प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहिणी जी, छान पोस्ट. ही माहिती इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या पोस्ट्सचा स्रोत, मधुवंती सप्रे लिखीत (मेहता पब्लिशिंग) ‘ध्यासपर्व’ आहे. आपण शेअर केलेल्या गोष्टींनी एक वेगळा पैलू समोर आला.

डॉ. रोहिणी, मनापासुन आभार.

गेल्या ५०-६० वर्षांत सामाजिक मुल्यांमध्ये खुप वेगाने बदल झालेले आहेत. बालकवी तर १०० वर्षांपुर्वीचे. तेव्हाचे त्यांचे वागणे आजचा चश्मा लाऊन जज करणे, तेही मर्यादित माहिती हाती असताना, हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे

Separate art from person there is a very long bb on this already. Refer hussain paintings. Refer that.

‘नोबेल’चा उत्सव नको
दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना नुकतेच यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांची दूरध्वनीवरून अल्प मुलाखत झाली. मुलाखतकाराने जेव्हा विचारले, की आता तुम्ही काय कराल? यावर शांत स्वरात त्या म्हणाल्या,
“माझं जेवण झालंय. आता मुलासोबत चहा घेईन”.

नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नकार दिला आणि त्या म्हणाल्या,

“सध्या जगातील दोन मोठ्या युद्धांमध्ये लोक मरत असताना पुरस्काराचा कसला उत्सव करायचा ?”

अभिनंदन आणि विनम्र अभिवादन !

बालकवींच्या बाबतीत - माणसा-माणसांमधल्या नात्यांमध्ये 'सत्य' या गोष्टीला अनेक बाजू असाव्यात. प्रत्येकाचं आपल्यापुरतं सत्य.

कैद्यांची नैतिकता व हुशारी
प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत Bertrand Russell यांना 1918 मध्ये ब्रिटिश सरकारने युद्धविरोधी भूमिका घेतल्याबद्दल सहा महिन्यांसाठी तुरुंगात टाकले होते. तुरुंगवासाचा अनुभव घेतल्यानंतर ते म्हणाले,

“अनेक बाबतीत मला तुरुंग खूप सोयीचा वाटला. माझ्यावर काळवेळेचे कोणतेच बंधन नव्हते, मला कुठलाही अवघड निर्णय घ्यायचा नव्हता, मला कटकटे फोन येण्याची भीती नव्हती आणि माझ्या चिंतनात अडथळा आणणारे तिथे काहीही नव्हते. या सगळ्याचा फायदा उठवत मी प्रचंड वाचन केले आणि त्याचबरोबर Introduction to Mathematical Philosophy हे अवघड विषयावरील पुस्तक लिहू शकलो. तसेच मला Analysis of Mind या पुस्तकाची प्राथमिक तयारी देखील करता आली.

या काळात मी मोठ्या उत्सुकतेने माझ्या बरोबरीच्या इतर कैद्यांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यातून मला जाणवले, की इतर समाजाशी तुलना करता या कैद्यांची नैतिकता अजिबात कमी नाही. फक्त गुन्हा करताना ते पकडले गेले, यातून त्यांची हुशारी थोडी कमी पडल्याचे मात्र म्हणता येईल !”

हिंदी चित्रपट : पहिले पार्श्वगायन
1935 मध्ये धूप छाँव हा नितीन बोस दिग्दर्शित हिंदी चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या चित्रपटापूर्वी नट आणि नटींनाच चित्रपटात अभिनयासहित गायन करावे लागे. धूप छाँव हा पहिला हिंदी चित्रपट, ज्यामध्ये पार्श्वगायनाचा वापर करण्यात आला. नितीन यांचे भाऊ मुकुल बोस हे ध्वनीतंत्रज्ञ होते. त्यांनी ही संकल्पना प्रथम मांडली.
के. सी. डे आणि अन्य काही गायकांनी त्यातील गाणी गायली आहेत.

https://myswar.co/album/dhoop-chhaon-1935
चित्रपट गायनातील ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
. . .
पार्श्वगायनाच्या सुरुवातीच्या काळात अशा गायकांकडे विशेष आदराने पाहिले जात नसे आणि त्यांना दिलेले मानधन देखील सामान्य असे. मात्र 1950 मध्ये उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी ही परंपरा मोडून सन्माननीय- नव्हे, लठ्ठ- मानधनाचा पायंडा पाडला. मुघल-ए-आजम मधील पार्श्वगायनासाठी त्यांनी प्रति-गाणे पंचवीस हजार रुपये घेतले होते. हे त्या वेळच्या इतरांच्या मानधनाच्या तुलनेत शंभर पट अधिक होते ! त्यांनी पार्श्वगायक या भूमिकेत हिंदी चित्रपटात गायलेली ही दोनच गाणी आहेत.
https://www.dnaindia.com/bollywood/report-india-s-highest-paid-singer-ba...

त्यानंतरच्या पार्श्वगायकांच्या दोन-तीन पिढ्यांनी देदीप्यमान यश तर मिळवलेच आणि त्याचबरोबर गायनाचा आनंद श्रोत्यांच्या घराघरात नेऊन ठेवला.

पहिलं पार्श्वगायन कुठलं याबद्दल वाद आहेत. काहींनी याचं श्रेय संगितकार सरस्वतीदेवींना दिलं आहे. काहींच्या मते पहिला प्रयोग केशवराव भोळ्यांनी केला.
अभिनेत्याने नुसतं तोंड हलवलं आणि मागे लपलेल्या गायकाने आवाज देऊन हे दोन्ही एका वेळी ध्वनिचित्रमुद्रित झालं , असाही पार्श्वगायनाचा एक प्रयोग झाला.
रेकॉर्डस वर आणि रेडियोवर पार्श्र्वगायकाचं नाव लागण्याची पद्धत लताच्या आएगा आनेवाला मुळे सुरू झाली. आधी त्या पात्राचं नाव लागे. पण आएगा आनेवाला कोणी गायलंय हे विचारणाऱ्या पत्रांचा मारा झाला आणि हे बदललं.

बडे गुलाम अली खां यांना चित्रपटासाठी गायचं नव्हतं, म्हणून म्हणे त्यांनी इतकी मोठी रक्कम सांगितली, की निर्माता आणि संगीतकार परत जातील. पण मेहबूब खान वेडाच होता.

*पहिलं पार्श्वगायन कुठलं याबद्दल वाद आहेत. >>>
शक्य आहे. म्हणून मी "हिंदी चित्रपटातील' म्हटले. ( धूप छाँव त्याच वर्षी प्रथम बंगालीत आला. त्यातील पार्श्वगायन भारतातले पहिले ?? )
..
*केशवराव भोळ्यांनी >>> कोणत्या भाषेत ?

भोळ्यांचा चित्रपट प्रभातचा म्हणजे हिंदी असणार.
ही माहिती मी वसंत पोतदार यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचली होती. पुस्तक संगीतकारांवर आहे, पण सुरुवातीला हिंदी चित्रपटसंगीताचा इतिहासही लिहिला आहे.

“ बडे गुलाम अली खां यांना चित्रपटासाठी गायचं नव्हतं, म्हणून म्हणे त्यांनी इतकी मोठी रक्कम सांगितली,” - हेच मी सुद्धा वाचलंय. त्यामुळे त्यांनी पार्श्वगायनासाठी मोठी बिदागी मिळण्याचा पायंडा पाडला असं म्हणता येणार नाही.पार्श्वगायकांना चांगले पैसे (आणि मान) मिळण्यात लता चा मोठा वाटा आहे असं मला वाटतं.

बालकवी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाबद्दल काहीच माहिती नव्हतं, आत्ताच वाचायला घेतलं, एकामागोमाग एक वाचत गेल्यावर, मनात एकेक यायला लागलं पण त्यांच्या पणती डॉक्टर रोहिणी यांच्या पोस्टमुळे, मन शांत झालं.

नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना दंडवत खरोखर.

>>रद्दीच्या जगातील जिद्दीचा माणूस !>> खूप छान. आदर वाटला.
>>नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना दंडवत खरोखर.>>> +1

आतापर्यंत आपण अनेक अस्सल प्रतिभावंत पाहिले. आता गंमत म्हणून खालील मजकूर केवळ हसण्यासाठी . . . Happy Happy

चोर हा एक उत्तम कलाकार असतो असे म्हटले जाते. या संदर्भात जागतिक पातळीवर काही जणांनी चांगलेच ‘नाव’ कमावलेले आहे. त्यापैकी एक भारतीय म्हणजे मिथिलेश कुमार श्रीवास्तव. श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गरिबांमध्ये वाटणे हा त्याचा उद्योग. त्याच्या या रॉबिनहूड प्रकारच्या कामामुळे त्याला नटवरलाल हे टोपणनाव मिळाले.

त्याच्या अभूतपूर्व चौर्य कामगिरींमध्ये ताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन परदेशी पर्यटकांना विकून टाकण्याचा समावेश आहे ! ताजमहाचे विक्रीखत तर त्याने तीनदा तयार केले होते. त्याला अनेक वेळा अटक झाली परंतु तो कायम तुरुंगात कधीच राहिला नाही. दहा वेळा तरी तुरुंग फोडण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

त्याने टाटा, बिर्ला आणि अंबानी यांना पण गंडवल्याचे म्हटले जाते. 1987मध्ये वाराणसीचे पोलीस अधीक्षक अरविंद जैन यांनी,
“श्रीवास्तव हा अत्यंत हुशार माणूस असून आपल्याला त्याच्या भूतकाळाचा अभ्यास केला पाहिजे”, असे मत व्यक्त केले होते.

त्याच्या जीवनावरून प्रेरणा घेऊनच 1979मध्ये अमिताभचा मिस्टर नटवरलाल, तर 2014 मध्ये राजा नटवरलाल हा चित्रपट तयार केला गेला.

https://en.wikipedia.org/wiki/Natwarlal
https://www.india.com/viral/indias-biggest-con-artist-sold-taj-mahal-ras...

प्रेक्षकाच्या खुर्चीतला दिग्दर्शक !
सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग यांच्या कारकिर्दीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. चित्रपट निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांचे स्वतःच्या कामाबद्दलचे एक वाक्य मार्मिक आहे :

“I always like to think of the audience when I am directing, because I am the audience "

* Jaws >> अगदी अगदी !
मी तो साधारण 1980च्या दरम्यान पाहिला होता - तेव्हाच्या 70 एमएम पडद्यावर. पाहायला जायच्या आधी तो पाहून आलेल्या मित्राने सांगितले होते, की एका विशिष्ट क्षणी संपूर्ण थिएटर जबरदस्त दचकते. त्याचा खरोखरच अनुभव घेतला. अर्थात त्याने मला आधी सांगितल्यामुळे माझे दचकणे थोडे कमी झाले होते.
तरीही तो आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहेच.

सुदेश भोसले
यांच्या घराण्यात 3 पिढ्या गायकी आहे. त्यांच्या आजी दुर्गाबाई शिरोडकर (आग्रा घराणे) आणि आई सुमन भोसले या दोन्ही उत्तम गायिका. त्याच बरोबर वडील व्यावसायिक चित्रकार. त्यामुळे घरात शुद्ध शास्त्रीय संगीत आणि चित्रकला या दोन्ही अभिजात कला नांदत होत्या.

ते लहान असताना त्यांच्या घरात शास्त्रीय, नाट्य आणि सुगम संगीत एवढेच ऐकायची परवानगी होती. चुकून जर त्यांनी किशोरकुमारची गाणी लावली तर वडील त्यांच्यावर चांगलेच खेकसायचे. त्यामुळे त्यांना ती गाणी वडील घरात नसतानाच ऐकावी लागत आणि ती ऐकत असताना वडील आल्याची चाहूल लागली रे लागली की लगेच ते सुगम संगीत लावून टाकायचे !

(त्यांच्या रोचक मुलाखतीतून : https://www.youtube.com/watch?v=zyHWHpC9Ty8)

पोस्ट वाचली, छान माहिती आहे. मुलाखत बघितली नाही. मला सुदेश भोसलेचा आवाज विशेष आवडला नाही कधीच. स्वतःचे असे वेगळेपण नाही त्यांच्या आवाजात. नेहमी अमिताभची नक्कल किंवा मिमिक्री केलेली बघितली आहे. मिमिक्री उत्तमच करतात पण मिमिक्री आर्टिस्टच वाटतात. आर्तता, मार्दव दोन्ही जाणवले नाही त्यांच्या आवाजात. एक्स्प्रेशन पण फार वरवरचे ऑर्केस्ट्रा टाईप वाटायचे. चांगली गाणी गायली असतील तर कल्पना नाही. माझी झेप त्यांच्या 'जुम्मा चुम्मा दे दे' इतपतच मर्यादित आहे.

आनंद बक्षी हे गीतकार म्हणून सर्वांच्याच माहितीचे आहेत.
चरस चित्रपटाची गाणी त्यांनी लिहीलेली आहेत. यातलं "आजा तेरी याद आई" या गाण्याला काही तरी वेगळं रूप द्यावं असं युनिटला वाटलं.
बक्षीसाहेबांनी मग एक रूबाई गाण्याच्या आधी लिहीली. तिचे शब्द बक्षींच्या प्रतिभेची साक्ष देतात.

एव्हढा एक पीस नरेंद्र चंचल सारख्या गायकांच्या स्केल मधे छान वाटेल असे बक्षींना वाटले.

पण लक्ष्मी प्यारेंनी आनंद बक्षींनाच या दोन ओळी गायला सांगितल्या. त्यानुसार आनंद बक्षी गायले.
त्यांची गायकी ऐकून मोहम्मद रफी विलक्षण प्रभावित झाले. लता मंगेशकर यांनीही त्यांचं दिलखुलास कौतुक केलं.

बहुआयामी प्रतिभेचे धनी !

आनंद बक्षींनी लतासोबत गायलेलं बागों मे बहार आयी ऐकलं आहे. आता शोधलं तर त्यांनी शोले मध्येही एक गीत गायलं आहे , असं दिसलं. कव्वाली आहे आणि ती याआधी ऐकल्याचं आठवत नाही.

Pages