचा ‘ शिव ! शिव !’ हा सुंदर लेख आठवला. त्यातील 1960-70 च्या दशकातला किस्सा रोचक आहे.
हारवर्ड विद्यापीठाच्या संस्कृत विभागात अध्ययन करणारा जॉर्ज हा गोरा अमेरिकी तर शिकागो विद्यापीठात तामीळचे अध्यापन करणारी कौसल्या ही सावळी भारतीय. या दोघांचे प्रेम जमले आणि लग्नाचे ठरले. अर्थातच जॉर्जच्या घरून कडाडून विरोध होता. मग या दोघांनी ते लग्न चोरून येथील एका ल्युथेरियन चर्चमध्ये झटपट उरकायचे ठरवले.
परंतु आयत्यावेळी जॉर्जच्या आईचा विरोध मावळला आणि तिने लग्नाला खुशीने संमती दिली. अशा संमतीने हे लग्न मग वाजतगाजत ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने चर्चमध्ये साजरे झाले. चर्चमधील पाद्री मंडळींनीही उदारपणे तिथे मंगलाष्टके म्हणण्यास परवानगी दिली. अशोक अकलूजकरांनी लिहिलेली ती संस्कृत मंगलाष्टके आनंद भट परांजपे यांनी गळ्यावर टीप लावून म्हटली.
या लेखाच्या समारोपात तेंडुलकर फार मार्मिक लिहून जातात :
“इकडे आम्ही राज्याराज्यातील भांडणे रोज अटीतटीने लढतो आहोत. जाती-पोटजातींची नि भाषांची अंतरे देखील उरीपोटी जपण्यासाठी धडपडतो आहोत आणि ही तरुण पोरे तिकडे देशादेशातले, वर्णावर्णातले, धर्माधर्मातले अंतर परस्पर मिटवून टाकताहेत”.
वा! रोचक किस्सा, धन्यवाद.
वा! रोचक किस्सा, धन्यवाद.
साने गुरुजी ह्यांची
साने गुरुजी ह्यांची "आंतरभारती" संकल्पना हिच आहे.
भारतीयांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या भाषिक राज्यात लग्न करावीत.
+१
+१
महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्यांचा मुलगा असलेल्या माझ्या एका वर्गमित्राने ठरवून गुजराती ( आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या) मुलीशी लग्न केले आहे. त्याची खरी इच्छा आंतरराष्ट्रीय लग्न करण्याची होती परंतु ते न जमल्याने त्याने निदान आंतरराज्जीय केले.
भारतीयांनी आपल्या देशातील
भारतीयांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या भाषिक राज्यात लग्न करावीत. >> परवडणार नाही आजच्या जमान्यात.
“ठरवून” म्हणजे आधी परिचय
.
"भारतीयांनी आपल्या देशातील
"भारतीयांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या भाषिक राज्यात लग्न करावीत" - प्रेमाचा नाही, पण भांडणाचा प्रॉब्लेम होतो.
जुगाड ही भारतियांची जगाला
जुगाड ही भारतियांची जगाला देणगी आहे. दुर्दैवाने जुगाडू लोक प्रसिद्ध नसतात. ते अज्ञात राहतात पण त्यांची प्रतिभा जगभरात पोहोचली आहे.
प्रतिभावंतांच्या धर्तीवर त्यांच्यासाठी जुगाडवंत हा शब्द योग्य वाटतो.
चीन पर्यंत जुगाड हा शब्द पोहोचला आहे. त्याच्या अर्थाच्या छटेसहीत !
https://www.youtube.com/watch?v=bFvpRwrGW3U
* जुगाडवंत >>>
* जुगाडवंत >>>
वा ! भारी शब्द. आवडलाच ...
. . .
जुगाड हा शब्द झाडीबोलीतून आलाय
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%...)
झाडीबोलीतून >>> या भागात
झाडीबोलीतून >>> या भागात हिंदीचा प्रभाव आहे.
जुगाड हा शब्द जुगत या हिंदी शब्दावरून आला असावा असे वाटते. जुगत या शब्दाच्या सुद्धा अनेक अर्थछटा आहेत.
शब्दकोशात असा अर्थ आहे.
a badly assembled collection of parts hastily assembled to serve some particular purpose (often used to refer to computing systems or software that has been badly put together)
जुगत = युक्ती या अर्थाने जुगाड हा शब्द हिंदीतून आलेला असावा हा अंदाज आहे.
* या भागात हिंदीचा प्रभाव >>>
* या भागात हिंदीचा प्रभाव >>> होय.
तसेच
या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. बऱ्याच गावांची नावे ही झाडांच्या नावावर आधारित आहेत. त्यामुळे ही झाडी प्रदेशातील बोली म्हणून झाडीबोली या नावाने ओळखली जाते.
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/buldana/conservation...
जुगत = युक्ती
जुगत = युक्ती
युगत आठवले.
युगत मांडली .....
एक से अनेक ह्या जगप्रसिद्ध अ
एक से अनेक ह्या जगप्रसिद्ध अॅनिमेशनमध्ये जुगत लगानी होगी ऐकले होते. त्यानंतर ती दिदी लगेच एकावर एक दगड ठेऊन दाखवते त्यामुळे मला जुगत् म्हणजे एकावर एक चढणे वाटले होते
युगत आठवले. >> जुग जुग जियो
युगत आठवले. >> जुग जुग जियो हे युगानुयुगे या अर्थाने आहेत.
भरवशाचे साथी, घटस्फोट आणि
भरवशाचे साथी, घटस्फोट आणि पुस्तकांची मालकी
Richard Gekoski हे इंग्लंडमधल्या विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांना पुस्तकांचे प्रचंड वेड होते आणि त्या वेडापाईच त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली. मग ते दुर्मिळ पुस्तकांचे विक्रेते बनले. त्यांनी पुस्तकं आणि माणसं यांची केलेली तुलना रोचक असून ते म्हणतात,
“पुस्तकं माणसापेक्षा अधिक भरवशाची असतात. बहुतेक वेळा ती माणसापेक्षा अधिक जगतात. त्याचबरोबर ती माणसाप्रमाणे बदलत नाहीत आणि धोका देत नाहीत. तसेच माणसाप्रमाणे ती आपले रंग देखील बदलत नाहीत”.
त्यांचे हे चिंतन स्वतःच्या आयुष्यातील घटस्फोटातून आलेले असावे. जेव्हा त्यांचा पहिल्या बायकोशी घटस्फोट झाला तेव्हा त्यांचं राहतं मोठं घर बायकोच्या ताब्यात गेलं. त्या घरात या महोदयांचा बहुमोल ग्रंथसंग्रह होता. आता त्यांनी शोधलेली नवीन जागा लहान होती जिथं तो संग्रह मावणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी बायकोला मूळच्या घरी संग्रह ठेवण्याची विनंती केली आणि तिने ती लगेच मान्य केली.
पुढे दोन वर्षांनी त्यांनी स्वतःसाठी मोठी जागा घेतली आणि भूतपूर्व बायकोकडे पुस्तकसंग्रहाची मागणी केली. पण आता तिने तो परत करण सपशेल नाकारलं आणि तिचीच त्या संग्रहावर मालकी असल्याचा दावा केला. Gekoski ना बसलेला हा फार मोठा मानसिक धक्का होता. त्यातून कसेबसे सावरताना त्यांनी मनाशी असा विचार केला, की जरी आपली प्राणप्रिय पुस्तके आता आपल्याजवळ प्रत्यक्ष नसली तरी देखील त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला दिलेला आकार आणि मनात उभी केलेली आंदोलने हे तर नाहीसे होऊ शकत नाही ना !
प्रसिद्ध चित्रपट-लेखक व
प्रसिद्ध चित्रपट-लेखक व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या डोक्यात जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा तयार होते तेव्हा ती त्यांची मनातल्या मनात संपूर्ण पाठ झालेली असते. त्यांना ती लिहून काढावी लागत नाही. एकदा त्यांनी निर्मात्यांपुढे हातात कोरे कागद धरलेले असताना अशी संपूर्ण कथा वाचून दाखवली. नंतर निर्माते म्हणाले की आता याच्या प्रती काढू, तेव्हा त्यांनी गौप्यस्फोट करून टाकला !
त्यांच्या अशा उत्तम कथनाची सुरुवात शालेय जीवनात इयत्ता सहावीत असतानाच झाली होती.
बापरे. जबरी!
बापरे. जबरी!
छान किस्से. वाचतोय.
छान किस्से. वाचतोय.
Pages