प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“आज कोणतीही बातमी नाही,” इति BBC !
सध्या बातमी देणाऱ्या कोणत्याही माध्यमातून एखाद्या दिवशी जर, ‘आज कोणतीही बातमी नाही’ अशी ‘बातमी’ दिली जाणे हे शक्य वाटते का ? खरंतर हा विनोदच वाटेल. परंतु इतिहासात असे घडलेले आहे, ते म्हणजे बीबीसी रेडीओच्या बाबतीत 18 एप्रिल 1930 रोजी.

त्या दिवशी रेडिओवरील रात्रीच्या 8:45च्या बातम्यांची सुरुवात,
“आज कोणतीही बातमी नाही”
अशी झाली आणि पुढील पंधरा मिनिटे त्या रेडिओने श्रोत्यांना फक्त पियानो संगीत ऐकवले.

या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमागचा इतिहास इथे वाचता येईल : https://origins.osu.edu/milestones/bbc-no-news-day

1927मध्ये बीबीसीची सुरुवात एक खाजगी उद्योग म्हणून झाली होती. पुढे त्याचे सार्वजनिक प्रकल्पात रूपांतर झाल्यानंतर त्याची सूत्रे पहिले महासंचालक John Reith यांनी हाती घेतली. वृत्तमाध्यमांवर असलेले जाहिरातदारांचे वर्चस्व आणि सनसनाटीपणा या गोष्टींना विरोध करण्याचा रिथ यांचा उद्देश होता. बीबीसीला स्वतःची काही मूल्ये प्रस्थापित करायची होती. म्हणूनच, ‘आज कोणतीही बातमी नाही’ या घोषणेतून त्यांनी त्यांचे चातुर्य व स्वातंत्र्य दाखवले होते.

ऑर्डर ऑफ मेरिट
सध्या 2024चे नोबेल पुरस्कार क्रमाने जाहीर होत आहेत. या पुरस्काराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या घटनेनुसार तो फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जातो. याच धर्तीवरचा अजून एक पुरस्कार म्हणजे ब्रिटनचा ऑर्डर ऑफ मेरिट (OM).

OM हा पुरस्कार देखील फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जातो. इतकेच नाही, तर कोणत्याही एका काळी केवळ 24 व्यक्ती OM असू शकतात. त्यातील एखादी व्यक्ती मृत्यू पावली तरच नव्या व्यक्तीला निवडले जाते.

हा पुरस्कार ब्रिटिश राष्ट्रकुलातील देश आणि काही मानद देशांसाठी ठेवलेला आहे. या पुरस्कारासाठी निवड करताना लष्करी सेवा, विज्ञान, कला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांचा विचार केला जातो.
सध्याच्या 24 च्या यादीमध्ये भारतीय वंशाचे जीवशास्त्रज्ञ वेंकटरमण रामकृष्णन यांचा समावेश 2022 मध्ये केलेला आहे.

या पुरस्कारासाठी निवड होऊनही तो नाकारल्याची काही उदाहरणे आहेत. यामध्ये Rudyard Kipling व George Bernard Shaw यांचा समावेश आहे.

विजय तेंडुलकर हे चतुरस्त्र साहित्यिक होते. त्यांना सर्वाधिक कीर्ती नाटककार म्हणून मिळाली. त्यांनी मोजून दोन कादंबऱ्या लिहीलेल्या असून त्यांची शीर्षके खास ‘तें’ पद्धतीची आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत :
‘कादंबरी एक’
‘कादंबरी दोन’.

वरील दोन्ही नावावरून कादंबरीच्या आशयाचा काही बोध होत नाही. कदाचित तसा व्हावा अशी गरजही त्यांना वाटली नसावी. ‘कादंबरी एक’ च्या पहिल्या पानावरच्या ओळी लक्षवेधी आहेत :

‘निघण्याचे गाव
आणि पोचण्याचे गाव
या दरम्यान अनेक
गावे असतात.
इतकेच नव्हे तर गावांमध्ये गावे
असतात.
ती पहावीत’.

कादंबरी ‘एक’ मध्ये लग्नसंस्थेचे विदारक रुप त्यांनी समोर आणले आहे. तर ‘दोन’चा विषय आहे ‘सत्ताकांक्षा आणि त्याच्या पूर्तीसाठी खेळले जाणारे राजकारण’.

माझ्या मतानुसार पुस्तकाच्या नावापेक्षा लेखकाचे नाव बघूनच पुस्तके खरेदी केली जातात, त्यामुळे पुस्तकाचे नाव काय आहे, याने फारसा फरक पडू नये. (विशेषत: कादंबरीच्या बाबतीत तरी). फार तर पुस्तक कसल्या संदर्भात आहे ते कळणार नाही, पण त्याने कितीसा फरक पडतो? समजा, पुस्तकाचे नाव ठेवले असते "गंजलेली बेडी" आणि दुसरे "खुर्चीचा खेळ", तर त्यावरून काय कळले असते, कितपत फरक पडला असता?

उबो
आत्ताच तिकडे वाचले.
"ह्या गोष्टीला नावच नाही!" असे एका पिक्चरचे "नाव" आहे.
बाकी नावात काय आहे म्हणा!
पिक्चरला "नावं" ठेवण्यासाठी तरी "नाव" असावे.

माझ्या मते ' ‘कादंबरी एक’ व ‘कादंबरी दोन’ ही शीर्षके खास ‘तें’ पद्धतीची आहेत.
त्यातून विषय न कळल्यामुळे कुतुहल अधिक चाळवले जाईल असे लेखकाला वाटले असावे, अशी शक्यता आहे.

छापील पुस्तक खरेदी करणारे बरेचसे वाचक पुस्तक पाच दहा मिनिटे तरी चाळून बघतात. त्यातून विषयाचा अंदाज येईलच.

कुमार१
अगदी खर आहे.
मार्केटिंग गिमिक्स!

एखाद्या पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठ कसे असावे यासंबंधी आतापर्यंत लिहिलेल्या किश्यांमधून लेखकांच्या वेगवेगळ्या ‘तऱ्हा’ दिसल्या आहेत त्या अशा :

  • पुस्तकाच्या नावातून आशय व्यक्त झाला(च) पाहिजे
  • आशय व्यक्त झाला नाही तरी चालेल
  • नाव गूढ पाहिजे किंवा चित्रविचित्र वाक्य हवे
  • मुखपृष्ठचित्र आशयाची सुसंगत पाहिजे
  • मुखपृष्ठावर स्त्री आणि पुरुषाचे एकत्र चित्र हवे (च)
  • मुखपृष्ठावर आकर्षक स्त्रीचे चित्र हवे (च)
  • मुखपृष्ठावर अजिबात चित्र नको; फक्त शीर्षक पुरे
  • मुखपृष्ठावर चित्र नको पण दर्जेदार अक्षरसुलेखन हवे
  • मुखपृष्ठावर ‘आधुनिक चित्रकला’ प्रकारातील चित्र हवे, जे सामान्य वाचकांना समजतेच असे नाही !

Happy

बरोबर, सगळा मार्केटिंगचा प्रकार. म्हणूनच म्हणत असतील Don't judge a book by its cover. Wink

@केशवकूल
योगायोगाने मी पण लगेच, तुम्ही म्हणताय तोच धागा वाचला. Happy

थोडे अवांतर.
लेमोनी स्निकेट( Daniel Handler) नावाचा माझा आवडीचा लेखक आहे. त्याने "ए सेरीज ऑफ अन्फोर्च्युनेट इवेंटस" नावाची १३ भागांची कादंबरी लिहिली आहे. प्रत्येक पुस्तकावर त्याने आवर्जून कळकळीने लिहिले आहे," प्लीज डोन्ट रीड धिस बुक..."! सापडले तर इथेच लिहीन.

John Reith हे अदभूत रसायन होते.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राइथ व्याख्याने बिबिसी आयोजीत करते, बिबिसीच्या वेबसाईटवर त्यांची ध्वनीमुद्रणे मोफत उपलब्ध आहेत! अवश्य ऐकावीत.

*" प्लीज डोन्ट रीड >> छान ! आवडले.
. . .
फ्रेंच लेखक मार्सेल बेनाबू या लेखकांच्या दोन पुस्तकांची शीर्षके पण मजेशीर आहेत :

  1. Dump this book while still you can
  2. Why I have not written any of my books

. . .
रमेश रघुवंशी यांच्या १९८९ मधील एका पुस्तकाचे शीर्षक :
‘इंदिरा गांधींचा टळलेला खून आणि इतर लेख’

" प्लीज डोन्ट रीड" >> छान ! आवडले.
बडे लोग बडी बाते.
माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने काढलेच एखादे पुस्तक आणि लिहिलेच असे काही तर वाचक ताबडतोब ऐकतील.

SharmilaR
नाही. असे नाहीये.
लेमोनी स्निकेट ह्यांचे हे पहिलेच पुस्तक होते. नाव "Bad Beginning"
त्याच्या पहिल्या परिच्छेदात ते लिहितात," C H A P T E R
One
If you are interested in stories with happy endings, you would be better off reading some other book. In this book, not only is there no happy ending, there is no happy beginning and very few happy things in the middle. This is because not very many happy things happened in the lives of the three Baudelaire..."
केवळ ह्याच्या मुळेच मी पुस्तक विकत घेतले आणि मग सगळी पुस्तके वाचुन काधली.
आहा हे पहा.
"Dear Reader, If you have just picked up this book, then it is not too late to put it back down. Like the previous books in A Series of Unfortunate Events, there is nothing to be found in these pages but misery, despair, and discomfort, and you still have time to choose something else to read. ”

— Lemony Snicket, The Ersatz Elevator

वा, रोचक !
. . . .
. . . .
पुस्तकाचे शीर्षक फक्त अंकांमध्ये असलेली काही ठळक उदाहरणे व लेखक :

  • 1984 : George Orwell
  • 11/22/63 : Stephen King

. . . . .
खेळांमधील जागतिक विक्रमाशी संबंधित काही अंक पुस्तक शीर्षकात अजरामर झालेत :

  • 400, not out : Brian Lara
  • Usain Bolt: 9.58

चेतन भगतच्या कादंबऱ्यांच्या शीर्षकामध्ये नेहमी एकतरी अंक असतो.

Five Point Someone
One Night @ the Call Center
The 3 Mistakes Of My Life
2 States
Revolution 2020
Half Girlfriend

केकू , माझ्याकडेही आहे Series of unfortunate events ( चे तेरा अभद्र अध्याय) . आमच्याकडे हॅरी पॉटरपेक्षा जास्त आवडले ते.

मागे एकदा अमितवने देखील मला असे सांगितले होते हे मला आठवले. मला असे वाटायचे कि लेमोनी स्निकेटची पुस्तके प्रौढ वाचकांसाठी आहेत. इतके गूढ वातावरण त्यात आहे. पण असे दिसतंय कि ती YA प्रकारात मोडतात. काहीही असो मी त्याचा फॅन आहे हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही.

वेटिंग फॉर गोदो
सॅम्युएल बेकेट यांचे हे बहुचर्चित नाटक. मूळ फ्रेंचमधून इंग्लिशमध्ये रुपांतरीत केलेले. या नाटकाने नाट्य लेखनाचे सगळे संकेत व साचे मोडून एक नवीच शैली निर्माण केली. उघड्या माळरानावर घडणारे हे नाटक. या नाटकात ‘काही घडत नाही, कोणी येत नाही की जात नाही’ अशी एक गोठलेली अवस्था प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. दोन माणसे गोदो येण्याची वाट पाहत आहेत व गोदो येत नाही इतकेच त्या नाटकाचे कथानक.
गेल्या 71 वर्षांत हा गोदो कोण याची अनेक उत्तरे अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु निश्चित असे उत्तर कोणालाच सापडलेले नाही. एकदा तर नाट्य रसिकांनी बेकेट यांनाच, ‘हा गोदो कोण’ हा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले होते,
मला ते माहित असते तर तसे मी नाटकात म्हटले असते”.

जागतिक रंगभूमीवर ‘हॅम्लेट’च्या खालोखाल दीर्घकाळ चर्चा झालेले हे नाटक असे म्हटले जाते.
. . .
अनेकार्थता आणि संदिग्धता ही बेकेट यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये असून त्यांच्या ‘कम अँड गो’ या तीन मिनिटांच्या नाटुकल्याचा यापूर्वीच परिचय करून दिलेला आहे : https://www.maayboli.com/node/79719

वेटींग फॉर गोदो ची ओळख दूरदर्शनने लहानपणी करून दिली होती. नाटक, सिनेमा यातलं फारसं काही समजत नसतानाही या फॉरमॅटने मंत्रमुग्ध केलं. गोदोची भुरळ नंतर कधीही ओसरली नाही. जालावरा व्हिडीओ उपलब्ध झाल्यावर पुन्हा मूळ नाटक पाहिले आणि मग त्यांची इतर नाटकेही पाहिली. दूरदर्शनचं महत्व आता कधी नव्हे इतकं जाणवतंय. प्रेक्षकांची अभिरूची समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. आभार मानावेत तेव्हढे थोडे आहेत. त्या वेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम कमी असल्याने सडकून टीका झेलावी लागली होती दूरदर्शनला.

मागे मायबोलीवरच अ‍ॅब्सर्ड थिएटरचं आणखी एक नाटक कुणीतरी दिलं होतं. ते डोक्यावरून गेलं. एकही संवाद नसलेलं ते नाटक गोदो प्रमाणेच किंवा थोडं पुढे जाऊन मेंदूत गिरमिट फिरवतं. आता नाव लक्षात नाही.

पण वाळवंटात काही लोक असतात. खड्डा खणत असतात एव्हढं लक्षात आहे.

* वाळवंटात काही लोक असतात
>>>
ते HIGH असावे
https://www.youtube.com/watch?v=Qb_eMMqUjTA
Samuel Beckett Act Without Words

हे एकपात्री मूकनाट्य (14 मिनिटे) :
वाळवंटात पडलेला एक तरुण आणि त्याची उंचावरच्या घोटभर पाण्यासाठी चाललेली धडपड
बहुतेक हेच ना ?

बरोबर सर.
धन्यवाद शोधून दिल्याबद्दल.

आणखी एक आहे अशाच पद्धतीचं. ते सॅम्युएल बेकेटचं नाही. त्यात अनेक जण आहेत.
आठवल्यावर इथे सांगेन.

"खरं सांगायचं झालं तर..." "वेटिंग फॉर गोदो" ही कथा प्रथम मी मी मी लिहिली. नंतर कुणा सम्युएल नावाच्या इसमाने त्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर करून त्याच्या वर नाटक काढले. मला क्रेडीट --ओके श्रेय-- न देता. चालायचंच. प्रतिभावंतांच्या तऱ्हा!
https://www.maayboli.com/node/81296

Pages